एक टके के दो नियाझी
गो नियाझी गो नियाझी
या घोषणांनी पाकिस्तानचा आसमंत दुमदुमतो आहे. पंतप्रधान इम्रान खान ह्यांनी पायउतार व्हावे म्हणून त्यांना राजकीय आव्हान देणारा मोर्चा हीच पाकिस्तानमधील आजची सर्वात मोठी बातमी आहे. मौलाना फाज़ल उर रेहमान ह्यांनी आयोजित केलेल्या आझादी मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणावर जनता त्यामध्ये स्वयंस्फूर्तीने सामील होत आहे. कराची ओकारा सुक्कुर लाहोर मुलतान बहावलपूर खानेवाल गुजरानवाला ह्या शहरांमधून रेहमानचे प्रचंड स्वागत झाले आहे. रात्रीचे एक दीड वाजलेले असो की मोर्चा लाहोरमध्ये रात्री साडेतीनची सभा असो - लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघण्यासारखा आहे. सरईकी, पश्तुन विभाग आणि सिंधमध्ये रेहमानना प्रतिसाद मिळाला पण पाकिस्तानी पंजाबमध्येही मिळेल का या प्रश्नाचे उत्तर आता मिळत आहे. कराची सिंधमध्ये बेनझीर भुट्टॊ ह्यांची पाकिस्तान पीपलस पार्टी तर पंजाब लाहोरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी नवाझ शरीफ ह्यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पार्टी - यांचे सदस्य आणि पाठीराखे रात्री बेरात्री रस्त्यावर उतरत आहेत. खैबर पख्तुन्वा मधून मी आझादी मोर्चा जाऊ देणार नाही, मोर्चाला परवानगी नाकारण्यात ये्ईल असे तेथील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते पण पेशावरच्या हायकोर्टाने मोर्चाचा मार्ग खुला ठेवा आणि त्याला प्रतिबंध करू नका असा आदेश सरकारला दिला आहे. मौलाना फाज़ल उर रेहमान डेरा इस्माईल खानचे. तिथे त्यांच्या स्वागतासाठी विराट जनसमुदाय जमावा हे स्वाभाविक आहे. पण जन्माने पठाण असलेले इम्रान खान मियांवाली मधले आहेत तिथेही रेहमान ह्यांनी बाजी मारली आहे.
"मेहंगाई का जिन्न बेकाबू - (ह्या सरकारचे) महागाईवर नियंत्रण नाही - कुठे आहे सरकार? महागाईने त्रासलेल्या जनतेला आज कोणाचा आधार उरलेला नाही. जनता स्वतःहून सांगत आहे की हा मोर्चा राजकीय हेतूने काढलेला नाही - इथे अव्यवस्था भोंगळ कारभार अनागोंदी भ्रष्टाचाराचे राज्य चालू आहे. गेली ७२ वर्षे ह्या परिस्थितीत बदल झालेला नाही. पंतप्रधान इम्रान खान ह्यांचे आर्थिकच नव्हे तर अन्य आघाडीवरचे अपयश डोळ्यात भरण्यासाखे आहे. गरीबांना खायला अन्न नाही. देशाचा सत्यानाश झाला आहे. त्यांनी सत्ता सोडावी म्हणून आम्ही मोर्चात सामील झालो आहोत. नियाझी चले जाव ही प्रत्येक देशप्रेमी पाकिस्तान्याची घोषणा आहे." ही सार्वत्रिक भावना आहे. सावधान! पाकिस्तान उन्मळून पडत आहे.
१४ ऑगस्ट २०१४ रोजी इम्रान खानने लाहोर ते इस्लामाबाद असा मोर्चा तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ ह्यांच्या विरोधात काढला होता. १५ ऑगस्ट रोजी मोर्चा इस्लामाबदमध्ये पोचला आणि शहराच्या अतिसुरक्षित रेडझोनमध्ये सुरक्षा व्यवस्थेला न जुमानता घुसला. शरीफ ह्यांच्या निवासस्थासमोर मोर्चेकरी ठिय्या मारून बसले. ह्यावेळी झालेल्या धुमश्चक्रीमध्ये तीन जण ठार आणि जवळजवळ ६०० जखमी झाले होते. त्यामध्ये ११५ पोलिस जखमी झाले होते. जे अस्त्र इम्रान खान ह्यांनी शरीफ विरोधात वापरले तेच आज फाझल उर रेहमान त्यांच्या विरोधात वापरत आहेत.
फरक असा आहे की इम्रान खान ह्यांना मोर्चा काढण्यासाठी शरीफ ह्यांच्या विरोधातील तत्कालीन सैन्यप्रमुखानेच प्रोत्साहन दिले होते असे म्हटले जात होते. आज मात्र मौलाना फाझल ह्यांच्या मागे श्री अजित दोवल ह्यांच्याशी झालेल्या भेटी असाव्यात असे पाकिस्तानात उघड उघड बोलले जात आहे. मोर्चा इस्लामाबादेत पोचण्याआधी ’मला मदत करा हो’ सांगत इम्रान खान ह्यांचे काही सरकारी अधिकारी इस्लामाबादमधील एका देशाच्या राजदूताला भररात्री लपून छपून भेटले असेही सांगितले जात आहे. हा देश कोणता असेल बरे? (मला वाचवा म्हणजे नेमके काय? राजकीय आश्रय? ते देऊ शकणारा देश आहे सौदी अरेबिया. त्यांच्या राजपुत्राला गाडीत बसवून स्वतः इम्रानने ड्रायव्हिंग काही उगाच केले नव्हते. बदल्यात राजपुत्राने इम्रानला अमेरिका भेटीसाठी स्वतःचे खास विमान देऊ केले होते. सध्या सौदीमध्ये मोदी दौर्यावर असताना इम्रानच्या विनंतीचे काय होणार इथे डोळे लागले आहेत.)
पाकिस्तानचा पंतप्रधान वारंवार अणुयुद्धाच्या धमक्या देऊ लागला की समजून जावे की त्याचे आसन दोलायमान झाले आहे. असल्या धमक्या दिल्याने जनता आपल्यामागे येईल हे मृगजळ ठरणार आहे. पाकव्याप्त काश्मिर हातचे जाणार ही वस्तुस्थिती जनतेपासून लपून राहिलेली नाही. सैन्य त्या बाबीवरून भारताशी युद्ध छेडण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. युनो तर्फे एफएटीएफची टांगती तलवार डोक्यावर आहे आणि आर्थिक संकटात सापडलेल्या देशाला एकहाती पैसा पुरवू शकेल असा मित्र उरलेला नाही. इस्लामी असूनही आखातामधल्या मुस्लिम देशांनी पाकिस्तानला अव्हेरले आहे. तुर्कस्तान व मलेशिया वगळता अन्य देशांनी पाठ फिरवली आहे. मुस्लिम नसलेला एकमेव देश पाकिस्तानला मदत करू म्हणतो तो चीनच. सर्वात महत्वाचे म्हणजे अफगाणिस्तानमधील शांतताप्रक्रियेमधील "व्यत्यय" मान्य करूनही तालिबानांना म्हणजे पर्यायाने पाकिस्तानलाच अमेरिकेने ढेंगा दाखवला आहे. पाकिस्तानला भारताच्या ताब्यातील काश्मिरमधील मानवाधिकाराचे हनन दिसते पण तो शिनज्यांग मधील मुस्लिमांवर चीन सरकारकडून होणार्या अत्याचाराविरोधात ब्र देखील का काढत नाही बरे असा सवाल ट्रम्प ह्यांनी विचारून पाकिस्तानचे पितळ उघड केले आहे. अशा पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनमधून अधिकृत शिष्टमंडळ पाकिस्तानात बोलावून त्यांना पाकव्याप्त काश्मिरच्या दौर्यावर नेण्याचे राजकारण इम्रान ह्यांनी केले. त्याला मोदी सरकारने सणसणीत उत्तर दिले आहे. इयूच्या २८ खासदारांच्या भेटीला गालबोट लावण्यासाठी गेल्या तीन दिवसात काश्मिर खोर्यामध्ये सहा दहशतवादी हल्ले झाले आहेत.
इम्रानना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कोण कोण उतावीळ झाले आहेत? त्यांचे आणि सैन्याचे आता फारसे चांगले संबंध नाहीत. पाकिस्तानात नकोशा झालेल्या विद्यमान पंतप्रधानाविरोधात असे मोर्चे सैन्यच आयोजित करवून घेते. मग ह्या मोर्चामागेही पाकिस्तानी सैन्य कशावरून नाही बरे? पण आज अशी शंका न घेता उघडपणे भारताचे आणि खास करून दोवल ह्यांचे नाव घेतले जात आहे हे विशेष.
ज्या कोणी ही कामगिरी फाझल ह्यांच्यावर सोपवली त्याने त्यांच्यावर विश्वास कसा बरे टाकला हे कोडे आहे. फाझल ह्यांचा इतिहास बघितला तर तो आश्चर्यजनक आहे. त्यावरच एक विशेष लेख लिहिता येईल. पण नरसिंह राव आणि अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्या कारकीर्दीमधील त्यांच्या भारतभेटी चांगल्याच गाजल्या होत्या. मौलाना ह्यांचे कराचीच्या सु(कु???)प्रसिद्ध बानुरी मशीदीचे प्रमुख शम्झई ह्यांच्याशी असलेले संबंध - तालिबान उभारणीतील सहयोग - बेनझीर भुट्टो आणि आसिफ झरदारी यांजबरोबरचे जिव्हाळ्याचे संबंध - ओसामा बिन लादेन मुल्ला ओमर आयमान जवाहिरी ह्यांच्यासोबतचे संबंध - अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्ता दृढ करण्यातले योगदान - हरकत उल अन्सारचे प्रमुख पद - त्यानंतर ह्या संघटनेचे जे दोन तुकडे झाले त्या हुजी आणि हुम चेही पडद्याआडचे प्रमुखपद - मुत्ताहिदा मजलिस ए अमल ह्या पाकिस्तानी राजकीय पक्षामागची प्रेरणा आणि ताकद - भारतातील देवबंदींशी जवळचे संबंध - गुजरातमधून २०११ मध्ये दार उल उलूम देवबंदच्या उपकुलगुरू पदावर नियुक्त झालेले आधुनिक विचाराचे मौलाना गुलाम महोमद वस्तानवी ह्यांना पदावरून हटवण्यासाठी फाझल ह्यांनी भारतामध्ये येऊन केलेली खलबते असे एकाहून एक स्फोटक विषय फाझल उर रेहमान ह्यांच्याशी जोडले गेले आहेत. शान शौकत सुखवस्तू चंगळवादी आयुष्याची आवड बाळगणारे फाझल पाकिस्तानला एक धक्का और देत शकले करण्यास मदत करणार का ह्या प्रश्नाचे उत्तर आता जवळ येऊन ठेपले आहे असे दिसत आहे.