१६ जून २०१७ रोजी चिनी सैनिक दोका ला येथे भूतानच्या हद्दीमध्ये घुसले आणि त्यांनी भूतानच्या जमिनीवरून आपल्या मोक्याच्या ठाण्यापर्यंत रस्ता बांधणीचे काम सुरु करण्याचे प्रयत्न केले. ह्या प्रयत्नांना भारतीय सैनिकांनी अटकाव केला. चिनी सैनिकांना हद्दीमध्ये घुसू दिले नाही. ही घटना जवळ जवळ नऊ दिवस दडवून ठेवण्यात आली. श्री नरेंद्र मोदी अमेरिका दौर्यावर असताना कळ काढल्यासारखे हिला चीनकडून प्रसिद्धी देण्यात आली. ह्या प्रसंगाच्या काही व्हिडियो देखील सोशल मीडियावरती पहायला मिळाल्या. त्यातून एक स्पष्ट झाले की चिनी सैनिकांनी हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न तर केला पण शस्त्र काही उगारले नाही. कोणत्याच पक्षाकडून एकही गोळी झाडली गेली नाही. ह्यानंतर प्रत्यक्ष रणभूमीमध्ये नव्हे तर आपल्या मीडियाद्वारे चीनने प्रचाराचा धूमधडाका लावला. आपल्या माध्यमांव्यतिरिक्त भारतामधील चीनची री ओढणार्या विद्वानांना हाताशी धरून सामान्य भारतीयांच्या मनामध्ये गोंधळ उडवून देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ह्या विद्वानांनी एक गोष्ट ठसवण्याचा प्रयत्न केला की चीनची ताकद भारतापेक्षा कित्येक पटीने मोठी आहे आणि म्हणूनच प्रत्यक्ष रणांगणावरती भारत सपाटून मार खाईल.
एक गोष्ट तर स्पष्ट आहे की जो कोणता रस्ता बांधण्याचे निमित्त चीनतर्फे शोधले गेले त्याची ताबडतोब निकड अजिबात नव्हती. दुय्यम काय पण कदाचित तिय्यम महत्वाचे देखील हे काम होते असे म्हणता येईल की नाही शंकाच आहे. बरे कळच काढायची तर खुद्द भारताच्या हद्दीमध्ये न काढता भूतानच्या हद्दीमध्ये काढण्याची तरी काय गरज होती? ह्याचाच अर्थ असा आहे की वरवर दिसतो तसा ह्या कळी काढण्याच्या कृतीचा हेतू नाही. चीनतर्फे जे प्रयत्न करण्यात आले त्याची वर्गवारी माध्यमयुद्ध आणि मनोवैज्ञानिक दबाव तंत्र ह्यामध्ये करता येईल. व्यापक प्रमाणावरती जनमत आपल्या बाजूने नाही असे दिसले तर मोदी सरकार नमते घेईल असा ह्यामागे हेतू असावा. लोकांच्या एकंदर प्रतिक्रिया बघता चीनचा हा डाव सपशेल फसला असल्याचे स्पष्ट होत आहे. (उदा. चिनी मालावरती जनतेनेच बहिष्कार टाकावा ह्या आवाहनाला जनतेकडून मिळणारा प्रतिसाद पुरेसा बोलका आहे. इतका की चीनने त्यावरती जाहीर नाराजी व्यक्त केली.) मग मनामध्ये प्रश्न हा उमटतो की इतका पाताळयंत्री चीन असा हरणारा डाव खेळलाच कसा? इतके साधे गणित त्याला कसे मांडता आले नाही? गैरप्रचाराची - अर्धवट माहितीची - दिशाभूल करणार्या बातम्या पसरवायची ही खेळी चीन का खेळला? इतक्या सोप्या रीतीने कठिण गणित चुकवायची चीनला गरजच काय होती? की चीन इथल्या अर्धवट मडके भाजलेल्या अतिडाव्या विद्वानांच्या सुरात सूर मिसळून आंधळेपणाने आपले धोरण ठरवत आहे? एक एक गोष्टीचा सखोल अभ्यास करूनच आपली खेळी ठरवणारा चीन असा उल्लू बनलाच कसा? ह्याचा एकच अर्थ असा निघू शकतो की ह्या सगळ्या खेळी चीननए आंतर: को पि हेतूः ह्या न्यायाने केल्या असाव्यात आणि हा गुप्त हेतू काय आहे हे समजणे आवश्यक आहे.
मॅट्रिकला बसणार्या विद्यार्थ्याची तयारी कुठपर्यंत आली - कोणत्या मुद्द्यांकरत त्याला अधिक अभ्यासाची गरज आहे हे अंतीम परीक्षेआधी कळले तर विद्यार्थ्याला आपल्या अभ्यासामध्ये सुधारणा करून परीक्षेतील यशाची खात्री करून घेता येते. दोका ला इथे जो काही घुसखोरीचा प्रकार करण्यात आला त्याचा हेतू सुद्धा असाच काहीसा होता. परराष्ट्रनीतीमध्ये बरेच काही बोलले जाते पण नेमके ज्याची वाच्यता होत नाही तेच महत्वाचे असते. अनेकदा जे जाहीररीत्या बोलले जाते ते शत्रूला कात्रजचा घाट दाखवण्यासाठी बोलले जाते. म्हणून जे जाहीर रीत्या बोलले जात नाही त्याची ’चाचणी’ घेतल्याशिवाय”तायारी’ कितपत आहे ह्याचा अंदाज येत नाही. चीनच्या धटिंगणपणाला मोदी सरकारने ’न आंखों से आंखे झुकाकर न आंखे उठाकर बल्की आंखों से आंखे मिलाकर’ चपखल उत्तर देण्याचे धोरण अवलंबले खरे. शिवाय भारताच्या बाजूने अनेक देशांच्या सहकार्याचे जाळे उभे केले. पण वेळ आली तर त्यातले काय नेमके टिकणार ह्याचा अंदाज घेणे कठिण असते.
भूतानला मैत्रीच्या आणाभाका मोदी यांनी घेतल्या तरीही संकटसमयी खरोखरच भारत भूतानच्या बाजूने उभा राहणार की नुसतीच चीनला तोंडातोंडी समज देऊन गप्प बसणार? आक्रमण झाले तर भूतान भारताकडे जाणार की निमूटपणे चीनला शरण जाऊन प्रकरण मिटवायचा प्रयत्न करणार? भूतानच्या निमित्ताने भारताची विश्वासार्हता आणि सुरक्षा धोक्यामध्ये आली तर अशाच आणाभाका घेणारा जपान खरोखरच भारताच्या बाजूने उभा राहील का? पाच दशके भारताचा मित्र म्हणून वावरणारा रशिया चीनकडे ओढला गेला असला तरीही युद्धप्रसंग आलाच तर हाच रशिया बाजू घेणार कोणाची? भारताची की चीनची? कोणाची बाजू घेतली नाही तर निदान तटस्थ तरी बसणार का? ह्या युद्धामध्ये पाकिस्तान ओढला जाणार हे उघड आहे. मग त्याचा मित्र सौदी काय करेल? पाकिस्तानच्या बाजूने बोलणार की भारताच्या? आणि सर्वात कळीचा प्रश्न म्हणजे अमेरिका आणि ट्रम्प काय करणार? भारत - अमेरिका - इस्राएल हे जे त्रिकूट उदयाला येत आहे त्याचे मनोबल कसे आहे? ठिसूळ? की बळकट?
ह्यालाच आपण Dip Test म्हणू शकतो. चीनला Dip Test करून भारताची लिटमस चाचणी घेतल्यावर जे आकलन झाले आहे ते कसे झोंबरे आहे हे पुनश्च उगाळायला नको. चीनचे आव्हान उभे राहताच भूतानने भारताकडे मित्र म्हणून पाहिले आणि आपला भरवसा त्याच्या खांद्यावर टाकला. भारतानेही भूतानसाठी आपली ताकद पणाला लावली. भारतावर हल्ला झाला तर आपण भारताच्या बाजूने उभे राहू असे जपान आणि इस्राएलने सांगितले. सौदी अरेबिया गप्प राहिला. रशियाने आपले सैन्य चीनच्या हद्दीवर आणून उभे केले. अमेरिकेनेही निःसंदिग्धरीत्या आपली भूमिका स्पष्ट केली. अशा तर्हेने चीनने जो डाव खेळला त्यामध्ये त्याची बाजू त्याच्यावरच पलटली आहे. आपला पेच लागू पडला नाही म्हणून आता त्याची चरफड वाढली आहे.
आजच्या घडीला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री अजित दोवल ब्रिक्स रासुस बैठकीसाठी चीनला गेले असून त्या भेटीचा तपशील आपल्या हाती लवकरच येईल. जर शी जिन पिंग यांनी दोवल यांना भेट दिली तर तेच एक महत्वाचे पाऊल ठरेल कारण चीनचे अध्यक्ष कोणत्याही देशाच्या रासुसला भेटत नसतात. माझ्या वाचनामध्ये असे आले आहे की दोवल दोका ला प्रकरणामध्ये काही तोडगा घेऊन गेले असून चीनकडे त्याविषयी गांभीर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. ह्याचे उत्तर आपल्याला नजिकच्या भविष्यामध्ये मिळणार आहे. तोपर्यंत जे झाले त्याचा नेमका अर्थ आणि महत्व आपल्यासमोर उलगडण्याचा मी प्रयत्न केला आहे. तपशील हाती आला की कोणत्या मुद्द्यांवर प्रकाश पडतो हे स्पष्ट होईलच.
संकेतांची मांडणी अगदी चपखल आहे. या विषयावर आणखी विस्ताराने वाचावयास मिळेल अशी आशा आहे.👌
ReplyDeletemadam very well explain
ReplyDeleteMadam tumche lekh jast yet nahi tari tumhi jast lihave hi apeksha.
ReplyDelete