Tuesday 29 May 2018

उत्तर कोरिया ४

File:Soviet military advisers attending North Korean mass event.jpg

(१४ ऑक्टोबर १९४५ रोजी प्योनग्यान्ग येथील सार्वजनिक सभेमध्ये किम इल सॉन्ग ह्याच्या बरोबरीने व्यासपीठावरती सोविएत लष्करी अधिकारी दिसत आहेत.)


हा भाग काळजीपूर्वक वाचा. आपल्याला हवे ते बाहुले सरकार एखाद्या देशामध्ये आणण्यासाठी सोव्हिएत रशिया कशाप्रकारे पावले उचलत होती त्याचे मनन करा. म्हणजे आजही आपल्या देशामध्ये काय चालले आहे हे तुमच्या लक्षात येईल. कोरिया प्रकरणावरती लिहा म्हणून अनेक जण आग्रह धरत होतेच पण आज ज्या घटना आपल्यासमोर उलगडत आहेत त्यातून माझ्या लेखाचे महत्व अधोरेखित होणार आहे. आजच्या घटना घडलेल्या नसत्या तर अनेकांना असे इथेही घडू शकते ह्याचा विचारही करावा असे वाटले नसते.

दुसर्‍या महायुद्धामध्ये सोव्हिएत रशिया आणि जपान ह्यांच्यात मंगोलिया - मांचुरियाच्या सीमेवरील खल्कनमध्ये शर्थीची लढाई झाली. पण बराचसा काळ सोव्हिएत रशियाने सुदूर पूर्वेतील लढायांमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता. असे असले तरी युद्ध संपताच तिथे काय परिस्थिती असेल आणि त्यावेळी काय करता येईल ह्याची मात्र योजना रशियाकडे तयार होती. फार आधी पासून त्यांनी विविध देशांमध्ये स्थानिक कम्युनिस्ट चळवळींना सक्रिय मदत केली होती. वेळ येताच ह्या सोव्हिएत रशियाशी इमान राखणार्‍या स्थानिक गटांनी त्या त्या देशांमध्ये सत्ता काबिज करावी ह्या दृष्टीने तयारी चालू होती. ह्या व्यापक योजनेमध्ये कोरियाला महत्वाचे स्थान होते. जपानची नांगी ठेचण्यासाठी कोरिया महत्वाचा होता. अनेक वर्षांपासून जपानमध्ये राहणार्‍या कोरियन प्रजेला हाताशी धरून तेथील सरकारविरोधात असंतोष निर्माण करणे ही एक महत्वाची योजना होती. (आजदेखील जपानमधील ही प्रजा दक्षिण कोरियातील राजवटीशी नव्हे तर प्योनग्यान्गशी निष्ठावंत असल्याचे दिसते.) तसे पाहिले तर स्टॅलिन व माओचे फारसे पटत नसून देखील सोव्हिएत रशिया चिनी कम्युनिस्टांना मदत तर करतच होता. पण अजूनही चीनमध्ये सत्ता कम्युनिस्टांच्या हाती आलेली नव्हती. तेव्हा जर कदाचित चीनमध्ये राष्ट्रवादी शक्ती प्रबळ ठरून कम्युनिस्टांचा पराभव करून सत्तारूढ झाल्या असत्या किंवा  कम्युनिस्ट जिंकल्यानंतर माओशी असलेले हे विवाद जर हाताबाहेर गेले तर चीनमार्गे पॅसिफिकपर्यंत पोचणे शक्य होणार नाही हे सोव्हिएत रशियाने गृहित धरले होते. अशी परिस्थिती उद् भवलीच तर पॅसिफिकपर्यंत पोचण्यासाठी रशियाला हक्काचा दुसरा मार्ग म्हणून कोरिया सोयीचा होता. तेव्हा कोरियाचे स्थान सोव्हिएत रशियासाठी वैशिष्ट्यपूर्ण होते. दुसरे महायुद्ध संपताक्षणीच कोरिया हाती घेण्याचा रशियाचा बेत तयार होता. आपल्याच अखत्यारीमध्ये सोव्हिएत रशियाने एक समांतर कोरियन सरकार बनवले होते. त्यामध्ये "सोव्हिएत" कोरियन लष्करी अधिकारी, सुरक्षा व्यवस्था आणि पक्षाचा अधिकारीवर्ग हे अंतर्भूत केले होते. युद्ध संपले की रशियन फौजांनी कोरियामध्ये हे सरकार "स्थापन" करायचे असे ठरले होते. असे आरोपण केलेले सरकार स्थानिक जनतेने स्वीकारले असते का? असे सरकार त्यांना आपलेच आहे असे वाटावे म्हणून समांतर योजना कार्यान्वित केली होती. कोरियामधील अनेक स्थानिक नेत्यांना हाताशी धरून विभागवार लोकसमितींचे (People's Committees) जाळे विणण्यात आले होते. युद्धकाळामध्ये अशा समित्यांना रशियाकडून राजकीय आणि संरक्षणात्मक मदत मिळत असे. जेव्हा सरकार स्थापायची वेळ आली तेव्हा रशियाने त्यांचा खुबीने वापर करून घेतला. ९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर १९४५ ह्या २४ दिवसात रशियाने मांचुरियामध्ये जपानविरोधात तुंबळ युद्ध छेडले. ह्या युद्धामध्ये वापरण्यात आलेले युद्धतंत्र पुढील काळामध्ये रशियाचे एक महत्वाचा नमुना तंत्र बनून गेले. (१८ ऑगस्ट रोजी सुभाषचंद्र बोस फोर्मोसावरून मांचुरियामध्ये पोहोचले तेव्हा जपान आणि रशियामध्ये युद्ध चालूच होते. तिथून ते रशियामध्ये प्रवेशले असे म्हणतात. रशियाने याअगोदर त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्यामुळे जपानपेक्षा रशियामध्ये जाणे त्यांना श्रेयस्कर वाटले असावे. पण रशियाने त्यांना ताब्यात तर घेतलेच पण युद्धकैद्यासारखी वागणूक दिली असे दिसते.) ह्यानंतर सप्टेंबरमध्ये रशियन फौजा कोरियामध्ये घुसल्या. प्रत्यक्षात दोन स्वतंत्र रशियन फौजा कोरियामध्ये पाठवया गेल्या होत्या. एकीचे काम होते राजकीय दृष्ट्या कोरियाच्या स्वातंत्र्याची लढाई लढण्याचे. त्याचे नेतृत्व होते इव्हान चिस्तियाकोव ह्यांच्याकडे. दुसरी छोटी फौज होती निकोलाय लेबेदेव ह्यांच्या कडे. लेबेदेवकडे महत्वाची कामगिरी सोपवण्यात आली होती. कोरिया "स्वतंत्र" झाल्यानंतर तिथे मॉस्कोला हवी ती माणसे (सोव्हिएत कोरियन्स) गादीवरती बसवून कोरियाला सोव्हिएत साम्राज्यातील एक सॅटेलाईट देश बनवायचे. लेबेदेवच्या दिमतीला दोन गुप्तहेर अधिकारी देण्यात आले होते. एकाला जपानी भाषा अवगत होती - त्याचे कोरियन भाषेचे ज्ञान जुजबी होते - त्याने जपानमध्ये राहून तिथे काम केले होते. दुसर्‍याला रशियन वकिलातीमध्ये नेमले होते. त्याचे काम होते त्यावेळपर्यंत भूमिगत राहून काम करणार्‍या कोरियन गटांच्या संपर्कात राहण्याचे. कोरियामध्ये येणे सुरक्षित असल्याचे रशियन फौजांनी कळवल्यानंतर किम इल सॉन्ग आपल्या ४० सहकार्‍यांसह रशियन युनिफॉर्म धारण करून तिथे आला. ह्या धोंड्याला सुरक्षितपणे गादीवरती बसवून कोरियन जनतेच्या गळी उतरवण्यापर्यंतची सर्व कामे रशियन अधिकारीच करत होते. ह्या कामासाठी किमचीच निवड क करण्य़ात आली होती? त्याचा प्रशिक्षक म्हणतो की " Kim was a simple and obidient border-crosser who came within the sights of our intelligence authorities. More precisely, he was obliging, far from having any ideas of his own, and capable of repeating what was suggested to him."

लक्षात घ्या की कोणत्या गुणांसाठी किमची निवड झाली होती. कोरियाची हद्द ओलांडून रशियामध्ये प्रवेशलेल्या बंडखोरांपैकी किम हा एक साधा तरूण होता - आम्हाला हवे तसे वागायला तो तयार होता - त्याच्या डोक्यामध्ये कोणत्याही स्वतंत्र कल्पना नव्हत्या (ज्या कार्यन्वित करण्याची त्याने हौस बाळगली असती आणि तसे करताना कदाचित रशियन डाव उढळले असते) - त्याला सूचना दिल्या की त्याबरहुकूम तंतोतंत बोलण्याचे काम तो उत्तमरीत्या करू शकत होता. एखाद्या देशाचा राज्यकर्ता होण्यासाठी असा माणूस बुद्धिमान असावा अथवा देशाशी आणि जनतेशी प्रामाणिक असावा - त्याच्यामध्ये नेतृत्व गुण असावेत - त्याला स्वतंत्र बुद्धीने कारभार हाकता यावा हे निकष इथे गैरलागू ठरवले गेले होते. कोणते गुण एखाद्या व्यक्तीमध्ये असायला हवेत ह्याचे निकष रशियाच्या लेखी काय होते हे नीटपणे समजावून घ्या. ही वाक्ये परत परत वाचा. तर तुम्हाला आजदेखील असे गुण असलेला आपल्यामधलाच राजकीय नेता सहज ओळखता येईल. खरे ना? आणि तसे असेल तर अशा नेत्यापासून आपल्याला नेमका काय धोका आहे हेदेखील स्पष्टच नाही का?

प्योनग्यान्गला परतल्यानंतर किम इल सॉन्गने कोरियामधील वरिष्ठ स्थानिक कम्युनिस्ट नेत्यांची भेट घेतली आणि त्यांचा पाठिंबा आपल्या सरकारला मिळावा अशी विनंती केली. पण हे वरिष्ठ नेते किमला स्वीकारण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हते. १४ ऑक्टोबर रोजी सोव्हिएत रशियाने एक भव्य सभा आयोजित केली. तिथे ह्या वरिष्ठ नेत्यांना बोलावून व्यासपीठावरती स्थानापन्न करण्यात आले. सभेला अर्थातच प्रचंड गर्दी होती. कोरियामध्ये असलेले सर्व वरिष्ठ रशियन्स सभेमध्ये हजर होते. इथे किम नागरी वेष परिधान करून आला होता. त्याने रशिय्न अधिकार्‍याने लिहून दिलेले भाषण तिथे केले. रशियन्स कोणतीही घाई न करता पावले टाकत होते. सुरूवातीला पीपल्स कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्थानिक वरिष्ठ नेते अंतर्भूत केले गेले होते. त्यांच्यासोबत "सोव्हिएत कोरियन्स" सुद्धा होते. पण त्यांना दुय्यम स्थान होते. ते फारसे प्रकाशात येऊ नयेत अशा तर्‍हेने कामकाज चालवले जात होते. सरकारी काम हाकण्यासाठी रशियन अधिकारी कामाला लागले होते. ते देखील कुठेही पडद्यासमोर न येता काम उरकत होते. स्थानिक वरिष्ठ नेत्यांना न दुखावता गाडा चालवला जात होता. १९४६ च्या शेवटाला रशियनांना परिस्थिती आपल्या हातून निसटण्याची भीती नसल्याची खात्री पटली. आता वेळ आली होती "निवडणुका" घेऊन सोव्हिएत कोरियनांच्या हाती सूत्रे सोपवण्याची. अशा तर्‍हेने मार्क्सिस्ट लेनिनिस्ट सरकार कोरियामध्ये कायदेशीर मार्गाने प्रस्थापित झाले असे जगासमोर आणणे शक्य होणार होते. त्याची कहाणी पुधील भागामध्ये पाहू. 



2 comments:

  1. Tai, one can conclude from your article that Russia is the one who is spreading communism in the world.
    Russians are the THIRD POWER who want thrown current govt. & control over india through Gandhis ????

    ReplyDelete
  2. No one wants an independent thinking ruler in India - USA Russia China Europe - just no one. If their will can prevail they are ready to ditch Modi because he will never sign on dotted lines. Today they can hardly impact the Indian scenario politically so they are raising toasts to Modi but - that does not stop them from making efforts to dethrone Modi.

    ReplyDelete