Sunday 27 May 2018

उत्तर कोरिया २


Image result for king sejong korea
(सोबत छायाचित्र सम्राट सेजोन्ग आणि त्याने निर्मिलेली नवी कोरियन लिपी)


फेक्यूलर लिब्बुंना राष्ट्रीयत्व कल्पनेचे वावडे असते. इतिहासाचे वावडे - संस्कृतीचे वावडे - भाषा प्रांत सगळ्याचेच वावडे असले तरी मानवी समाज मात्र तसे जगू इच्छित नाही. उदा. एखाद्या माणसाला स्मृतीभ्रंश झाला की आपण कोण आपले घर कोणते आपण काय करत होतो आपले नातेवाइक मित्रपरिवार कोणता ह्याची आठवण राहत नाही. थोडक्यात काय असा माणूस असूनही नसल्यासारखाच होईल. खरे ना? मग अशा माणसाला घरात पुनश्च सामावून घेण्यासाठी कशी धडपड करावी लागते बघा. लिब्बुंचे ऐकले तर आपली ओळख आपण विसरून जाऊ. सुदैवाने माणूस लिब्बुंचे हे म्हणणे ऐकायला तयार नसतो. उत्तर कोरियाचेही वेगळे काय असणार? एका तोंडाने कम्युनिझमची आचमने करताना उत्तर कोरिया आपला इतिहास संस्कृती विसरू शकलेला नाही. तीच त्याची ओळख आहे. मग तिची निदान तोंडओळख तर करून घेऊ.

कोरिया हा एक अगदी छोटा देश आहे. हजारो वर्षांचा इतिहास त्याला आहे. त्याकाळापासून ह्या देशाचे तीन मोठे तुकडे बघायला मिळतात. नैऋत्येकडे पेक्चे - आग्नेयेकडे सिला आणि उत्तरेकडे कोगुर्यो ह्या पुरातन प्रांताच्या स्मृती कोरियन समाजाने जपल्या आहेत. एका बाजूला जपान तर दुसर्‍या बाजूला चीन मांचुरिया रशिया आणि मंगोलिया कोरियाच्या इतके जवळ होते की ह्या देशांनीही कोरियावरती आपला प्रभाव टाकला आहे. तीन हजार वर्षांपूर्वी कोरियामध्ये पोचलेल्या चिनी तत्वज्ञ सजे किजा आणि त्याचे ५००० अनुयायी ह्यांनी आपल्या संस्कृतीचा प्रभाव तिथे नेला. कोरियाने तो पचवला. आपली ओळख पण जपली. सजेने एक तत्कालीन आधुनिक राज्यव्यवस्था - लिखित इतिहास अशा संस्कृतीच्या देणग्या कोरियन समाजाला दिल्या. त्याच्यानंतर सुमारे हजार वर्षांनी  उत्तर कोरियामध्ये आलेल्या चिनी स्थलांतरितांनी तिथे किमान चार मोठ्या वसाहती वसवल्या. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. आपल्या शेतीच्या आणि त्यातून मिळणार्‍या उत्पन्नाच्या संरक्षणासाठी हे चिनी स्वतःचे सैन्यही घेऊन आले होते. तेच सैन्य आपल्या वसाहती तसेच इतरही कोरियन लोकांचे संरक्षण करू लागले. अशा रीतीने चिनी प्रजा कोरियामध्ये स्थिरावत होती. कालांतराने कोरिया म्हणजे अशा चिन्यांचे जणू एक तैनाती फौज स्वीकारलेले मांडलिक राष्ट्र बनून गेले. सुमारे १२०० वर्षांपूर्वी आग्नेयेकडील सिला राजवटीने संपूर्ण कोरियाला एकत्र आणले. यानंतर कोरियावरती सर्वाधिकार केंद्राकडे एकवटलेली राजवट सुरू झाली. ह्या स्थिर काळाला आव्हान मिळाले ते मांचुरियाचे. आणि त्यानंतर आलेल्या मंगोलियन राज्यकर्त्यांचे. चिनी कोरियात आले तेव्हा त्यांनी सोबत आपली संस्कृती आणली पण कोरियाची संस्कृती दडपली नाही. मंगोल आक्रमकांनी मात्र कोरियाच्या संस्कृतीवरती आणि सामाजिक जीवनावरती जबर आघात केले. कोरियाचे पारंपरिक पुरातन ज्ञान लाकडी ठोकळ्यांवरती कोरून ठेवण्यात आले होते. पण मंगोल आक्रमकांनी असे ठोकळे जाळून टाकले. ह्या जबर धक्क्यामधून कोरियन समाज जागा झाला तोवर मंगोल आक्रमकांनी तिथे मैत्रीचे संबंध स्थापन करण्यचे प्रयत्न सुरु केले होते. मंगोलांच्या आधुनिक राज्यतंत्राचा लाभ कोरियातील लोकांना मिळाला. पुढे त्याच लोकांच्या मदतीने मंगोल लोकांनी जपानवरही आक्रमण केले. मंगोल राजवटीचा एक परिणाम कोरियन समाजावरती असा झाला की तिथे एक लढाऊ वर्ग जन्माला आला. ह्या वर्गाच्या हातामध्ये राजकीय निर्णयशकेतीही आली होती. त्या बळावरती १३६४ मध्ये कोरियाने चिनी वर्चस्वाविरुद्ध बंड केले आणि त्यातून त्यांचे स्वतःचे यी राजघराणे उदयाला आले. ह्या घराण्याने चिनी मिंग राजघराण्याशी सूत जुळवून त्यांचे संरक्षण मिळवले. ह्यानंतर कोरियातील बौद्ध धर्म बाजूला पडला आणि कन्फ्यूशियसच्या तत्वज्ञानाने समाजात पकड घेतली.

१४४६ मध्ये कोरियामध्ये स्थापना झालेल्या सेजोन्ग ह्या सम्राटाने कोरियाचे भविष्य बदलले असे म्हणता येईल. कोरियन लिपीमध्ये त्याने आमूलाग्र बदल केले आणि त्यातील मूळाक्षरे कमी करून त्यांची संख्या २८ वरती आणली. ही मूळाक्षरे ध्वनीवरती आधारित होती. तार्किकदृष्ट्या ती लिपी सर्वथा यथार्थ होती. हुनमिन चोंगम म्हणजे "लोकांसाठी बरोबर ध्वनी". Correct sounds for people - सोप्या शब्दात ह्या लिपीला हनगुल असे म्हटले जाऊ लागले. त्या लिपीचे वैशिष्ट्य असे होते की की ती तार्किक दृष्ट्या यथायोग्य (most logically arranged alphabets) असल्याने काही तासात शिकणे शक्य होते.  ह्या बदलानंतर राजाने आपल्या सर्व प्रजेला लिहिता वाचता यावे म्हणून एक मोहीमच हाती घेतली.  ह्याचा फायदा असा झाला की सामान्य जनता लिहायला आणि वाचायला शिकली - सोप्या लिपीमुळे जनतेला लिहिणे वाचणे अगदी सुलभ झाले. पाश्चात्यांनी आशियामध्ये पदार्पण केले तेव्हा लिहिता वाचता येणाऱ्या प्रजेचा सर्वात मोठा टक्का कोरियामध्ये असल्याचे नोंदले गेले. साक्षरतेची पातळी अशी उंचावल्यामुळे एकंदरीत समाजजीवनावरती त्याचे खोलवर परिणाम झाले. आज देखील कोरियाच्या लहान सहान गावांमध्येही ही परंपरा चालू आहे सेजोन्ग राजाने राज्यकारभार  - सामाजिक - आर्थिक आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनेक चांगल्या सुधारणा घडवून आणल्या. अशा तर्‍हेने चीनच्या भक्कम संरक्षणाचे छत्र असलेल्या कोरियन राजवटीला भरभराटीचे दिवस काही शतके पाहायला मिळाले. पुढे १५९२ मध्ये जपानने चीनवरती हल्ला चढवला तो कोरियाच्या मार्गाने. (ह्या वर्षी भारतात शहाजहान जन्मला.). त्याचा प्रतिकार म्हणून चीनकडूनही हल्ले होत राहिले. अशा तऱ्हेने सुबत्तेच्या काळानंतर आलेली ही अस्थिरता कोरियन प्रजेला आवडली नाही. १६३८ पासून कोरियाने स्वतःला कोंडून घेतले आणि जगाशी संपर्क बंद केला. कोणत्याही परकीय माणसाला देशाची दारे बंद केली गेली. हा नियम तोडणाऱ्याला देहांताची शिक्षा सुनावली जात असे. कोरियावरती चीनचा अनेक शतकांचा प्रभाव होता. परकीयांना देशाची दारे बंद झाली तरी तो चिनी प्रभाव काही पुसला गेला नाही. ही बंदी सुमारे अडीचशे वर्ष चालू होती. इथे लक्षात येईल की आजदेखील कोरिया जगापासून आपला सगळं संपर्क तोडून एखादे Hermit Kingdom असल्यासारखा मानसिक दृष्ट्या कसा तगू शकला. 

१८७६ मध्ये जपानने कोरियाला पटवून त्याची काही बंदरे व्यापाराकरिता तरी आम्हाला वापरू द्या म्हणून गळ घातली आणि अनुमती मिळवली. एकदा कोरियाने दारे किलकिली केल्यावरती जपानने झपाट्याने तिथे आपला प्रभाव वाढवण्याची पावले उचलली. जपानने कोरियामध्ये जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याकडे लक्ष दिले. त्यांना कोरिया गिळंकृत करायचा होता. जपानच्या प्रभावामुळे चिंतेमध्ये पडलेल्या चीनच्या हे लक्षात आले की कोरियाच्या संरक्षणामध्ये आपण एकटे काही जपानी प्रभावाला पुरे पडू शकणार नाही. त्याने कोरियाला अमेरिकेशी मैत्री करण्याचा सल्ला दिला. अशा तऱ्हेने १८८२ मध्ये म्हणजे जपानला परवानगी मिळाल्यानंतर सहाच वर्षात अमेरिकेचे पदार्पण कोरियामध्ये झाले ते जपानी प्रभावाला अटकाव करण्यासाठी. अमेरिकेपाठोपाठ आशियामध्ये आधीच पोचलेल्या अन्य युरोपियनांनी देखील कोरियाच्या बंदरांचा आम्हालाही वापर करू द्यावा म्हणून विनंती केली. त्यानंतर अमेरिकेसकट उर्वरित युरोपियन देशांनी कोरियन राजवटीशी व्यापारविषयक करारही केले. ह्या काळामध्ये कोरियाचे एकलकोंडे जीवन संपुष्टात आले. १८८३ मध्ये कोरियाने चीनच्या सल्ल्यावरून अमेरिकेशी मैत्री करार करण्याचे पाऊल उचलले. जपानने मात्र कोरियन प्रजेमध्ये दुफळी माजण्याची कारस्थाने करण्याचे तंत्र चालू ठेवले. त्यासाठी बंडखोरांना पैसे प्रचार साहित्य शस्त्रास्त्रे आणि हे सर्व आयोजन करू शकतील असे तज्ज्ञही पुरवले. कोरियाच्या उत्तर भागामध्ये चिनी वस्ती होती. तिथे हे बंड अधिक जोर धरत होते. हळूहळू चीनलाही गप्प बसणे अशक्य होऊ लागले. १८८४ मध्ये चीनने बंडाचा बीमोड करण्याचा प्रयत्न केला पण जपानने त्याचा पराभव केला. १८९४-९५ मध्ये चीनने पुन्हा एकदा "कोरियन लोकांच्या मदतीच्या हाकेला प्रतिसाद" म्हणून कोरियाच्या भूमीवरती जपानशी मुकाबला केला पण जपानने त्यांचा पुन्हा प्रभाव केला. जपानने कोरियाच्या यि राजघराण्यातील राजाला ताब्यात घेतले. अन्य कुटुंबियांना ठार मारले. ह्यानंतर कोरियाच्या अंतर्गत कारभारावरती देखील जपानचे वर्चस्व प्रस्थापित झाले. कोरियामधली परिस्थिती गंभीर होती. त्याची दखल रशियालाही घ्यावी लागली. असेच चालू राहिले तर जपान रशियाच्या हद्दीतही पोहचू शकला असता. सावधगिरी म्हणून आता रशियाने आपले सैन्य मांचुरियामध्ये आणून ठेवले. 

त्यातच १८९६ मध्ये जपानच्या ताब्यात असलेला राजा तुरुंगातून सटकला आणि मांचुरियामध्ये पोचला. त्याने आपल्याला मदत करावी म्हणून रशियाला गळ घातली. मांचुरियामधून तो कोरियाचे परागंदा राज्य चालवू लागला. पण रशियालाही जपानचे आक्रमण थांबवता आले नाही. ३८ अक्षांशाची सीमा मान्य करून कोरियाचे दोन तुकडे करू व आपापल्या प्रभाव क्षेत्रामध्ये काम करू असा प्रस्ताव जपानने रशियाला पाठवला. पण रशियाने तो अमान्य केला. १९०० ते १९०१ ह्या वर्षांमध्ये रशियाने सुमारे दीड लाख सैन्य चीनमध्ये बॉक्सर बंडाळी मोडण्यासाठी पाठवले. त्याची जपानने गंभीर दखल घेतली. बंडाळीनंतर हे सैन्य रशियामध्ये परतलेच नाही. ते गेले कोरियामध्ये. शिवाय १९०३ मध्ये रशियाने ट्रान्ससैबेरियन रेल्वेचे काम पूर्ण केले. आता अगदी दूरच्या युरोपियन सीमेवरूनही रशियन सैन्य कोरियामध्ये त्वरित पाठव्ण्याची सोय झाली हे पाहून जपान बिथरला. १९०४-०५ ह्या वर्षांमध्ये दोन्ही देशांमध्ये युद्धाला प्रारंभ झाला. जपानने रशियाला नाकी नऊ आणले. सायबेरियन किनार्‍यावरची बेटे ताब्यात घेतली. रशियाच्या काही संपूर्ण आरमारी तुकड्या गारद केल्या. 1907 नंतर कोरियावरती जपानचे निर्विवाद राज्य प्रस्थापित झाले. जपानची वसाहत म्हणून १९४५ पर्यंत कोरिया त्यांच्या ताब्यात राहिला. परागंदा राजा कोजोन्ग रशियामध्येच राहिला. 

दुसर्‍या महायुद्धाचे परिणाम कोरियावरती काय झाले हे पुढील भागामध्ये पाहू. 

No comments:

Post a Comment