Tuesday 21 August 2018

दिल जित कर आओ - अटलजी


Image result for cricket pakistan 2004 atal


सप्टेंबर २००१ नंतर अमेरिकेच्या अफगाणिस्तान मोहिमेमध्ये काहीशा अनिच्छेने पाकिस्तानला सामील व्हावे लागले होते. त्यांनीच जन्माला घातलेल्या दहशत वाद्यांचा पाडाव आता त्यांनाच करायचा होत. १९७९ मध्ये अफगाणिस्तान मधील जिहाद सुरु झाला तेव्हा सोयीचे म्हणून पाकिस्तान सरकारनेच पद्धतशीर पणे प्रचार करून जनतेला जिहादच्या मानसिकतेमध्ये लोटले होते. आता त्याच मुजाहिदीन विरोधात आपलेच सरकार कारवाई करते दिसले तर जनता बिथरली असती. म्हणून ह्या कारवाया होत असताना आपण अमेरिकेला शरण गेलो नाही हे जनतेला दाखवून देण्यासाठी पाकिस्तान भारतावर हल्ले करत होते. त्यामधूनच संसदेवरील हल्ल्यासारखे प्रसंग ओढवले होते. ह्या हल्ल्यांनंतर भारतामधले वातावरणही तापलेले होते. केंद्रात असलेले वाजपेयींचे सरकार कठोर पावले उचलणार अशी भारतीय जनतेची अपेक्षा होती. 

पण सरकारने मात्र या अगोदर बंद ठेवण्यात आलेल्या क्रिकेट मॅचेस सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय अवघड होता. क्रिकेटर्स सुद्धा घाबरलेलेच होते. पाकिस्तानात जाऊन मॅच खेळणे असेही अवघड असते. तिथला जमाव त्याकडे खेळासारखे बघत नाही तर युद्धभूमीवर भारताला हरवायची खुमखुमी क्रिकेटच्या मैदानात पूर्ण करण्याची मनीषा बाळगून वेळ आली तर आपल्या संघातील खेळाडूंना मारपीट करण्याच्या मानसिकतेमध्ये असतो. मग एरव्ही देखील जिथे असे वातावरण असते तिथे सप्टेंबर ११ नंतर काय वातावरण असेल याची कल्पना आपण करू शकतो. म्हणूनच हा निर्णय घेणे अवघड होते पण सर्व तयारीनिशी सरकारने त्याला संमती दिली होती.

पाकिस्तान मध्ये रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ पंतप्रधानांच्या भेटीला गेला. सर्वाना शुभेच्छा देत वाजपेयींनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली - केवळ सामना जिंकू नका - "पाकिस्तान में दिल जीत कर आओ" असा अलौकिक संदेश देऊन वाजपेयींनी भारतीय संघाला तिथे पाठवले. 

हे जे "दिल जित कर आओ" चे सूत्र आहे ना ते त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे मूळ सूत्र असावे. म्हणूनच तीन चार महिने रुसवा धरलेल्या अडवाणींना जवळ करायचे तर त्यांनी एक दिवस थेट त्यांच्या पत्नीला फोन करून सांगितले आज दुपारी जेवायला मी तुमच्या घरी येत आहे. वाजपेयी जेवायला येणार म्हटल्यावर अडवाणींना देखील घरी यावे लागले आणि बोलाचाल झाली. 

त्यांच्या वेळचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री ब्रजेश मिश्रा एकदा म्हणाले - कोणाशी संघर्षाची वेळ आलीच तर ते त्या व्यक्तीला बोलावून घेत आणि चाल काय बरे आहे तुझे म्हणणे असे म्हणून त्याला बोलते करत. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. राजदीप सरदेसाई ह्यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये तर त्यांच्या स्वभावाचे किती पैलू दिसतात त्यावर स्वतंत्र लेखच होऊ शकेल. 

वाजपेयींच्या मतदार संघामध्ये चाळीस रुपयाच्या साडीकरिता महिलांची झुंबड उडावी आणि तिथे एक दुर्घटना घडावी ही घटना खेदजनक होती. ह्यावरती चिमटा घेणारा प्रश्न राजदीपने केला असता ही चूक वाजपेयी किती निर्मळ मनाने कबूल करतात हे पाहून आपण थक्क होतो. एकीकडे हे दृश्य असताना इंडिया शायनिंग म्हणणे बरोबर आहे का असा दुसरा टोकदार प्रश्न येताच वाजपेयी म्हणाले भारतामध्ये दोन टोकाच्या स्थितीमधले लोक जगात आहेत. एक घटक येणारे चांगले दिवस पाहू शकत आहे तर दुसऱ्या समाज घटकाला ते दिवस जवळ आल्याचे जाणवत नाही हे उत्तरही असेच थक्क करणारे आहे. 

एकीकडे विरोधक इंडिया शायनिंग वरती बेछूट आरोप करत होते पण ते पूर्णपणे असत्य नाही ते फार तर एक अर्धसत्य आहे हे सुनावण्याची संधीही त्यांनी घेतली. तुम्ही तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतलीत आणि चौथ्यांदाही घ्याल - हे तर नेहरूंनाही जमले नव्हते अशी मखलाशी करणाऱ्या राजदीपला तीन वेळा शपथविधीच्या दाखल्यामधला फोलपणा ते कसे दाखवतात बघण्यासारखे आहे. तीन वेळा शपथ घेतली पण तीन वेळा मला काही पाच वर्षांचा कालावधी मिळाला नाही असे सुनावत उगाच स्तुती करणाऱ्या (हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या) राजदीपला ते थांबवतात कसे हेही विशेष आहे. 

एका बाजूला अणुस्फोटाचा कठोर निर्णय घेणारे वाजपेयी पाकिस्तानमध्ये "दिल जीत कर आओ" असे का म्हणाले असतील बरे? पाकिस्तानने अणुयुद्धही लादलेच  तर त्याचा सामना करण्याची मानसिक तयारी त्यांनी ठेवली होती पण लाहोर बस असो कि क्रिकेट डिप्लोमसी आपण समझौत्याचे प्रयत्न केले नाहीत असे काही दृश्य त्यांनी उभे होऊ दिले नाही. देशामध्ये पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार पाच वर्षे कालावधी पूर्ण करणार होते. हेही सरकार बोलणी करायला तयार असल्याचे दृश्य जगासमोर तर उभे राहिलेच पण पाकिस्तानी जनतेसमोर सुद्धा.

वाजपेयींच्या ह्या वागण्याचा जो सूक्ष्म परिणाम तेथील  लोकांवर झाला आहे. त्याचा फायदा आजच्या सरकारलाही मिळत आहे. शरीफ ह्यांनी निवडणूक भारताशी संबंध सुधारण्याची घोषणा करत का जिंकली  ह्याचे उत्तर वाजपेयींच्या ह्या वर्तनामध्ये दिसते. भले तेथील लष्कर भारताशी आडमुठे धोरण राबवून सतत रक्तबंबाळ करण्याचे तंत्र अवलंबत असले तरीही जनतेचा भ्रमनिरास होत चालला आहे. जेव्हा केव्हा लष्कर विरूद्ध जनता असा संघर्ष उभा राहील तेव्हा "दिल जित कर आओ" संदेशाची किंमत काय होती ते आपल्याला कळू शकेल.

समाजाला रुचेल असे बोलणारे नेते असतात पण त्याला न दुखावता हळूहळू आपल्या विचाराशी जोडून घेणे ही कला असते. ह्याबाबत मला काही उदाहरणे द्यायची आहेत. २००२ च्या दंगलींनंतर मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भाजप मधला एक गट फारच उत्सुक होता. गोवा अधिवेशनामध्ये ह्याचा सोक्ष मोक्ष लावला गेला पाहिजे असे काही जण धरून बसले होते. पंत प्रधान गोव्याला निघाले तेव्हा त्यांच्या विमानामध्ये त्यांच्या सोबत काही केंद्रीय मंत्री देखील होते. मोदी प्रश्नाबाबत वाजपेयींना त्यांनी गळ घातली. त्यांच्या मनात काय आहे जाणून घ्यायचा प्रयत्न चालला होता. अधिवेशनामध्ये पोचले तेव्हा मोदी जाणार म्हणून ह्या मंत्री गणाची अगदी खात्री पटलेली होती. अधिवेशनामध्ये मोदी जरा उशिरा पोचले. त्यांनी सभागृहामध्ये प्रवेश केला आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला. सभागृह दणाणून गेले. मोदींचे हे स्वागत पाहताच वाजपेयींनी त्यांच्या हाकल पट्टीचा प्रश्न उपस्थित होऊ दिलाच नाही. म्हटले तर आपल्याला जे पाहिजे ते त्यांना कार्यकर्त्यांच्या गळी उतरवणे कठीण होते काय? अजिबात नाही. म्हटलेच तर तसे झालेही असते. पण त्यांनी मन आवरले. आपला मुद्दा पुढे रेटला नाही. आणि कार्यकर्त्याच्या इच्छेपुढे मान तुकवली. जनमनाचा असा ठावा असलेले नेते क्वचित बघायला मिळतात. 


ह्याच प्रश्नावरती निर्णय घेण्यापूर्वी श्री बाळासाहेब ठाकऱ्यांचे मत काय आहे ह्याचीही चाचपणी झाली होती. मोदी गया तो गुजरात गया अशी जगजाहीर टिप्पणी बाळासाहेब ह्यांनी तेव्हा केली होती. वाजपेयींसारख्या जनमताचा पडसाद अचूक ऐकणाऱ्या आणि पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीला आपल्या पक्षाबाहेरील बाळासाहेबांचे मन ह्या विषयावरती जाणून घेण्याची खरे तर काय बरे गरज होती? १९९६ च्या निवडणुकीपूर्वी "हिंदू मन आज प्रक्षुब्ध है" असे जाहीर मुलाखतीमध्ये सांगणाऱ्या वाजपेयींना जनता काय विचार करते हे नक्की कळत होते. पण तरीही बाळासाहेबांचे ह्यावरचे मत जाणून घेण्याची ऋजुता त्यांनी दाखवली. ह्यामध्ये यांनी दोन गोष्टी साध्य केल्या. वाजपेयींच्या अनेक निर्णयांवर अगदी परराष्ट्र धोरणावरही बाळासाहेब जाहीर टीका करत. त्याचा त्यांनी कधी राग मानला नाही. कारण बाळासाहेबांना सुद्धा हिंदू जनमताची नाडी कळते ह्याचे त्यांना भान होते. आपण जे करत आहोत ते जनतेला चटकन रुचणारे नाही तेव्हा तिचा राग कोंडून त्याची संहारक वाफ होण्यापेक्षा बाळासाहेबांच्या टीकेमधून आपल्या मतांचीही कदर कुठे तरी होते आहे असे जनतेला वाटू देण्याचे आणि जनतेच्या रोषाला वाट मोकळी करून देण्याची संधी न अडवण्याचे त्यांचे कसब त्यांची राजकीय परिपक्वता दाखवते. मोदींच्या बाबतही भाजपने मोदींना पदावरून दूर केले आणि बाळासाहेबांनी त्यावर टीका केली तर जनमताचे काय होईल ह्याचा सूक्ष्म विचार ते करत असावेत. मी आयुष्यभर काय जपले असेल तर माझी  विश्वासार्हता असे ते म्हणत. तेव्हा कोणत्याही कसोटीच्या क्षणी ती विश्वासार्हता भाजपमधल्या कार्यकर्त्यांची असो व संपूर्ण जनतेची असो आपण गमावून बसणार नाही ह्याची काळजी घ्यावी असे त्यांना वाटत होते हे विशेष. 

क्रिकेटच्या विश्वामध्ये आज देखील भारतीय जनता सुनील गावस्कराला विसरू शकलेली नाही. संपूर्ण संघाला विजयाप्रत नेण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. गावस्कर बाद झाला तर संघ आपले अवसान हरवून बसत असे. म्हणून गावस्करने आपल्या बॅट ला खिळे ठोकून ती जड केली होती असे सांगितले जाते. जेणेकरून फटकेबाजीचा मोह टाळण्याचा आणि सहजी विकेट जाऊ न देण्याचा तो एक प्रयत्न होता असे म्हणतात. गावस्कर प्रमाणेच अटलजींनाही आयुष्यभरच आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये आपल्या सोबत पक्षाचे काय होईल ह्याचा आधी विचार करण्याची सवयच लागली होती असे दिसते. त्या हितासाठी आपल्या मनाला मुरड ते आनंदाने घालत होते. समाजमनाची बूज अशी राखण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते - समाज घडवण्याची आणि जनमत उभारण्याची समाजाला आपल्या विचाराकडे हळूहळू बदलत नेण्याची आपली जबाबदारी त्यांनी प्रामाणिक पणे स्वीकारली होती म्हणून "काल के कपाल पर लिखता मिटाता  हूँ " असे ते सहजपणे लिहू शकले. 

समुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहून त्याच्या लाटांचा खेळ बघताना महासागराच्या गतिविधींमुळे कधी कधी चकित व्हायला होते. त्याच्या अक्राळ विक्राळ लाटा जसजशा किनाऱ्यावर आपटत राहतात तसतसा किनाऱ्यावरचा खडक भंग पावत राहतो आणि हळूहळू त्याची वाळू होत जाते. पण ह्याच्या अगदी उलटी क्रिया सुद्धा महासागर त्याच वेळी घडवत असतो. त्याच्या पाण्याच्या दाबाने खालच्या मातीवर दाब पडून नवे खडक बनत असतात. किनाऱ्यावरचा खडक फुटून त्याची वाळू बनायला जसा कित्येक वर्षांचा अवधी जातो तसेच नवे खडक बनण्याची प्रक्रिया देखील हळूहळू घडत असते. एका बाजूला किनाऱ्यावरील खडकाची वाळू करणारा महासागर दुसऱ्या बाजूला नवे खडक जन्माला घालत असतो. महापुरुषांच्या जीवनकथेचेही हेच सार असते. 

वाजपेयींसारखा नेता त्या महासागरासारखा समाजमनावरती घण घालत असतो. एकाच वेळी किनाऱ्यावरील खडकाची वाळू करतो तर आतल्या मातीचे खडक बनवतो. राजकय प्रक्रियादेखील अशीच असावी लागते. संघर्षाच्या कामासोबत विधायक काम देखील बरोबरीने व्हावे लागते. तेव्हा माणसे संतत्वाला पोचतात.  "दिल जित कर आओ" हे त्यांचे सूत्र एकेकाळी साध्य होते ते केव्हा साधन बनून गेले ते कोणालाच कळलेही  नाही 

2 comments:

  1. Classic ... अप्रतिम ... गेल्या पंधरा दिवसात अग्रलेख ब्लॉग आठवणी या सगळ्यांमध्ये अटलजींचे यथार्थ वर्णन येथे भेटले

    ReplyDelete