पं. जवाहरलाल नेहरूंजींनी भारतासाठी एक स्वप्न पाहिले आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांची सुकन्या श्रीमती इंदिराजी ते स्वप्न पूर्ण करणार असे आम्ही लहान असतानाच ऐकले होते. पुढे आम्ही मोठे झालो - तारुण्यात पदार्पण केले. नेहरूजींचे स्वप्न चालूच होते. मग इंदिराजी गेल्या आणि राजीवजी आले. त्यांनी पहिल्यांदाच आम्हाला इंदिराजींचे देखील एक स्वप्न होते असे सांगितले आणि ते आपण पूर्ण करू म्हणून आम्हाला आश्वासन दिले. आम्ही पुन्हा राजीवजींवरतीही विश्वास ठेवला. राजीवजींनंतर सोनियाजी आल्या. त्यांनी आपण राजीवजींचे स्वप्न पूर्ण करू असे सांगितले. आता त्यांचे सुपुत्र कॉंग्रेसच्या शीर्षस्थानी आहेत. अर्थातच त्यांनाही स्वप्न पूर्ण करायचे आहेच. पिढ्यानुपिढ्या हा स्वप्नांचा सिलसिला चालू असल्यामुळे राहुलजींनंतर प्रियांकाची मुले स्वप्न पूर्ण करतील अशी मी खूणगाठ बांधली होती. पण राहुलजी खरोखरच एकदमच डायनॅमिक निघाले. आपल्या पणजोबाला जे जमले नाही ते त्यांनी अवघ्या काही वर्षात करून दाखवायची वाटचाल सुरू केली आहे. नशीबही कसे असते बघा - राहुलजींना संधीही अशी मिळाली की काय बिशाद आहे त्या स्वप्नाची की ते पूर्ण हो ऊ नये? मोदींसारखा मूर्ख चायवाला विरोधक म्हणून आल्यावर राहुलजी काय संधी सोडतात काय राव? बरे - नाही ना उलगडत?
राजघराण्याला ओढ कसली असते बरे? पुढच्या दहा पिढ्यांनी आपलेच नाव काढावे असे भरीव काम आपल्या हातून व्हावे हेच असते कोणत्याही राजघराण्याचे स्वप्न. राहुलजींनी असे काही काम केले आहे की खरोखरच महाराष्ट्रातल्या पिढ्यानुपिढ्या त्यांचेच गुणगान गातील. घराघरातून एकच कथा सांगितली जाईल. बरे का रे बाळा - ही कथा आहे ना अशी की आपल्या राहुलजींनी गुंफली हो असे आज्या पणज्या आया बाप आपापल्या संततीला सांगतच राहतील.
महाराष्ट्रात वाढलेले असे एकही मराठी मूल नसेल ज्याला कापूसकोंड्याची गोष्ट माहिती नाही. २०१९ च्या निवडणुकीनंतर आता हळूहळू लोक कापूसकोंड्या विसरून जाणार आहेत अशी साधार शक्यता निर्माण झाली आहे. ह्याचे कारण असे की भाजप व मोदींचे कट्टर विरोधक ह्यांनी नवा कापूसकोंडा शोधून काढला आहे. त्याचे नाव आहे राफाल करार. कापूसकोंड्याचा खेळ मोठा मजेशीर असतो. आपण काहीही म्हटले आणि उत्तर देण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्याने एव्हढेच म्हणायचे असते - खोटे काय बोलतोस कापूसकोंड्याची गोष्ट सांगू? मुख्य म्हणजे ह्या खेळाला शेवट नसतोच. कारण आपण काही उत्तर दिले तरी समोरचा पुढे विचारतोच - खोटे काय सांगतोस? कापूसकोंड्याची गोष्ट सांगू? आजकाल राफालवरची माध्यमांमधली चर्चा ऐकली की मला ही कापूसकोंड्याची गोष्ट आठवते. कॉंग्रेसच्या प्रश्नाला मोदी सरकारने अथवा भाजपने कोणतेही उत्तर दिले की कॉंग्रेसचा प्रतिप्रश्न तयारच आहे - खोटे काय सांगतोस राफालकोंड्याची गोष्ट सांगू? तेव्हा इथून पुढे महाराष्ट्रातल्या घराघरात जन्मलेल्या छोट्या बाळाला आपण राफालकोंड्याची गोष्ट ऐकवू लागणार आहोत. अशा एपिक कथेला जन्म देण्याचे नेहरूजींपासूनचे राजघराण्याचे स्वप्न राहुलजींनी पूर्ण केले ह्यासाठी त्यांचे नाव अजरामर होऊ घातले आहे.
राफाल कराराच्या निमित्ताने कॉंग्रेसने गेले काही महिने एकच राळ उठवली आहे. संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी त्यांनी केल्यावर सरकारने चर्चा घडवून आणली आणि सविस्तर उत्तरही दिले. तेव्हढ्याने त्यांचे समाधान झालेले नाही. परत परत माध्यमांमध्ये मोदी "चोर" असल्याचा आरोप करून चर्चेला विराम मिळूच द्यायचा नाही असा कॉंग्रेसने चंग बांधला आहे. पुन्हा त्यांचे काम अत्यंत सोपेच आहे. आता तर कॉंग्रेसला प्रकरणाचा अभ्यास करायचीही गरज उरलेली नाही - समोरच्या भाजपवाल्याला फक्त म्हणायचे - खोटे काय बोलतोस? .........
तर म्हणे यूपीएचे प.पू. (परमपूज्य - ह्याचा अर्थ पूजनीय असा घ्यावा - शून्य असा कदापि घेऊ नये असे राफालकोंड्याने सांगितले आहे. त्यावरती का म्हणून विचारू नका - तिथे गोता आहे!) अध्यक्ष श्री राहुलजी गांधीजी असे म्हणाले होते की मी पंधरा मिनिटे राफालवरती बोललो तर मोदींच्या पायाखालची जमीन सरकेल आणि हाहाःकार उडेल. इतक्या महिन्यांनंतर मोदी शांत आहेत. जमीन सोडा - त्यांच्या डोक्यावरचा केससुद्धा हललेला नाही. पण कॉंग्रेसला मात्र वाटत आहे की राफालकोंड्याच्या गोष्टीचे कथाकथन झाल्यावरती मोदी सत्तेबाहेर फेकले जातील. अर्थातच त्यानंतर यूपीए सत्तेमध्ये येईल. भ्रमात राहू नका राव - काल पाकिस्तानमधून टाळ्या वाजवल्या गेल्यायत! ऐकल्या नाहीत काय? राफाल मुद्दा धरून रहा - सोडू नकाच - भारताचे भावी पंतप्रधान म्हणून विजयश्री तुम्हालाच माळ घालणार आहे - एकदा का पाकिस्तानकडून उत्तेजनाची चिठ्ठी आली की राहुलजींचा जोम कसा पटापटा वाढतो नाही?
झालेच तर मोठा बूस्ट द्यायला माताजी रशियामध्ये आहेत. विनवण्या चालू आहेत की खलबते - प्रश्न विचारू नका - राफालकोंड्या हजर होईल. तिथेच म्हणे पाकिस्तानचे वरिष्ठ "धोरणकर्ते" पण आहेत. राहुलजींच्या हातातला लाऊडस्पीकर मोठा पावरबाज आहे. त्याच्यातला आवाज फक्त १०० डेसिबेलपेक्षा कमी असूनही पार युरोप अमेरिकेतही पोचतो. तिथेही राफालकोंड्याची गोष्ट आत्मसात केलेली विद्वान मंडळी तयार झाली आहेत. अहो गोष्ट अशी फक्कड शोधून काढली आहे की फार काही प्रशिक्षणाची गरज नाही. इथून बटाटे घातले की तिथून सोने बाहेर पडते ना? अगदी तसेच. एव्हढेच बोलायला शिकायचे - खोटे काय बोलतोस - राफालकोंड्याची गोष्ट सांगू?
तर आता म्हणे तेहसीन पूनावाला ह्या एकनिष्ठ कॉंग्रेसी नेत्याने राफालची केस सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यापासून चार हात दूर राहण्याचे राहुलजींनी ठरवले आहे. पण मला खात्रीच आहे की कोर्टात हा एकनिष्ठ कॉंग्रेसवाला प्रत्यक्ष न्यायाधीशालाही रिवाज सोडून प्रश्न विचारणार आहे - खोटे काय बोलतोस? आता पंचाईत इतकीच आहे की पूनावाला ह्यांची केस समजा १ ऑक्टोबर नंतर बोर्डावर आली तर कदाचित राहुलजींचा राहू केतू मंगळ गुरू बुध रवि चंद्रमा शनी एकजात सगळे ग्रह जिलबीसारखे सरळ झाल्यामुळे त्यांना न्यायही मिळू शकतो - खरे ना? पण. पण. प्रॉब्लेम आहे हो. समजा राहुलजींचे सॉरी सॉरी पूनावालांचे म्हणणे कोर्टाला पटलेच आणि त्यांनी पूनावाला ह्यांच्या बाजूने आणि मोदी सरकारच्या विरोधात निर्णय दिला तरी प्रशिक्षणाप्रमाणे चुकून पूनावाला कोर्टात विचारायचे - खोटे काय बोलतोस राफालकोंड्याची गोष्ट सांगू?
इतकेच नाही तर दरम्यानच्या काळामध्ये पाकिस्तानने सांगितल्याप्रमाणे राहुलजींनी रोजच्या रोज राफालकोंड्याच्या कथेचे पारायण करायचे ठरल्यामुळे एक धोका उद् भवतो. समजा राहुलजींनी एकाला तिकिट दिले. तर तो येऊन विचारयचा धोका नाही का? खोटे काय बोलतोस? मग उमेदवाराचे करायचे काय? राहुलजी बोलले की महागठबंधन झाल्यामूळे सर्व मोदी विरोधकांनी सुद्धा राफालकोंड्याची गोष्ट लावून धरली आहे. म्हणजे असे की समजा कॉंग्रेसच्या उमेदवाराने अर्जच भरला नाही तर अन्य महागठबंधन वाले तरी भरतील ह्याचा भरवसा काय? प्रश्न विचारू नका. धोका आहे त्यात.
२०१९ मध्ये समजा - पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार अशा पारायणांमुळे प्रसन्न होऊन कैलासपती भगवान शंकरांनी राहुलजींना आशिर्वाद दिलाच आणि ते निवडणूक जिंकल्याचे निर्वाचन आयोगाने जाहीर केलेच तर परत तेच - अहो सांगणार्याला हे विचारतीलच - खोटे काय सांगतोस? फारच मोठे संकट बुवा. एक करता एक व्हायचे. पण आहे - मार्ग काढणारे कॉंग्रेसी पण आहेत आपल्यामध्ये.
असे काही होऊ नये म्हणून २०१९ च्या निकालाच्या अलिकडे सर्व कॉंग्रेसी मंडळींना पुन्हा एकदा पहिले प्रशिक्षण देऊन नेहमीसारखे बोलायला शिकवावे असा प्रस्ताव कॉंग्रेसचे बुद्धिमान नेते श्री शशी थरूर ह्यांनी मांडला खरा पण सध्या राहुलजी राफालकोंड्याच्या कथेत गुरफटल्यामुळे त्यांनी म्हणे त्यांनाही लगेच विचारलेच - खोटे काय बोलतोस?
आली का पंचाईत? आता नेमके हे नवे प्रशिक्षण सुरू करायचे कधी - कॉंग्रेसवाले ते आत्मसात करणार कधी हा पेच संपणार कधी - छे बाबा - काहीच समजेनासे झाले आहे. कोणी मला अगदी १० जनपथवरून खरेखरे वृत्त द्यायला आले तरी अहो मला पण झाली ना सवय आता - मीही हेच विचारणार - खोटे काय सांगतोस राफालकोंड्याची गोष्ट सांगू?