Monday, 7 August 2017

शी जिन पिंग वि. चिनी सैन्य

माझ्या मागल्या लेखामधल्या ह्या संघर्षाच्या उल्लेखावरती काही जणांचा विश्वास बसला नाही. असो. प्रत्येक मुद्दा पटतो असे नाही. पण संघर्षाचे चित्र खरे आहे असे मानण्यासाठी कोणताही ठाम पुरावा नसल्याचे प्रतिपादन काही ठिकाणाहून केले जाते. म्हणून हा खास लेख लिहित आहे. त्याच उद्देश हा आहे की वरकरणी चीन हा एकसंध दगडासारखा अभेद्य वाटला तरी आतून मात्र अनेक संघर्षाचे अनेक अंकुर जीव धरत असतात. ह्या मध्ये नवल वाटाण्याचे कारण नाही कारण सर्व प्रकारच्या समाजामधली ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

चीनच्या राजकीय प्रणालीमध्ये तीन पदे महत्वाची असतात. पहिले म्हणजे पक्षाच्या जनरल सेक्रेटरीचे पद (सीपीसी). दुसरे महत्वाचे पद म्हणजे सेंट्रल मिलिटरी कमिशन (सीएमसी) आणि तिसरे पद अर्थातच राष्ट्राध्यक्ष पद. माओ झे डॉंन्ग यांच्यानंतर देन्ग हे प्रबळ नेते मानले गेले पण त्यांच्या हाती १९८१ ते १९८९ पर्यंत फक्त सीएमसीचे प्रमुखपद होते. उर्वरित दोन पदे त्यांच्यापाशी नव्हती त्यातून असा अर्थ लावला जातो की सीएमसीचे प्रमुखपद हेच राजकीय वर्तुळामध्ये महत्वाचे पद आहे. त्यांच्यानंतर जियांग झेमीन आपल्या कारकीर्दीमध्ये सीपीसीचे जनरल सेक्रेटरी (१९८९ - २००२) , सीएमसीचे प्रमुख (१९८९ - २००४) आणि राष्ट्रप्रमुख (१९९३ - २००३) अशा तिन्ही पदावरती काम करत होते. त्यांच्यानंतर २००२ - २०१२ पर्यंत सीपीसीचे जनरल सेक्रेतरी, सीएमसीचे चेयरमन म्हणून २००४ ते २०१२ आणि २००३ ते २०१३ पर्यंत राष्ट्रप्रमुख म्हणून हु जिन ताओ यांनी काम बघितले. म्हणजेच २००२ ते २००४ पर्यंत हु जिन ताओ ह्यांच्याकडे सीएमसीचे पद नव्हते. जियांग यांनी पार्टीचे सेक्रेटरी पद जरी सोडले तरी त्यांनी सैन्याचे प्रमुखपद सोडले नव्हते. ह्याचे कारण स्वतः जियांग आणि अन्य पार्टी सभासद ह्यांचा हु ह्यांच्यावरती पुरेसा विश्वास नसावा. कारण हु मूळचे शांघायकडचे नव्हते. पॉलिटब्यूरोमध्ये शांघाय गॅंगचे (किंवा क्लिक) वर्चस्व होते. त्यांना जियांग जवळचे वाटत. पण ह्या गोंधळात लष्कराची पळापळ होती. कारण पार्टी प्रमुख हु तर सैन्याला जावे लागे जियांग ह्यांच्याकडे. अखेर जियांग यांनी राजिनामा दिला तेव्हा कुठे हु ह्यांच्या हाती सत्ता आणि तिन्ही महत्वाची पदे आली. १८ व्या कॉग्रेसमध्ये जेव्हा सत्तांतर झाले तेव्हा सैन्याने हु जिन ताओ ह्यांनी बनवलेल्या रिपोर्टला पाठिंबा दिला एव्हढेच नव्हे तर सैन्याने पार्टीला संपूर्ण सहयोग देऊन तिला सर्वोच्च मानावे हे कबूल केले होते.

कॉंग्रेसच्या बैठकीमध्ये मावळत्या पार्टी सेक्रेटरीच्या अहवालावरती प्रतिनिधी चर्चा करतात. १८ व्या कॉंग्रेसच्या बैठकीमध्ये नवनिर्वाचित सेक्रेटरी शी जिन पिंग ह्यांनी देन्ग ह्यांच्या विचारसरणीच उल्लेख केला पण माओ झे डॉन्ग यांच्या विचारसरणीचा उल्लेख देखील केला नाही याची जगभरच्या निरीक्षकांनी नोंद घेतली. पुढच्याच वर्षी चॉंन्गकिंग शहराचे प्रमुख बो शी लाय यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांची संपत्ती तसेच पार्टीतील पदे काढून घेण्यात आली. हे बो शी लाय माओच्या विचारांवरती पार्टीने पुनश्च वाटचाल करावी म्हणून आग्रही होते. त्यांच्यावरील् कारवाईनंतर वेन जिया बाओ यांनी त्यांची विचारसरणी त्यांच्या र्‍हासाला कारणीभूत झाल्याचे म्हटले पण हु जिन ताओ ह्यांना काही ते पटले नाही. त्यांनी बो शी लाय ह्यांचा खटला केवळ गुन्हेगारी स्वरूपाचा म्हणून बघितला जावा असे प्रतिपादन केले. त्याचा पार्टीमधील कुरबुरींशी संबंध जोडू नये असे ही ते म्हणाले. इथेच वरून एकसंध दिसणार्‍या चीनच्या कम्युनिस्ट पक्षामध्ये मतभेदाच्या चिरा किती खोलवर गेलेल्या आहेत त्याची कल्पना आपण करू शकतो.

१९६६ पासून ते १९७६ पर्यंत माओ यांनी चालवलेल्या कल्चरल रेव्होल्यूशनमध्ये चिनी समाज भरडून निघाला. शी जिन पिंग ह्यांच्याबरोबर सीपीसीचे सभासद म्हणून ज्यांची निवड झाली होती त्या सर्वांचे लहानपण कल्चरल रेव्होल्यूशनमध्ये भरडून निघाले होते. त्याचा त्रास त्यांच्या मातापित्यांनी भोगला - त्यांनी भोगला पण देन्ग ह्यांनी केलेल्या सुधारणांचे फळही त्यांच्या पिढीच्या वाट्याला आले आहे. असे सहकारी घेऊन शी ह्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. हे महत्वाचे तपशील आहेत.

अर्थातच ह्याचा अर्थ असा होतो की चीनच्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये जे किमान दोन प्रवाह आहेत त्यामधल्या एकाला माओ यांच्या विचारसरणीने काम करण्याची अजिबात इच्छा नाही. आजच्या घडीला चीन हा फक्त पक्षाची हुकूमशाही राबवण्यापुरताच कम्युनिस्ट राहिला आहे. देन्ग ह्यांच्या राजवटीपासून पार्टी रिव्हिजनिस्ट बनली. क्रांती झाली राजेशाही संपली आता हे तत्वज्ञान पुरे असे वाटणार्‍या गटाला देन्ग ह्यांनी पुढे आणले. त्यांनीच चीनमध्ये क्रमाक्रमाने आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. हाच काळ होता १९८९ नंतरचा जेव्हा सोव्हिएत रशियाची शकले उडालेली चीनच्या राज्यक्र्त्यांनी पाहिली. तिथेही तिआन आन मेन चे धाडसी आंदोलन झाले आणि ते निर्दयपणे दडपले गेले. ह्यानंतर आपली पकड ढिली पडू न देता आर्थिक सुधारणा घडवण्यासाठी जी पावले उचलली त्यातून चीन हा एक आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करू लागला. असे असूनही आजदेखील माओ ह्यांची विचारसरणी मानणारे पक्ष सदस्य आहेत आणि ते विविध महत्वाच्या पदांवरती कामही करत आहेत.

१८ व्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये चिनी प्रीमियर वेन जियाबाव म्हणाले होते की लवकरात लवकर राजकीय सुधारणा होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर पुन्हा एकदा कल्चरल रेव्होल्यूशनचा धोका संभवतो. जियाबाव हे सुधारणावादी समजले जातात. चीनच्या आर्थिक धोरणातील बदलाचे पुरस्कर्ते  समजले जातात. चिनी समाजामध्ये नव्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत - त्यांचे निराकरण केले नाही तर पुनश्च कल्चरल रेव्होल्यूशन उदयाला येईल. ज्या चुकांमुळे ही क्रांती करण्यात आली त्यांची कारणे समूळ नष्ट झालेली नाहीत. त्यांचा नायनाट करणे महत्वाचे आहे. "

शी जिन पिंग ह्यांनी आपल्या भाषणामध्ये माओच्या तत्वज्ञानाचा उल्लेख केला नाही. इतकेच नव्हे तर ह्या आधी पक्षाच्या घटनेमधून माओचे विचार काढून टाकावेत अशा अर्थाची विधाने केली गेली होती. म्हणून बो शी लाय ह्यांच्यावरील कारवाईने हा विवाद संपलेला नाही आणि त्यावरील खळबळ अजून ताजी आहे हे लक्षात येते. शांघायच्या प्रमुखपदावरती एका बोल्शेविकाची निवड नुकतीच झाली आहे!

बो शी लाय ह्यांच्यावरील कारवाईनंतर त्याच चॉंन्गकिंग शहराचे प्रमुख सुन झेंग कई ह्यांच्यावरही तशीच कारवाई करण्यात आली आहे. शी जिन पिंग ह्यांच्या राजकीय विरोधकांवरच्या ह्या धडाकेबाज कारवाया चालूच राहतील. ऑक्टोबर २०१७ मध्ये १९ व्या कॉंग्रेसचे अधिवेशन भरेल आणि विरोधकांचा पडदाफाश केल्यामुळे शी ह्यांचे वर्चस्व तिथे राहील ह्यामध्ये शंका नाही. 

ज्या शांघाय क्लिकचे प्रतिनिधी पार्टीची सूत्रे हलवतात त्यांचे आणि लष्कराचे विवाद असणे स्वाभाविक आहे. शी ह्यांच्या आधी हु सैन्यप्रमुख देखील होते. आणि त्यांच्याशी प्रामाणिक असणारी काही मंडळी तिथे शी यांच्या कारकीर्दीतही असण्याची शक्यता आहे. बीजींगमध्ये महत्वाच्या पदावरती आरूढ होण्या आधी हु यांची नेमणूक तिबेटमध्ये करण्यात आलेली होती. तिबेटी लोकांचे बंड अत्यंत निर्दयपणे चिरडून टाकण्यामागे हु ह्यांचे आदेश होते. आजदेखील दोकाला येथे जे दृष्य बघायला मिळत आहे त्यामागे चिनी सैन्य आणि तिबेटचा इतिहास ह्यांची सांगडा असू शकते.

चीनच्या सामान्य जनतेच्या मनामध्ये आजही अमेरिकेविरुद्ध आणि पाश्चात्यांविरुद्ध अत्यंत प्रक्षोभाच्या भावना आहेत. पूर्व किनार्‍यावरील चार ते पाच राज्ये सोडली तर उर्वरित चीनमध्ये अजूनही आधुनिकतेचे जीवन जनतेच्या वाट्याला आलेले नाही. अशा जनतेच्या भावविश्वामध्ये आजही फरक पडलेला नाही. पण शांघाय सकट अन्य चार प्रांतांमध्ये - जिथे आधुनिकतेचे नवे वारे जनतेचे आयुष्य बदलऊन गेले आहेत - तिथे मात्र अशा भावना साहजिकच फार कमी प्रामाणामध्ये दिसतात. अर्थात सैन्यामध्ये अजूनही उच्चभ्रू शांघाय क्लिकमधला ’वर्ग’ येत नाही. तिथे सामान्य वर्ग जातो. जनतेच्या भावनांमधली ही दरी हटवणे हे एक मोठे काम जरूर आहे पण सध्याच्या घडीला तरी असा आहे हा वर्गसंघर्ष.

इथे शी जिन पिंग ह्यांना जनतेला आपल्या सोबत घ्यायचे - सामान्य जनतेच्या प्रतिनिधींवरती - त्यांच्यातील सैनिकी अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्यासाठी त्याच सामान्य जनतेला विश्वासात घ्यावे लागते. आणि त्याकरत राष्ट्रवादासारखे दुसरे साधन नाही. चीनमध्ये देशभक्तीची एक लहर आली आहे. देशाकडे पैसा येताना दिसत आहे. कधी ना कधी आपल्याही वाट्याला त्याची गोड फळे येतील ही जनतेला खात्री वाटणे स्वाभाविक आहे. देश योग्य मार्गाने चालला आहे असे सर्वसाधारण मत दिसते. हान वंशिय प्रजा सुखात नसली तरी समाधानी आहे. म्हणूनच चीनमध्ये आर्थिक मुद्द्यांवरती बंड होईल ही अपेक्षा चुकीची ठरेल.

शी यांच्या विरोधात बंड करायचेच तर जनतेच्या ज्या आध्यात्मिक - मानसिक - भावनिक गरजा मारल्या गेलेल्या आहेत त्यांच्या कडेलोतामुळेच असे आव्हान उभे राहू शकते. इथेच तर चीनला भारताच्या सांस्कृतिक आक्रमणाची धास्ती वाटत असते.

No comments:

Post a Comment