सायप्रसमध्ये स्थापित केलेल्या प्रेवेझॉन कंपनीविरुद्ध अमेरिकन कोर्टामध्ये खटला चालू होता. कंपनीने आपली बाजू मांडण्यासाठी अमेरिकन वकिल नेमले होते परंतु तिचे मालक रशियन उद्योगपती डेनिस कात्सिव्ह ह्यांनी आपले वकिल म्हणून रशियन वकिल नातालिया वेसेल्निटस्काया ह्यांचे नाव दिले होते. ९ जून रोजी खटल्याची सुनावणी सर्किट कोर्ट ऑफ अपील्स मध्ये होणार होती. वेसेलनिटस्काया ह्यांना त्याकरिता व्हिसा मिळणार असे स्पष्ट होताच संगीत क्षेत्रामध्ये गाजलेले प्रकाशक रॉब गोल्डस्टोन ह्यांनी डॉनल्ड ट्रम्प ह्यांच्या सुपुत्राला इमेल पाठवून कळवले की "रशियाची क्राउन प्रॉसिक्यूटर वेसेलनिटस्काया अमेरिकेत येत असून हिलरी क्लिंटन ह्यांच्या प्रचाराविषयी त्या काही माहिती देऊ शकतील. आपल्याला भेटायचे असल्यास कळवा." रशियन बिल्डर आरास आगालारोव्ह ह्यांची भेट ट्रम्प ह्यांनी त्यांच्या रशिया वारीत घेतली होती. तसेच आगालारोव्ह ह्यांनी स्पॉन्सर केलेली मिस युनिव्हर्स पेजंट आणी त्यांच्या मुलाच्या वाढदिवस समारंभात ट्रम्प गेले होते. इथे रॉब गोल्डस्टोन ह्यांचा संगीत कार्यक्रम झाला होता. गोल्डस्टोन ह्यांच्या इमेलला ट्रम्प ह्यांच्या मुलाकडून होकार आला.
त्यानुसार ९ जून रोजी वेलनिटस्काया ट्रम्प टॉवरमध्ये ट्रम्प ह्यांचा मुलगा - त्यांचा जावई जॅरेड कुशनर आणि त्यांच्या प्रचारयंत्रणेचे प्रमुख पॉल मानाफ़ोर्ट ह्यांना भेटल्या. तिन्ही अमेरिकनांनी लिखित पुरावे असतील तर त्यांच्याकडील बाबी ऐकण्यास तयार आहोत असे सांगितले. तिच्याकडे डेमोक्र्~टिक पक्षाला देणग्या देणार्या काही व्यक्तींनी रशियामध्ये टॅक्स बुडवल्याची केस होती. पण वेलनिटस्काया ह्यांनी कोणतीही भरीव माहिती दिली नाही. एक शंका अशी व्यक्त केली जाते की मूळ बेताप्रमाणे हा वेलनिटस्काया ह्यांना भेटवण्याऐवजी पुतिन ह्यांचे विश्वासू रशियाचे प्रॉसिक्यूटर जनरल युरी चायका ह्यांना भेटवायचे होते हे स्पष्ट नाही. वेलनिटस्काया ह्यांनी भेटीदरम्यान जो मसुदा बनवून आणला होता तो महत्वाचा होता. हा मसुदा तिने युरी ह्यांच्याशी चर्चा करून बनवला होता. युरी ह्यांनी दोन महिन्यांपूर्वी एका अमेरिकन कॉंग्रेसमनला जो मसुदा दिला होता त्यातलेच काही परिच्छेद जसेच्या तसे तिच्याही मसुद्यात होते.
आपल्या भेटीमध्ये वेलनिटस्काया परत परत सांगत होती की माझ्याकडे जी माहिती आहे ती मी स्वतः मिळवली असून त्याचा रशियन सरकारशी अधिकृतरीत्या काहीही संबंध नाही. वेलनिटस्काया ह्यांची ट्रम्प टॉवरला दिलेली भेट चांगलीच गाजली अर्थात पुढे उजेडात आल्यावरती. पण वेलनिटस्काया ट्रम्प टॉवरमध्ये जाणार ही माहिती बहुधा ग्लेन सिम्पसनला आधीच होती. (ती त्याच्यापर्यंत पोचवणारी सूत्रे कोणती???) एका वेगळ्या खटल्यासाठी सिम्पसन अपेलेट कोर्टामध्ये हजर होता. तिथे त्याचे वेलनिटस्कायाशी बोलणे झाले. पुढे जबानी देताना सिम्पसन ह्यांनी तिच्याशी विशेष बोलणे काही झाले नाही कारण ती तर फक्त रशियन बोलू शकते असे सांगितले. (केवळ रशियन बोलू शकणारी वकिल अमेरिकन कोर्टात अशिलाच्या बचावासाठी काय काम करू शकत होती हा एक प्रश्न आणि तसे असेल तर ट्रम्प टॉवर भेटीत ती कोणत्या भाषेत संवाद करत होती हा दुसरा यक्षप्रश्नच नाही का? की तिच्याबरोबर आणि कोणी टॉवरमधील भेटीत उपस्थित होते? वेलनिटस्कायाशी सिम्पसनशी झालेली ही एकच भेट नव्हती.
दुसर्याच दिवशी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयातील कर्मचार्यांना इमेल्स हॅक झाल्याची माहिती देण्यात आली होती. "Don't even speak to your dog about t" - इमेल्स हॅकचे प्रकरण गंभीर असून त्याविषयी कुठेही वाच्यता करू नका असे कर्मचार्यांना व्यवस्थापनाने सांगितले होते. ह्यानंतर १० दिवसांनी ख्रिस्टोफर स्टीलने आपला पहिला अहवाल सादर केला होता. स्टीलने एफबीआयकडे आपली माहिती द्यावी असे सुचवणारा सिम्पसनच होता. त्याने आपल्या जबानीमध्ये तसे कबूल केले. ट्रम्प ह्यांच्याबद्दलचे व्हिडियो शोध असे तू स्टीलला सांगितले होतेस का असा प्रश्न विचारला गेला असता सिम्पसन म्हणाला - "kompromat - compromising material" चे आकर्षण रशियाशी डील करणार्या स्टीलला असू शकते. मला रस होता तो राजकारण - वित्तीय गुन्हे - भानगडींमध्ये. तेव्हा स्टील ह्या व्हिडियोच्या मागे होता की नाही हे मी सांगू शकत नाही पण कदाचित त्याने दुसर्या कोणालातरी त्याबद्दल माहिती काढायला सांगितले असू शकते. "तुमच्याकडे ट्रप ह्यांच्याबद्दल काय माहिती आहे अशी विचारणा एफबीआयने माझ्याकडे केली होती" असे स्टीलने एकदा चर्चेदरम्यान सिम्पसनला सांगितले. ५ जुलै रोजी जेव्हा स्टील एफबीआय अधिकार्याला रोम येथे भेटला तेव्हा त्याची तिथे जाण्याची व्यवस्था एफबीआयने केली असावी किंवा त्याचा खर्च दिला असावा. सिम्पसन आणि स्टील ह्यांच्यामध्ये ह्या भेटीमध्ये एफबीआय अधिकार्याला काय माहिती द्यावी ह्यावरती सविस्तर चर्चा झाली होती आणि दोघांच्या संमतीने माहिती दिली गेली हे सिम्पसनने आपल्या जबानीमध्ये कबूल केले.
रोम येथील भेटीमध्ये स्टीलच्या असे लक्षात आले की एफबीआयकडे ट्रम्प ह्यांच्या प्रचारयंत्रणेमध्ये काम करणार्या दुसर्या एका सूत्राने "स्वतःहून" काही माहिती दिली होती. स्टील जे सांगत होता त्यावरती त्या अधिकार्याचा विश्वास बसत होता असे लक्षात आले कारण अगोदर असलेली माहिती आणि स्टीलची माहिती मिळतीजुळती होती. माझ्याकडची सगळी माहिती मी त्यांना दिली आहे असे स्टीलने सिम्पसनला भेटीनंतर सांगितले. गंमत अशी की पापादूपोलोसने ऑस्ट्रेलियन राजदूत डाऊनरकडे जी बढाई मारली होती ती डाऊनरने २२ जुलै नंतर अमेरिकेतील ऑस्ट्रेलियन राजदूताला कळवली होती ज्याने ती त्यानंतर एफबीआयला कळवली अशी "स्टोरी" बाहेर आली होती. पण ह्या राजदूताने माहिती कळवण्यापूर्वीच रोममधील एफबीआय अधिकार्याकडे टम्प ह्यांच्या प्रचारयंत्रणेमध्ये काम करणार्या व्यक्तीकडून आलेली माहिती तब्बल किमान दोन आठवडे आधी ५ जुलै रोजी कशी काय होती बरे? ह्याचाच अर्थ असा की २२ जुलै नंतर माहिती कळल्यावरती ट्रम्प ह्यांच्या प्रचारयंत्रणेची चौकशी आम्ही सुरु केली हे एफबीआयचे म्हणणे ही धादांत थाप ठरत नाही का? चौकशी तर आधीच सुरु झाली असावी असे दर्शवणारे हे संकेत आहेत.
स्टील आणि एफबीआयची भेट झाल्यानंतर आणि त्याची माहिती विश्वसनीय आहे असे एफबीआयने मूक संकेत दिल्यानंतर आता सिम्पसनचे काम ह्या बाबींना प्रसिद्धी देणे हे होते. स्टीलची माहिती ताडून बघण्यासारखी नाही सबब अमेरिकन वृत्तपत्रे ती तशीच्या तशी स्वीकारणार नाहीत याची काही काळ पत्रकारितेमध्ये घालवलेल्या सिम्पसनला कळत होते. पण ट्रम्प आणि रशियामध्ये काहीतरी साटेलोटे आहे ही मूळ कल्पना धरून त्याभोवती गोष्ट गुंफणे सोपे होते. "The New Yorker" प्रकाशनाचे संपादक डेव्हिड रेम्निक ह्यांनी "Trump and Putin: A Love Story” असा लेख ऑगस्टच्या सुरुवातीला प्रसिद्ध केला. "ट्रम्प अज्ञानी आहेत - संभ्रमित आहेत - कमकुवत आहेत - त्यांचा वापर करून घेणे सोपे आहे - ट्रम्प हा पुतिन ह्यांचा मोठा असेट आहे" असे रेम्निकने लिहिले. पुतिन ट्रपना ब्लॅकमेल करत आहेत अशा शब्दात काही रेम्निकने स्टोरी लिहिली नाही पण तसे सूचित केले होते. "आपल्या वैर्याबद्दलची गुप्त माहिती गोळा करण्याचे पुतिन ह्यांचे तंत्र जुने आहे. वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींचे सेक्स स्कॅंडलमधील व्हिडियो किंवा ड्रग घेतानाचे व्हिडियो मिळवून त्याच्या अस्पष्ट फोटो इंटरनेटवर टाकण्याचे काम रशियन गुप्तचर संस्था करत असते" असे रेम्निकने लिहून वाचकांना काय सूचित केले असेल ते लक्षात येते.
रेम्निक सिम्पसनला भेटला होता का हे निश्चित सांगता येत नसले किंवा त्याने आणखी कोणत्या सूत्रांकडून ही ब्लॅकमेलची कहाणी ऐकली होती ह्याविषयी ठामपणे सांगता येणार नाही. पण पुढे त्याच्या प्रकाशनामध्ये काम करणार्या जेन मायरने आपण स्टीलला सप्टेंबरमध्ये भेटलो होतो असे कबूल केले. तेव्हा ऑगस्टच्या सुरुवातीला देखील अशी भेट झालेली असू शकते. निदान त्याच्या लेखामध्ये आलेले उल्लेख स्टीलच्या अहवालात सापडतात. अशाच प्रकारचे लेख सिम्प्ससन अन्यत्र छापून आणू शकत होता. कारण त्यासाठी आधार म्हणून ट्रम्प ह्यांची काही ट्वीटस् आणि परराष्ट्रसंबंधातील काही तज्ञ व्यक्तींची मते एव्हढे पुरेसे होते.
सिम्पसन पत्रकारांना भेटून आपल्याकडची माहिती देत होता. लागलेच तर स्टीलचे अहवाल चाळायला देत असे. त्यांचे नजर टाकून होताच कगद परत आपल्याकडे घेऊन टाकणे महत्वाचे!! वौशिंग्टन पोस्टचे पत्रकार जोनाथन वायनर ह्यांनी आपल्या जबानीमध्ये पुढे सांगितले की मला स्टीलचा अहवाल दाखवण्यात आला होता. पण त्याची प्रत मिळू शकली नाही. मी आमच्या व्यवस्थापनाला त्याबाबत कळवले. पूर्वायुष्यात स्टेट सेक्रेटरी खात्यामध्ये डेप्यूटी पदावरती काम केलेले वायनर म्हणाले की अहवालाची प्रत मिळाली असती तर मी रीतसर तक्रार स्टेट डिपार्टमेंटकडे केली असती. अहवाल दाखवूनही काही पत्रकार त्यावरती चटकन विश्वास ठेवत नसत. तेव्हा सिम्पसनने अशा बैठकीमध्ये स्टीललाही बसवायचे ठरवले. सप्टेंबरनंतरच्या बैठकांमध्ये स्टील उपस्थित राहायचा. अशी माहिती रशियाच आपल्यामध्ये पेरत असेल - अशी शंका त्यांना आलीच तर एक फर्डे भाषण अटील आणि सिम्पसनकडे तयारच असे. अनवधानाने आपले भाषण सिम्पसनने पुढे चौकशी समितीसमोरही बोल्लोन दाखवले.
स्टील सांगत असे - "मी Ml6 मध्ये रशियन डेस्कचा प्रमुख होतो. त्या अगोदर मला मॉस्कोमध्ये पोस्टींग दिले होते. रशियन गुप्तचर संस्थांशी वागण्याबोलण्याचा मला दीर्घकालीन अनुभव आहे. चुकीची माहिती पेरण्याची रशियनांची खूप जुनी परंपरा आहे आणि ही कला त्यांना इतरांपेक्षा चांगलीच अवगत आहे. तेव्हा पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या व्यवसायामधला हा एक मोठा अडसर राहिला आहे. तेव्हा र्शियनांकडून माहिती येते तेव्हा तिच्यामध्ये थोडीफार चुकीची माहिती दडपलेली असण्याची शक्यता मी गॄहित धरतो. पण ती कशी ओळखायची मला कळते आणि अशी माहिती वगळून मी माझे अहवाल बनवतो. पण हे तर खरेच आहे की चुका कोणाच्याही होऊ शकतात." स्टील आपले बोलणे संपवतो तोवर तो धागा पकडून सिम्पसन सांगत असे की - स्टील यातला खरा तज्ञ आहे. तेव्हा आम्ही ही माहिती तुम्हाला देत आहोत त्यातली बेभरवशाची माहिती आम्ही आधीच काढून टाकली आहे.
खुद्द सिम्पसनचा स्टीलच्या अहवालांवरती कितपत विश्वास होता?
(अपूर्ण)