सीरियामधल्या रासायनिक हल्ल्याबद्दल अमेरिकन सरकारला - ट्रम्प यांच्या चमूला ब्रिफिंग देण्यात आले त्या प्रसंगाचे छायाचित्र लेखासोबत दिले आहे. ह्या चित्रामध्ये ट्रम्प सरकारमधील वरिष्ठ अधिकारी असतील अशी तुमची अपेक्षा असेल. पण ह्यामध्ये जॅरेड कुशनेर ही व्यक्ती दिसत आहे. कुशनेर हे ट्रम्प यांचे जावई आहेत. त्यांचे ह्या बैठकीत काम काय असा प्रश्न पडतो. किंबहुना इतक्या संवेदनशील विषयामध्ये कोणत्याही पदावर नसताना (सिनियर अॕडव्हायजर टू प्रेसिडेंटट) कुशनेर असे ब्रीफिंग कसे घेऊ शकले हे आश्चर्य आहे. कन्या आयव्हॅनसा हिच्यावर ट्रम्प यांनी आपला पूर्ण विश्वास टाकला आहे. अशा तऱ्हेने मुलीवरती आणि जावयावरती अवलंबून राहावे लागावे अशी ट्रम्प यांची अवस्था कशामुळे झाली आहे? युरोपात - अमेरिकेत आणि अन्य जगामध्येही भोंदू फेक्युलरांचे - उदारमतवाद्यांचे जे थोतांड माजले होते त्या थोतांडाच्या विरोधात जाण्याची हिम्मत ट्रम्प यांनी दाखवली आणि अमेरिकन लोकांनी त्यांच्या भूमिकेवर त्यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करून शिक्कामोर्तबही केले. पण ही बाब भोंदू उदारमतवाद्यांच्या गळ्याखाली अजूनही उतरत नाही. गेल्या काही वर्षांच्या अनिर्बंध सत्तेमुळे ते शेफ़ारले आहेत. न्यायसंस्था असो की कायदेमंडळ अथवा सरकारची प्रशासन व्यवस्था - सर्वत्र त्यांचेच पित्ते जगभर घुसवण्यात आले आहेत. तुमच्या - माझ्यापर्यंत जगामध्ये काय चालते ते पोहोचवणारे पत्रकारही ह्याच भोंदूनी पुढे आणले आहेत. त्यांच्या मताप्रमाणे भूमिका मांडणारे आणि ती जनतेच्या गळी उतरवण्यासाठी मदत करणारे विचारवंत - थिंक टँक्स आदी देखील हे भोंदू सांगतील त्याचीच री ओढत असतात. अमेरिकन प्रशासनामध्येही ह्यांचा सुळसुळाट आहे. ट्रम्प यांच्या अनेक धोरणावर पाणी टाकण्याचे काम ते करत आहेत. ( मोदी यांचा अनुभवही असाच नव्हता काय? कोणत्या परिस्थितीमध्ये परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांना काढून विद्यमान सचिव श्री जयशंकर यांची नेमणूक करावी लागली तो प्रसंग आठवा) ट्रम्प यांची अवस्था तर अशी आहे की त्यांच्या आणि सी आय ए यांच्यामध्ये विस्तव जात नाही असे अहवाल वर्तमानपत्रे छापत होती. (ते चित्र पुसून टाकण्यासाठी ट्रम्प यांना सी आय ए च्या कार्यालयाला भेट द्यावी लागली हेही आठवा). पण तरीदेखील ट्रम्प यांनी सी आय ए कडून सुरक्षा अहवाल स्वीकारण्याचे नाकारले होते. अमेरिकेचा अध्यक्ष स्वतःच्याच गुप्तहेर खात्यावर सी आय ए वर अथवा एफ बी आय वर विश्वास टाकू शकत नाही ही परिस्थिती भीषण आहे. कारण आपल्या मार्गामध्ये केवळ सरकारी प्रशासन - पत्रकार - विचारवंत हेच नव्हे तर सुरक्षा यंत्रणा सुद्धा अडसर ठरू शकतात अशी शंका ट्रम्प यांच्या मनात असावी ही चिंताजनक परिस्थिती आहे. आणि अशा वातावरणामध्ये ट्रम्प यांना आपल्या मुलीवरती अथवा जावयावरती अवलंबून राहावेसे वाटले तर तेही क्रमप्राप्त आहे असे म्हणता येते. पण ट्रम्प यांची अशी कोंडी करणारी टोळीही पूर्ण शक्तीनिशी आपल्या अस्तित्वाचा लढा देत आहे. आजच्या घडीला खेदाने असे म्हणावे लागते की ह्या भोंदू उदारमतवादी टोळीने ट्रम्प यांच्या जावयालाच आपलेसे केले आहे!!
स्वतः वरचे गंडांतर टाळण्यासाठी कोण काय करेल ते सांगता येत नाही. इकडे ट्रम्प साहेब चीनला इशारे देत होते तेव्हाच चीनने आपला जुना दोस्त श्री हेनरी किसिंजर यांच्याशीही संपर्क साधल्याचे कळते. श्री किसिंजर यांनी 1972 मध्ये चीनच्या चौ एन लाय यांच्याशी बोलणी करून चीनला रशियाच्या प्रभावांमधून बाहेर काढले आणि रशियाला शीत युद्धाच्या कसोटीच्या काळामध्ये आशियामध्ये एकटे पाडले होते. ही मैत्रीच चीनला गेल्या चार दशकामध्ये उपयुक्त ठरली किसिंजर यांचे चीनशी अजूनही संबंध चांगलेच आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी किसिंजर साहेबानी चीनचा दौरा केला. आणि चीनला ट्रम्प यांचे जावई श्री कुशनेर यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. इतकेच नव्हे तर १९ डिसेंबर रोजी किसिंजर यांनी ट्रम्प यांना असे आवाहन केले की त्यांनी चीनविषयक आपला दृष्टिकोन बदलावा.
युरोपावरचे लक्ष उठवून ट्रम्प आपल्या मागे लागले तर भारी पडेल हे जाणून किसिंजर यांच्या सल्ल्यानुसार चीनने कुशनेर ह्यांना चीनचे महाद्वार उघडून दिले आहे. गेल्या काही आठवड्यामध्ये कुशनेर यांच्या कंपनीला चीनच्या सरकारकडून भरघोस प्रस्ताव गेले असून त्यातले काही संमतही करण्यात आले आहेत. अशा तऱ्हेने ट्रम्प यांच्या विश्वासू जावयाला चीनने सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले आहेत. यातूनच चीनचे अध्यक्ष शी जीन पिंग यांनी जणू काही खडकाला भेग पाडली आहे. चीन इराण रशिया हा त्रिकोण मोडायचा संकल्प सोडणाऱ्या ट्रम्प यांना चीनने वेगळ्याच मार्गाने जिंकले असल्याचे चित्र ह्यातून उभे राहिले आहे.
किसिंजर साहेब नेमके कोणासाठी काम करत आहेत हे काळाने कठीण आहे म्हणजे ते हे काम चिनी हितासाठी करतात की अमेरिकन हा प्रश्न ट्रम्प प्रशासनामधल्या काही अधिकाऱ्यांना पडला आहे. अमेरिकेमध्ये कोणत्याही परक्या देशासाठी काम करताना त्यातून मिळणारे उत्पन्न सरकारकडे कळवावे लागते. किसिंजर यांना अडचणीत आणायचेच तर ट्रम्प साहेब असले संदर्भ तपासू शकतात पण तूर्तास तरी आपल्या जावयाच्या सल्ल्यानुसार ट्रम्प साहेब 'निवळले' आहेत असे म्हणता येईल. किंबहुना अमेरिकन प्रशासनामधली उदारमतवादी लॉबी परराष्ट्र धोरणावरची आपली पकड घट्ट ठेवून आहे असे स्पष्ट झाले आहे. आणि हीच भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अमेरिकन प्रशासनामध्ये भारताला 'मित्र' नाहीत हे उघड आहे. गेल्या काही दशकामध्ये अमेरिकेने पाकिस्तान जे सांगेल त्यांची री ओढण्याचे काम केले आहे आणि त्याचे कारण हेच आहे की प्रशासनावर भोंदू उदारमतवाद्यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व तसेच राहिले तर ट्रम्प यांना निवडणूक प्रचारादरम्यान मांडलेले मुद्दे अमलात आणणे अवघड होणार आहे.
भारतासाठी ही डोकेदुखी विविध अंगानी आहे. अमेरिकेचे पाकिस्तान धोरण हे त्याच्या अफघाण धोरणाचा परिपाक आहे. आणि त्याचे चीन धोरण हे त्याच्या युरोप धोरणाचे अंग आहे. युरोप जर केंद्रवर्ती राहिला तर अमेरिका रशियाच्या मागे पडेल. आणि एकट्या अमेरिकेला तोंड देता येत नाही म्हणून रशिया चीनच्या बरोबर मैत्री करू पाहत आहे. असे हे एकात एक गुंतलेले त्रांगडे आहे. एका सीरिया वरच्या हल्ल्याने अमेरिकन सरकारच्या धोरणाचे असे अनेक पैलू उजेडात आले आहेत. २००३ मध्ये इराक वर हल्ला करून जॉर्ज बुश जसे फसले तोच हा क्षण आता ट्रम्प यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच आला आहे. (की आणला गेला आहे हे स्पष्ट नाही) सीरियावर हल्ला केल्यावाचून गत्यंतर नाही अशी त्यांची अवस्था आहे.
असे असले तरी थांबायचे कुठे हे ट्रम्प यांच्या हाती आहे. रशियाला फार ना दुखावता केवळ बशर यांना डच्चू देऊन नवा राज्यकर्ता तिथे बसवून हे आक्रमण त्यांना संपवता आले तर त्यांच्या कारकीर्दीत नवे काही घडण्याची आशा बाळगता येईल. अन्यथा इराक युद्धासाठी बुश बदनाम झाले तसे ट्रम्प सीरिया युद्धासाठी बदनाम होतील अशी भीती आहे. तसे झाले तर त्यांना दुसरी टर्म मिळणार का हाही प्रश्न उपस्थित होईल. एकंदरच भोंदू उदारमतवाद्यांना ट्रम्प नकोच आहेत. ट्रम्प यांच्यासाठीच सीरिया क्षण हा बुश यांच्या इराक क्षणासारखा आहे.
दुसरीकडे आपल्यावरचे संकट मध्यपूर्वेवर आणि युरोप वर वळवून चीनने बाजी साधली आहे. चीन शिरजोर होणे भारतासाठी वाईट बातमी ठरेल. १९ फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या लेखामध्ये (Taking the bull by horn) मी अमेरिकन राष्ट्रपती श्री ट्रम्प यांच्याविषयी लिहिले होते की "US President Donald Trump has commenced his presidency with a big bang under the watchful and astonished eyes of the world. The experts had opined that promises made by him during his campaign were far-fetched and unrealistic. They also believed that the powerful Washington DC bureaucracy would successfully scuttle these proposals."
अमेरिकन प्रशासनाबद्दलच्या ह्या विधानाची प्रचिती इतकी लवकर येईल असे वाटले नव्हते. रशियाने अनेक क्लृप्त्या लढवून हिलरी यांना पाडले आणि ट्रम्प यांना जिंकवले आणि अमेरिकन निवडणुकात हस्तक्षेप केला असा आरोप केला जातो. तो खरा असेल तर हेचि फळ काय मम तपाला असे पुतीन यांना वाटत असेल. ह्याचा परिपाक म्हणून मोदी सरकारची वाटचाल अवघड झाली आहे. ह्यातून काय मार्ग निघतात ते बघावे लागतील.
No comments:
Post a Comment