Monday, 27 January 2020

अकलीम अखतर ते अदनान सामी


tumblr_inline_mhqp6gw9DT1qz4rgp





अकलीम अखतर उर्फ जनरल रानी हे नाव भारतीयांना माहिती नाही यात काही नवल नाही पण एकेकाळच्या या सामर्थ्यवान महिलेची आठवण आज पाकिस्तानातही कोणाला राहिलेली नाही. पाकिस्तानातील गुजरात शहराच्या एका पोलिस अधिकार्‍याची ही पत्नी सहा अपत्ये झाल्यानंतर नवर्‍याला सोडून देशाच्या राजधानीमध्ये आपल्या मुलांसह राहू लागली. तिथे ती बड्या अधिकार्‍यांसाठी डान्स पार्टीज आयोजित करत असे. अकलीमकडे हळूहळू मोठमोठ्या मुल्की आणि लष्करी अधिकार्‍यांची रीघ लागू लागली. रावळपिंडीतील महत्वाच्या पार्ट्यांमध्ये तिला आमंत्रणे येऊ लागली. अशाचा एका पार्टीमध्ये तिची ओळख झाली जनरल याह्या खान ह्यांच्याशी. ओळख झाली तेव्हा त्यावेळी जनरल याह्याखान लष्कर प्रमुख नव्हते. तेव्हा जनरल अयूब खान यांची राजवट सुरू होती. जनरल याह्या खान हळूहळू अकलीमच्या घनिष्ट मैत्रीपाशामध्ये गुंतत चालले होते. अकलीमनेच बाईलवेड्या याह्याची ओळख अनेक उच्च सामाजिक वर्तुळातील महत्वाच्या महिलांशी करून दिली होती. १९६८ - ६९ मध्ये पाकिस्तानात जनरल अयूब खान यांच्या विरोधात प्रखर डावी चळवळ उभी राहिली होती. त्या वादळामध्ये अयूबना सत्ता सोडावी लागली होती. त्यानंतर सत्तेवर आले ते जनरल याह्याखान. 

देशातील सर्वोच्च पद भूषवणार्‍या याह्या खानची खास मैत्रिण म्हणून अकलीमचे वजन रावळपिंडीच्या राजकीय वर्तुळांमध्ये अचानक अधिकच वाढले. तिला आता जनरल रानी म्हणून लोक संबोधू लागले. देशातील कोणत्याही राजकीय निर्णयामध्ये तिच्या मताला किंमत आली. सत्तेकडून मलिदा लाटण्यासाठी उत्सुक असलेले लोक तिच्याकडे लाचार होऊन घिरट्या घालत असत. आता केवळ मुल्की वा लष्करी अधिकारी नव्हेत तर राजकारणी आणि उद्योगपती - श्रीमंत व्यक्तीही जनरल याह्याखान यांच्याकडून काहीतरी पदरात पडावे म्हणून तिच्याकडे येत असत. 

अकलीमच्या निर्विवाद वर्चस्वाच्या काळामध्ये तिच्या नातेवाईकांना देखील वेगळेच महत्व प्राप्त झाले होते. तिची एक कन्या आरूसा आलम एक पत्रकार होती.तिने एका मुल्की अधिकार्‍याशी लग्न केले होते. तिचे आणि भारतीय पंजाब राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या प्रेमसंबंधांविषयी अनेक प्रवाद २००० नंतर उठले होते. अर्थात त्या बातम्यांचा इन्कारही गेला गेला होता. २००४ नंतर आरूसाचे सलग वास्तव्य भारतातच आहे. तिचा पुत्र फक्रे आलम पाकिस्तानच्या फिल्मी दुनियेमधला एक चमकता सितारा आहे. 

अकलीमच्या बहिणीची मुलगी म्हणजे नौरीन सामी खान. नौरीनचे वडिल जम्मूचे. नौरीनकडे ब्रिटिश आणि पाकिस्तानी नागरिकत्व होते. तिने अर्शद सामी  खान यांच्याशी लग्न केले होते. अर्शद पाकिस्तानच्या वायुदलामध्ये सेवारत होते. अर्थात आपल्या मावस सासूच्या प्रभावाचा त्यांना लाभ झाला नसेलच असे नाही. 

नौरीन आणि अर्शद यांचा पुत्र अदनान सामी खान यांना मोदी सरकारने पद्मश्री पुरस्कार दिल्यामुळे त्यांचे वडिल अर्शद खान यांचा इतिहास आज सोशल मिडियामध्ये उगाळला जात आहे. १९७१च्या युद्धामध्ये पाकिस्तानने पठाणकोट या महत्वाच्या भारतीय वायुदलाच्या ठाण्यावर यशस्वी हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यामध्ये अर्शद यांनी भाग घेतला होता इतकेच नव्हे तर त्यातील यशासाठी त्यांना जुर्रत ए पाकिस्तान हा मानाचा पुरस्कारही मिळाला होता. १९७२ मध्ये अर्शद यांनी पाकिस्तानी सैन्यातून राजिनामा दिला. त्यांची नेमणूक नंतर पकिस्तानचे राजदूत म्हणून विदेशांमध्ये झाली होती. एकूण चौदा देशामध्ये राजदूत म्हणून कारकीर्द चालवून अर्शद सामाजिक जीवनामधून बाजूला झाले होते. त्यांच्या पुत्राला पद्मश्री देण्यावरून जी बोंब चालू आहे तिची पार्श्वभूमी ही अशी आहे.

१९६९ मध्ये याह्याखाननी सत्ता हाती घेऊन देशामध्ये मार्शल लॉ जाहीर केला होता. लवकरच निवडणुका घेतल्या जातील असेही जाहीर केले होते. १९७० साली झालेल्या निवडणुकीत जेव्हा सध्याच्या बांगला देशचे जनक मुजिबुर रेहमान यांना निर्विवाद यश मिळाले तेव्हा याह्या खान यांनी पूर्व पाकिस्तान्यांच्या हाती देशाची सत्ता सोपवण्यास नकार दिला. २५ मार्च १९७१ रोजी ते ढाका येथे गेले. पुढे काय करायचे हे त्या भेटीमध्ये ठरवण्यात आले. जनरल साहेब पश्चिम पाकिस्तानात परतले. आणि पूर्व पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सर्च लाईटची सुरूवात झाली. मुजिबुर रेहमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तानच्या तुरूंगात डांबण्यात आले. आणि पूर्व बंगालमध्ये पाकिस्तानी सैन्याने अत्याचारांचा कहर केला. १९७१ च्या युद्धानंतर जनरल याह्या खान यांना पाय उतार व्हावे लागले. तेव्हा देशात झुल्फिकार अली भुट्टो यांची सत्ता आली. 

भुट्टॊंच्या पीपीपीने १९७०च्या निवडणूक प्रचारामध्ये अकलीम अख्तर उर्फ जनरल रानी यांच्या विरोधामध्ये आपली तोफ डागली होती. भुट्टॊ पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानच्या प्रचार माध्यमांनी अकलीमवर लक्ष केंद्रित केले होते. उर्दू दैनिक मुसावत तिच्यावर जहरी टीका करत होते. १९७१च्या पराभवाला अकलीम जबाबदार असल्याचे आरोप होत होते. यातच भुट्टो यांनी तिची पूर्ण चौकशी व्हावी म्हणून १९७१ च्या पराभवाची चिकित्सा करणार्‍या हमुदुर रेहमान कमिशनला अकलीमचीही चौकशी करण्यास सांगितले होते.  किंबहुना भुट्टो सत्तेमध्ये आल्यावर अकलीमला नजरकैदेत टाकले गेले होते. हमुदुर रेहेमान कमिशनने अकलीमच्या सहभागाचीही चौकशी केल्याची बातमी २००० नंतरच मिडियामध्ये वाचायला मिळाली होती. 

१९७७ मध्ये जेव्हा भुट्टॊंना सत्तेवरून हटवून जनरल झिया पदारूढ झाले तेव्हा तिची नजरकैद संपली. जनरल रानीवर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर समजू शकते. पण देशद्रोह केल्याचे आरोप का बरे होत असतील? देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच्या विश्वासातील ह्या महिलेला अशी कोणती माहिती होती जी सुलभपणे मिळू शकत नव्हती? सगळीच की. भर युद्धामध्ये अगदी जनरल याह्या खानच्या वॉर कॅबिनेटच्या बातम्याही तिच्याकडे येत असाव्यात. 

१९७१ च्या युद्धामध्ये भारताची गुप्तहेर संस्था रॉ ने जी भरीव कामगिरी केली तिची अनेक प्रकरणे आजही गुलदस्तात आहेत. त्यातले एक प्रकरण म्हणजे याह्याखानच्या वॉर कॅबिनेटमध्ये पेरलेला एक भारताचा हेर. रॉ चे प्रमुख आर एन काव यांचे दोन नंबरचे सहकारी होते पी संकरन नायर. नायर साहेबांचे नुसते नाव काढले तरी पाकिस्तान्यांच्या पोटात गोळा येत असे. नायर साहेबांनी हा हेर पेरलेला होता. डिसेंबर १९७१ मध्ये दिल्लीवर हल्ला चढवून पाकिस्तान युद्धाला प्रारंभ करेल म्हणून रॉ कडे पक्की खबर होती. त्यानुसार वायुदलाला सूचना देण्यात आली. दोन दिवस वैमानिक विमानात उड्डाण करण्याच्या अवस्थेत बसून होते. पण हल्ला काही झाला नाही. शेवटी वायुदलाने विचारणा केली की खबर विश्वसनीय आहे ना? त्यावर रॉ ने होकारार्थी उत्तर दिले. पुढे दोन दिवसात म्हणजे तीन डिसेंबर रोजी युद्धाला तोंड फुटले. 

खबर खरी होती तर दिवस का चुकला म्हणून पुढे चौकशी झाली असता दूताने सांकेतिक भाषेमध्ये नेमकी तारीख कळवली होती पण भाषांतरकर्त्याने चुकीची तारीख काढली असल्याचे लक्षात आले. हेराकडून मिळालेल्या अचूक माहितीमुळे देशाचे संरक्षण करण्यात यश आले होते. पाकिस्तानच्या पराभवाला कारणीभूत झालेली हीच बाब भुट्टोंना डाचत होती का?

कोण होता हा हेर संकरन नायर यांनी पेरलेला? जो याह्या खानच्या वॉर कॅबिनेटमधून थेट खबरा काढत होता बरे?

असो. युद्धस्य कथा रम्या म्हणतात ते उगाच नव्हे.

सूज्ञास अधिक सांगणे न लगे!!

16 comments:

  1. शेवटचा प्रश्न अनुत्तरीत का सोडला आहे.... सुज्ञ असलो तरी चुकीचा अंदाज लावला जाण्याची शक्यता आहे!

    ReplyDelete
    Replies
    1. Modi rewards people who work for India

      Delete
    2. REPLY ALREADY RECEIVED DURING BALAKOT ATTACK

      Delete
    3. आपल्या मताशी सहमत...
      सद्यस्थितीत नाव सांगणे भाऊंना अनुचित वाटत असेल.
      पण मोदीजींचे एक वैशिष्ट्य असे की देशासाठी काम करणाऱ्याना ते वेळ आली की सन्मानित करतातच..।

      Delete
  2. उत्कंठापूर्वक

    ReplyDelete
  3. नेमके उत्तर आकलनाच्यापुढे आहे। पूर्ण करा ही युद्धकथा।

    ReplyDelete
  4. भर युद्धामध्ये अगदी जनरल याह्या खानच्या वॉर कॅबिनेटच्या बातम्याही तिच्याकडे येत असाव्यात.

    It look like she was agent

    Then what is role of (The Black Tiger )RavindraKushik?

    ReplyDelete
  5. भारी आहे. अतिशय उत्कंठावर्धक !
    लवकर टाका पुढील भाग.

    ReplyDelete
  6. पाकिस्तानी चॅनेल मध्ये, अदनान आणि एकूणच सामी कुटुंबावर भारतीय RAW चे एजंट असल्याचे खुले आरोप केले जातात.

    त्या व्यतिरिक्त त्याचे कुटुंब मूळच अफगाण असून त्याचा त्याचे आजोबा का पणजोबा हे तत्कालीन अफगाण आर्मी चे गव्हर्नर जनरल होते, त्या व्यतिरिक्त त्यांचे खैबर पख्तुनख्वा प्रांतात छोटे संस्थान-वजा राज्य पण होते जे पाकिस्तान मध्ये सामील करण्यात आले होते.
    त्याचे वडील तब्बल १४ देशात पाकिस्तानचे राजदूत, तीन पाकिस्तानी राष्ट्रपतींचे आणि ४ पाकिस्तानी पंतप्रधानांचे aide-de-comp म्हणजे मुख्य लष्करी सल्लागार होते.

    आता असे कुटुंब भारतात स्थायिक झाले म्हणजे बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात असणार पण माझ्यामते सामी कुटुंबाने भरपूर सिक्रेट्स शेअर केली असणार.
    कारण समाजमाध्यमांवर गुलाम बोंबलत असले तरी काँग्रेस सह इतर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने अधिकृत विरोध नोंदवला नाहीये

    ReplyDelete
  7. मला वाटते यावर एक चित्रपट आहे.
    नांव आठवत नाही.

    ReplyDelete
  8. Modi knows whom to reward.. Yes

    ReplyDelete