एकीकडे कोरोना व्हायरसचे संकटाने सर्व माध्यमे व्यापली असतानाच पाकिस्तानने एक अचाट काम केले आहे. कोरोनाच्या गदारोळामध्ये त्याची पुसटशी बातमीही येणार नाही आणि त्याची चर्चाही होणार नाही ही त्यांची अटकळ खरी ठरली आहे. अफगाणिस्तानमधील करारामध्ये तालिबानांना महत्वाचे स्थान अमेरिकेकडून पदरात पाडून घेतल्यावर अफगाणिस्तानमध्ये तालिबानांचे रंग प्रकट होत आहेत. सरकारने आपले तुरूंगात डांबलेले सदस्य विनाअट सोडावेत म्हणून तालिबान आग्रह धरत आहेत. पाकिस्तानातही एका महत्वाच्या व्यक्तीची तुरूंगातून सुटका होण्याच्या मार्गावर आहे - मार्गावर अशासाठी म्हटले की न्यायालयाने २ एप्रिल २०२० रोजी त्याच्या "मुक्ती"चा मार्ग प्रशस्त केला आहे. परंतु सदा सजग असलेल्या भारतीय सूत्रांनी तसेच अमेरिकन सूत्रांनी ही घटना नेमकी टिपली आहे. "त्या" व्यक्तीची तुरूंगातून सुटका करण्यावर अमेरिकेने तंबी भरली असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे "चिरंजीव" अजून तुरूंगातच आहेत. ही असामी अर्थातच साधी सुधी नाही. तुरूंगात बसून तो धमक्या देऊ शकतो इतकेच नव्हे तर आपल्या धमक्या प्रत्यक्षात उतरवू शकतो. त्याच्या धमक्या म्हणजे साध्यासुध्या माणसाला दिल्या जाणार्या खंडणीच्या धमक्या नव्हेत. तो आत बसून दहशतवादी हल्ले घडवून आणतो. आणि अगदी सत्ताधीश मुशर्रफनाही त्याने धमक्या दिल्या आणि त्या वास्तवात उतरवून दाखवल्या आणि तरीही पाकिस्तानचे सर्वसत्ताधीश मुशर्रफ त्याचे काहीही वाकडे करू शकले नाहीत. तुमची उत्सुकता ताणली गेली असेलच की कोण असावा हा इसम बरे? तर त्यामध्ये खुलासा करण्यापूर्वी थोडी भरच घालते.
२६/११ च्या हल्ल्यानंतर एक विचित्र घटना घडली आणि आपल्या माध्यमांनी त्यांच्या आचारसंहितेनुसार तिला विशेष प्रसिद्धी दिली नव्हती. तरीही झिरपून झिरपून बातम्या बाहेर येतच होत्या. या व्यक्तीने पाकिस्तानाच्या तुरूंगात बसून तीन कॉल लावले. तिन्ही फोनसाठी वेगवेगळे सिमकार्ड वापरण्यात आले होते. पहिला होता भारताचे परराष्ट्रमंत्री श्री प्रणब मुखर्जी यांना. फोन करणार्याने मुखर्जींना सांगितले होते की मी पाकिस्तानचा अध्यक्ष आसिफ अली झरदारी बोलत आहे. मग त्याने आसिफ अली झरदारी आणि लष्करप्रमुख अशफाक परवेझ कयानी यांना फोन लावून मी प्रणब मुखर्जी बोलत आहे अशी बतावणी केली. दोन्ही देशातील या उच्च पदस्थ व्यक्तींना फोन लावणे सोपे नसते. अशा प्रकारच्या संभाषणासाठी विशिष्ट फोन नंबर वापरले जातात. त्या फोन नंबरवरच संपर्क केला जातो. हे फोन नंबर सरसकट कोणाकडे दिले जात नाहीत. तात्पर्य - पाकिस्तानच्या तुरूंगात बसलेल्या या व्यक्तीकडे हे फोन नंबर कोणी पुरवले होते हे कोडे आहे. प्रणब मुखर्जींचा हा अतिगुप्त नंबर ज्या मंत्र्याला माहिती होता तो आता दिवंगत आहे. झरदारी वा कयानींचे नंबर कसे मिळाले असतील ह्याविषयी तर्क अपुरे पडतात. झरदारींच्या नजिकच्या एका व्यक्तीने सांगितले की प्रोटोकोलनुसार आवश्यक ती सर्व बंधने वा अडसर पार करूनच तो कॉल झरदारी ह्यांच्यापर्यंत पोचला होता. हे वाचून तर बुचकळ्यात पडायला होते. कारण ह्याचा अर्थ असा आहे की झरदारींच्या मिलिटरी सेक्रेटरीने प्रथम कॉल घेतला व खातरजमा करून तो झरदारींकडे दिला होता. झरदारींप्रमाणेच कयानी ह्यांना देखील असाच फोन लावण्यात आला होता. झरदारी व कयानी यांना लावण्यात आलेल्या फोननुसार त्या दोघांना प्रणब मुखर्जींनी म्हणे जोरदार धमक्या दिल्या होत्या तर मुखर्जींना आलेल्या "झरदारींच्या" फोनमध्येही पाकिस्तानने भारताला दिलेल्या धमक्याच मुखर्जींना ऐकाव्या लागल्या होत्या.
अशा प्रकारचे फोन आले असल्याचा बातमीचा अधिकृत इन्कार ह्या तिघापैकी कोणीही केलेला नाही. ६ डिसेंबर २००८ रोजी पाकिस्तानच्या डॉन वर्तमानपत्राने डीजी आयएसपीआर पदस्थाचे "मत" प्रसिद्ध केले होते त्यानुसार असे फोन आले नसल्याचे सांगण्यात आले होते. पण ही अधिकृत घोषणा नव्हती. गंमत म्हणजे ही बातमी सर्वप्रथम फोडणारे डॉनचे पत्रकार झफर अब्बास आज त्याचे संपादक आहेत. विशेष म्हणजे आपले "मत" व्यक्त करणार्या डीजी आयएसपीआर मेजर जनरल अथर अब्बास यांचे झफर अब्बास हे बंधू होत.
या फोनाफोनीच्या वार्ता अमेरिकेपर्यंत पोचल्या कारण २६/११ नंतर धमक्यांच्या तथाकथित फोनमुळे वातावरण चांगलेच तापले होते. अमेरिकेने धावपळ करून संशयाचे ढग विरवण्यास मदत केली म्हणून अन्यथा ठिणगी पडणे अवघड नव्हते. पाकिस्तानात कोणाला बरे भारत पाकिस्तान रणभूमीमधील संघर्ष बघण्याची उत्कंठा लागली होती? तुरूंगात बसलेली ही व्यक्ती पूर्वायुष्यात कोणाचा हस्तक म्हणून काम करत असे? आणि आताही ती तसेच काम करत होती काय? आजच्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला तुरूंगातून बाहेर काढण्याची कोणाला बरे घाई झाली आहे? आणि त्याचे कारण काय?
गूढ आहे ना हे सगळे? इतक्या धुक्याच्या पडद्याआड लपेटलेली ही व्यक्ती कोण आहे बरे? तुमच्यापैकी काहीजणांनी तिला ओळखले असेल. पूर्णतः निर्दोष असलेल्या कुलभूषण जाधवला पाकिस्तानात फाशीची शिक्षा हो्ऊ शकते पण ही व्यक्ती मात्र भारत अमेरिका आणि ब्रिटनच्या - हो ब्रिटनच्या कारण ती व्यक्ती जन्माने ब्रिटिश आहे - नाकावर टिच्चून सोडवली जाते! पाकिस्तानच्या तुरूंगाला फिरते दरवाजे असतात. बंद कोठडी कधी बंद नसतेच - आणि तुरूंगातील व्यक्तीला अपत्येही होत असतात. मग ह्या कहाणीचे वैशिष्ट्य तरी काय आहे? ही व्यक्ती अशाप्रकारे सोडवली गेली तर मोदी सरकारची बदनामी करण्याची मोहिम इथे आखली जाईल - किंबहुना ती आखून तयार असेल अशी मला खात्री आहे म्हणून तर आजच्या लेखाचा हा प्रपंच मांडला आहे.
२००२ पासून चाललेल्या ह्या खटल्यामध्ये सिंधच्या हायकोर्टाने या व्यक्तीची खुनाच्या गंभीर आरोपामधून बाइज्जत सुटका केली आहे व त्यामुळे त्याला ट्रायल कोर्टाने दिलेली फाशीची शिक्षा रद्दबातल झाली आहे. त्याच्या सोबत्यांना ट्रायल कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्यांचीही शिक्षा कमी करण्यात आली आहे. या महत्वाच्या व्यक्तीवरचा खुनाचा आरोप सरकारपक्षाने सिद्ध केला नसल्याचे कोर्टाने मान्य करून त्याची फाशीची शिक्षा रद्द केली. त्याच्या विरोधात केवळ अपहरणाचा गुन्हा सिद्ध झाला असल्यामुळे केवळ सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा आता शिल्लक उरली आहे. परंतु ही व्यक्ती अगोदरच १८ वर्षे तुरूंगात होती त्यामुळे त्याची त्वरित मुक्तता होऊ शकते. त्याचे साथीदारही असेच सुटणार आहेत. सिंध हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात इम्रान सरकारने अपील केले नाही तर ही बाब अटळ होऊन बसणार आहे. ज्या प्रकारे मौलाना मासूद अजहर याची कोर्टाद्वारे मुक्तता करवून घेण्यात आली होती त्याच पद्धतीने ही व्यक्ती सुटू शकते.
दुर्दैव एवढेच आहे मासूद अजहर पेक्षाही ही व्यक्ती खतरनाक आहे आणि तिच्या तुरूंगवासामध्ये पाकिस्तान सोडून अन्य तीन देशांना स्वारस्य असल्यामुळे त्यातील किचकटपणा वाढला आहे. गंमतीचा भाग असा आहे की १३ जानेवरी रोजी लाहोर कोर्टाने मुशर्रफ यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द केल्याची बातमी आली होती. २००७ साली मुशर्रफ यांनी पाकिस्तानची घटना स्थगित करवली होती आणि देशात आणिबाणी लागू केली होती. आपली सत्ता निर्वेध चालू राहावी म्हणून त्यांनी ही पावले उचलली असल्याचे आरोप केले जात होते. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. त्यानंतर मुशर्रफ यांना वैद्यकीय कारणासाठी देश सोडण्याची परवानगी देण्यात आली. डिसेंबर २०१९ मध्ये त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगत कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता १३ जानेवारी रोजी लाहोर कोर्टाच्या खंडपीठाने म्हटले की मुशर्रफ यांच्यावरील खटला राजकीय द्वेषाने प्रेरित होता - हा गुन्हा एक व्यक्ती अन्य कोणाच्या मदतीशिवाय करू शकत नाही. कोर्टाने म्हटले की खालच्या कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य आहे व सबब शिक्षा रद्द केल्याचे घोषित केले आहे.
प्रश्न असा आहे की मुशर्रफ यांच्या सुटकेनंतर तर सिंध कोर्टाने ह्याही व्यक्तीला सोडावे म्हणून अशा खेळी करण्यात आल्या नव्हत्या ना? पाकिस्तानच्या राजकारणामध्ये कोणाला तरी "ती" महत्वाची व्यक्ती तुरूंगातून मुक्त झालेली हवी आहे. म्हणजे आज तेथील राजकारणामध्ये "तिचा" वापर करून घ्यायचा आहे काय? हे प्रश्न गैरलागू नाहीत. कोर्टाद्वारे राजकीय खेळ खेळत आपल्याला हव्या त्या निर्णयांवर कोर्टाकशून शिक्का मोर्तब करूओन घेण्याची पाकिस्तानमध्ये अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून परंपरा आहे आणि तीच पुढे राबवली जात आहे हे या दोन निर्णयांमधून पुढे आले आहे.
त्या महत्वाच्या व्यक्तीचे नाव आहे - ओमर सईद - हो तोच ओमर सईद ज्याला भारताने IC 814 अपहरणप्रसंगी विमानातील प्रवाश्यांचे जीव वाचवण्यासाठी आपल्या तुरूंगामधून अपहरणकर्त्यांच्या हवाली केले होते. तोच तो ओमर सईद ज्याने काश्मिरात अमेरिकन नागरिकांचे अपहरण केले होते. तोच तो ओमर सईद ज्याला पाकिस्तानचे लष्करशहा मुशर्रफ यांनी डॅनियल पर्लच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये तुरूंगात डांबले होते. त्या ओमर सईदची कहाणी अत्यंत गुंतागुंतीची आहे. दमाने लिहावी लागणार आहे.
प्रतीक्षा ठेवा भाग २ ची.
वाट पाहतोय.
ReplyDeleteWaiting
ReplyDeleteI was also waiting for your article on This- Pankaj
ReplyDeleteवाट बघत आहे पुढच्या भागाची
ReplyDeleteमला आश्चर्य वाटते की कुठल्या तरी स्तरावर पाकिस्तान मध्ये काही सकारात्मक चिंतन होतच नाही का? की आपल्याला एक देश म्हणून काय साध्य करायचे आहे? ८०च्या दशकात सोव्हिएत रशिया असताना आपल्याला 'इस्लामी मूलतत्व वाद' निर्यात करता आला. पण, आजच्या काळात, कुठलेच प्रोडक्ट् किंवा सर्व्हिस सदा सर्वकाळ निर्यात करता येईलच असे नाही. हे लक्षात नाही घेतले तर अशा उत्पादनांचे - सेवांचे अतिरिक्त उत्पादन आपल्याच देशात खपले जाईल.
ReplyDeleteपाकिस्तान व पाकिस्तानी सुधारण्याच्या पलिकडे पोहोचले आहेत.
ReplyDeleteमँडम, आपले विश्लेषण अगदी बरैबर आहे. या कोरोनाच्या गोंधळात पाकिस्तान नक्कीच काहीतरी घडवण्याच्या मागे असणारच, कारण अजूनही काश्मीरमधील अतिरेकी कारवाया थांबलेल्या नाहीत यावरुन अंदाज येतोच.
ReplyDeleteWaiting
ReplyDeleteLihit raha..never stop...if bhau's pen is hammer, your pen is sword...cuts in to two parts....you are awesome
ReplyDeleteवाट पाहतोय
ReplyDelete