Friday, 12 May 2017

ओबोर सिपेक चे रहस्य भाग 4

ओबोर सिपेक चे रहस्य भाग 4

Beijing General Qamar Bajwa Meeting With Chinese Foreign Minister General

ह्याच पार्श्वभूमीवरती सिपेकच्या निमित्ताने नेमका काय करार झाला आहे आणि पाकिस्तानी सैन्याने तो गुलदस्तात ठेवण्याचे काय प्रयोजन असावे हे प्रश्न उपस्थित होतात. मला भेटलेले डावे इतके आश्वस्त का होते ह्याचे कोडे सुटायला फार वेळ लागला नाही. पाकिस्तानी सैन्याकडे लपवण्यासारखे काही आहे ह्याचाच अर्थ पाकिस्तानी जनतेच्या स्वाभिमानाला धक्का लागेल अशा अटी ह्या करारामध्ये मान्य करण्यात आल्या असाव्यात अशी शंका घेण्यास वाव उरतो. इथे एक गोष्ट स्पष्ट होत आहे की चीन दिवसेंदिवस पाकिस्तान हा जणू शिन्ज्यांग प्रमाणे आपलाच एक प्रांत असल्याप्रमाणे वर्तन करत आहे. आपले सार्वभौमत्व चीनच्या चरणी वाहण्याचे धोकादायक काम स्वतःला देशप्रेमी म्हणून डंका पिटणाऱ्या पाकिस्तानी जनरल्सनीच केले आहे हे उघड आहे. 

भारतीय उपखंडाविषयक आणि खास करून पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तान विषयक निर्णय पाकिस्तानचे देशहित बघून होताना दिसत नाहीत. ते चीनच्या काय हिताचे आहे हे बघून घेतले जात आहेत. एकविसाव्या शतकामध्ये जर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था - अंतर्गत राजकीय हालचाली - परराष्ट्र धोरण - सुरक्षा आणि संरक्षण ह्या बाबतचे निर्णय जर स्वतःच्या देशाचे हित लक्षात न घेता शेजारी देशाच्या इच्छेप्रमाणे त्याच्या सोयीने त्याच्या हिताच्या दृष्टीने घेण्यासाठी त्याच देशाचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व उतावीळ असेल तर अशा देशाने आपल्या शेजारी देशाचे मांडलिकत्व स्वीकारले असे म्हणायला हरकत नाही. असा छोटा देश हा त्या मोठ्या शेजाऱ्याची वसाहत असल्याप्रमाणे वापरला जाऊ शकतो. आणि हाच भारतीय सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका आहे. 

पाकिस्तान नेहमीच अशी शेखी मिरवत असतो की आपण एक अण्वस्त्रधारी देश आहोत - जगाच्या राजकारणामध्ये आपल्याला अनन्यसाधारण असे स्थान आहे - खास करून भारत हा आकाराने मोठा असला तरी आपले स्ट्रॅटेजिक महत्व त्याच्यापेक्षा यत्किंचितही कमी नाही किंबहुना आपण भारताच्याच इतके प्रभावशाली आहोत. सर्व जागतिक व्यासपीठांवर आपण भारताइतकेच श्रेष्ठ आहोत हे ठसवण्याचा तो सतत प्रयत्न करत असतो. आपले स्थान इतके एकमेवाद्वितीय आहे की बलाढ्य अमेरिकेलाही आपण झुकवू शकतो. ह्या वल्गनांचे चीनसमोर काय होते ते रहस्यच आहे. चीन समोर असा बलाढ्य पाकिस्तान नांगी का टाकतो हे कोडे नाही का? सर्व प्रकारची नाटके अमेरिका व पाश्चात्यांसमोर करणारा पाकिस्तान चीनसमोर मात्र नाक मुठीत धरून वागतो. इथे पाकिस्तान असे असे करतो असे म्हणण्यापेक्षा खरे तर मी असे म्हटले पाहिजे की पाकिस्तानी सैन्यावर ज्यांची जबर पकड आहे ते पंजाबी पाकिस्तानी जनरलस असे असे करतात. 

"पर्वताएव्हढी उत्तुंग आणि महासागराएव्हढी खोल" अशी आपली चीनशी दोस्ती असल्याच्या वल्गना पाकिस्तानची सेना करत असते. तिच्यामधला फोल पण दाखवून देणे अवघड नाही. किंबहुना ह्या वल्गना ह्याचसाठी केल्या जात आहेत की जेणेकरून आपल्या सैन्याच्या देशप्रेमावर जरासुद्धा शंका ना घेणारी भोळी पाकिस्तानी प्रजा अशाच गैरसमजात अखंड राहावी.  शिन जियांग प्रमाणेच पाकिस्तान हा चीन चा एक प्रांत होऊन बसला आहे हे बिंग फुटू नये ह्याची काळजी घेण्याचे काम तिथे चालू आहे. अशा प्रकारचे नियंत्रण मिळवण्यासाठी चीनने नेमक्या कोणत्या पातळीपर्यंत पाकिस्तानी सैन्यामध्ये आपले हित बघणारी मंडळी घुसवली आहेत - परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्या प्रक्रियेमधल्या कोणत्या पदांवरती त्याची पकड आहे - ही खोलात जाऊन बघण्याची बाब ठरेल. 

चीनच्या हिताची री ओढणारी ही घटनाबाह्य व्यवस्था पंजाबी पाकिस्तान्यांपुरतीच काटेकोरपणे मर्यादित का ठेवली गेली आहे हे कोडे आहे. चिन्यांचे अधिकारी येतात आणि कधी बलुची किंवा सिंधी राजकारण्यांना अथवा सैनिकी अधिकाऱ्यांना अथवा नागरी पदाधिकाऱ्यांना भेटतात असे दिसत नाही ते फक्त पंजाबी केडरलाच भेटतात. असे का बरे असावे? पाकिस्तानच्या सैन्याचे हस्तक असलेले दहशतवादी गट चीनला जवळचे का वाटतात? मौलाना मसूद अजहरला दहशतवादी ठरवण्याला चीन इतके का मुरडे घेतो? की असे इसम त्याला स्वतःचेही ऍसेट वाटतात? भारतामध्ये दहशतवादी कृत्ये घडवून आणण्यासाठी चीनलाही मसूदच्या वापर करून घ्यायचा आहे हे खरे ना?  भारताने युनोच्या सुरक्षा समितीवरती कायमस्वरूपी सभासदत्व मागितले की तसे पाकिस्तानलाही मिळाले पाहिजे असे चीन का म्हणतो? गिलगिट बाल्टिस्तान - बलुचिस्तान मध्ये जनतेचा जो छळ पाकिस्तानी सैन्य करत आहे त्यामागे चीनचे हितसंबंध जपण्याचा हेतू नाही काय? 

ही वस्तुस्थिती आपण विसरता नये की आज चीनने पाकिस्तानवरती आर्थिक - मूलभूत सोयी सुविधा - ऊर्जा - रस्तेबांधणीसारख्या क्षेत्रामध्ये आपली घट्ट पकड बसवली आहे. सिपेक ही पाकिस्तानला अंतिमरीत्या आपला मंडलिक बनवण्याची योजना असून तीच पाकिस्तानची जीवनरक्षक कशी आहे हे तेथील लोकांना 'विकण्याचे' काम तिथंही माध्यमे - फेक्युलर विद्वान करत आहेत. अशा तऱ्हेने ज्या पाकिस्तानने अमेरिकेला कधी आपला आत्मा विकला नाही तो पाकिस्तान चीनकडे आपले सर्वस्व गमावून बसला आहे हे सुस्पष्ट होत आहे. इतक्यावरच प्रकरण थांबले नसून सिपेक योजनेचे नियंत्रण नागरी आस्थापनाकडे न राहता सैन्याकडे असावे म्हणून पाकिस्तानी सैन्याचा कटाक्ष आहे. कारण सिपेकमध्ये सहभाग नसेल तर आपण पाकिस्तानमधली अंतिम शक्ती गमावून बसू हे कटू भविष्य त्याच्या डोळ्यासमोर नाचते आहे. 

ह्या परिस्थितीचा अर्थ स्पष्ट आहे. १९४७ नंतर चीनने तिबेट घशाखाली ढकलला आज तो पाकिस्तान गिळू पाहत आहे. पंजाबी नेतृत्व ऐकणारच नसेल तर पाकिस्तानचे विभाजन हे हिंदू स्वाभिमानाला सुखावणारे म्हणून नव्हे तर भारतीय उपखंडामध्ये आपल्याभोवती चीनचा विळखा अधिकच घट्ट होउ नये म्हणून करणे आता गरजेचे होत जाईल. एक तिबेट गिळंकृत केला त्याची जबर किंमत आपण आज मोजतो आहोत. चाचा नेहरूंसारखेच आजही गप्पा बसलो तर चिनी ड्रॅगन ची मगरमिठी सुटणे अधिकच अवघड होऊन बसेल. म्हणून बलुची - सिंधी - पश्तुनी जनतेच्या हिताचे आहे म्हणून नव्हे तर भारताच्याही हिताचे आहे म्हणून मोदी सरकारला काळजीपूर्वक पावले उचलायची आहेत. ते तसे उचलेल तेव्हा त्याच्या मागे जनतेची टाकत आहे हे दृश्य दिसणे गरजेचे आहे. 

दुर्दैव हे आहे की भारतामधल्या डाव्या फुरोगामी फेक्युलरांची एक वेळ चीनकडे पाकिस्तानचे  सार्वभौमत्व गेले तरी चालेल अशी मानसिकता झाली आहे. पाकिस्तान विरोधात मोदी जिंकले असे चित्र उभे राहण्यापेक्षा चीनचे स्वागत करू आणि हिंदू राष्ट्राचे स्वप्न हाणून पाडू असा घातक विचार ही मंडळी करत आहेत. त्यांचा हिंदू द्वेष - मोदी द्वेष - संघ द्वेष इतका पराकोटीचा आहे की त्यासाठी भारत चीनचा मंडलिक झाला तरी त्यांना चालणार आहे.  असलेच बुद्धिवंत विचारवंत पत्रकार फुरोगामी फेक्युलर पुढच्या काही दिवसात आपल्याला सिपेकची भुलवणारी गोड गोड माहिती सांगतील - मोदी सरकार कसे हटवादी आहे आणि टांग अडवून बसले आहे हे पटवतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सर्वात उत्तम मार्ग आहे. पण त्याचबरोबर वेळ येताच हे बिंग पाकिस्तानी जनतेसमोर आणण्याचे जे प्रयत्न होतील त्याच्यामागे शक्ती उभी करावी लागेल. पाकिस्तानी सैन्याला तेथील सामान्य जनतेने डोक्यावर घेऊ नये म्हणून त्याचे खरे स्वरूप काय ते उघड झाले तरच भारत पाक नव्हे तर उपखंडाच्या परिस्थितीमध्ये आपण बाजी पालटवून दाखवू शकू. ही क्षमता आपल्यामध्ये आहे ह्याची जाणीव जरी आज ठेवली तरी पुरेल.

No comments:

Post a Comment