Sunday 20 May 2018

इराण अफगाणिस्तान पेच


बहुतांशी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान मधून बाहेर पडणार हे स्पष्ट झाल्यानंतर चीन रशिया पाकिस्तान आणि भारतामध्ये अफगाणिस्तान मध्ये इतरांना पाय रोवता येऊ नये म्हणून व्यूहरचना करण्याचे डावपेच चालू आहेत. त्यात भर म्हणून अफगाणिस्तानला लागून असलेल्या इराणमधील पेच प्रसंग अधिकच गंभीर होत आहे. इराणमधील जनतेचा उद्रेक - रुहानी ह्यांची पुन्हा निवड तसेच ट्रम्प ह्यांनी इराण करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा केल्यापासून वातावरण पुन्हा ढवळले गेले आहे. आजच्या घडीला युरोप जरी करारामधून बाहेर पडला नसला तरी एकट्या अमेरिकेच्या नसण्याने मोठा फरक पडत असतो.
मध्यपूर्वेमध्ये सुद्धा सौदी प्रणित आघाडीचे आणि इराणचे पटत नाहीच. सीरिया - येमेनमधील संघर्षांसकट अन्य मुद्दे घेऊन चाललेला संघर्ष इस्राएलच्या भूमिकेमुळे अधिक तीव्र होत आहे. ह्या पार्श्वभूमीवरती पुतीन - नेतान्याहू - शी जीन पिंग आणि मोदी ह्यांच्यातील परस्पर भेटींचे गुंतागुंतीचे जाळे चक्रावून सोडणारे आहे.
नेतान्याहू ह्यांनी रशिया तसेच चीनशी संबंध सुधारण्याचे केलेले प्रयत्न - असेच प्रयत्न करणारे मोदी असे ढोबळ स्वरूप असले तरी घटनांचा क्रम बघा - जून २०१७ मध्ये मोदी प्रथम रशियात आणि लगेच नंतर इस्राएलमध्ये - मग ऑगस्टमध्ये नेतान्याहू रशियात - मागोमाग सप्टेंबरमध्ये मोदी ब्रिक्स भेटीसाठी चीन मध्ये हा २०१७ चा क्रम तर २०१८ मध्ये १ जानेवारी रोजी नेतान्याहू् ह्यांचे पुतीन ह्यांच्याशी फोनवरून बोलणे - नंतर जानेवारी १४ ला भारत भेट - लगेच जानेवारी २७ ला रशिया भेट - एप्रिलच्या शेवटाला मोदीची अनौपचारिक चीन भेट आणि आता मे मध्ये रशिया ला अनौपचारिक भेट ही सगळी लगबग कशासाठी चालू आहे असा प्रश्न जरूर पडतो.
रशिया आणि चीनला अमेरिकेची लुडबुड नको आहे - आणि भारताचे व इस्राएलचे अमेरिकेशी साटेलोटे असणे हेही पसंत नाही. पण असेच एकमेकांशी भांडत राहिलो तर आपणच अमेरिकेला लुडबुड करायला संधी देतो - ही वस्तुस्थिती ह्या नेत्यांनी मान्य केली असेल काय? वर्षानुवर्षे सगळेच अमेरिकेच्या लुडबुडीविषयी नाराजी व्यक्त करतात पण एकमेकांपासून संरक्षण हवे तर पुन्हा अमेरिकेकडे जातात ही अवस्था संपवायची असेल तर ह्या देशांनी एकत्र येऊन आपल्यामधील मतभेद मिटवून प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.
जगाच्या राजकारणावरती जागतिक लिबरल्सचे वर्चस्व आहे आणि ज्याप्रकारे ते सर्वच देशांना आपल्या स्वार्थासाठी खेळवत असतात त्या चक्रव्यूहाला भेद द्यायला सगळे उत्सुक असले तर दोन पावले पुढे पडू शकतात. इराणचा प्रश्न सोडवायचा तर त्यामधला काटा आहे तो खामेनीचा. अफगाणिस्तानचा प्रश्न सोडवायचा तर त्यामधला अडथळा आहे पाकिस्तान चा .
ह्या चार नेत्यांच्या भेटींमधून ह्यावर तोडगा निघेल का? त्याचे स्वरूप काय असेल? ह्याची उत्सुकता आता ताणली जात आहे. बघू या - मोदींच्या सोची भेटीनंतर काय घडामोडी घडतात ते.

No comments:

Post a Comment