श्री. झिबग्नियो ब्रेझेझिन्स्की यांचे २६ मे २०१७ रोजी निधन झाले. ब्रेझेझिन्स्की हे अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जिमी कार्टर यांच्या राजवटीमध्ये म्हणजे १९७७ ते १९८१ या कालावधीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. ब्रेझेझिन्स्की यांच्या कार्यकाळामध्ये तैवान प्रश्नावर चीनची भूमिका स्वीकारत सामंजस्य घडवणे - स्ट्रेटेजिक आर्म्स लिमिटशन ट्रीटी २ - इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात आणि इज्राएलचे पंतप्रधान मेनाचेम बेगिन यांजबरोबर आपसातील वैर मिटवण्यासाठी पहिले पाऊल टाकणारा कॅम्प डेव्हिड करार - इराणमधील उलथापालथ आणि अमेरिकेचा दोस्त असलेला शहा याची उचलबांगडी करून अयातोल्ला खोमेनी सत्तारूढ होणे - अफगाणिस्तानमध्ये रशियन सैन्य घुसणे - पाकिस्तानच्या मदतीने जागतिक जिहादसाठी अमेरिकेने दिलेला सर्वंकष पाठिंबा ह्या पुढच्या चार दशकांवर प्रभाव पाडणार्या ठळक घटना घडल्या.
’द ग्रांड चेस बोर्ड’ या १९९७ मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या पुस्तकामध्ये चीन सोडाच पण भारत पाकिस्तानशी सुद्धा युद्ध जिंकू शकत नाही असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. अण्वस्त्रे आहेत म्हणून कोणी युद्ध जिंकत नाही. त्यासाठी संपूर्ण संरक्षण धोरण असावे लागते. भारताने युद्धसामग्री भरपूर जमवली आहे. आणि त्याच्याकडे सैन्य सुद्धा आहे. पण आपल्या संरक्षणासाठी शत्रूबद्दलची पुरेशी जाण - त्याच्यापासून कोणत्या प्रकारचा आणि किती धोका आहे याचा अंदाज - युद्ध कुठे छेडले जाऊ शकते आणि कसे लढले जाईल या व अशाच इतर गोष्टींबद्दलचे भारताचे ज्ञान तोकडे आहे आणि त्यामध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच भारताकडे लष्करी जमवाजमव आहे पण सामर्थ्य नाही ही कटू वस्तुस्थिती आपल्याला वारंवार निदर्शनास येते. १९६२ च्या लढाईमध्ये अचानक झालेल्या आक्रमणानंतर सावरलेल्या भारतीय सैन्याने जुळवाजुळव केली होती पण तोपर्यंत चीन माघारी परतला होता. १९७१ मध्ये मार्च महिन्यात सैन्याने बांगला देशात कूच करावी म्हणून इंदिराजींनी श्री मानेकशा यांच्याकडे चर्चा केली असता या प्रकारच्या कारवाई साठी आपले सैन्य तयार नाही असे स्पष्ट उत्तर मानेकशा यांना द्यावे लागले. प्रत्यक्षात त्यांनी पुढे नऊ महिने तयारीसाठी घेतले. पाकिस्तानची सहा लाखाचे फौज भारताच्या तेरा लाखाच्या फौजेला डरत नाही हे आपण बघतो. तीन दशकांपुरते प्रॉक्सी वॉरचा सामना करूनही आपल्याकडे त्यावर दमदार धोरणातक उत्तर नाही हेच चित्र प्रामुख्याने पुढे येते. कारगिल युद्धाच्या वेळी सैन्याला आपली कुमक कार्यरत करायल इतका वेळ लागला की त्याचा फायदा घेऊन पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवरती गवगवा केला आणि भारताला खेळी करण्याच्या स्वातंत्र्यावर बंधने आली. आजदेखील पाकिस्तान किंवा चीन एखादे छोटे युद्ध भारतावर लादेल - मोठे नाही - असे मोठ्या मुत्सद्दीपणे इथले विद्वान सांगत असतात. हे देश छोटे युद्ध का करणार याचा अर्थ इथे समजून येतो. छोट्या युद्धासाठी प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. (ती क्षमता निर्माण करण्याचे काम मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सुरु झाले आहे. तसेच केवळ Defensive नव्हे तर offensive-defensive असा पवित्रा असावा असे म्हणणारे दोवल जुने धोरण बदलत आहेत. हे चुटकीसारखे होत नाही. तयारी पूर्ण होईपर्यंत म्हणजे १९७१ सारखा आज संयम दाखवावा लागेल)
जगामध्ये अण्वस्त्रांच्या प्रसारावरती निर्णायक रोख लागू शकली नाही कारण संपूर्ण जगाचे हित लक्षात घेऊन अमेरिकेने प्रामाणिकपणे हे प्रयत्न केले नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. अलिकडच्या काळामध्ये म्हणजे ओबामा सत्तेवर असतानाच २०१५ साली वाढते ओबामा - मोदी संबंध पाहता ब्रेझेझिन्स्की यांनी इशारा दिला होता की अमेरिकेने भारताशी फार जवळीक केली तर रशिया दुरावण्याचा धोका आहे. ज्यांनी अफगाणिस्तानमधून रशियाला हटवण्यासाठी जीवाचे रान केले तो निरीक्षक अमेरिकेने रशियापासून फार दूर जाऊ नये असे मत मांडतो हे बघितले तर उच्च पदावरील व्यक्तीला पूर्वग्रह दूर ठेवून विचार करावा लागतो हे कळेल.
ब्रेझेझिन्स्की यांच्यासारखे विद्वान भले भारताचे मित्र नसतील पण त्यांच्या लिखाणामधूनही आपल्याला दिशा मिळू शकते. भारतीय परंपरेनुसार त्यांना श्रद्धांजली.
सोबतच्या छायाचित्रामध्ये जनरल झिया यांच्या बाजूला उभे असलेले कार्टर आणि मागे उभे असलेले झिबग्नियो ब्रेझेझिन्स्की
No comments:
Post a Comment