Friday 8 June 2018

नक्षली लिब्बू

Image may contain: text    Image may contain: 1 person, text



तर मुंबई पोलिसांना मोदींना जीवे मारण्याचा कट रचणारी इमेल ताब्यात घेतलेल्या नक्षली नेत्याच्या लॅपटॉपवरती मिळाल्याची बातमी सर्व माध्यमांमधून काल झळकल्यानंतर ह्या नेत्यांच्या बचावासाठी पुढे येणारी नेहमीची गॅंग बुचकळ्यात पडल्यामुळे नेहमीचेच युक्तिवाद ऐकायला मिळाले नाहीत. तेव्हा आता कशावरून ही इमेल खरी आहे असे प्रश्न विचारले जात आहेत. पर्यायाने त्यांना असे सुचवायचे आहे की पोलिसांनीच ही इमेल त्याच्या लॅपटॉपवरती टाकली असावी -  म्हणजेच असेही सुचवायचे आहे की अर्थात पोलिस असे स्वतःहून करणारच नाहीत सबब केंद्र व राज्यामधील भाजप सरकारच्या सांगण्यावरून - आदेशावरून पोलिसांनी नकली इमेलचा बनावट पुरावा पुढे करून "सामान्य जनतेच्या मुक्तिदात्यांना" ताब्यात घेतले आहे.

ज्यांना कसेही करून मोदी विरोधातील बाईटस् ऐकायच्या असतात त्या कुवाकेराई विद्यापीठाच्या वाचकांना असले तर्क ताबडतोब पटतातच. मग त्यांची सेना टाळकुटेपणाचा कहर करते. असो. प्रश्न ज्यांना बुद्धी चालवायची आहे त्यांचा आहे.

पोलिसांनी इमेलचा पुरावा कोर्टासमोर दाखल केला आहे असे सांगितले गेले आहे. पुरावा म्हणून इमेलचा अर्थ समजून घ्या. हा पुरावा काही केवळ आरोपीच्या लॅपटॉपवरती असतो असे नाही. जो इमेल सर्व्हर वापरून इमेल पाठवली गेली त्या सर्व्हरवरती त्याची कॉपी असते. अगदी इमेल पाठवणाराने ती डिलिट केली तरी सर्व्हरच्या बॅक अपमध्ये तसेच इंटरनेटवरील अन्य ठिकाणी पुरावा उरतोच. 

लॅपटॉप हाती मिळाल्यानंतर त्याची फोरेन्सिक तपासणी केली जात असल्याचे नोंदवले गेले आहे. जिज्ञासूंनी ह्याचा अर्थ गूगल करून समजावून घ्यावा. फोरेन्सिक तपासणी झालेली नसेल तर कोर्ट पुरावा ग्राह्य धरत नाही.

आपले म्हणणे इतक्या प्रकारे खोटे पडण्याची शक्यता असताना देखील बनावट पुरावे भाजप सरकार पुढे रेटत आहे कारण "गरीबांच्या नेत्यांना - दलितांच्या नेत्यांना विनापुरावा तुरुंगात डांबायचे आहे" असे ह्या लिब्बूंना म्हणायचे असावे. थोडक्यात काय पडे तो भी टांग उपर ही भूमिका आहे. २००२ सालापासून मोदी आणि संघ ह्यांच्याविरोधात कुभांड रचले लिब्बूंनी - हिंदू दहशतवाद नावाने साध्वी आणि कर्नल पुरोहितना दहा वर्षे विना पुरावा तुरुंगात डांबणारे आणि त्याचे समर्थन करणारे आज भर पावसात खोट्या पुराव्याच्या एकाच छत्रीखाली पुरेशी जागा नसतानाही कोंबून उभे राहताना दिसतात. साहजिकच ते ओले आहेत हे जनतेला कळते पण आपण कोरडे असल्याचा दावा करणार्‍या लिब्बूंची गत आता डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजराप्रमाणे झाली आहे. मोदींविरोधात कट करणारे अहिरेगहिरे नाहीत आणि असल्या फालतू चुका आणि लिखित स्वरूपात कोणी कट रचेल काय त्याचे तपशील देईल काय इतके काही आम्ही कच्चे भोळे नाही असे तर ह्यांना म्हणायचे नाही ना? पण गॅंगमधला एखादा मूर्ख असतोच त्याच्या मूर्खपणापायी गॅंग पकडली जाते हा पोलिसांचा नित्याचा अनुभव आहे. 

हे खोट्या पुराव्याचे तर्क येतात कुठून? म्हणतात ना की पोलिसाने पकडलेच तर गुन्ह्यातून सुटायच्या सर्व चोरवाटा गुन्हेगाराला आधीच माहिती असतात. उदा. जगामध्ये जिथे जिथे इस्लामी दहशतवादी पकडले गेले त्यांचे वर्तन बघा. त्यांना शिकवले गेले आहे - पकडले गेलात तर पोलिस यंत्रणेबद्दल आणि तुरुंग व्यवस्थेबद्दल तक्रार करत रहा - तुमची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांची नावे लक्षात ठेवा - कोर्टासमोर तुम्हाला हजर केले जाईल तेव्हा हा आपल्याला छळतो अशी तक्रार करा - तुरुंगात आपल्याला अन्नपाणी औषधे दिली जात नाहीत म्हणून तक्रारी करा - कोर्टात येताजाताना मोठमोठ्याने घोषणा द्या वगैरे. जे आपण केले ते करून भाजप आपल्याला तुरुंगात डांबत आहे असे जगाला ओरडून सांगण्याची गुन्हेगारांची ही मोडस ऑपरेंडी आहे. त्यांनी तसे केले की बाहेर कोरस द्यायला लिब्बूंची आणि मानवाधिकारवाल्यांची फौज त्यांच्या मदतीला माध्यमांमध्ये हजर आहेच. (श्री तुषार दामगुडे ह्यांना एका चॅनेलवरती कसे धारेवरती धरले गेले हे तुम्ही बघितले असेलच.) 

"मोदी हा पक्का फेकाड्या आहे - त्याच्याकडे कोणतीही नीतीमत्ता नाही - कोणत्याही खालच्या थराला जाऊन तो राजकारणामध्ये वागतो - आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला "खतम" करण्यासाठी त्याला साधनशुचिता बाळगण्याचे कर्तव्य आहे हे वाटत नाही - आपल्याला जो विरोध करेल त्या - मग भले अशी व्यक्ती म्हणजे समाजामधली एक नगण्य व्यक्ती का असे ना - व्यक्तीचा बंदोबस्त करण्याचे हा आदेश देतो आणि अधिकार्‍यांना धमकावल्यामुळे त्या पाळल्या जातात  - कोणत्याही मार्गाने का हो ई ना पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त त्याला आपल्या हाती ठेवायचे आहे आणि त्यासाठी लोकशाहीचा खून करून घटनेची पायमल्ली करून तो कोणत्याही थराला जाऊन कारस्थानरचून देशाची सत्ता हाती घेण्याचे बेत रचतो आहे आणि ते तडीस नेण्याचे प्रयत्न चालू आहेत" - हे लिब्बूंचे केवळ स्वप्नरंजन नसून त्यावरती त्यांची नितांत श्रद्धा आहे. जिथे श्रद्धा असते तिथे लॉजिक चालत नाही. 

पकडले गेलेले आरोपी आजच्या घडीला नक्षल वा माओवादी नेते या नावाने अथवा अर्बन नक्षल ह्या नावाने किंवा नक्षली आयडियालॉग्ज (विचारवंत) अशा नावाखाली तुमच्या समोर सादर केले जात आहेत तेही अशा खुबीनी की त्यांचे जाळे नेमके कसे चालते त्याचा मागमूसही लागता कामा नये. खोटारडेपणा ज्यांच्या पाचवीला पुजला गेला आहे आणि आपल्या ध्येयासाठी समाजाशी खोटेही दडपून बोला हे ज्यांनी त्यांच्या तत्वज्ञानाची नीतीमत्ता शिकवते त्यांच्याबद्दल काय बोलावे? इतकेच आज नोंदवत आहे की - अभी अभी तो शुरुवात है - मामला आगे आगे बढेगा - सबूर रखिये जी - अजून ह्यांना पैसा कोणत्या वाटेने मिळाला हे पोलिसांनी उघड केलेले नाही. काय माहिती आणि कोण कोण ह्या जाळ्यात फसणार आहेत? त्यांच्यातही हेडलीचे काम करणारा कोण होता का? तो कोणत्या देशात राहत होता - एकच होता की अनेक - त्या हेडलीला मदत करत असाच एखादा तहावुर राणाही सोबत होता का? बास बास किती शंका विचारते आहे मी! थोडा दम धरा हो. पोलिसांना उसंत तर मिळू द्या.



1 comment:

  1. हा शेखर गुप्ता किती घृणास्पद माणूस आहे.डोक्यात कायम विषच भरलेले असते.

    ReplyDelete