गिलगिट - बाल्टीस्तान - भाग २
१९७१ चा बांगला देशातील भारताचा विजय - १९७९ साली इराणमधून शहाची सत्ता उखडण्याची घटना - त्यानंतर लागोपाठ अफगाणिस्तानमध्ये घुसलेल्या रशियन फौजा - रशियानांच्या पाडावासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने उभारलेला सुन्नी दहशतवादी इस्लामी गटांचा जिहाद ह्या घटनांमुळे भारतीय उपखंडामधल्या शिया समुदायावरती काय परिणाम झाले त्याची सविस्तर चर्चा आपल्या माध्यमांमध्ये झाल्याचे दिसत नाही.
गिल्गिट - बाल्टीस्तान मध्ये कोणत्याही राजकीय हालचाली करण्यावर बंदी असूनही १९७१ मध्ये बांगला देशातील घडामोडींमुळे धीर आलेल्या गिल्गिट - बाल्टीस्तान मधल्या शियांनी उचल खाल्ली आणि तनझीम ए मिल्लत नावाच्या संघटनेची स्थापना करण्यात आली. इथून गिलगिट बाल्टीस्तानमधील शियांच्या सुन्नीविरोधातील संतापाला तोंड फुटले. १९७४ मध्ये संघटनेचा संस्थापक जोहर अली खान याने रहिवाशांना मूलभूत हक्क मिळावेत आणि फ्रॉंटीयर्स क्राईम रेग्युलेशन मागे घेण्यात यावे म्हणून बंद पुकारला. त्याला हिंसक वळण लागताच तेथील सुन्नी कमिशनरने गोळीबाराचे आदेश दिले. पण शिया स्काउटस् नी आपल्याच शिया बांधवांवरती गोळ्या घालण्यास नकार दिला. यानंतर कमिशनरने स्वतः गोळीबार केला आणि बंदच्या नेत्यांना तुरुंगात डांबले. पण बहादूर जनतेने त्यांना तुरुंगातून सोडवले. सरकारने त्यांना पुन्हा जेरबंद केले. यानंतर कमिशनरचा आदेश धुडकावणारे स्काउट झुल्फिकार अली भुत्तो यांनी बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शेकडो शियांच्या नोकर्या गेल्या. त्याने हा समाज पाकिस्तानी राजवटीपासून अधिकच दुरावत गेला. शियांनी आपल्या संघर्ष करणार्या अनेक संघटना स्थापन केल्या. त्यांना चुचकारण्याचे सोडून पाक सरकारने तेथील सुन्नींना त्यांच्या संघटना काढण्यासाठी उत्तेजन दिले. यातून समाजामधली दरी वाढत गेली.
१९७९ साली अमेरिकेशी उत्तम संबंध असलेल्या इराणच्या शहाला पदच्युत करून अयातोल्ला खोमेनी सत्तेवर आला. अमेरिका ह्या क्षेत्रामध्ये दबली आहे हे गृहित धरून रशियाने अफगाणिस्तानमध्ये आपल्या फौजा १९७९ च्या शेवटाला घुसवल्या. अफगाणिस्तानमधून रशियन सैन्याला हुसकावून लावण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने कट्टरपंथी सुन्नी संघटनांच्या मदतीने तिथे लढा उभारला.
इराणमधील उलथापालथ शियांसाठी एक मोठी घटना होती. इराणमध्ये शिया बहुसंख्य आहेत - भारतात राहणार्या अनेक शियांचे इराणमधील कुटुंबांशी जवळचे संबंध आहेत. इराणमधील रॅडिकल इस्लामच्या उदयानंतर तेथील समाजामध्ये झालेली उलथापालथ इथल्या शियांना भयभीत करून गेली. जसे भारतीय शिया चिंताक्रांत होते त्यापेक्षा जास्तच पाकिस्तानामधले सुद्धा. भारतीय शिया तरी बहुसंख्य हिंदूंमध्ये राहतात. सुन्नींच्या छळकपटापासून हिंदूंची भिंत त्यांचे संरक्षण करत असते. पण पाकिस्तानातील अल्पसंख्य शियांचे काय? त्यांना तर तिथे कोणीच वाली नाही. ते तिथेही अल्पसंख्यच आहेत. असेही ते तिथे जीव मुठीत धरूनच जगतात. सभोवती उठलेली सुन्नी कट्टरतावादाची आग त्यांना भयभीत करणारी ठरणारच. सुन्नी राजवटीमधून बाहेर पडणे एवढाच त्यांच्यापाशी त्या जाचामधून सुटका करून घेण्याचा मार्ग असल्यामुळेच १९८० च्या दशकामध्ये पाकिस्तानातील शिया उचल खाताना दिसू लागले. त्यामध्ये जसे बलुची शिया होते तसेच सिंध आणि पाराचिनार मधले. गिलगिट बाल्टीस्तानमधल्या शियांनी आपल्यासाठी स्वतंत्र काराकोरम प्रांताची मागणी केली. हे साल होते १९८८. जनरल झिया कर्तृत्वाच्या शिखरावर होते. रशियाची पिछेहाट. अफगाणिस्तान निर्वेधपणे पाकिस्तानच्या परभारे हातामध्ये. अमेरिकेशी उत्तम संबंध! देशात सुन्नी रॅडिकल्सची लाट. भारतामधले राजीव गांधी सरकार संसदेमध्ये ४०० च्या वर खासदार असूनसुद्धा विश्वनाथ प्रताप सिंघ यांच्या राजकीय आव्हानामुळे विकलांग - जेरीस आलेले. तेव्हा झियांना आव्हान देणारे कोणी नव्हते. त्यातच गिलगिट बाल्टीस्तानमधील शियांनी काराकोरम प्रांतासाठी मागणी करावी हे झियांना कसे आवडणार? हे बंड चेपून टाकण्याचे आदेश त्यांनी दिले. ते अंमलात आणण्यासाठी एका पाकिस्तानी जनरलची नियुक्ती झाली. त्याचे नाव होते जनरल मुशर्रफ. मुशर्रफ यांनी अफगाणिस्तानमधून ओसामा बिन लादेनच्या फौजेला गिलगिट - बाल्टीस्तानामध्ये उतरवले. ओसामा बिन लादेनच्या फौजेमध्ये पाकिस्तानच्या फाटामधल्या (Federally Administered Tribal Area - FATA) वझिरीस्तानचे वझीर आणि मेहसूद ह्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर होत्या. ही फौज कारकोरम हायवेवर उतरली. त्यांना अडवणारे कोणीच नव्हते. कारण त्यांचा नेता ओसामा स्वतः ह्या शिरकाणाच्या वेळी त्याच ठिकाणी त्यांचे नेतृत्व करायला हजर होता. शेतामधल्या उभ्या पिकाची नासधूस - लोकांना मरेपर्यंत मारहाण - जाळून टाकणे - स्त्रियांवर बलात्कार आणि अन्य अमानवी अत्याचार यांचे थैमान चालू होते. तालिबानांनी अफगाणिस्तानमध्ये जितके हजारा शिया मारले नाहीत त्यापेक्षा जास्त शिया गिलगिटमध्ये मारले गेले. त्याची किंमत कोणी मोजली असेल?
त्याच वर्षी म्हणजे १९८८ मध्ये गिलगिटमध्ये हत्याकांड करण्याचे आदेश देणार्या जनरल झिया यांच्या बहावलपूरहून पिंडीकडे निघालेल्या विमानामध्ये पाकिस्तानचे सर्व वरिष्ठ लश्करी अधिकारी तर होतेच पण अमेरिकन लश्कर अधिकारी - राजदूत हेही होते. ऑगस्ट १९८८ मधल्या ह्या उड्डाणामध्ये एक शिया कर्मचारी होता. त्याने आपले काम केले. विमानाने आकाशात झेप घेताच स्फोट होऊन सर्व प्रवासी मारले गेले. (जनरल मिर्ज़ा असलम बेगदेखील विमानाने प्रवास करणार होते. पण आयत्या वेळी त्यांनी बेत रद्द केला आणि दुसर्या विमानाने ते निघाले. आकाशामधून झियांच्या विमानाला झालेला अपघात त्यांनी बघितला. त्याभोवती दोन फेर्या मारल्या. आणि नंतर ते तिथे मदतीसाठी न उतरता पिंडीला पोहोचले. अर्थातच पाकिस्तानचे लश्करप्रमुखपद त्यांची वाट पाहत होते.) (जनरल ले. फाज़ल हक यांचीही पेशावर येथे एका शिया बंदूकधार्याने हत्या केली. जनरल मुशर्रफ यांच्यावर प्राणघातक हल्ले चढवणारे शियाच होते.)
शियांना असे जबरी चेपल्यानंतर १९८८ मध्येच पहिल्यांदा काराकोरम हायवेवरून पाकिस्तानला चीनने अत्यंत काटेकोर संरक्षणात कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि अणुकार्यक्रमासाठी महत्वाची सामग्री पाठवली. हाच हायवे वापरून अशी सामग्री इराणलाही पोचवण्यात आलेली होती. इथूनच ए. क्यू. खान यांचा न्यूक्लीयर हायवे आणि न्यूक्लीयर वॉलमार्ट सुरु झाले.
शियांचा विरोध आणि सुन्नींचा प्रतिहल्ला ही यादवी पुढेही चालू राहिली. १९९२ - ९३ - ९४ सालामध्ये कहाणी तीच होती. १९९३ साली तर संघर्षाचा उद्रेक असा होता की सियाचेनमध्ये पहारा देणारे सैन्य शिखर सोडून सरकारच्या हितरक्षणासाठी गिलगिटमध्ये हजर झाले.
शियांच्या संघर्षाला पुढचे मोठे वळण मिळाले ते अर्थातच सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्ल्यानंतर. ती कहाणी पुढच्या भागामध्ये बघू.
No comments:
Post a Comment