Sunday, 16 July 2017

चीनचा हत्ती - पादे रे फूस

Image result for ryszard czarnecki india


१६ जून रोजी चुम्बा खोर्‍यामध्ये भारत व चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या विवादाचे सूर वातावरणामध्ये अजूनही घुमत आहेत. दोकलाम विभागातील दोकाला ते झोर्नपेरली येथील भूतानी कॅम्पपर्यंत भूतानच्या हद्दीमधून आपल्या ठाण्यापर्यंत रस्त्यासाठी खोदकाम करावयास आलेल्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी मानवी साखळी करून रोखले. ह्यानंतर चीनच्या परराष्ट्रखात्याकडून आणि त्याहीपेक्षा जास्त थयथयाट सरकारी चिनी माध्यमांमधून बघावयास मिळाला. ह्या घटनेला आता एक महिना पूर्ण होईल. या काळामध्ये चिनी सैनिकांना रोखण्यासाठी भारतीय जवानांनी एकही गोळीसुद्धा झाडली नाही. आणि चिनी जवानांचीही तशी हिंमत झालेली नाही. ह्या घटनेनंतर भूतान सरकारने चीनच्या राजदूताला आपल्या वकिलातीमध्ये पाचारण करून राजनैतिक मार्गाने इशारा दिला आहे. 

मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याला गालबोट लावण्याइतकाच मर्यादित हेतू बाळगून चीनने हा आगाऊपणा २६ जूनच्या आसपास प्रसिद्धीस दिला असला तरी  मुत्सद्देगिरीच्या लढाईमध्ये चीन कमी पडला असे उघडच दिसत आहे. भारताला राग यावा पण नुसते ओरडण्यापलिकडे त्याला काही करता येऊ नये अशी बेचक्यामधली जागा चीनने निवडली होती. चीनने केलेली घुसखोरी नकाशावरती घुसखोरी भूतानच्या हद्दीमधली होती. भूतान हा चीनच्या तुलनेमधला दुर्बल देश. असे झाले तर तो काय करणार? फार तर आरडा ओरडा करेल - भारताकडे विनवणी करेल मग भारत आपल्याला इशारा देऊन गप्प बसेल असे गणित असावे. म्हणजेच हे चित्र उभे करायचे होते की भारतीय सीमा धोक्यामध्ये आहेत. भारताने जर जागतिक पातळीवरती चीनला राग येईल अशा पद्धतीने अमेरिका - जपान यांच्याशी हातमिळवणी करून दक्षिण चीन समुद्रामध्ये आपली कोंडी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना हातभार लावला तर भारताची उत्तर सीमा शांत राहणार नाही असा इशारा चीन भारताला देऊ पाहत असावा. शिवाय भूतान व तत्सम देशांना हा इशारा होता की भारताच्या नादी लागाल तर तुमचे नुकसान आहे. आम्ही आक्रमण केलेच तर तुमच्या मदतीला भारत येणार नाही. आशियामधली सुपर पॉवर म्हणून आवाज चीनचाच आहे हे दृश्य जगासमोर उभे करायचे होते. पण ह्याकरिता खेळण्यात आलेली खेळी भारताने आज चीनवरच उलटवलेली आहे. 

तीन आठवडे झाले तरी चीन सीमेवरती हात बांधून उभा आहे. झालेच तर आपल्या सरकारी वर्तमानपत्रातून भुंकतो आहे. ह्या सगळ्याला भारताने अजिबात दाद दिलेली नाही. परराष्ट्र खात्याने एक निवेदन तेवढे जारी केले. पण चीनची ’समजूत’ काढण्यासाठी कोणतीही राजशिष्टाईची चाल झाली नाही की अन्य बलाढ्य देशांकडे चीनची तक्रार घेऊन भारत गेला असेही दिसले नाही. फार कशाला अजून पंतप्रधान मोदी यांनी यावर साधी प्रतिक्रियाही दिलेली नाही. भारत कसा हतबल आहे आणि आपल्या सामर्थ्यापुढे झुकतो हे दाखवण्यासाठी केलेल्या नाटकाचा पुरता फज्जा उडाला आहे. अंगात दम असेल तर चीनने सामर्थ्य पणाला लावून रस्त्याचे काम सुरु ठेवायला हवे होते. प्रसंगी युद्ध पुकारून हे काम पुढे रेटायला हवे होते. पण प्रत्यक्षात ह्यातले काहीच घडले नाही. हती पादनार तेव्हा किती मोठा आवाज येणार म्हणून घाबरलेले लोक आधीच कान झाकण्यासाठी कानावर घट्ट आवरणे लावतात पण प्रत्यक्षात चीनचा हत्ती पादला त्याचा आवाज नगार्‍याएवढा आलाच नाही. एकदाच काय ते फुस्स ऐकू आले. हत् तेरी. आता ह्या नाटकावर पडदा पाडायचा तरी कसा ह्या पेचामध्ये चीन अडकला असताना चीनच्या मदतीला सरसावून जाण्यासाठी श्री राहुल गांधी यांचा मोहरा खर्ची घालावा लागला आहे. 

हे पहिल्यांदाच घडले असे नाही. ह्या पूर्वी इथल्या खुळचट डाव्या विद्वानांनी चीन आणि पाश्चिमात्य देशांची अशी समजूत करून दिली होती की दिलेली आश्वासने पूर्ण करता न आल्यामुळे मोदी सरकार अप्रिय असून यूपी सकट अन्य चार राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये मोदींचा सपशेल पराभव होईल. मोठ्या मोठ्या पुरस्कारांनी आभूषित विद्वानांकडून आलेले हे विश्लेषण चीनला सुखावणारे होते. त्यावरती त्याची भिस्तही होती. म्हणूनच मोदी सरकारने निवडणुकांच्या आधी जेव्हा चीन सरकारला मौलाना मासूद अजहर ह्याला दहशतवादी म्हणून घोषित करा म्हणून कळवले होते त्यावरती चीनच्या माध्यमांची प्रतिक्रिया हीच होती की अशा बाबींचा मोदी सरकार अंतर्गत राजकारणासाठी दुरुपयोग करुन घेण्याची शक्यता आहे.  आहे ना गंमत? हे मोदी यांचे भुसकट मूल्यमापन केवळ डावेच करु शकतात. मुख्य म्हणजे चीनचे सरकार सुद्धा असल्या विश्लेषणाला भुलून आणि मोदी सरकारला आपल्या तर्फे राज्य निवडणुकांमध्ये राजकीय मसाला मिळू नये म्हणून महत्वाच्या विषयावरती निर्णय घ्यायला राजी झाले होते. काय करणार? चिन्यांना ओलावा मिळत होता इथल्या यूपीएच्या सहकार्‍यांकडूनच! तेव्हा राज्य निवडणुकांमध्ये मोदींनी विरोधकांचा धुव्वा उडवला त्यानेही चीनला अजून अक्कल आलेली दिसत नाही. कशी येणार? कारण यूपी एचे ’सहकारी’ पुढची खुळे दाखवत होते.

यूपीए राजवटीमध्ये ट्रॅक २ डिप्लॉमसी नावाचे खूळ बोकाळले होते. ह्याच्या अंतर्गत फुकटे विद्वान पत्रकार अभ्यासक विश्लेषक विचारवंत आदि आदि जमाते पुरोगामीची मंडळी आपली वटवट सुनावण्यासाठी सरसावत. सरकारला जे अधिकृत धोरण म्हणून घोषित करणे शक्य नव्हते ते ह्या पोपटांकरवी वदवून दाखवावे आणि देशद्रोही भूमिकेसाठी हळूहळू जनमत तयार करावे ह्या हेतूनेच ट्रॅक २ डिप्लॉमसीचे नाटक रंगवले जात होते. तेव्हा आतादेखील मोदी सरकारला उघड संघर्ष करणे शक्य नसल्यामुळे ह्या ना त्या रूपाने ट्रॅक २ डिप्लॉमसीचे खूळ पुढे रेटत न्यावे लागेल आणि आपल्याला ईप्सित साध्य करता येईल ही चीनची अटकळ असावी. पण ती सपशेल फोल ठरली आहे. तेव्हा ट्रॅक २ डिप्लॉमसीचा प्रस्ताव मोदी सरकारकडून पुढे येत नसल्यामुळेच एकच बकरा उरला बळी द्यायला. रोहित वेमुला असो की कन्हैय्या - डाव्यांचे मुद्दे पुढे नेण्यासाठी कुर्बानी द्यायला नेहमी तयार असलेला एकमेव बकरा आताही पुढे करण्यात आला. अर्थातच प्रत्यक्ष राहुल गांधी ह्यांना मैदानात उतरवण्यात आले. राहुल गांधी यांनी चिनी राजदूताची भेट घेतली आणि त्यानिमित्त कॉंग्रेसची कशी फजिती झाली ही कहाणी सगळ्यांनी चाखत माखत ऐकली आहे. 

दुर्दैव असे की यूपीएच्या ह्या ट्रॅक २ डिप्लॉमसीचे खूळ संपते तोवर आता युरोपियन युनियनचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या परराष्ट्र संबंधांतील समितीचे सदस्य रिसझार्ड झारनेकी ह्यांनी दोन दिवसापूर्वी ईपीटूडे (EPToday) ह्या वेबसाईटवरती एक लेख लिहून चीनच्या धोरणाचे बारा वाजवले आहेत. झारनेकी म्हणतात -  "गेली काही वर्षे चीनने जागतिक पातळीवरती सर्वांना हेच आश्वासन दिले आहे की आपला उदय हा जगाच्या शांततेच्या आणि उन्नतीच्या आड येणारा नसून प्रगतीसाठी आहे. शी पिन पिंग ह्यांच्या उदयानंतर चीनच्या धोरणामध्ये लक्षणीय बदल झाला असून १६ जून रोजी दोकलाम येथे रस्ता बांधण्यासाठी चीनने भूतानच्या हद्दीमध्ये केलेली घुसखोरी हे त्या बदलाचे उदाहरण आहे. ह्या घुसखोरीनंतर भूतानकडून आपल्याला डिमार्ची मिळेल अशी चीनने अपेक्षा केली असली तरी ह्या घुसखोरीविरोधामध्ये भारत दखल घेऊन आपल्या सैनिकांना अटकाव करेल हा चीनसाठी धक्का होता. प्रत्यक्षामध्ये काही आठवड्यामध्ये रस्त्याचे काम पूर्ण करून मग ही घटना प्रसिद्धीस देण्याची तयारी होती. पण असे होऊ शकले नाही. आता कांगावखोरी करून चीन असे सांगत आहे की भारताचे सैन्य मागे गेल्याशिवाय ह्या विषयावरती आपण बोलणी करणार नाही. आपल्या आर्थिक आणि लश्करी उन्नतीला साजेसे असे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणारे वर्तन चीनने दाखवावे अशी अपेक्षा आहे. अन्यथा त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या सर्वांसाठी लाभदायक आणि सामायिक उज्ज्वल भविष्याच्या बतावणीवरती विश्वास टाकता येणार नाही." 

भारताच्या तिखट प्रतिक्रियेनंतर चीनचा डाव उद्ध्वस्त झालेलाच आहे. तो राहुल गांधी सावरणार कसा हा प्रश्न आहे. सध्या तरी भूतानसारख्या छोट्या देशाने डिमार्श द्यावा ह्यातच चीनची जगापुढे नाचक्की झाली आहे. धटिंगण चीनला आवरायचे तर भारत हाच खरा मित्र असू शकतो हे मोदी यांनी एक शब्दही न उच्चारता सिद्ध केले आहे. ह्यातूनच चीनने ज्यांच्याशी सीमावाद उकरून काढला आहे ते २३ देश भारताला अधिक विश्वसनीय मानतील ही मोठी कामगिरी आहे. जागतिक नेतृत्व असेच सिद्ध होत असते. दमदाट्या करून नव्हे. 








No comments:

Post a Comment