Sunday, 14 May 2017

काश्मिरमध्ये काही तरी बदलतंय!



काश्मिरमध्ये काही तरी बदलतंय!

भारतीय लश्कराने जवळ जवळ १५ वर्षांपूर्वी सोडून दिलेली CASO ही कारवाई पुनश्च काश्मिरात दहशतवादाचा सामना करण्यासाठी "कायम स्वरूपी" आणायचे ठरवले आहे अशा खोडसाळ बातम्या काही वृत्तपत्रे देत होती. परंतु लश्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी हे स्पष्ट केले की CASO चा सर्रास वापर केला जाईल ह्या बातमीमध्ये तथ्य नाही. CASO म्हणजे Cordon And Search Operations. १९९० च्या दशकामध्ये सैन्यदलाकडून ह्या पद्धतीचा वापर नियमितपणे केला जात असे. तसेच Area Domination & Sweep असे स्वरूप तेव्हा अंमलात आणले जात होते. ह्या पद्धतीमध्ये गावातील सर्व नागरिकांना भल्या पहाटे चावडीवर गोळा करून त्यांची झडती घेतली जात असे. तसेच घराघरामधून जवान जाऊन तेथील सामानाची झडती घेत. हे करण्याचा हेतू हा होता अचानक केल्या जाणार्‍या ह्या शोध मोहिमेमुळे दहशतवाद्यांना गावामध्ये आश्रय घेणे कठीण होत असे. आणि त्यातूनच अतिरेक्यांच्या कारवायांवर नियंत्रण आणले जात होते. २००१ नंतर स्थानिक जनतेच्या विरोधाखातर ही पद्धती जवळपास बंद करण्यात आली होती. जर पक्की खबर असेल तरच सैन्यदलाकडून CASO चा वापर होत होता. आता मात्र कुलगाम, पुलवामा, त्राल, बडगाम आणि शोपियन ह्या दक्षिण काश्मिरातील विभागांमध्ये स्थानिक जनतेमध्ये बेमालूमपणे मिसळून वावरणारे दहशतवादी पकडण्यासाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे असे सांगण्यात आले आहे. परंतु ह्यामध्ये लश्कर घेराबंदी करत नसून केवळ शोधमोहिम राबवली जात आहे असेही स्पष्ट करण्यात आले. काश्मिरमध्ये सुमारे १०० दहशतवादी कार्यरत असून स्थानिक जनतेला भडकावण्याचे काम ते करत आहेत. शेकडो काश्मिरी तरूण पोलिसात भरती होण्याकरत रांगेत उभे असतात पण हे दहशतवादी त्यांना भरती हो ऊ नका म्हणून धमक्या देत असतात. लश्करातर्फे जी शोधमोहिम हाती घेतली आहे ती गावातील वस्तीपेक्षा जास्त जंगलामधून राबवावी लागणार आहे असे सांगण्यात आले आहे. स्थानिक काश्मिरी लश्करी अधिकारी ले. उमर फैयाज़ याच्या निर्घृण हत्येनंतर स्थानिक जनतेमध्ये दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट उअसळलेली दिसते. उमर हा अवघ्या २३ वर्षीय तरूण हा काश्मिरी युवकांचे आशास्थान होता. त्याच्या सारखेच आपलेही आयुष्य असावे असे वाटणारे तरूण गावकरी अनेक होते. पण त्याच्या हत्येनंतर दहशतवाद्यांनी जनतेची सहानुभूती गमावली आहे.

उमर यांच्यासाठी काल कॅंडल मार्च करण्यात आला त्याला मिळालेला प्रतिसाद बघता फेक्यूलरांची तोंडे उतरली आहेत. अन्यथा हीच घटना घेऊन ही मंडळी OROP One Rank One Pension ह्या जुन्याच मुद्द्यावर पुनश्च आंदोलन छेडण्याच्या मार्गावर होती. ज्या विशिष्ट क्षणी संपूर्ण लश्कराचे मनोबल सर्वोच्च असले पाहिजे त्याच क्षणी असली अवसानघातकी आंदोलने हाती घेतली जात आहेत ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. वरकरणी कितीही देशप्रेम दाखवले तरीही त्यांचा अंतस्थ हेतू काय आहे हे उघड होण्याचे दिवस लवकरच येतील.

दरम्यान झाकिर मुसा नामक नेत्याने उधळलेल्या मुक्ताफळांचाही अर्थ माध्यमांनी स्पष्ट केलेला नाही. काश्मिरचा लढा राजकीय आहे धार्मिक नाही - जागतिक जिहादी गट आयसिस आणि अल कायदाशी आमचा काही संबंध नाही - असे विधान हुर्रियत नेते सय्यद अली शाह जिलानी - मिरवाईज़ उमर फारुक आणि यासिन मलिक यांनी गेल्या आठवड्यामध्ये केल्यानंतर हिज्ब उल मुजाहिदीनचा कमांडर झाकिर मुसा याने हुर्रियतच्या ह्या नेत्यांना लाल चौकामध्ये फासावर लटकवण्याची धमकी दिली आहे. काफिर नंतर - आधी तुम्हाला फासावर लटकवेन अशी धमकी मुसाने दिली आणि त्याने स्पष्ट केले की काश्मिरचा लढा धार्मिक आहे - हा जिहाद आहे - राजकीय लढा नव्हे - तसे नसते तर तुम्ही ला इलाह इल् अल्लाह अशा घोषणा का देत होतात - लोकांसमोर भाषणे देण्यासाठी तुम्ही मशिदीमध्ये का येत होतात - मी काही उलेमा नाही पण इथले विद्वान नक्कीच भ्रष्ट आहेत - हे तुरुंगवासाला घाबरतात - हे आमचे नेते होऊ शकत नाहीत - हे फक्त राजकीय नेते आहेत - त्यांनी आमच्या लढ्यामध्ये लुडबुड करू नये - आम्हाला शरिया राबवायचा आहे आणि आम्ही तो राबवणारच - तुमचे राजकारणात बरबटलेले हात तुम्ही तुमच्या घरापुरते ठेवा - विद्वत्तेच्या नावाखाली आम्हाला फाटाफूट नको आहे. मुसा याची ही धमकी सर्वांना थक्क करून गेली आहे. गेल्या तीस वर्षामध्ये कोणत्याही काश्मिरी नेत्याने येथील लढा हा धार्मिक स्वरूपाचा असल्याचे जाहीर विधान केले नव्हते.

बुरहान वानी ज्या त्राल शहरामधला त्याच शहरामधला आहे हा झालिर मुसा. गेल्या जुलै मध्ये वानी मरण पावल्यावर मुसाने तेथील सूत्रे हाती घेतली होती. Traitors Go Back Hurriyat Go Back No Freedom No Pakistan - No UNO - No Self Rule - Only Islam - Only Islam ही मुसाची घोषणा आहे. मुसाच्या ह्या उद्रेकाशी आपण असहमत आहोत असे सांगत हिज्ब उल् मुजाहिदीन ने सुद्धा त्याच्याशी फारकत घेतली आहे. मुसाच्या मागे समर्थक आहेत. पण प्रस्थपितांना मुसा नको आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानलाही मुसा नकोच असेल. पण एव्हढे मात्र नक्की की काश्मिरच्या लढ्यामध्ये आज फूट पडली आहे. आता ह्या दोन गटांमध्ये लागून राहील. दिल्ली सरकारमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी त्यांच्यामधलाच एक कपिल मिश्रा बाहेर आला. काश्मिरात कोण येणार बाहेर? हुर्रियत नेत्यांच्या पैशाच्या गैरव्यवहाराची कहाणी सांगायला कोण येईल पुढे?

झाकिर मुसाचे आयुष्य धोक्यात आहे. तसेच हुर्रियत नेत्यांचेही आयुष्य धोक्यात आहे. एक जण जरी मारला गेला तरी काश्मिरात पुनश्च हिंसाचाराचा आगडोंब उसळणार यात शंका नाही. ह्यापैकी कोणीही मारले गेले तरी दोष येणार तो सरकारवरती.

अडव्हांटेज?? भारत - काश्मिर - मोदी - दोवल की पाकिस्तान?

No comments:

Post a Comment