Thursday 20 February 2020

पाकिस्तानचा काळा इतिहास - जिनांचा मृत्यू भाग २

जिनांना घेऊन एक अम्ब्युलन्स आणि एक सेडन असा ताफा विमानतळावरून निघाला तेव्हा या अतिमहत्वाच्या व्यक्तीला घेऊन निघालेल्या अम्ब्युलन्सच्या बाजूनेच उंटगाड्या आणि खेचरे ओढत असलेल्या गाड्या जात येत होत्या. त्यामुळे अम्ब्युलन्स वेगाने नेणे शक्य नव्हते. जिनांचा प्रवास संथ गतीने सुरू होता. गाड्या सहा किमी गेल्या नाहीत तोच अचानक अम्ब्युलन्स बंद पडली - ती चालूच होईना. हे पाहून मागची गाडीही थांबवण्यात आली. बराच काळ दुसरी अम्ब्युलन्स उपलब्ध होईना तसे जिनांना सेडनमधून कराचीपर्यंत पोचवावे का असाही विचार सुरू झाला. पण त्यांची अवस्था बघता हे शक्य नव्हते - सोबतच्या डॉक्टर्सनी असे करण्यास नकार दिला. गाडी थांबली तिथे कोळ्यांची वस्ती होती. गावात मासे सुकवण्यास घातले होते त्यामुळे माशा आणि मच्छर यांचा सुळसुळाट आसपास होता. जिनांनाही त्याचा उपद्रव झालाच. सेडनमध्ये पेट्रोल पूर्ण भरले होते पण अम्ब्युलन्समधले पेट्रोल संपले होते. 

इथे कराचीमध्ये जिना पोचले का हे तपासण्यासाठी लियाकत आपल्या गच्चीमध्ये गेले. गव्हर्नर जनरलच्या घराजवळ निळा झेंडा फडकताना दिसला नाही म्हणून चौकशी करता त्यांना अम्ब्युलन्स बंद पडल्याचे कळले. यानंतर दुसरी अम्ब्युलन्स पाठवण्याचा प्रयत्न झाला. ही अम्ब्युलन्स यायला एक तासाहून अधिक काळ लागला. दुसर्‍या अम्ब्युलन्सवरही झेंडा नव्हता. शिवाय तिच्याही सोबत कोणतीही मदत आली नव्हती. अम्ब्युलन्सवर झेंडा असता तर संध्याकाळच्या भर गर्दीतून तिला पुढे काढणे शक्य झाले असते. (अम्ब्युलन्स विमानतळावर पाठवण्यापूर्वी त्यात पेट्रोल आहे की नाही याची खबरदारी न घेण्य़ाबद्दल पुढे कोणालाही शिक्षाही झाली नाही.) अखेर १७ किमीचा प्रवास आटोपायला सुमारे दोन तास लागले. संध्याकाळी सहाच्या सुमारास ते घरी पोचले. सरकारने घरी काम करण्यासाठी नर्सची व्यवस्था केली नव्हती. इतक्या नाजूक अवस्थेतील रूग्ण घरी आणायचा तर काय तयारी हवी हे कोणत्याही डॉक्टरशी बोलून ठरवण्यात आले नव्हते. अखेर इलाहीने आपल्या ओळखी वापरून नर्स बोलावून घेतली. तिला येण्यास रात्रीचे साडे आठ वाजले. 

त्यांची तब्येत ढासळल्याचा निरोप मिळताच रात्री नऊ वाजता इलाही घरी पोचले. शिवाय डॉक्टर शहा आणि मिस्त्री आले. जिनांना इन्जेक्शन द्यायचे होते. हे इन्जेक्शन दिले की तुम्हाला बरे वाटेल आणि तुम्ही देशाचे नेतृत्व कराल असे इलाही त्यांच्या कानात कुजबुजले पण जिनांनी मान हलवून नकार दिला. अखेर १० वाजून २० मिनिटांनी त्यांनी प्राण सोडले. जिनांवर घरचे अंत्यसंस्कार झाले ते शिया पद्धतीने पण देशासमोर दाखवले गेले ते सुन्नी अंत्यसंस्कार होते. 

ज्या पद्धतीमध्ये सारी कथा आटोपण्यात आली त्यातून जनतेच्या मनामध्ये अनेक संदेह असणे स्वाभाविक होते. पण पाकिस्तानच्या राजकीय परिस्थितीमध्ये मुक्तपणे यावर चर्चा अशक्यच होती. डॉ. इलाहींनी जिनांसोबतचे अखेरचे दिवस असे एक छोटेसे साधारण ७०-८० पानांचे पुस्तक १९४९ मध्ये लिहिले व प्रसिद्ध केले. झियारात, क्वेट्टा आणि कराची अशा तीन प्रकरणांमध्ये त्याने ते पुस्तक विभागले होते. सुरूवातीच्या काळामध्ये ते झपाट्याने खपले पण नंतर पाकिस्तानमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली. पुढे २०११ साली ऑक्सफर्डने ते पुन्हा छापले खरे पण काही परिच्छेद वगळण्याची सक्ती करण्यात आली होती. पुस्तकामध्ये इलाहीने एक गंभीर आठवण दिली आहे. क्वेट्टावरून निघताना अमीन नामक व्यक्तीने इलाहीकडे लकडा लावला होता की एका व्यक्तीला जिनांना ताबडतोबीने भेटायचे आहे तर भेटण्याची परवानगी द्यावी. इलाहींनी खोदून खोदून अमीनला ही व्यक्ती कोण आहे - ह्या व्यक्तीविषयी माहिती विचारली पण अमीनने माहिती दिली नाही. इलाहींनी अखेर ही व्यक्ती कोण होती त्याचा छडा वैयक्तिक पातळीवर तर लावला पण नाव देण्यास नकार दिला. त्यांच्या पुस्तकातही हे नाव दिलेले नाही. त्यामुळे इलाहींच्या पुस्तकातील ही एक अपूर्ण कहाणी ठरली आहे. हा कोण अनोळखी इसम मृत्यूशय्येवरील जिनांना भेटू इच्छित होता? आणि त्याच्याकडे अशी काय रहस्यमय माहिती होती की त्याला जिनांची गुप्त भेट हवी होती बरे?

जिनांच्या मृत्यूला दोन वर्षे झाली तरी फातिमांचे त्यावर भाषण सरकारने होऊ दिले नाही. फातिमा आपल्यावर सडकून टीका करतील ही सरकारला भीती असावी. तुम्ही आपल्या भाषणाची लिखित प्रत द्या असे सांगितले जाई. फातिमांनी त्याला नकार दिला की भाषण रद्द केले जाई. १९५१ मध्ये त्यांना पाकिस्तान रेडियोवरून बोलण्याची परवानगी देण्यात आली. फातिमांनी आपल्या मनातील व्यथा भाषणात सांगितल्या पण तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्षात संपूर्ण भाषणाचे प्रसारण झालेच नाही. मुख्य म्हणजे आपले भाषण जसेच्या तसे प्रसारित होत नसल्याचे फातिमांना भाषण चालू असताना कळू देण्यात आले नाही. याचा प्रचंड गवगवा झाला. आणि टीकेची झोड उठली. पण सरकारने तांत्रिक कारणामुळे प्रसारण होऊ शकले नसल्याचे टुमणे चालूच ठेवले. 

इलाही बक्ष वगळता खुद्द फातिमा यांनीही माय ब्रदर शीर्षक असलेले पुस्तक १९५५ मध्ये लिहिले होते पण त्याही पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. अखेर १९८७ मध्ये ते प्रसिद्ध झाले तेही अर्थातच काही भाग वगळून. आपल्या राजकीय वारसदार म्हणून जिनांनी फातिमांच्या नावाला संमती दिली होती पण पाताळयंत्री राजकारण्यांनी तसे होऊच दिले नाही. १९५८ मध्ये जनरल अयुब खानने सत्ता हाती घेऊन पाकिस्तानमध्ये लष्करशाहीचा अंमल सुरू केला होता. अखेर जागतिक दडपणाखाली जानेवारी १९६५ मध्ये निवडणुका घेण्याचे ठरवले. त्या निवडणुकीत अयुब यांच्या विरोधात फातिमा उभ्या राहिल्या. एकंदर वारे बघता त्या सहज जिंकतील अशी परिस्थिती असूनही प्रत्यक्षात अयुबच निवडणूक जिंकल्याचे घोषित केल्यामुळे सर्वांना धक्का बसला होता. तरीही कराची ढाका या दोन महत्वाच्या शहरांमध्ये त्यांनी अयुबना मताधिक्यात मागे टाकले होते. 

जिनांच्या मृत्यूसंबंधी संशयास्पद वर्तन करणारे लियाकतदेखील पुढे भर जाहीर सभेत मारले गेले. १९६७ मध्ये खुद्द फातिमा यांचाही गूढ मृत्यू झाला. त्यांच्या शरीरावर काळेनिळे डाग आणि पोटावर जिवंत जखम होती जिच्यातून रक्त व अन्य द्रव पाझरत होते असे साक्षीदारांनी लिहून ठेवले आहे. इतके होऊनही मृत्यूची चौकशी झालीच नाही. त्यांच्या मृत्यूनंतर जिन्नांचे भारतीय भाचे व निष्णात वकिल अकबर पिरभाई यांनी अयुब खान यांची भेट मागितली होती. फातिमांचे शवविच्छेदन न करता दफन करण्याला त्यांनी आक्षेप घेतला व हृदय बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असे सर्टिफिकेट देणार्‍या डॉक्टरची तसेच सर्वच प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. अयुब खान यांनी दोन्ही मागण्या फेटाळून लावल्या. आदल्या राती एका विवाहसोहळ्यामध्ये सामील झालेल्या फातिमांचा  खून त्यांच्या नोकरानेच केला अशी दाट शंका होती. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सुमारे सहा लाख लोक लोटले होते असे म्हणतात. जानेवारी १९७२ मध्ये (डि. १९७१ मध्ये पाकिस्तानचा युद्धात दारूण पराभव झाल्यावर आणि बांगला देश स्वतंत्र झाल्यावर) मलिक गुलाम सरवार नामक व्यक्तीने फातिमा मृत्यूप्रकरणी अडिशनल सिटी मॅजिस्ट्रेट मुमताझ मुहमद बेग यांच्यासमोर तक्रार गुदरली आणि क्रिमिनल प्रोसिजरच्या कलम १७६ खाली दाद मागितली. यानंतर हसन ए शेख व अन्य काही व्यक्तींनीही अशाच शंका व्यक्त केल्या. याअगोदर म्हणजे २ ऑगस्ट १९७१ रोजी एका स्थानिक उर्दू वर्तमानपत्राने एक वृत्तांत प्रसिद्ध केला त्यामध्ये मृत व्यक्तीला आंघोळ घालण्याच्या रिवाजासाठी आलेल्या हिदायत अली आणि त्याचे साथीदार यांचे खळबळजनक निवेदन छापले होते. ही कागदपत्रे सरवारने आपल्या अर्जासोबत जोडली होती. या प्रकरणी कोर्टाने अखतर अली मेहमूद यांची नेमणूकही केली. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. 

फाळणीच्या वेळी पाकिस्तानात काम करत असलेले भारतीय राजदूत श्रीप्रकाश यांनी आपल्या पुस्तकामध्ये जिनांच्या मृत्यूविषयी बरीच माहिती दिली आहे. श्रीप्रकाश म्हणतात की क्वेट्टाहून जिनांना कराचीमध्ये आणले त्यासाठी गव्हर्नर जनरलसाठी वापरण्यात येणारे खास विमान वापरले गेले नव्हते. एरव्ही कराचीमध्ये त्यांचे आगमन हा एक महत्वाचा सार्वजनिक कार्यक्रम असे. त्यांच्या आगमनाच्या आधी सर्व परकीय वकिलातींना आगाऊ सूचना दिल्या जात आणि शिष्टाचारानुसार आम्ही सर्व जण त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर राहत असू. केवळ राजदूतच नव्हे तर मंत्रिगण - वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि सर्वसामान्य जनताही मोठ्या संख्येने स्वागतासाठी येत असे. ११ सप्टेंबर रोजी असे काहीच घडले नाही. विमानतळावर सामसुम होती. श्रीप्रकाश म्हणतात की पाकिस्तानातील रेडक्रॉस संस्थेचे प्रमुख जमशेट मेहता यांना एक अम्ब्युलन्स पाठवण्यास सांगण्यात आले होते. पण अम्ब्युलन्स जिनांसाठी हवी आहे असे सांगितले गेले नव्हते. मला माहिती असते तर मी स्वतः गेलो असतो असे मेहता श्रीप्रकाशना म्हणाले. मेहता यांनी पाठवली तीच ती दुसरी अम्ब्युलन्स. जिना सहाच्या सुमाराला घरी पोचले व त्यांचा संध्याकाळी साडेसातला मृत्यू झाला असे श्रीप्रकाश म्हणतात. ही बातमी कोणालाच कळवली गेली नाही. अनेकांना तर असे वाटत होते की क्वेट्टामध्येच त्यांचा मृत्यू झाला होता. केवळ शव कराचीला आणले गेले. त्यासाठी इतकी गुप्तता बाळगण्यात आली असावी. पंतप्रधान लियाकत यांनाही पक्की खबर रात्री बाराला समजली. यानंतर गव्हर्नर हाऊस मध्ये पहाटे चारपर्यंत खलबते चालू होती. तिथे अस्वस्थता पसरली होती. भावाच्या मृत्यूनंतर फातिमा सत्तेवर दावा करतील अशी हवा होती आणि त्यामुळे राजकारणी अस्वस्थ होते. श्रीप्रकाश यांनीही जिनांच्या मृत्यूविषयी व्यक्त केलेल्या या भावना ते स्वतः त्याप्रसंगी कराची इथे उपस्थित असल्यामुळे महत्वाच्या आहेत.

भारतीय उपखंडामध्ये अशाप्रकारच्या संशयास्पद मृत्यूंची मालिकाच जेव्हा आपण पाहतो तेव्हा इथल्या राजकीय हवेमध्ये परकीय हस्तक्षेपाची पावले ठळकपणे उमटलेली दिसतात. मग ती पावले पूर्वेकडची असोत की पश्चिमेकडची. अलिकडे म. गांधी यांच्या खुनावरून शरसंधान करत मोदी व भाजपला लक्ष्य बनवणार्‍या - लेक्चर देणा‍र्‍या पाकिस्तानला - व त्यांच्या भारतातील फुरोगामी पिट्ट्य़ांना स्वतःचा काळा इतिहास आठवत नाही हे विशेष. 




3 comments:

  1. Read both parts kaki... Apratim

    ReplyDelete
  2. जीना स्वत: हुकूमशहा होते. फाळणीच्या कत्तली त्यांच्या मुळे झाल्या.हिटलर, माओ, शहाजहान यांना असे दुर्दैवी मृत्यू आले. इतिहास म्हणू अभ्यास झाला तरी यात दु:ख वाटत नाही

    ReplyDelete