Wednesday, 10 May 2017

ओबॉर - सीपेकचे रहस्य भाग १

Image result for cpec



ओबॉर - सीपेकचे रहस्य भाग १

आजपर्यंत हे दोन शब्द आपण अनेकदा ऐकले आहेत. त्याबद्दलचे संदर्भ वाचनामध्ये येतात. आणि आपण जितके वाचत जातो तितके अधिकाधिक प्रश्न मनामध्ये येत राहतात. ओबॉर म्हणजे काय - सीपेक आणि ओबॉर वेगळे आहेत काय - चीनला ह्या दोन प्रकल्पांमध्ये इतका रस का आहे - १००००० कोटी डॉलर्स एव्हढी अवाढव्य रक्कम चीन ह्या पर्कल्पामध्ये का ओतू पाहत आहे - ओऑर वा सीपेक जर का आर्थिक उन्नतीसाठी असेल तर भारत मात्र त्याला विरोध का करतो - भारत एकच देश आहे का जो ह्या संकल्पनांच्या विरोधात आहे असे विविध प्रश्न समोर येत राहतात. म्हणून प्रथम एका दृष्टिक्षेपामध्ये हा प्रकल्प काय आहे त्याची कल्पन यावी म्हणून काही माहिती बघू या. 

इतिहास काळामध्ये चीन देशामध्ये तयार होणार्‍या रेशीम आणि तत्सम वस्तूंचा व्यापार जगामधल्या अनेक भागांपर्यंत पोहोचला होता. चिनी वस्तूंना मागणी होती. ह्या व्यापारामधून चीनला भरभराटीचे दिवस बघायला मिळाले होते. ज्या मार्गाने मालाची ने आण त्या काळामध्ये केली जात असे त्याला सिल्क रूट असे नाव रूढ झाले. मराठी मुलांना हाच खुष्कीचा मार्ग म्हणून माहिती आहे. इतिहासामध्ये खुष्कीचा मार्ग केवळ चिनी वस्तूंच्या व्यापारासाठी वापरला जात नव्हता तर भारतीय वस्तूंची बाजारपेठही ह्याच मार्गाचा वापर करून मोठी झाली होती. वस्तूंच्या व्यापाराबरोबरच सांस्कृतिक देवाण घेवाण होत होती. आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या मार्गावरती लुटारूंनी माल लुटून नेऊ नये आणि व्यापार्‍यांना निर्वेधपणे व्यापार करता यावा म्हणून तत्कालीन राजे महाराजे संरक्षण उपलब्ध करून देत असत. गेल्या काही वर्षांमध्ये नेत्रदीपक आर्थिक प्रगती करणार्‍या चीनला आता पुनश्च हा मार्ग पुनरुज्जीवित करण्याचा ध्यास लागला आहे. बदलत्या काळानुसार आज हा मार्ग केवळ व्यापारासाठी वापरण्याचे मनसुबे चीन करत नसून त्याच्या योगाने प्रत्यक्षामध्ये मार्ग ज्या ज्या देशांमधून जाईल तिथे तिथे चीनचे केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय साम्राज्य असावे - हे देश म्हणजे एक प्रकारे चीनच्या ’वसाहती’ व्हाव्यात अशा पद्धतीची विचारसरणी राबवायची योजना आखली जात आहे. 

ओबॉर म्हणजे चीनच्या पूर्वेकडील प्रांतांपासून ते युरोपापर्यंत बांधण्यात येणारा जमिनीवरून जाणारा मार्ग - रेल्वे. ओबॉरचा एक फाटा म्हणजे सीपेक - चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्यामध्ये चीनच्या पश्चिम सीमेनजिकचे शहर काशगर पासून ग्वदर बंदरापर्यंत बांधण्यात येणारा २७०० किमी लांबीचा रस्ता. ओबॉर आणि सीपेक मिळून चीनची भूमी युरोप - मध्य पूर्व आणि आफ्रिकेपर्यंत जोडण्याची ही महत्वाकांक्षी योजना आज जन्मली नाही. १९९० पासून क्रमाक्रमाने त्याच्यामध्ये प्रगती होत राहिली. शी जिन् पिंग २०१३ मध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी त्याला स्पष्ट आणि मूर्त रूप देण्यामागे आपली राजकीय शक्ती उभी केली आहे. 

सीपेक ह्या नावामध्येच स्पष्ट होते की चीनच्या दृष्टीने हा चीन आणि पाकिस्तानला जोडणारा रस्ता आहे. हा मार्ग ज्या भूमीवरून जायचा आहे तो पाकव्याप्त काश्मिर हा अवैधपणे पाकिस्तानने आपल्या ताब्यामध्ये घेतला असून भारताने ह्या पाकिस्तानी कृत्याच्या वैधतेवर कधीही शिकामोर्तब केलेले नाही. पाकव्याप्त काश्मिरामधली जनता पाकिस्तानी राजवटीला कंटाळली आहे. शिवाय पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामधून हा मार्ग जायचा असून तेथील जनतेने तर स्वातंत्र्याचे बंडच पुकारले आहे. बलुची स्वातंत्र्य योद्धे आजही ह्या प्रकल्पाच्या कामावरील चिन्यांवर सशस्त्र हल्ले चढवत असतात. १५००० सैनिकांची फ़ौज उभी करून सुद्धा पाकिस्तान ह्या मार्गाला सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती तोंडाने मान्य केली नाही तरी मनाने चीनने ते सत्य स्वीकारले आहे. भारत ह्या प्रकल्पामध्ये सहभागी झाल्याशिवाय त्याच्या स्थैर्यावरती कायमचे प्रश्नचिन्ह राहील आणि ज्या प्रमाणामध्ये गुंतवणून करायची आहे त्या प्रमाणामध्ये त्यावर हाती काय लागणार हे स्पष्ट होत नाही. म्हणूनच हवे तर त्याचे नाव आपण बदलू पण तुम्ही मात्र सामिल व्हा ह्यामध्ये असा लकडा चीनने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून म्हणजे गोव्यामधील ब्रिक्स भेटीनंतर लावला आहे. ह्या विषयावर भारत चीन यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या असून चीनने त्याकरिता शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. 

चीनच्या विषयी मी माझ्या आधीच्या लेखांमध्ये सविस्तर लिहिले आहे. ज्या बेजाबाबदारपणे चीन आजवर वागत आला आहे ते पाहता त्याच्या प्रामाणिकपणावरती कायम प्रश्नचिन्हच उठत राहणार हे स्पष्ट आहे. साहजिकच पाकिस्तानी आय एस आयने असे चित्र आज उभे केले आहे की पाकिस्तानच्या आर्थिक उन्नतीसाठी चीन ४६०० कोटी डॉलर्स एव्हढी प्रचंड रक्कम खर्च करायला तयार आहे - ह्यामधून आधुनिक पाकिस्तानच्या उदयाला प्रारंभ होऊ शकतो आणि ह्या स्वर्णिम स्वप्नामध्ये मोडता घालायचे काम भारत करत असून त्याला पाकिस्तानची भरभराट बघवत नाही. म्हणूनच आय एस आयने उभे केलेले हे चित्र आणि वस्तुस्थिती यामधले अंतर काय आहे त्याचा भाग २ मध्ये विचार करू या. 

No comments:

Post a Comment