Saturday, 6 May 2017

माकडाची शेपूट पाचरीत - भाग १


Reality of Jamat-e-Islami


माकडाची शेपूट पाचरीत - भाग १

एप्रिल २०१७ च्या मध्यानंतर पाकिस्तानचे निवृत्त जनरल राहिल शरीफ सौदी अरेबिया पुरस्कृत ४१ देशांच्या संयुक्त लश्करी आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी सौदीची राजधानी रियाध येथे पोहोचले. आजपर्यंत पाकिस्तानने या आघाडीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचे टाळले होते. सौदी अरेबियाने पुढाकार घेतलेल्या ह्या आघाडीशी मतभेद आहेत म्हणून नव्हे तर ह्या आघाडीचा जो मूळ उद्देश आहे तोच पाकिस्तानच्या मुळावर बेतणार याची त्यांना खात्री आहे. ह्याच भीतीमुळे आजवर पाकिस्तानने जे करण्याचे टाळले ते आता त्यांना करावे लागले आहे. कारण आजवर सौदी मेव्याची मजा तर चाखून झालेली आहेच आता त्याचे चटके सोसण्यापासून सुटका व्हायची कशी?

वरकरणी दहशतवाद विरोध म्हणून उभारण्यात आलेली ही आघाडी वास्तवात शियांच्या संघटनांशी लढत आहे. आणि तिचे पहिले आव्हान आहे अर्थातच येमेनमध्ये आणि दुसरे खुद्द इराणमध्ये. ह्या आघाडीला ज्या संघटनांशी लढायचे आहे त्या शिया संघटनांच्या मागे सिरिया आणि खास करून इराण भक्कम रीत्या पाठीशी उभे आहेत. इराणच्या धर्मसत्तेशी सौदी राजघराण्याचे उभे वैर आहे. एक ना एक दिवस इराण आपल्या घराण्याची सत्ता संपुष्टात आणून येथील राजसत्ता हाती घे ईल याची त्यांना खात्री आहे. सौदी अरेबियाचे राजघराणे सुन्नी आहे आणि जगभरात आपले अत्यंत कर्मठ वहाबी तत्वज्ञन पसरवण्यासाठी घसघशीत मदत पाठवत असते. कधी ना कधी आपला आणि शिया राजसतांचा संघर्ष होणार आणि त्यावेळी जगामधल्या सर्व सुन्नी मुसलमानांनी आपल्या मदतीसाठी यावे याची भक्कम तयारी सौदी गेली कित्येक वर्षे करत आला आहे. सौदी अरेबिया असो की इराण - यांना दहशतवादाचे वावडे नाही. त्यामुळे सौदीने अशा प्रकारची आघाडी करावी हेच हास्यास्पद आहे. या विषयामधला सौदीचा प्रवास बघितला तर त्यांच्या आजच्या कृत्याचे आपल्याला काहीही आश्चर्य वाटणार नाही. 

सद्दाम हुसेनने जेव्हा कुवेटवर आक्रमण केले तेव्हा सौदी अरेबिया घाबरला होता. आत पुढचे पाऊल म्हणून सद्दाम आपल्याकडे लक्ष वळवणार या भीतीने त्यांची गाळण उडाली होती. तो काळ असा होता की अमेरिकेला हवे म्हणून सद्दामने नुकतेच इराणशी छेडलेले आठ वर्षीय युद्ध संपुष्टात आले होते. आणि अफगाणिस्तानामधून रशियन सैन्य माघारी परतले होते. आता आपण कुवेट गिळंकृत केला तर अमेरिका मध्ये पडणार नाही असा त्याला विश्वास असावा. पण तसे झाले नाही. सौदी राजाने आपल्या भीतीपोटी अमेरिकन सैन्याला सौदी भूमीवरती पाचारण केले. (ह्याच मुद्द्यावरून तर सौदी राजाचे आणि ओसामा बिन लादेनचे अखेरचे वाजले. ओसामा म्हणत होता की सद्दामच्या प्रतिकारासाठी मी स्वतः मुजाहिदीन एकत्र करून लढा देतो. समोर सुन्नी मुजाहिदीन पहिले तर सद्दमचे सैन्य त्याचे आदेश पाळणार नाही - लढणार नाही. ह्या एका कारणासाठी तुम्ही अमेरिकन राक्षस ह्या पवित्र भूमीवरती बोलावू नका. इथेच मक्का आणि मदिना आहेत त्या भूमीवरती परके सैन्य नको. पण सौदीच्या राजाने त्याचे ऐकले नाही. अमेरिकन सैन्य तिथे येऊन बसले ते आजतागायत.) इतकेच नव्हे तर सप्टेंबर ११ च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानामध्ये तालिबानांना हुसकून झाल्यावरती सौदीच्या राजघराण्यानेच अध्यक्ष बुश यांना इराकवर हल्ला करायला भाग पाडले. पेट्रोलसाठी मध्यपूर्वेवर अवलंबून असलेल्या अमेरिकेला तसे करणे भाग पडले. (आज तेलाच्या स्वतःच्या उपयोगासाठी अमेरिका मध्यपूर्वेवर अवलंबून नाही.) ह्याचा सगळा दोष बुश यांच्या माथी मारण्यात आला पण मुळात सौदीकडे वाकडी नजर करण्याची हिंमत दाखवणारा सद्दाम सौदील नको होता. शिवाय शिया बहुल देशामध्ये सुन्नींना त्रास होऊ नये म्हणून सौदीने अमेरिकेला मध्ये घालून तेथील राजसत्तेमध्ये शियांसोबत सुन्नी देखील घ्यायला भाग पाडले. 

तेव्हा शिया सुन्नी हा संघर्ष काही नवा नाही. आणि त्यामधली सौदी अरेबियाची आणि इराणची भूमिकाही नवी नाही. मग आताच्या संघर्षात नवे काय आहे? नवीन आहे ती पाकिस्तानची शेपटी. सौदी अरेबियाकडून घेतलेल्या पैशावरती आजवर पाकिस्तानने अण्वस्त्रांचा कार्यक्रम राबवला आहे. त्याच मदतीवरती त्याच्या वहाबी तत्वञ्ञानाने प्रणित मदरसा आणि दहशतवादी संघटना चालवल्या जातात. इराक लिबिया सिरिया आदि देशांमध्ये चालणार्‍या संघर्षामध्ये सुन्नी गटांना आधुनिक हत्यारे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम पाकिस्तानचे लश्करी अधिकारीच करत आले आहेत. पण ह्या सगळ्याच्या मागे ’Deniability' चा बुरखा होता - मी नाही त्यातली म्हणायला मोकळे राहू अशा पद्धतीवर पाकिस्तान हे काम करत होता. आज मात्र सौदीने दबाव टाकून पाकिस्तानला आपल्या युद्धामध्ये सक्रिय ओढले आहे आणि लढ्याचे नेतृत्वही स्वीकारायला लावले आहे. ह्यामधून जो पेच पाकिस्तानसमोर उभा राहिला आहे त्याची सौदीला जराही क्षिती नाही. 

खुद्द पाकिस्तानमध्ये आणि पाकव्याप्त काश्मिरात मोठ्या प्रमाणावर शिया राहतात. पाकिस्तानमध्ये गेल्या तीन वर्षामध्ये जे वारंवार बॉंम्ब हल्ले होतात ते बव्हंशी शिया सुन्नी वादामधून करण्यात येतात. पकिस्तानचा सर्वात खळबळ असलेला प्रांत बलुचिस्तान येथे शिया बव्हंशी आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुन्नींच्या आघाडीचे नेतृत्व करणे म्हणजे स्वताःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. आघाडीत आपण गेलोच तर त्याची इराण विरोधाची धार बोथट करू अशी गाजरे पाकिस्तान खात होता आणि स्वतःची समजूत काढत होता. पण सौदीचे इराणवरचे आक्षेप आगदी मुळाशी जाणारे आहेत आणि ते आजही तसेच धारदार आहेत. उदाहरणार्थ सौदीच्या सरकारचे अधिकृत चॅनेल मिडल इस्ट ब्रॉडकास्टींग टेलेव्हिजन नेटवर्क वरती बोलताना सौदी राजपुत्र आणि संरक्षण मंत्री मोहम्मद म्हणाले की इराणी लोक असे मानतात की इमाम माहदी अवतीर्ण होतील आणि त्यांच्या आगमानच्या प्रतीक्षेत असलेल्या जगामध्ये त्यांना मुस्लिम जगतावर राज्य करता यावे म्हणून अनुकूल पार्श्वभूमी तयार करणे आपले काम आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याशी सुसंवाद कसा साधता ये ईल? सहकार्य कसे करता ये ईल? असा प्रश्न विचारत राजपुत्र मोहम्मद यांनी इराणशी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला. पुढे युद्ध झालेच तर ते इराणच्या भूमीवर हो ईल असेही सांगायला ते विसरले नाहीत. राजपुत्र मोहम्मद यांचा इशारा अर्थातच होता चीन आणि भारताकडे. इराणशी युद्ध छेडले गेलेच तर त्यामध्ये भारत आणि चीन यांनी पडू नये असे राजपुत्राला सुचवायचे असावे. 

सौदीचे गुप्तहेर प्रमुख आणि त्याचे अमेरिका आणि ब्रिटन येथील राजदूत राजपुत्र तुर्की अल फ़ैसल हे पॅरिसमध्ये एका संमेलनामध्ये गेले होते. इराणमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या इराणी नागरिकांनी ते आयोजित केले होते. People’s Mujahedin Organization of Iran or Mujahedin-e-Khalq ही ह्या लोकांची संघटना फ्रान्स येथून काम करते. तिचे लागेबांधे अगदी १९७९ मध्ये इराणच्या शहाला हुसकावून लावण्याच्या वेळेपर्यंतचे आहेत. इराणमधील सध्याची  सत्ता उलथून लावण्याचे ही संघटना प्रयत्न करते. त्यांच्या संमेलनामध्ये जाऊन तुर्की म्हणाले की इराणची सत्ता मलाही नको आहे. तुमच्या प्रयत्नांना भविष्यात जरूर यश ये ईल."

इतकी स्पष्ट भूमिका घेणारा सौदी पकिस्तानसाठी आपले म्हणणे बदलेल ही एक कविकल्पना होती. असेही पाकिस्तानचे आणि इराणचे पटणे कठिण असते. हल्ली हल्ली सुद्धा तुम्ही पाक - इराण सीमेवरती होणार्‍या कुरापतींबद्दल वाचले असेल. जी अवस्था भारत पाक सीमेची आहे तीच इराण पाक सीमेची आहे. इराणचा राजदूत पाकिस्तानाता निर्घृणपणे मारला गेला आणि त्या हल्ल्यामागे पाकिस्तानची आय एस आय होती असा आरोप इराण करत होता. त्यामुळे हल्लेखोरांवर कारवाई अशक्यच. तेव्हा सौदी जर इराणवर आक्रमण करण्याच्या मनःस्थितीमध्ये असेल तर पाकिस्तानची अवस्था काय होईल याचा विचार करा. असा हल्ला करण्याची योजना काय असावी ती पुढील भागात पाहू. 

स्वाती तोरसेकर

No comments:

Post a Comment