Tuesday, 18 July 2017

चीन आता काय करणार?

Image result for human chain indian soldiers

१६ जून रोजी चुंबी खोऱ्यामध्ये घुसणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी भूतानच्या हद्दीत येण्यापासून रोखून धरले. काही ठिकाणी झटाझटी झाली तर काही ठिकाणी शाब्दिक चकमकी. अभिनिवेशपूर्ण हातवारे करत चिनी सैनिक आम्हाला तिथे जाऊ द्यात म्हणून भारतीय जवानांना दम भरत होते. ह्या सर्व झटापटीच्या काही व्हिडियो देखील पहिल्यांदाच बघायला मिळाल्या. चिन्यांनी दबाव टाकला तरीही भारतीय जवानांनी आपली जागा सोडली नाही. काही ठिकाणी मानवी साखळी करून त्यांना रोखण्यात आले. हे चिनी सैनिक डोक लाम पासून आपल्या हददीमधल्या लष्करी ठाण्यापर्यंत रास्ता बांधण्यासाठी आले होते. रस्ता भूतानच्या हद्दीमधून जात असल्याने त्यांना रोखावे लागले.  हे करण्याचे काम भूतानचे पण ते भारतीय जवानांनी केले म्हणून चीन संतापला आहे. भूतान - चीन सीमा हा आम्हा दोघांमधला प्रश्न असताना त्यात भारताने पडावे कशाला म्हणून चिनी प्रश्न विचारत आहेत. जोपर्यंत भारतीय जवान परतत नाहीत तो वर बोलणी स्थगित ठेवल्याची घोषणा झाली आहे. ह्या वृतान्तानंतर एक महिना लोटला तरी पुढची हालचाल झालेली दिसत नाही. म्हणूनच सामान्य भारतीय माणूस बुचकळ्यात पडला आहे की आता चीन करणार तरी काय? 

अशा प्रकारची झटपट चीन बरोबर पहिल्यांदा घडली आहे असे नाही. पण बोलणी थांबवण्यापर्यंत गोष्टी गेल्याचे फारसे आठवत नाही. शिवाय ह्या ना त्या कारणाने चीन सतत भारताला धमकावताना दिसतो आहे. भारताचा एन एस जी मधील प्रवेश त्यानेच रोखून धरला आहे आणि भारताला प्रवेश द्यायचा तर पाकिस्तानला पण द्यावा लागेल असे हास्यास्पद कारणही त्याने पुढे केले आहे. मौलाना मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्यालाही त्याने विरोध केला आहे आणि त्यासाठी दिलेले कारण तर अधिकच मजेशीर आहे. एकीकडे मौलानांच्या विरोधात तुमच्याकडे पुरावे नाहीत असे अधिकृतपणे भारताला चीन सांगतो तर दुसरीकडे आपल्या माध्यमांमधून असेही म्हणतो की हे मुद्दे अंतर्गत राजकारणामध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी मोदी सरकार पुढे रेटत असून आमचा त्याला विरोध आहे. दलाई लामा यांनी अरुणाचल राज्याला धार्मिक उत्सवासाठी भेट दिली त्यावर चीनने आक्षेप घेतला आहे. अमेरिकन राजदूताने अरुणाचलला भेट दिली त्यावरही चीनने आक्षेप घेतला आहे. अशा तऱ्हेने काही कारण नसताना भारताच्या कुरापती काढण्याचा उद्योग चीन करत असल्यामुळे चुंबा खोरे प्रकरणामध्ये भारताने रोखले तर चीन दमदार उत्तर देईल अशी सर्वांची अपेक्षा होती. पण रणांगणामध्ये असे दमदार उत्तर देण्या ऐवजी चीन भलतेच काही करताना दिसतो आहे. 

भारताच्या कळी काढण्याची कामे आजपर्यंत पाकिस्तान करत आला आहे. कुठे ना कुठे दहशतवादी घुसवणे  - भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणे - काश्मीरमध्ये लष्कराला लक्ष्य बनवून त्यांच्यावर हल्ले करणे - नियंत्रण रेषेवरती कुरापती काढणे - रेषा ओलांडून आत यावे आणि बेछूट गोळीबार करावा - तोफांचा मारा करावा - भारतामध्ये घुसण्यासाठी प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना रेषा ओलांडून भारतीय हददीमध्ये प्रवेश मिळवून देण्यास मदत करणे - त्यांना लपत छपत आत जात यावे म्हणून भारतीय ठाण्यावरती गोळीबार करून त्यांना त्यात गुंतवून ठेवावे जेणे करून अतिरेक्यांना आत घुसायचे संधी मिळावी - काश्मिरात उठाव आंदोलने घडवून आणणे आणि ती तशी झाली  की स्थानिक पोलीस  व जवान याना हिंसेचे लक्ष्य बनवून दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्राचे मथळे भरतील अशा घटना घडवून आणणे आणि त्या तशा आल्या की आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताच्या 'दमनशाही' वरती आपल्याच पिट्ट्यांकडून आक्रोश करवून आणणे ही होती पाकिस्तानची modus operendi. भारताशी थेट लढायची अंगात कुवत नाही - थेट लढाई करून काश्मीर जिंकून घेण्याची टाकत नाही मग काय तर असल्या खेळी करून बेजार करणे आणि कसेही करून प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रसिद्धी मिळवून देणे ही आक्रमक पाकिस्तानची modus operendi आज सर्व भारतीयांना परिचित झाली आहे. 

ही सगळी नाटके पाकिस्तान करू शकत होता कारण त्याला गोंजारणारे पाश्चात्य देश उलट दम भारतालाच भरत होते. वाटाघाटीला बसा आणि सामंजस्याने प्रश्न सोडवा ह्यापलीकडे कोणताही पाश्चात्य देश - अमेरिकासुद्धा भारताची बाजू घेत नव्हती. म्हणजेच हे प्रश्न जागतिक व्यासपीठावर नेऊन भारत सरकारवर तिथून दडपण आणण्याच्या खेळींमधले ग म भ न नव्हे आता ह ळ क्ष ज्ञ देखील भारतीयांना ओळखता येतात. आता हळूहळू चीन बद्दलही तुम्ही साक्षर होऊ लागाल.

स्वतः हून भारताची कळ काढणाऱ्या चीनकडे आता कोणत्या खेळी आहेत? एक तर राजनैतिक मार्गाने वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याची हवा तयार करणे - दुसरे म्हणजे असह्य दबावाखाली झुकवून भारताला आपल्या अटींवर समझौता करण्यास भाग पाडणे - एक चुंबा खोऱ्यापुरता संघर्ष मर्यादित न ठेवता अधिकाधिक ठिकाणी अशा आघाड्या उघडून भारतावर दबाव टाकून त्याला जेरीस आणणे हे ताबडतोबीने चोखाळायचे पर्याय चीनकडे उपलब्ध आहेत. 

ह्यापैकी वाटाघाटीच्या मेजावर भारताने यावे म्हणून चीनने एक मोहीमच आखली असून त्याची प्यादी असल्यासारखे वागणारे बुद्धिवंत कोण आहेत हे आपल्यासमोर आलेआहे. पण केवळ बुद्धिवंत नव्हे तर भारतामधले राजकीय पक्षसुद्धा चीनची री ओढताना दिसत आहेत. एक साधी थप्पड मारली की भारत वाटाघाटीला बसतो हे चीनला जगासमोर दाखवून द्यायचे आहे.  आपल्यासारख्या महासत्तेशी लढण्याची भारताची औकात नाही हा तर मूळ सिद्धांत आहे. असा चीनचा समज करून देण्यामागे कोण मंडळी आहेत हे आपण ओळखत नाही का? सैन्य आधी मागे घ्या - सीमा भूतानची आहे तेव्हा चीन आणि भूतान ह्यांना हा प्रश्न सोडवू द्या ही भूमिका चीन ने तर मंडळी आहेच - त्यात नवल काही नाही - पण हेच भूमिका जेव्हा इथले डावे आणि काँग्रेस ही मांडते तेव्हा हे भारताच्या हिताचे बोलतात की कोणाच्या कठपुतळ्या म्हणून पुढेपुढे करतात अशी शंका येते. प्रसिद्धी माध्यमांमध्ये बोंबाबोंब करून सुद्धा मोदी सरकारने ह्या दबावाला अजिबात दाद दिलेली नाही. 

दबाव तंत्राला कंटाळून भारत आधी डोळा मारेल ह्या आशेवर अजूनही चीन असला तरी संघर्ष सुरु होताच भारताचे संरक्षण मंत्री श्री अरुण जेटली यांनी ह्याचे उत्तर आधीच देऊन ठेवले आहे. जेट म्हणाले होते की हे २०१७ साल आहे - १९६२ चा भारत आता उरला नाही हे चीन ने ध्यानात घ्यावे. तेव्हा अरे म्हणालात तर आम्हीही का रे म्हणणार आहोत असा स्पष्ट संकेत जेटली यांनी चीनला दिला आहे. 

मग आता पर्याय उरतो तो एकाच वेळी अनेक आघाड्या उघडण्याचा. उत्तर सीमेवरती अशा अनेक जागा आहेत जिथे चीन जे नाटक त्याने चुंबी खोऱ्यामध्ये केले तेच नाटक करू शकतो. चुंबीमध्ये झाले त्यापेक्षा अधिक तीव्रतेचे संघर्ष उभा करू शकतो. ही केवळ कागदावर मांडण्याची शक्यता नसून असे होणार हे भारताने आणि त्याच्या लष्कराने गंभीरपणे जाणून घेतले आहे. आठ जून रोजी जेव्हा जनरल बिपीन रावत यांनी 'आम्ही अडीच आघाड्यांवर लढायची सज्जता केली आहे' असे म्हटले तेव्हाच चीन काय काय करणार ह्याचे पूर्ण चित्र लष्कराने गृहीत धरून आपल्या प्रतिखेळी काय असाव्यात ह्याची संरचना केली आहे हे सूचित होत आहे. 

ह्याव्यतिरिक्त गरज पडली तर काश्मीरमध्ये तिसऱ्या देशाचे सैन्य उतरू शकते असे म्हणण्याची मग्रुरी चीनने व्यक्त केली आहे. ही धमकी भारताने तोंडाची हवा म्हणून गणलेली नाही. मे महिन्याच्या मध्यावरती 'काश्मिरात काही तरी बदलतंय' अशा मथळ्याचा लेख लिहिला होता. (https://swatidurbin.blogspot.in/2017/05/blog-post_14.html )त्याच दरम्यान काशीर मध्ये आंदोलकांच्या हातातले लाल झेंडे असलेले फोटो देखील मी FB टाकले होते. तेव्हा चीनने काश्मीरमध्ये प्रवेश केला आहे हे तोंडाने सांगायला जुलै उजाडला तरी कृतीने ते मे महिन्याच्या आधीच छुप्या रीतीने केलेले होते.  

भारताला धडा शिकवलाच पाहिजे म्हणून वल्गना करणारा चीन असल्या छोट्या मोठ्या कुरापती काढून गप्प बसला तर लाज त्याचीच जाणार आहे. हे सुज्ञ चीनला काय कळत नाही? मग कळत असून देखील त्याने असे करण्याची गरज काय हा प्रश्न तुमच्या मनात येईल. अर्थात त्याचे उत्तर पुढच्या लेखात बघू. 




No comments:

Post a Comment