Sunday 9 September 2018

जमाते पुरोगामींची कवायती फौज - भाग २


Image result for sophia tuticorin arrest





अवार्ड वापसीच्या नाटकानंतर ज्यांचे डोळे अजून उघडले नसतील त्या सहिष्णु भारतीयांसाठी हा लेख लिहित आहे. अवार्ड वापसीला चार वर्षे झाली. हिंदू समाजाच्या संवेदना बथ्थड असतात. चीड आली की भडाभडा बोलतात आणि पाच दिवसात विसरून जातात. पण फेक्यूलर मात्र तितक्याच चेवाने "आपली" लढाई लढत आहेत ह्याची प्रतिदिनी प्रचीती येतच असते.  तरीदेखील २०१९ च्या निवडणुका होईपर्यंत अत्यंत कर्कश आवाजातली नाटके आपल्याला बघायची आहेत अशी मनाची तयारी अनेकांनी करून ठेवली असली तरीदेखील एक कवायती फौज काय काय करू शकते ह्याची सरळ मनाच्या सामान्य माणसांना मात्र कल्पनाही नसल्यामुळे ही घटना विस्ताराने लिहित आहे.

३ सप्टेंबर रोजी तुतुकोडी (इंग्रजी उच्चार तुतीकोरीन) येथील विमानतळावरती एक विमान उतरले. त्यामधील एक प्रवासी सोफियाने खाली उतरण्याआधी "फॅसिस्ट बीजीपी सरकार हाय हाय" अशा घोषणा दिल्या. "योगायोगाची" बाब म्हणजे सोफियाच्या शेजारची सीट देण्यात आली होती ती तामिळनाडू भाजप नेत्या श्रीमती तामिळसई ह्यांना. सोफियाच्या बेशिस्त वर्तनाविरोधात तामिळसई ह्यांनी तक्रार नोंदवली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली.  पोलिसांनी तिच्याकडे पासपोर्ट मागितला असता तिने कालबाह्य झालेला पासपोर्ट देऊ केला. आश्चर्य म्हणजे कालबाह्य पासपोर्ट हा आयडी प्रुफ दाखवून तुम्ही आम्ही विमानामध्ये चढू शकतो का? मग ह्या मुलीला विमानामध्ये चढूच कसे दिले? असो. चालू पासपोर्ट आपल्याजवळ नसल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी तिला तो नंतर जमा करण्याची परवानगी दिली. 

२८ वर्षीय "विद्यार्थिनी" सोफिया ३० तारखेला कॅनडामधून भारतामध्ये (चेन्नई येथे) आली होती. आपल्या आईवडिलांसोबत ती चेन्नई ते तुतुकोडी असा प्रवास करत होती. आई वडिल दलित मुस्लिम व नंतर ख्रिश्चन बनलेले. सोफियाने लूटन्स दिल्लीच्या "प्रतिष्ठित" "सेंट स्टीफन्स कॉलेज" मधून गणित विषयात पदवी घेऊन उच्च शिक्षणासाठी जर्मनी आणि कॅनडाचा रस्ता धरला होता. सोफिया विद्यार्थिनी असल्याचे ठासून सांगितले जात होते परंतु प्रत्यक्षात मात्र ती "पोलीस प्रॉजेक्ट" ह्या संस्थेशी संबंधित असल्याचे दिसून आले. तिने एक पॉडकास्ट केला होता. तुतुकोडी येथील स्टरलाईट कंपनीच्या निमित्तने निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणामध्ये सरकार तिथे पत्रकार व आंदोलकांना जाऊ देत नसल्याचा ती निषेध करत होती. आपल्या लिखाणामधून ती भाजपवर खरमरीत टीका करत होती असे दिसून आले. पोलीस प्रॉजेक्ट ह्या संस्थेचे मालक आहेत एक कट्टर भारतविरोधी कश्मिरी गृहस्थ. 

देवेंद्रकुल वेल्लालार ह्या जातीची ही कन्या असल्याचे पोलिसांनी तक्रारीमध्ये नमूद केले होते नंतर ते खोडण्यात आले. सोफियातर्फे एक स्वतंत्र तक्रार नोंदवण्यात आली. ह्यानंतर अनेक चक्रे फिरू लागली. सोफियाला अटक होताच क्षणार्धात "संबंधितांपर्यंत" बातमी पोचवण्याची सोय झाली. विमानामध्ये कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे हे केवळ बेशिस्तीचे वर्तन नसून दंडनीय देखील आहे. सोफियाला ह्या वर्तनासाठी अटक करण्यात आली म्हणजे तिने एखाददोन वेळा घोषणा दिल्या आणि गप बसली असे झाले नसावे. अन्य प्रवाश्यांना त्रास होईल इतपत उपद्रव झाल्यामुळेच विमानातील सेवाचमूने हे पाऊल उचलले असावे. परंतु तिच्या ह्या बेकायदेशीर वर्तनाकडे डोळेझाक करत फेक्यूलरांचे ट्वीटस् चमकायला सुरूवात झाली. भाजप सरकार विरोधात घोषणा दिल्या हा तिचा गुन्हा आहे म्हणून अटक झाली हो, सबब भाजपच्या राज्यामध्ये सरकारविरोधी वर्तन खपवून घेतले जात नाही असा खोडसाळ प्रचार होऊ लागला आणि सरकारचा निषेध होऊ लागला. परंतु विमानामध्ये अशा प्रकारे जे वर्तन झाले त्याचा कोणी साधा निषेधही केला नाही. 

ट्वीटस् यायला सुरूवात झाली तेव्हाच लक्षात आले की हे प्रकरण नक्कीच चिघळणार. पोलिसांशी झालेल्या संवादानंतर ती म्हणे एका हॉस्पिटलमध्ये भरती झाली. तिकडे तिच्या वडिलांनी प्रसिद्धीची "जबाबदारी" स्वतःकडे घेतली. वडिलांचे नाव डॉ. सामी. तामिळनाडूमधील सरकारी सेवेतील निवृत्त डॉक्टर. आई देखील तामिळनाडू सरकारची कर्मचारी. माध्यमांना जे काही सांगायचे त्यासाठी वडिलांनी तेथील जवळच्या चर्चचा आडोसा घेतला. हेच ते चर्च जिथून स्टरलाईट कंपनी विरोधामधली आंदोलने छेडली जात आहेत. खरा धक्का बसला तो ४ सप्टेंबर रोजी. सोफियाच्या दिमतीला कोर्टामध्ये तब्बल १६ वकील हजर होते. मॅजिस्ट्रेटने विचारले - आपण कुठे घोषणा देत आहोत ह्याचे भान तिला असायला हवे होते. तिच्या दिमतीसाठी १६ वकील का उपस्थित आहेत - एक पुरेसा नाही का असेही मॅजिस्ट्रेट म्हणाले. यानंतर कोर्टाने तिला पासपोर्ट कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले. 

देवेंद्रकुल वेलालार जातीचे कुटुंब म्हणजे काय हे लगेच लक्षात येणार नाही म्हणून विस्ताराने लिहिते. १९८१ मध्ये तामिळनाडूतील एका खेड्यामधील सर्व अनुसूचित जमातीमधील जनतेने एकसाथ धर्मांतर करून इस्लाम स्वीकारल्याची बातमी मोठी खळबळ उडवून गेली होती. ती जमात म्हणजेच देवेंद्रकुल वेल्लालार. खरे म्हणजे आपले ह्या जमातीशी असलेले नाते सांगू नये अशा सूचना होत्या. पण वडिलांकडून चूक झाली आणि हे प्रकाशामध्ये आले. टीव्हीवरील एका पॅनेल चर्चेमध्ये वडिलांनी सांगितले की "डॉ. तामिळसई सौंदरराजन तेनकाशी येथे एका कार्यक्रमासाठी जात होत्या. इथे त्या देवेंद्रकुल वेल्लालार जातीतील व्यक्तींशी संपर्क साधणार होत्या. ह्या जातीतील लोकांनी भाजप सोबत यावे म्हणून त्या प्रयत्न करणार होत्या. म्हणून आमच्या जातीतील लोकांना आम्हाला हे दाखवून द्यायचे होते की तामिळसई दुटप्पी आहेत - एकीकडे ह्यांनी माझ्या मुलीचा पोलिसांच्या हवाली देऊन छळ केला  आणि दुसरीकडे त्या तुम्हाला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण देत आहेत."

वडिलांच्या ह्या वक्तव्यामुळे हे तर अगदी उघड झाले की - सोफियाने विमानामध्ये घोषणा दिल्या हे वडिल मान्य करतात - देवेंद्रकुल वेल्लालार जातीच्या लोकांनी भाजपमध्ये जाऊ नये म्हणून हे नाटक रचण्यात आले होते. सोफिया विमानामध्ये काय करणार ह्याची पूर्व कल्पना वडिलांना होती म्हणजेच हा एक पूर्वनियोजित राजकीय स्टंट होता ज्यामध्ये तामिळसई ह्यांना शिताफीने गुंतवण्यात आले होते. त्यांचा गुन्हा एव्हढाच की त्या देवेंद्रकुल वेल्लालार जातीच्या लोकांनी भाजपमध्ये यावे म्हणून कार्यशील होत्या. प्रश्न हा उरतो की सोफियाला तामिळसई ह्यांच्या जवळची सीट मिळणे हाही योगायोग होता की तेही पूर्वनियोजित होते? असेल तर ही "सोय" नेमकी कोणी करवून घेतली होती? तामिळसई त्याच विमानाने प्रवास करणार ही माहिती कोणाकडे होती बरे? मग त्याच फ्लाईटची तीन तिकिटे सोफिया कुटुंबाला कशी देण्यात आली? त्यामध्ये कोणकोण सामिल होते? ह्याची सखोल चौकशी व्हायला नको काय?

असो. कोर्टाच्या आदेशानुसार सोफियाच्या पासपोर्टची "झेरॉक्स कॉपी" ८ सप्टेंबर रोजी देण्यात आली - देणारे होते तिचे वडिल. पासपोर्टवरती चालू व्हिसा असल्यामुळे मूळ पासपोर्ट देता येत नाही म्हणून कॉपी देत असल्याचे त्यांनी सांगितले. मूळ ऑर्डरनुसार पासपोर्ट कोर्टाकडे जमा करण्याचा असूनही कोणते कोर्ट अशा प्रकारे केवळ कॉपी स्वीकारते? २८ वर्षीय कन्या म्हणजे अज्ञान बालक म्हणावे काय? सज्ञान सोफिया स्वतः का कॉपी द्यायला गेली नाही? चार सप्टेंबरला कोर्टाने तिला जामीन दिला. त्यानंतर काही रिपोर्ट म्हणतात सोफिया गायब आहे. स्वतःच्या घरी नाही. दुसरीकडे गेली आहे असे सांगितले गेले. तिच्यातर्फे देण्यात आलेला "चालू" पासपोर्ट नक्की भारतीयच होता काय? की अन्य कोणा देशाचा होता? सोफिया अटक होणार म्हणून घाबरून कुठे गेली आहे? की नेपाळ वा थायलंड मार्गे पसार झाली आहे? असेलच तर असा प्रवास करण्यासाठी तिने कोणता पासपोर्ट वापरला? 

ही कथा इथेच संपत नाही. सोफियाच्या केसमध्ये मॅजिस्ट्रेटने जी ऑर्डर दिली ती कोर्टाच्या वेबसाईटवरती टाकली गेली नाही? अगदी काही वकिलांनी प्रयत्न करूनही ही ऑर्डर तिथे नसल्याचे दिसून आले. लिखित स्वरूपामध्ये तरी ऑर्डर जतन करण्यात आली आहे की नाही शंका आहे. तसे असेल तर मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात तरी काय चालले आहे ह्या शंकेने मन भयाकुल होते. न्यायाधीश ऑर्डर तर देतात पण ती गुप्त राहते - किंवा तोंडीच राहते - लेखी ऑर्डर नाही - वडिल पासपोर्टची केवळ कॉपी देतात. अशा अवस्थेमध्ये सोफिया जर भारतामधून निसटली असेल तर काय म्हणावे? हिला कॅनडाने ग्रीन कार्ड दिले आहे की नागरिकत्व? कोणत्या नावाने? भारतीय पासपोर्ट जमा न करताच हे सगळे कसे होऊ शकते? कदाचित - कदाचित - मित्रहो - सोफिया प्रकरणाचा अंक पहिला भारतामध्ये समाप्तही झाला असेल. अंक दोन कॅनाडामध्ये सुरू होईल. कोणी सांगावे?

जाता जाता हेही नमूद केले पाहिजे की स्टरलाईट कंपनीच्या विरोधामध्ये छेडलेल्या आंदोलनामध्ये आघाडीवरती असलेल्या अडव्होकेट अतिशयकुमार ह्यांची सोफिया जवळची नातलग असल्याचे डेक्कन क्रॉनिकलने म्हटले आहे. तामिळनाडूमधील पक्षांनी सोफियाला (पळून जायला?) मदत केल्याचे दिसून येत आहे. तामिळसईंच्या समर्थनासाठी तेथील भाजप उतरल्याचे दिसत नाही. १९८१ च्य धर्मांतरानंतर देवेंद्रकुल वेल्लालार समाजाने आपल्या धर्मांतराचा पुनर्विचार करत भाजपकडे कल दाखवला आहे त्यानंतर ह्या एका राज्यातील एका जातीसाठी कोणत्या पातळीवरती जाऊन कवायती फौज काम करते आहे हे ध्यानात घ्या. तुम्हाला ही फौज नैराश्यग्रस्त वाटेल पण ते निकराचा लढा देताना कोणतीही संधी सोडणार नाहीत असेच दिसत आहे.

ट्वीटरवरील एका ह्ँडलने "आज स्टरलाईट तर उद्या अदानी" असे सूतोवाचही केले आहे. काही ह्ँडल्स बंद करण्यात आली आहेत. भीमा कोरेगाव आणि सोफिया प्रकरणे एकसाथ जोडत देशातील मॅजिस्ट्रेटस् च्या कार्यपद्धतीवरती टीका केली आहे. सोबत लिंक देत आहे. 

https://www.livelaw.in/magisterial-lapses-when-remand-requests-are-blindly-rubber-stamped/

एक यूट्यूब लिंक देत आहे. टीव्हीवरील चर्चेमध्ये सोफियाचे वडिल म्हणतात ती सायन्सची विद्यार्थी आहे तिला कायद्याचे एव्हढे ज्ञान नाही. तामिळ भाषेमध्ये असले तरी तुम्हाला थोडेफार कळू शकेल म्हणून हाही व्हिडियो!

https://www.youtube.com/watch?v=TvKYupNbbbo&feature=youtu.be

म्हणून म्हणते - सर्व मतभेद मिटवा - भारतीय म्हणून जीवंत रहायचे असेल तर एकत्र या. अर्बन नक्षलचे हे एक ताजे उदाहरण आहे. तुमच्या भोवतीही अशीच नाटके रचली जात आहेत. इथून पुढे विमानात आपल्यासोबत कोण बसले आहे ह्याची चिंता रेल्वे अथवा कमर्शियल फ्लाईटने जाणार्‍या भाजप व संघ नेत्यांना करावी लागेल असे दिसते.  ह्या फेक्यूलरांचा पर्दाफाश हेच ह्यावर उत्तर आहे. 









3 comments:

  1. ताई,
    तुमच्या शोधपत्रकारीतेला सलाम!

    ReplyDelete
  2. Khup prabhavi.upayukt mahiti. Dhanyawad. Upendra Kulkarni

    ReplyDelete
  3. ताई नमस्कार
    आपला हा लेख आम्ही www.bhartiya.info या आपल्या वेबसाईट वर प्रकाशित करू शकतो का ? लेखा सोबत आपले नाव आणि आपल्या वेबसाईट ची लिंक सुद्धा दिली जाईल.

    ReplyDelete