Tuesday 29 May 2018

उत्तर कोरिया ५

File:Kim Tu-bong.png


(वर्कर्स पार्टी ऑफ नॉर्थ कोरियाचे नामधारी अध्यक्ष आणि हानगुल भाषेचे तज्ञ किम तु बॉन्ग - किम इल सॉन्ग ने ह्यांची १९५७ मध्ये हकालपट्टी केली)


उत्तर कोरियामधील परिस्थिती रशियनांनी तीन टप्प्यांमध्ये नियंत्रित केली होती. पहिला टप्पा होता - ऑगस्ट १९४५ ते जानेवारी १९४६ चा. कोरियामधील स्थानिक मान्यवरांनी रशियनांशी सहकार्याची भूमिका घेतली होती. रशियनांनी आयोजित केलेल्या लोकसमित्यांमध्ये अशा मान्यवरांना सामावून घेण्यात आले. ह्या काळामध्ये रशियनांनी जाणीवपूर्वक किम इल सॉन्ग आणि त्याच्या सोव्हिएत कोरियनांना दूर ठेवले होते. लोकसमित्यांमध्ये जसे कोरियन कम्युनिस्ट होते तसेच डावे-राष्ट्रवादी विचाराचे सदस्यही सामिल होते. हे डावे रशियामध्ये कधी गेलेले नव्हते पण स्थानिक जनतेमध्ये त्यांच्या कामामुळे त्यांना स्थान व प्रतिष्ठा मिळाली होती. परंतु ही मंडळी रशियनांना कोरियामध्ये कम्युनिस्ट राजवट स्थापण्यासाठी मनापासून मदत करत होती. रशियनांनी त्यांना आणि सोव्हिएत कोरियनांना कधी एकत्र येऊ दिले नाही. सोव्हिएत कोरियन त्यांच्यामध्ये मिसळत नसत. मनापासून मदत करणरे असले तरी रशियनांना ही मंडळी नको होती कारण रशियन सांगतील तसे ते वागतील ह्याची हमी नव्हती. रशियनांनी त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्यातल्या उणिवा टिपल्या. या ना मार्गाने त्यांच्यामध्ये भांडणे लावून दिली. रशियन स्वतः नामानिराळे राह्त. ही बुद्धिवादी मंडळी असे समजत होती की आपल्यामध्ये खरोखरीचे मतभेद आहेत. अशा तर्‍हेने हे गट स्वतःहून स्वतःला विनाशाकडे नेत होते. त्यांनी सदस्यत्व सोडले की त्यांची जागा हळूहळू सोव्हिएत कोरियनांना दिली जात होती. अजून राष्ट्रवादी सदस्यांना रशियनांनी हात लावला नव्हता. 

दुसरा टप्पा सुरु झाला फ़ेब्रुवारी १९४६ मध्ये - हा १९४८ पर्यंत चालू होता. याही काळामध्ये सोव्हिएत घटक बोगस आघाडीच्या नावाने राजकारण करत त्याच्या बुरख्या आड लपले होते. स्थानिक जनतेचा विश्वास प्राप्त करायचा तर हे करणे भाग होते. रशियनांना स्थानिक कोरियन कम्युनिस्ट सत्तेमध्ये भागिदार म्हणून नकोच होते. कारण त्यांची निष्ठा युरोपियन कम्युनिस्टांकडे होती. ते रशियाला फारसे मानत नसत. तसेच कोरियाचे नियंत्रण उत्तरेकडून नव्हे तर दक्षिणेकडून (सोल शहरातून) व्हावे असे त्यांना वाटत होते. ह्यांची हकालपट्टी नजरेत येणार नाही अशा बेताने केली जात होती.  त्यासाठी सुरुवातीला स्थापन करण्यात आलेल्या पीपल्स कमिटी रद्द अरण्यात आल्या आणि त्या ऐवजी नॉर्थ कोरियन प्रोव्हिजनल पीपल्स कमिटीची स्थापना झाली. ह्यामध्ये विविध् गट सामावून घेतले होते पण त्याचे नेतृत्व किम इल सॉन्गकडे दिले गेले होते आणि पूर्ण नियंत्रण रशियाच्या हाती होते. लोकशाही सुधारणा असा कार्यक्रम हाती घेऊन ही कमिटी काम करू लागली. समाजामधल्या सर्व टोकाच्या मंडळींनी त्यामध्ये सामिल व्हावे म्हणून प्रयत्न करण्यात आले. खरे म्हणजे रशियनांना अशा व्यक्तींची गरज नव्हती पण त्यानिमित्ताने आपले राजकीय विरोधक कोण असू शकतात ही माहिती त्यांच्या आयतीच हाती पडण्याची सोय झाली होती. रशियनांची गुप्त हेर व्यवस्था अशांना हेरून त्यांचा बंदोबस्त परस्पर आवाज न करता करून टाकत होती. ह्याच काळामध्ये किम इल सॉन्गने स्वतःला राष्ट्रवादी भूमिकेच्या साच्यात बसवण्याचे काम केले त्यामुळे देशामध्ये किम इल सॉन्ग एक लोकप्रिय राष्ट्रनिष्ठ नेता म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचे सोव्हिएत कोरियन सहकारी सरकारी यंत्रणेमध्ये आपला जम बसवत होते. अजूनही रशियन्स पडद्या आड राहून नियंत्रण ठेवत होते. सुरक्षेच्या नावाखाली रशियन फौजांनी अनेक एतद् देशीय लढाऊ आणि बंडखोर गट संपवून टाकले. हेतू हाच होता की केवळ नागरी राजकीय विरोधक नव्हेत तर लढाऊ विरोधक सुद्धा किमच्या मार्गात येणार नाहीत अशी व्यवस्था केली जात होती. जुलै १९४६ मध्ये किम इल सॉन्गने स्वतंत्ररीत्या वर्कर्स पार्टीची स्थापना केली आणि सोल शहरातून चालवल्या जाणार्‍या कोरियन कम्युनिस्ट पार्टीशी फारकत घेतली. नव्या पार्टीचे अध्यक्ष म्हणून किम इल सॉन्गची नव्हे तर ज्येष्ठ कम्युनिस्ट आणि हानगुल भाषातज्ञ किम तु बॉन्गची निवड झाली. किम इल सॉन्ग ह्या पार्टीमध्ये व्हाईस चेयरमन होता. बॉन्गच्या अध्यक्षतेखाली अनेकांची हकाल पट्टी करण्यात आली. अर्थात अध्यक्ष म्हणून त्याचे खापर जनता सॉन्गवर नव्हे तर बॉन्गवर फोडू लागली. अशा प्रकारच्या राजकीय खेळींमध्ये आपण सर्वोत्तम आहोत हे आपल्या वागणुकीमधून सॉन्गने पुन्हा एकदा रशियनांना पटवले. 

१९४८ च्या सुरुवातीला रशियनांच्या हे लक्षात आले होते की आता किमचे पक्षावरती पुरेसे नियंत्रण आहे. पण अजून एक गट उरला होता. आता किमसोबत असे काही कोरियन कम्युनिस्ट होते की  ज्यांनी मॉस्कोचे वर्चस्वही मान्य केले होते पण ते मॉस्कोशी "निष्ठावंत" नव्हते. कल्पना करा की खरे निष्ठावंत कोण आहेत हे ठरवण्याचे निकष कसे बनवले गेले असतील आणि ते पार्टीमध्ये आलेल्या प्रत्येक सदस्यासाठी ताडून पाहण्याची व्यवस्था कशी काम करत असेल. आता किम इल सॉन्गने उमेदवार द्यावेत आणि पार्टीने ते मान्य करावेत अशी स्थिती आली होती कारण आव्हान देणारे कोणीच पार्टीमध्ये उरले नाही. ह्यानंतर त्याचा मार्ग निर्वेध झाला होता. सप्टेंबर १९४८मध्ये किमने डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया DPRK ची स्थापना झाल्याचे घोषित केले. ह्यानंतर डिसेंबर १९४८ मध्ये सोव्हिएत फौजा माघारी परतल्या. त्यांची लष्करी सामग्री कोरियामध्येच ठेवण्यात आली होती. तसेच सामग्री सांभाळण्यासाठी रशियन सल्लागारही कोरियातच थांबले. मांचुरियातील लढाईमध्ये चिनी सेनापती लिन बि यओ ह्याच्या हाताखाली जवळजवळ दीड लाख कोरियन सैनिक होते. हे सैनिक आता कोरियन लष्करामध्ये किम इल सॉन्गच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले. १९४९ पर्यंत उत्तर कोरियाने सोव्हिएत संघ राज्यामध्ये सामिल व्हावे म्हणून रशियाने सर्व तयारी पूर्ण करत आणली होती. चीनमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करून जर राष्ट्रवादी शक्तींचे राज्य वाचवले असते तर कोरिय संघ राज्यात सामिल झालाही असता. पण एकदा चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट येणार हे स्पष्ट झाल्यावरती कोरियाला संघ राज्यात घेण्याचे प्रयोजन उरले नाही. 

(आज जे पक्ष भारतामध्ये कम्युनिस्टांशी चुम्बाचुम्बी करत आहेत त्यांच्यासाठी तसेच कम्युनिस्ट पक्षातलेही प्रामाणिक सदस्य ह्यांच्यासाठी हा धडा आहे. आपले काय होणार ह्याचा त्यांनी विचार करायचा आहे - अर्थात आत्मपरीक्षा करायची असेल तर) 


हे सर्व घडेपर्यंत अमेरिका काय करत होती असा प्रश्न पडेल. ६ सप्टेंबर १९४५ रोजी जपानने शरणागती पत्करली त्यानंतर ताबडतोब एका रात्रीत सोल शहरामध्ये एक सरकार स्थापण्यात आले.  अमेरिकन फौजा कोरियामध्ये पोचल्यावरती त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादी विचाराच्या मंडळींना एकत्र करून कोरियन डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केली. आणि सोल शहरामध्ये रिपब्लिक ऑफ कोरिया ROK ची स्थापना करून सिन्गमन र्‍ही ह्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. सिन्गमन कोरियाच्या सुशिक्षित च्चभ्रू आणि श्रीमंत गृहस्थ होते. ते व त्यांचे सहकारी ह्यांचा कल पाश्चात्य जीवनाकडे झुकलेला होता. अमेरिकेच्या भरघोस मदतीवरती ह्या गटाने राज्य चालवले होते. ह्या दरम्यान उत्तर कोरियामधल्या ख्रिश्चनांना तेथील रशियन कम्युनिस्ट राजवट नको होती. त्यामुळे तिथे त्यांचा छळ चालला होता. त्यांच्या मदतीला दक्षिण कोरियातील उच्चभ्रू वर्गाने पोसलेले आक्रमक गट पाठव्ण्यात आले. दक्षिणेकडेही परिस्थिती शांत नव्हती. इथेही पीपल्स कमिटीची स्थापना झालेली होती आणि त्यांना दक्षिणेतील सरकारही कम्युनिझमला बांधलेले हवे होते. तसेच ते दुसर्‍या महायुद्धात  हाती आलेली शस्त्रे खाली ठेवायला तयार नव्हते. त्यामुळे दक्षिणेकडेही काळ अशांततेचा होता. ह्या कम्युनिस्टांनी साउथ कोरियन लेबर पार्टी SKLP ची स्थापना केली. त्यांच्यातही रशियनांनी आपली माणसे घुसवली. हळूहळू हा पक्षदेखील उत्तरेच्या ताब्यात आला. १९४९ च्या अखेरीपर्यंत दक्षिण कोरियातील सर्व भागामध्ये रशियाप्रणित गट उभे राहिले होते. तर उत्तर कोरियामध्ये सक्षम सैन्य उभे राहिले होते. त्यामुळे उत्तर कोरियाने हल्ला केलाच तर अगदी झपाट्याने प्रगती करत किम इल सॉन्गचे सैन्य दक्षिण कोरिया गिळंकृत करेल अशी खात्री पटल्यानंतर रशियाने किमला तसे आदेश दिले. अशाने उत्तर व दक्षिण कोरियामध्ये युद्ध सुरु झाले. 



1 comment: