Friday 4 August 2017

आक्रमक चीन

Image result for sushma swaraj china



२७ जुलै रोजी परराष्ट्र मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी चीनबरोबर बोलण्य़ांची आवश्यकता असल्याचे विधान केले तर दुसरीकडे त्याच दिवशी भाजप वरिष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की गैरसमजामधून आणि चुकीचे हिशेब मांडल्यामुळे भारत चीन यांच्यामध्ये सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीसाठी बीजींग येथे गेलेले श्री दोवल भारतामध्ये परतले आणि त्यानंतर त्यांनीही वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये परिस्थितीचा आढावा घेतला. यापुढे जाऊन आज डॉ. स्वामी यांनी ३ ऑगस्ट रोजी म्हटले की चीनबाबतची परिस्थिती धोक्याचा इशारा देत आहे. माझे म्हणणे चुकीचे ठरले तर मला आनंद आहे. 

वरिष्ठ नेत्यांची ही विधाने काळजी वाढवणारी आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा भारतीय लष्कर प्रमुख श्री बिपिन रावत यांनी जेव्हा म्हटले की भारतीय सैन्य अडीच आघाडीवरती युद्ध लढण्यास समर्थ आहे तेव्हा परिस्थिती कशी टप्प्याटप्प्याने स्फोटक बनत आहे ह्याची पूर्ण कल्पना सामान्य माणसाला असणे शक्य नव्हते. त्यामुळे श्री रावत यांच्या विधानाची खोली कोणी लक्षात घेतली नव्हती. चीनशी टक्कर आपण देऊच शकत नाही ह्या समजामध्ये असणारे काही जण डोळ्यासमोर दिसणारे खरे नाही पण भासमय जग खरे आहे अशा तोर्‍यात होते. चीन भारतापेक्षा बलाढ्य आहे म्हणून भारताला युद्ध परवडणार नाही सबब आजचे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध टाळेल असा भोळा आशावाद बाळगणारेही बरेच होते. पण जसजशी परिस्थिती ढासळू लागली आहे तसतसे ह्या मुद्द्याचे गांभिर्य वाढले आहे. 

म्हणूनच वारंवार लिहिले तरी परत एकदा आठवण करून देत आहे की आपल्याला नको असले तरी चीनला युद्धच हवे असेल तर युद्ध होत असते. युद्ध आपण ओढवून आणले असे नसते. युद्धखोरीचा हा जो स्वभाव असतो तो मध्यमवर्गीयांच्या महिन्याच्या बजेटसारखा हिशेब करून युद्ध परवडते की नाही हे बघत बसत नाही. युद्धाची झिंग चढलेल्या माणसाला असला विचार विवेक सुचत नाही. पण त्याला ते कळत नसले तरी आपल्याला त्याच्या युद्धखोरीकडे डोळेझाक करून चालत नाही. १९५८ पासून चीन युद्धाची तयारी करत आहे म्हणून सांगणार्‍या जनरल थोरातांच्या सल्ल्याला केराचे टोपली दाखवल्यामुळे पुढे काय झाले हे आपण बघितले आहे. सुदैवाने आता डोके शाबूत असलेले नेतृत्व शीर्षस्थानी बसले आहे. त्यामुळे लष्कराच्या वस्तुनिष्ठ सल्ल्याकडे दुर्लक्ष होणार नाही एवढी खात्री आहे. 

चीन ही युद्धखोरी का करत आहे हा आपल्या पैकी सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. भारतीय सैन्य १९६२ चे नाही - भारताचे पंतप्रधानपदी आता नेहरू नाहीत - दोका ला येथील रस्ता भारताशी युद्ध उकरून काढण्याइतका मोठा आहे का? ह्या प्रश्नांची उत्तरे देऊनही आता युद्ध हवे कशाला याचे उत्तर मिळत नाही. म्हणून ह्यामध्ये काही अन्य शक्यता तपासण्याची गरज आहे.

शक्यता क्र. १ - अध्यक्ष शी जिन पिंग मोदी यांच्याशी चांगले संबंध वृद्धिंगत करू पाहत आहेत पण चीनच्या सैन्याला हे मान्य नाही. 
शक्यता क्र. २ - शी यांनी चालवलेली भ्रष्टाचार विरोधी मोहिम - सैन्याच्य संख्येमध्ये कपात - सैन्याचे पुनर्गठन - सैन्याकडून परंपरेने चालत आलेले त्यांच्या अखत्यारीमधले उद्योगधंदे काढून घेणे आदि उपाययोजनांमुळे बिथरलेले सैन्य शी जिन पिंग यांना अडचणीत आणू पाहत आहे.
शक्यता क्र. ३ - भारताने पाकव्याप्त काश्मिरच्या मुक्तीसाठी तयारी पूर्ण करत आणल्यामुळे चीनचे सीपेक प्रकल्प धोक्यात आले आहेत. पाकव्याप्त काश्मिर पाकिस्तानच्या हातात राहावे ह्यातच चीनला स्वारस्य आहे. त्यामुळे भारताचे लक्ष ह्या बाबीकडून वळवण्यासाठी चीन सीमेवरती निष्कारण कुरबुरी वाढवत आहे. उत्तर सीमेवरती युद्ध सुरु झाले तर पश्चिम सीमेवरती भारत आणखी एक आघाडी स्वतःहून उघडू शकणार नाही. 
शक्यता क्र. ४ - पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या श्री नावाझ शरीफ यांना लश्कराने न्यायालयाद्वारे सत्ता सोडण्याचे कारस्थान पार पाडले आहे. भारताशी संघर्षाची वेळ आलीच तर आपल्या पूर्णपणे आधीन असलेला जिहादी पंतप्रधान ह्या पदावरती असेल ह्याची दक्षता पाक सैन्याने घेतली आहे. 
शक्यता क्र. ५ - दोकाला मधला रस्ता काही थोडक्या किमीचा आणि तांत्रिक दृष्ट्या भूतानमधून जाणारा. तेव्हा संघर्ष न वाढवता भारत गप्प बसेल ही चीनची अटकळ फोल ठरली आहे.
शक्यता क्र. ६ - भारताला पंखाखाली घेऊ नका नाही तर युद्धच होईल हा चीनचा अमेरिकेला इशारा


ह्यामधले नेमके कारण कोणते की एकापेक्षा अधिक कारणे खरी आहेत ही बाब विचारार्थ असली तरी चुकीची गणिते मांडल्यामुळे टोकाच्या संघर्षाचा रस्ता समोर दिसू लागला आहे. अशा पद्धतीचे डावपेच आखण्यात चीन तरबेज आहे हे मी लिहिले होते. (Brinkmanship) दोका ला मधली घुसखोरी आताआताची. मग गेली तीन वर्षे चीनला भारताचा एनएसजी प्रवेश रोखून धरण्यामध्ये काय हाती मिळाले? हाफीझ सईदला दहशतवादी घोषित करण्याला विरोध करण्याने चीअनए गेल्या तीन वर्षात काय कमावले ह्याची उत्तरे आपण शोधली नाहीत तर आपली समज वरवरचीच राहील. एकावर एक पडलेल्या ह्या पिळ्यांमुळे प्रश्न अधिकच जटील बनला आहे.


जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा सन्मानपूर्वक माघार घेण्यासारखी परिस्थिती असावी - तशी ती काबूत ठेवावी - ह्यामध्येच हुशारी असते. पण चीनची आजची अवस्था नेमकी उलट आहे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये ह्याचे अगदी प्रसिद्ध उदाहरण आहे. राघोबादादा जेव्हा अहिल्याबाईंवरती चाल करण्याची तयारी करत होते तेव्हा बाईंनी निरोप धाडला - तुमच्याशी लढून मी हरले तर माझी छी थू होणार नाही पण बाईकडून पराभव झाला तर तुमच्या प्रतिष्ठेचे काय ह्याचा विचार करा. हाच संदेश चीनला लागू होत नाही काय? बलाढ्य चीन जिंकला तर जग फारसे कौतुक करेल असे नाही पण जर भारताने चीनला हरवले तर महासत्तेच्या ध्येयामागे धावणार्‍या चीनची पुरती लाज जाईल हे सत्य आहे. झाकली मूठ सव्वालाखाची म्हणतात. आता चीनने एकदा मूठ उघडून दाखवली आहे - त्यातले रहस्य संपले आहे. आपल्या खेळी खेळत असताना चीनला ह्या गोष्टीचा विसर पडला आहे की आपण स्वतःच तर ह्या सापळ्यात शिरत नाही ना? यशस्वी माघार घेता यावी म्हणून एखादे पाऊल मागे घेता येण्याइतकी जमीन पायाखाली सोडायची असते. पण चीन हे प्राथमिक डावपेच विसरला आहे.


इतक्या अटीतटीच्या प्रसंगातही मोदींनी आपले तोंड वाजवले नाही ह्याचे रहस्य आपल्याला समजू शकते. युद्ध हा शेवटचा पर्याय आहे मानणार्‍या भारतीयांना शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करणारा पंतप्रधान मोठा वाटतो. आणि प्रामाणिक प्रयत्नांनाही प्रतिसाद मिळाला नाही तर अधर्माशी धर्मयुद्ध छेडणारा पंतप्रधान त्यांना हिरो वाटतो हे सत्य आहे. तेव्हा भारताची छीथू व्हावी म्हणून खेळला गेलेला डावपेच आता चीनवरच उलटल्यासारखे दिसत आहे. भूतानसारख्या छोट्या देशाच्या मदतीला जाणारा भारत हाच चीनशी मुकाबला करणारा पर्याय आहे ह्या गोष्टीची आता आशियामधल्या लहानमोठ्या देशांनी नोंद घेतली आहे. भारताची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे. असे आहे म्हणून युद्ध टळेल असे नाही. तज्ञांच्या मताप्रमाणे चीनला युद्धज्वर चढला आहेच त्याचे पर्यवसान कशामध्ये होते ते उद्या पाहू. 

No comments:

Post a Comment