४ एप्रिल २०१७ रोजी सीरियन सरकारने आपल्याच नागरिकांवर रासायनिक अस्त्रांसकट हल्ला केल्याची बातमी आली आणि पाठोपाठ ह्या हल्ल्याला बळी पडलेल्या लोकांची छायाचित्रे आणि विडिओ बघण्यात आले. ते पाहिल्यावर हल्ल्याच्या भीषणतेबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण उरले नाही. आश्चर्य ह्याच गोष्टीचे होते की नेमके घडले काय - रासायनिक हल्ल्याला सीरियाने प्रवृत्त व्हावे असे काय घडले? तुर्कस्तानच्या भेटीवर असलेल्या अमेरिकन स्टेट सेक्रेटरी रेक्स टिलरसन यांनी अंकारा ह्या तुर्कस्तानच्या राजधानीमध्ये ३१ मार्च २०१७ रोजी स्पष्टपणे सांगितले की यापूर्वीच्या अमेरिकन सरकारप्रमाणे आम्ही बशर अल असद ह्यांना पदच्युत करण्यावर आमची ताकद लावू इच्छित नाही. बशर सत्तेमध्ये असण्याच्या विषयाला आम्ही प्राधान्य देणार नाही. बशर अल असद हा सीरियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मार्गामधला एक अडसर आहे हे आम्हाला माहिती आहे. पण त्यांना हटवण्यामागे शक्ती लावण्यापेक्षा सीरियामध्ये काय केल्याने तिथल्या जनतेसाठी अपेक्षित बदल होउ शकतो ह्यात आम्हाला रस आहे. श्री टिलरसन ह्यांचे विधान म्हणजे अमेरिकेने गेली सात आठ वर्षे मध्य पूर्वेत केलेल्या राजकारणाला दिलेली सोडचिठ्ठी होती. टिलरसन यांच्या वक्तव्यावर अमेरिकेमध्येच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम - सिनेटर जॉन मॅक केन यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उठवत असे करणे ही गंभीर चूक ठरेल असे स्पष्ट प्रतिपादन केले.
ह्या विधानानंतर ७२ तास उलटत नाहीत तोवर सीरियामध्ये रासायनिक अस्त्रांचा हल्ला व्हावा ही गोष्ट कोणालाही खटकणारी आहे. आजवरच्या युद्धामध्ये बशर यांच्याकडे रासायनिक अस्त्रे असावीत अशी शंका व्यक्त झाली असली तरी त्यांचा वापर झाल्याचे कधी पुढे आले नव्हते. जेव्हा अमेरिकन सरकार स्वतःच आपले धोरण बदलण्याच्या मार्गावर होते आणि त्याने बशर यांनी सत्ता सोडावी म्हणून या आधीच्या सरकारने धरलेला दुराग्रह सोडण्याची भूमिका घेतली होती ह्या पार्श्वभूमीवरती बशर यांच्याकडून अशी गंभीर चूक होईल याची शक्यता खरे तर कमी आहे. बशर यांच्याविरोधात लिहिणाऱ्या एका पत्रकाराने हल्ला होण्यापूर्वी चोवीस तास आधीच असा हल्ला झाल्याची बातमी छापावी आणि ती नंतर मागे घेण्यात यावी हे एक गौड बंगाल आहे. आणि याचे निष्कर्ष इतके सोपे नाहीत. म्हणून असा हल्ला करण्यासाठी बशर यांच्याकडे कोणता हेतू होता हे स्पष्ट नसले तरी पण तूर्तास असे गृहीत धरू की हा हल्ला बशर यांच्या सरकारनेच आणि त्यांच्या संमतीनेच करण्यात आला होता. अर्थातच ह्या हल्ल्यानंतर सीरिया प्रकरणाची दिशा बदलण्यास ट्रम्प सरकारला भाग पडले आहे. ३१ मार्च नंतर अवघ्या चार दिवसात घडलेल्या ह्या घडामोडींमुळे ट्रम्प सरकार अडचणीत आले आणि त्यांना आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा लागला आहे.
ट्रम्प यांनी आपले धोरण आणि लक्ष युरोपावरून उठवून चीनकडे वळवण्याचा मानस अगदी प्रचार मोहिमेपासून व्यक्त केला होता. तसेच रशियाबरोबर संबंध सुधारण्याकडे लक्ष देऊ असेही म्हटले होते. सीरियामधील संघर्ष मुळात उदभवला आणि ताणला गेला तो मध्यपूर्वेतील काही सत्ताधाऱ्यांच्या आग्रहाखातर - त्यांच्यामागे फरफटणाऱ्या युरोपियन सत्ताधाऱ्यांमुळे. शिवाय अमेरिकन नेतृत्व ह्याच युरोपियन नेतृत्वाच्या मागे फरफटत होते. युक्रेनमधील संघर्षात रशियाची कोंडी करणाऱ्या नेटोला चाप बसावा म्हणून! दुसरीकडे सीरियामध्ये रशिया बशर यांच्या बाजूने आपले वजन टाकत होती. गेली काही वर्षे चाललेल्या ह्या खेळ खंडोबाला ट्रम्प पूर्णविराम देतील अशी आशा होती. जेणेकरून युरोपला वाऱ्यावर सोडून रशियाच्या मदतीने चीनवर लक्ष केंद्रित करता यावे असा विचार ट्रम्प चमूचा होता हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेही होते. पण तसे झाले तर युरोपची फारच पंचाईत झाली असती.
२००३ साली अमेरिकेने ब्रिटनच्या मदतीने इराकवर हल्ला करण्याचे ठरवले तेव्हा इराकचे राज्यकर्ते सद्दाम ह्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जीवित हानी करू शकतील अशी WMD अस्त्रे असल्याची 'साधार' (?) शंका दाखवण्यात आली होती. पुढे तिच्यात काहीच दम नसल्याचे उघड झाले. त्यातून ब्रिटनचे पंतप्रधान श्री टोनी ब्लेयर आणि खुद्द जॉर्ज बुश यांच्यावरही थापा मारून इराकावरील हल्ला गळी उतरवल्याचे आरोप झाले. इराकवरील हल्ल्यासाठी युरोपचे नेते तयार नव्हते. त्यामुळे युनोचा ठराव होउ शकला नाही. युनोचा ठराव नसल्यामुळे बुश याना स्वतंत्रपणे अन्य देशांशी आघाडी करून ही मोहीम आखावी लागली होती. आणि त्यासाठी वर्षानुवर्षांची युरोप अमेरिका मैत्री बिघडली असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. म्हणून आताही सीरियावर हल्ला करायचा तर बशर यांच्याकडे रासायनिक अस्त्रे आहेत अशी शंका 'पुढे' करून 'भागण्यासारखे' नाही हे लक्षात घेऊन प्रत्यक्ष तसा हल्ला झाल्याचाच पुरावा हाती आला तर हल्ला करण्यासाठी योग्य पार्श्वभूमी होती म्हणून हल्ला केला असे पटवता यावे अशा तऱ्हेनेच हालचाली झाल्या की काय अशी शंका येते.
रासायनिक अस्त्रांचा हल्ला झाल्याच्या निर्विवाद पार्श्वभूमीवर बशर यांची सत्तेमधून हकालपट्टी करण्याच्या निर्णयाकडे पाठ फिरवणे 'अपेक्षेप्रमाणे' ट्रम्प यांना अशक्य झाले आहे. आपले निर्णय इतक्या सहजपणे बदलणारे ट्रम्प नाहीत. एक उद्योगपती म्हणून अमेरिकन सरकारच्या धोरणांचा काय बोजवारा उडतो आहे आणि त्यावर काय उपाय करावेत ह्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेले चित्र आणि राष्ट्रपतीपदाची उमेदवारी हा विषय डोक्यात नसताना सुद्धा म्हणजे गेली २०-२५ वर्षे जे विषय त्यांच्या मनामध्ये घोळत होते हीच त्यांनी स्वतःसाठी आखलेली एक मार्गदर्शक रेषा होती. ही ओलांडण्याची पाळी त्यांच्यावर अवघ्या अडीच महिन्यात यावी हे रूपांतर काही अचानक घडलेले नाही. कसे ते पुढील भागात पाहू.
No comments:
Post a Comment