ड्युरांड लाईनची कालबाह्यता
नुकतेच युरोपियन संसदेच्या बातम्या देणार्या EPTODAY ह्या संकेतस्थळावरती संसदेचे उपाध्यक्ष पोलिश - ब्रिटिश नागरिक श्री. रिझार्ड झारनेकी यांनी ब्रिटिशांनी आखलेली ड्युरांड लाईन कालबाह्य झाली असून तिचा फेरविचार होणे गरजेचे आहे असे मत १२ मे २०१७ रोजी मांडले आहे. पाक - अफगाण सीमेवरती वारंवार घडणार्या धुमश्चक्रीच्या बातम्या हेच दर्शवतात की झारनेकी यांनी एका महत्वाच्या विषयावर केलेले प्रतिपादन आपण समजून घेतले पाहिजे.
५ मे रोजी अफगाणिस्तानने चमन सीमेजवळ चढवलेल्या हल्ल्यामध्ये ११ पाकिस्तानी ठार झाले तर ७ मे रोजी पाकिस्तानने केलेल्या चढाईमध्ये २ अफगाण नागरिक ठार झाले असे वृत्त होते. १९४७ साली ब्रिटिश भारतीय उपखंडातून बाहेर पडले तेव्हा NWFP प्रांतातील पश्तून लोकांना पाकिस्तानमध्ये अजिबात जाण्याची इच्छा नव्हती. पश्तून लोकांच्या निष्ठा धर्माकडे नसून आपल्या राष्ट्रा कडे होत्या. पाकिस्तानातील पंजाबी मुसलमानांवरती त्यांचा विश्वास नव्हता. पश्तूनी लोकांना भारतामध्ये घ्या म्हणून त्यांचे नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांनी असा लकडा गांधी - नेहरू यांच्याकडे लावला होता. परंतु ब्रिटिशांनी त्यांचे ऐकले नाही. तीच परिस्थिती बलुचिस्तानची आहे.
अफगाणिस्तानमध्येही पश्तून लोकांची संख्या लक्षणीय आहे. म्हणून निर्मितीपासूनच अफगाणिस्तानने ड्युरांड लाईन कधीच मान्य केली नाही. अगदी पाकिस्तानप्रणित तालिबानांचे राज्य होते तेव्हाही पाकिस्तानने तीन वेळा प्रयत्न करूनही अफगाणिस्तानच्या एकाही सरकारने ही सीमा मान्य केलेली नाही.
१९४७ नंतर आताच्या परिस्थितीमध्ये येथील पश्तूनांमध्ये पाकिस्तानी पंजाब्यांबद्दल रोष कमी न होता वाढीला लागला आहे. १९४७ नंतर पाकिस्तानने कोणत्याही प्रकारे ह्या NWFP प्रदेशामध्ये विकासाचे नावही पोचणार नाही अशी व्यवस्था राबवली आहे. तसेच मधल्या पश्तूनांना अफगाण पश्तूनांची मदत मिळू नये म्हणून अफगाणिस्तानमध्ये कोणतेही सरकार स्थिर राहणार नाही ह्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन कारवाया केल्या आहेत. होता होईल तितका पाकिस्तानने आपल्या जिहादी कारवायांसाठी मरायला तयार असलेल्या पश्तूनांचा वापर करून घेऊन त्यांच्या जीवावरती आपले NWFP प्रदेशामध्ये वर्चस्व कायम राहावे म्हणून धोरण राबवले आहे. अफगाण सरकार अस्थिर ठेवण्याच्या नादामध्ये पाकिस्तानने हाच NWFP प्रदेशही तेव्हढाच अस्थिर ठेवला आहे. इतका की इथले नागरिक मुक्तपणे अफगाणिस्तानमध्ये येऊन जाऊन असतात आणि त्यांना अडवणारी कोणतीही यंत्रणा तिथे नाही. अफगाणिस्तानमधून होणारे हल्ले थांबवण्यासाठी आता पाकिस्तानने तिथे कुंपण बांधण्याचे ठरवले आहे.
ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. जोपर्यंत ड्युरांड लाईन हीच आंतरराष्ट्रीय सीमा आहे हे जग मान्य करते तोपर्यंत पाकिस्तान आपल्या कारवाया चालूच ठेवणार आणि अफगाणिस्तानमधील परिस्थिती अस्थिर ठेवून आपल्या कह्यात कशी राहील याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. पाकिस्तानला ह्या भागामध्ये शांतता असावी असे अजिबात वाटत नाही. मध्या आशियाकडे जाण्याचा मार्ग आपल्या ताब्यात असावा ह्या वेडाने त्याला झपाटले आहे आणि आज चीनही ह्याच भूमिकेला पाठिंबा देत आहे. अगदी आताआता पर्यंत पाश्चिमात्य देशांनी आणि अमेरिकेनेही ब्रिटिशांच्या घोडचुकीवर आपले शिक्कामोर्तब केले आहे.
अफगाणिस्तानमधील शांतता आज पाश्चिमात्य देश आणि अमेरिकेसाठीही अग्रक्रमाची ठरली आहे. तिथे जोवर शांतता नाही तोवर अमेरिकेला तिथले सैन्य पूर्णपणे काधून घेता येणार नाही. शिवाय प्रचंड राजकीय असंतोषामधून निर्माण होणार्या सामाजिक असंतोषाचा परिणाम म्हणून अफगाणिस्तानमधून निर्वासितांची रीघ पश्चिमेकडे लागली आहे. २०१५ साली सिरियामधून पश्चिमेकडे गेलेले निर्वासित ३६२००० होते तर अफगाणिस्तानमधून गेलेले १७५००० होते. यामध्ये सिरियाचा नंबर पहिला तर अफगाणिस्तानचा दुसरा लागतो.
NWFP ची भूमी अजूनही मुजाहिदीनांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते. सप्टेंबर ११ च्या हल्ल्याचे नियोजन इथूनच झाले. २००१ नंतर मूळ प्रश्नाला हात घातला गेला नाही. म्हणून अफगाण प्रश्न लांबत गेला आहे. झारनेकी म्हणतात की पाश्चिमात्य जगताला आपल्या अफगाण धोरणाचा पुनर्विचार करणे ही अत्यावश्यक बाब झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये पैसा ओतून अपेक्षित विजय मिळणार नाही. तिथे शांतता नांदली तरच काही हाती लागेल ही बाब महत्वाची आहे असे झारनेकी म्हणतात.
झारनेकी यांनी स्पष्ट सांगितले नाही तरी आपण त्यात लपलेला अर्थ समजून घेतला पाहिजे. पाश्चात्यांचे अफगाण धोरण फसले आहे कारण त्यांचे पाकिस्तान धोरण फसले आहे. तेव्हा अफगाण धोरण बदलायचे म्हणजेच पाकिस्तान धोरण बदलावे लागेल् असे वस्तुनिष्ठ विचार झारनेकी यांनी मांडले आहेत. युरोपियन युनियनच्या उपाध्यक्ष पदावर बसलेल्या ह्या महत्वाच्या व्यक्तीकडून केले गेलेले हे विश्लेषण भारतासाठी अर्थातच उपयुक्त आहे हे सांगायला नको.
१९७९ साली अफगाणिस्तानमधील रशियनांना हुसकावून बाहेर काढण्याच्या अमेरिकन धोरणाला श्रीमती इंदिराजींनीही विरोध केला होता. तुम्ही जी शस्त्रे रशियाशी लढण्यासाठी देत आहात ती भारताविरुद्ध वापरली जात आहेत असे बजावून सुद्धा अमेरिकेने त्याकडे ढुंकून बघितले नाही. रशियाच्या बंदोबस्तासाठी चीनशीही दोस्ती केली. आज त्याची फळे हे पाश्चात्य भोगत आहेत. कोणताही डेमोक्रॅट अध्यक्षाने ह्या धोरणामध्ये बदल करण्याचा विचारही केला नसता. आज ट्रम्प साहेब कदाचित असा विचार करतील ही अंधुक का होईना आशा आहे. किंबहुना परिस्थितीच असा बदल घडवायला कारणीभूत ठरेल.
एका बाजूला अफगाणिस्तान तर दुसरीकडे इराण पाकिस्तानच्या सीमेवरती धुमश्चक्री च्या बातम्या येत आहेत. भारतीय बाजू तर आपल्याला चांगलीच माहिती आहे. सगळीकडून घेरला गेला तरी खुमखुमी जात नाही कारण चीन आपल्या पाठीशी आहे ही मस्ती आहे. ही मस्तीच पाकिस्तानला कुठे घेऊन जाईल हे स्पष्ट आहे.
No comments:
Post a Comment