Sunday 16 July 2017

ओवेसींची ठूसठूस

Image result for owaisi swami


इस्राएल भेटीकरता मोदी गेले असताना टीव्ही वरती डॉ. सुब्रमण्यम स्वामी वि. असद उद्दीन ओवेसी अशी एक चर्चेची फेरी ऐकायला मिळाली. मोदी सरकारवरती श्री ओवेसी अनेक आक्षेप घेत असतात. ओवेसी यांचे वैशिष्ट्य असे की आपली कडवी इस्लामी मते ते वरकरणी भारतीय घटनेच्या चौकटीत राहून मांडण्याचा आव आणत असतात. शहाबानो खटल्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने घेतलेल्या भूमिकेमुळे मुस्लिम प्रजा भारतीय घटना पाळायलाच तयार नाही आणि त्यांना इथे शरियतचे राज्य आणायचे आहे अशी लोकांची समजूत झाली आणि ती आपल्या वर्तनामधून दूर करण्या ऐवजी ती अधिकाधिक कडवी कशी होईल अशा पद्धतीनेच अन्य मुस्लिम नेते आपले राजकारण रेटत आले आहेत. शहाबानो खटल्यातील आपल्या भूमिकेमुळे मुस्लिम समाजाच्या झालेल्या नुकसानीची दखलही न घेतल्यामुळे क्रमाक्रमाने भारतीय राजकारणामध्ये हिंदूंची व्होटबॅंक पक्की होत गेली आहे. त्या चुकीला सावरून घेऊन पुढच्या काळामध्ये तिचे परिणाम कमी क्लेशकारक होतील असा विचार कोणत्याही मुस्लिम नेत्याने केला नाही.

ओवेसी यांचे राजकारण वेगळ्या मार्गाने चालत असते. प्रचलित तथाकथित मुस्लिमवादी पक्ष आणि मुस्लिमांचे हित बघू म्हणून आश्वासने देणारे अन्य मुख्य प्रवाहामधले पक्ष यांनी मुस्लिम प्रजेचा व्होट बॅंक म्हणून वापर तेवढा करून घेतला पण समाजाला मात्र त्यातून काहीच मिळाले नाही अशी घणाघाती भूमिका मांडण्याचे काम ते करत आले आहेत. दीर्घ पल्ल्याच्या राजकारणाचा विचार करत भारतामधल्या मुस्लिम प्रजेसाठी बॅ. जिना यांची जागा घेण्याची आकांक्षा बाळगणारा नेता म्हणून  स्वतःला ते पेश करतात आणि ह्याच भूमिकेमधून मुस्लिम प्रजेने आपल्याला स्वीकारावे असे त्यांचे राजकारण सुरु असते.

गेल्या काही वर्षांमध्ये असे दिसून येईल की मुस्लिम समस्यांवरील चर्चांमध्ये ओवेसी यांनी अन्य मुस्लिम नेत्यांना मागे टाकले आहे. त्यांना ह्यामुळे एक महत्वाचे स्थान राजकीय व्यासपीठावरती मिळत गेले आहे. भारताबाहेरील व्यासपीठांवरती ओवेसी तेथील मुस्लिम समाजाची री न ओढता भारतीय मुसलमान स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवतील आणि त्यामध्ये तुमची ढवळाढवळ नको आहे असे बजावत असतात. म्हणूनच पाकिस्तानी नेत्यांची आंधळेपणाने री ओढणारे भारतीय मुस्लिम नेते अशी स्वतःची ख्याती त्यांनी होऊ दिलेली नाही ही बाब महत्वाची आहे.

तेव्हा वरकरणी भारतीय हिताचा विचार करतो दाखवणार्‍या ओवेसी यांना डॉ. स्वामी यांच्या विरोधात काय वाद घालायचा आहे असा प्रश्न पडणे स्वाभाविक होते. ह्या चर्चेमध्ये बोलताना ओवेसी म्हणाले की स्वातंत्र्यापासून चालत आलेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोदींनी बदल केला आहे याची आम्ही दखल घेत आहोत. त्यांना उत्तर देत असताना डॉ. स्वामी ही म्हणाले की ओवेसी यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे की मोदी यांनी इस्राएल संबंधी भारतीय धोरण बदलले आहे. पण त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही. कॉंग्रेसचेच धोरण आम्ही पुढे राबवू असे काही आश्वासन आम्ही प्रचारादरम्यान दिले नव्हते. म्हणूनच देशाच्या हिताचे असेल तेच धोरण राबवायला आम्ही उत्सुकता दाखवतो. जगाच्या राजकारणामध्ये भारत इस्राएल एकत्र आले तर मोठा परिणाम एकरित रीत्या घडवून आणतील असे स्वामी म्हणाले. आणि तेच ओवेसी यांना ठुसठुसते आहे काय?


आजवरच्या भारतीय सरकारांनी मतपेटीचा विचार मनामध्ये ठेवूनच इस्राएलशी संबंध कसे असावेत यावर विचार केला होता. गांधी घराण्याचे राज्य होते तोवर इस्राएलची वकिलातही भारतामध्ये नव्हती कारण दोन देशांमध्ये राजनैतिक संबंधही नव्हते. अशी वकिलात प्रथम स्थापन झाली ती श्री. नरसिंहराव यांच्या कारकीर्दीमध्ये. (योगायोग म्हणा किंवा कसे पण बाबरी मशिदही पडली ती त्यांच्याच कारकीर्दीमध्ये). कारगिल युद्धामध्ये इस्राएलची मदत घेणार्‍या वाजपेयी सरकारनेही इस्राएलला भेट देण्याचा विचार केला नव्हता. तेव्हा असलीच तरीही मतपेटीची बंधने झुगारून मोदी इस्राएलला भेट देते झाले ही बाब ओवेसींना झोंबणार हे उघड आहे. कारण भारतीय पंतप्रधानाने इस्राएलला स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी भेट देणे आणि शिवाय त्या भेटीमध्ये पॅलेस्टाईनच्या नेत्यांना न भेटणे वा तिथे न जाणे ह्या कृतीमधून हे निःसंदिग्धपणे मान्य केले गेले की पॅलेस्टाईनच्या प्रश्नाचे भारत सरकारचे आकलन आता बदलले आहे.

जसे डाव्यांना (पूर्वीच्या काळी मॉस्को मध्ये आणि सध्या) बीजींग मध्ये पाऊस पडला की भारतामध्ये छत्री लागते तसे येथील इस्लामी पक्षांना पॅलेस्टाईनमध्ये वा अन्य मुस्लिम जगतामध्ये जे काही घडेल त्यानुसार येथे छत्री उचलण्याची सवय लागली आहे. पॅलेस्टाईनचे अस्तित्व भारताने नाकारणे ही एक प्रचंड मोठा बदल करणारी घटना आहे हे निश्चित. 

अर्थात ओवेसी इतके काही भोळसट नाहीत की पॅलेस्टाईनकरत सर्वस्व पणाला उघडपणे लावतील. त्यांची मुख्य ठुसठुस वेगळीच आहे असे दिसते. यूपी आणि अन्य राज्यांच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम प्रजेने मोदी यांना जोरात मतदान केले हे स्पष्ट झाले आहे. पण तसे असूनही मोदी यांनी आपल्या ’नवजात’ मतपेटीची पर्वा न करता इस्राएलचे धोरण उघडपणे कवटाळले आहे. तेव्हा ह्या कारणावरून मुस्लिम जनता आपल्यापासून दूर जाऊच शकत नाही हा मोदींचा आत्मविश्वास ओवेसी यांना हलवून सोडतो आहे. त्यांच्यासाठी ही अधिक गंभीर बाब आहे.

ह्या ठुसठुसणार्‍या गळवावरचा उपाय एकच आहे की त्यामध्ये वर्षानुवर्षे साठलेला पू बाहेर पडू देणे. पण नेमके तेच ओवेसी यांना परवडणारे नाही. मोदी मात्र ओवेसी यांच्यासारख्यांच्या कोल्हेकुईकडे जराही लक्ष नदेता आपल्या मतदारावरती जो विश्वास टाकत आहेत तो अदम्य आहे. मोदी यांच्या इस्राएल भेटीची ही ठुसठुस ओवेसी यांच्या मतपेटी इतकीच मर्यादित आहे की तिला असलेले अन्य पदरही ओवेसी व मोदींच्या अन्य विरोधकांना भिववून सोडतात हे गुपित नसून त्याचा उलगडा पुढच्या लेखामध्ये बघू.

2 comments:

  1. मोदी आपले पत्ते हुशारीने खेळत आहेत

    ReplyDelete