Sunday 10 June 2018

उत्तर कोरिया ७


Image result for kim jong il albright



(सोबत: किम जॉन्ग इल आणि बिल क्लिंटन ह्यांच्या परराष्ट्र सचीव श्रीमती मॅडलिन अल्ब्राईट - ऑक्टोबर २००० - क्लिंटन ह्यांच्या अध्यक्षपदाचा शेवटचा महिना)


पन्नास वर्षांच्या दीर्घ सहचर्यानंतर एप्रिल १९८२ मध्ये किम इल सॉन्गचे सहकारी चो निवर्तले त्यानंतर त्यांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येऊ लागले. प्रकृतीही साथ देईनाशी झाली. त्यानंतर पक्षामध्ये आपल्या मुलाच्या मार्गामध्ये येऊ शकतील अशा सदस्यांच्या हकालपट्टीचे पर्व १९८३ मध्ये सुरु झाले. हे पर्व संपल्यानंतर ऑगस्ट १९८४ मध्ये किम इल सॉन्गचे सुपुत्र किम जॉन्ग इल ह्यांचे नाव त्यांचे अधिकृत वारसदार म्हणून घोषित केले गेले. ह्यानंतरचे आयुष्य किम इल सॉन्ग ह्यांनी ऐषारामात काढले. वर्षातून काही वेळा ते देशभरात सरकारी कार्यक्रमामध्येही जात पण हळूहळू ते प्रमाण कमी होत गेले. उर्वरित वेळ संपूर्ण उत्तर कोरियामध्ये त्यांच्यासाठी खास बांधलेल्या अनेक राजवाड्यांमध्ये राहण्याचे सत्र सुरु झाले. प्योन्गान्नम दो येथे राजवाडा बांधण्यासाठी योग्य उंची मिळावी म्हणून एका टेकडीचे शिखर सपाट करून उंची कमी करण्यात आली आणि अवतीभवती कृत्रिमरीत्या पठारे - डोंगर रांगा आणि दर्‍या निर्माण करण्यात आल्या. तिथे एक तळेही निर्माण केले गेले. किमला आवडणार्‍या फुलांच्या बागा राजवाड्यातून दिसण्याची सोय करण्यात आली होती. भवताली दाट जंगल वसवण्यात आले. जंगलामध्ये किम शिकारीसाठी जात असे. तेथील "हिंस्र" प्राण्यांना खास प्रशिक्षण देऊन माणसांना न बुजण्याचा सराव करून घेतला जाई. किमला एका खास तयार केलेल्या गाडीमधून शिकारीच्या जागी नेले जाई. जनावरे तिथे माणसांना बघून बुजत नव्हती. त्यामुळे अगदी जवळ आलेले जनावर टिपणे किमला सोपे होत असे. वनराई इतकी विस्तृत होती की तिथे फिरायचे तर कित्येक मैलांची प्रदक्षिणा घालावी लागे. किम इल सॉन्ग ह्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून "कमिटी फॉर लॉन्जेव्हिटी ऑफ किम इल सॉन्ग अंड हिज सन"ची स्थापना करण्यात आली. किमच्या आरोग्याची सर्व चिंता कमिटीवरती सोपवण्यात आली होती. पारंपारिक कोरियन आहार - त्यामध्ये सामिल करण्यात आलेली दुर्मिळ वनस्पती आणि मुळ्या हे आहाराचे वैशिष्टय् होते. किमचा वेळ आनंदात जावा म्हणून त्याच्या भोवती सतत हॅपी ग्रुप्स ठेवले होते. ह्यामध्ये कोरियामधून निवडून आणलेल्या वीस वर्षीय ३००० युवतींचा समावेश करण्यात आला होता. विविध प्रकारची नृत्ये - संगीत - गायन ह्याचे प्रशिक्षण दिले जाई. त्याला आनंदित ठेवण्याचे खास प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले होते. एकंदरीत जुन्या काळातील कोरियन राजेमहाराजाचे जीवन हा कट्टर कम्युनिस्ट जगत होता. शिवाय जगामधले पहिले कम्युनिस्ट "राजघराणे" जन्माला घालण्याचे आणि ते प्रस्थापित करण्याचे "महान कार्य"ही त्याने पार पाडले होते.

स्वतःच्या पुत्राच्या हाती सूत्रे देण्यासोबत किमने "पहिल्या" पिढीतील आपल्या सोव्हिएत कोरियन सहकार्‍यांच्या मुलांनाही सत्तावर्तुळामध्ये सामिल करून घेतले आणि त्यांना खुश ठेवले. अशा तर्‍हेने घराणेशाहीची प्रथा दुसर्‍या आणि तिसर्‍या स्तरामध्येही रुजवण्यात आली. उत्तर कोरियामधली ही दुसरी पिढी उच्चशिक्षित होती. कम्युनिस्ट जगतामधल्या सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. साहजिकच सत्तावर्तुळामध्ये आता उच्चशिक्षित टेक्नोक्रॅटस् दिसू लागले होते. उत्तर कोरियाची युद्धाची खुमखुमी ह्या तरूणवर्गाने जागृत ठेवली. किम घराण्याशी आपले इमान सिद्ध करण्यासाठी आणि त्यांची मर्जी राखण्यासाठी अधिकाधिक युद्धखोरीचे वर्तन अनिवार्य झाले होते. ह्या पिढीची मानसिकता अशाच वातावरणामध्ये तयार झाली होती. किम इल सॉन्गचे स्वयंपूर्ण कोरियाचे स्वप्न ह्या पिढीने मनापासून आत्मसात केले होते. किंबहुना ह्या तत्वाला आता किमिलसोन्गीझम असे नाव पडले होते. 

१९९१ मध्ये किम इल सॉन्गने बीजींग दौरा करून आपल्या दीर्घ राजवटीला आणि सुपुत्राच्या वारसदारीला चिन्यांचे आशिर्वाद मिळवले. अमेरिकाविरोधी धोरणाला चिन्यांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न किमने केले पण त्यावेळेपर्यंत जागतिक परिस्थिती बदलली होती. ज्याच्या आश्रयाने किमची राजवट सुरक्षित राहिली होती तो सोव्हिएत रशिया आता संपुष्टात आला होता. जगामधला एक ध्रुव निखळून पडला होता. आता दादागिरी चालत होती फक्त अमेरिकेची. मग तिच्याशीच वैर घेऊन कसे होणार? एकंदरीत सर्वच "सोव्हिएत ब्लॉक"मधील देशांना अशाप्रकारे आपले परराष्ट्रधोरण बदलावे लागत होते. खुद्द चीनने अमेरिकेशी जुळवून घेतले होते. मोठ्या प्रमाणावरती अमेरिकन ऑर्डर्स मिळवून त्या देशाशी तसेच अन्य पाश्चात्यांशी व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याचे बेत चीनमध्ये आखले जात होते. आपल्याच मार्गावरती चालण्याचा सल्ला चीनने किमला दिला. अत्याधुनिक सामग्रीची आयात खुली होईल इतपत तरी पाश्चात्यांशी संबंध सुधारा असा चीनचा सल्ला होता. समृद्धी येणे गरजेचे आहे. पैसा हाती आला म्हणून आपल्या कम्युनिस्ट तत्वज्ञानाशी प्रतारणा होते असे नाही तर उलट हाती पैसा खेळू लागला तर उत्तमोत्तम शस्त्रास्त्रे हाती येतील आणि संरक्षणव्यवस्था अत्याधुनिक होऊ शकेल असे चीनचे म्हणणे होते. दहा दिवसांच्या काथ्याकूटानंतर किमने ते धोरण स्वीकारले. त्याला महत्वाचे कारण होते उत्तर कोरियाची स्वतःची आर्थिक परिस्थिती. ह्यानंतर कोरियाने प्रथम इराणशी करार करून आयात तेल देशात उपलब्ध होईल ह्याची सोय लावली. त्याच्या बदल्यात द्यायला पसिआ नव्हता. मग इराणने आधुनिक शस्त्रास्त्रे मागितली होती. उत्तर कोरियाने ते मान्य केले. अशाच धर्तीवरती उत्तर कोरियाने अनेक प्रॉजेक्टस् हाती घेऊन इलेक्ट्रोनिक्स आणि कम्प्यूटर्स क्षेत्रामध्ये भरीव प्रगती केली. केवळ इराणशी नव्हे तर सिरियाबरोबर सुद्धा उत्तर कोरियाने व्यापार संबंध वाढवले. ह्या यादीमध्ये पाकिस्तानही मोडतो. चीनने बांधलेल्या आणि भारतीय हद्दीमधून जाणार्‍या काराकोरम मार्गाच्गा वापर करत आण्विक आणि अन्य युद्धसामाग्री शस्त्रास्त्रे आदि सामग्रीची येजा दोन्ही देशांमध्ये सुरू झाली. 

१९९२ मध्ये कोरियाच्या दौर्‍यावरती आलेल्या इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व स्वतः रफसंजानी करत होते. राककीय अनिश्चिततेचा काळ तेव्हा कोरियामध्ये चालू होता. किम इल सॉन्ग तर वयोवृद्ध आहेत आणि त्यांचे वारसदार किम जॉन्ग इल ह्यांना वरिष्ठ नेतृत्व धूप घालत नाही असे रफसंजानी ह्यांच्या निदर्शनास आले. प्रत्यक्षात काय झाले होते? काही वरिष्ठ लष्करी अधिकारी बंड करण्याच्या तयारीमध्ये होते. ह्या अधिकार्‍यांना रशियामधील गोर्बाचेव्ह ह्यांच्या पेरेस्त्रोईका योजनेचे आकर्षण होते. उत्तर कोरियामध्येही रशियाच्या धर्तीवरती बदल व्हावेत असे त्यांचे विचार होते. कोरियाच्या चढत्या युद्धखोरीच्या धोरणाला त्यांचा विरोध होता. पुढे बंडखोरांपैकी एकजण फुटला आणि सगळे पकडले गेले. बंड मोडून काढले गेले. पण दुसरे मोठे संकट दारात उभे होते. उत्तर कोरियाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. एकीकडे लष्करावरचा वारेमाप खर्च आणि त्यातून निर्माण झालेली पैशाची चणचण. पैसा अपुरा म्हणून जनतेच्या मूलभूत गरजाही भागवल्या जात नव्हत्या. विजेचा तुटवडा असा होता की जनतेला लागणार्‍या रोजच्या वापरातील वस्तूंचे कारखाने बंद पडत होते. पण लष्करी सामग्रीचे उत्पादन मात्र अव्याहत चालू होते. देशामध्ये अन्नाचाही तुटवडा होता. रोज तीन वेळा जेवण न्सले तरी चालते - दोन जेवणे पुरे आहेत असे सरकारी घोषणांचे बोर्ड जागोजागी लावलेले दिसत. लोकांना रेशनवर मिळणारे अन्नधान्य दोन तृतीयांश भागावरती आणले गेले होते. अशाही परिस्थितीमध्ये वंशपरंपरेने सत्ता गाजवण्याची संधी किम जोन्ग इल ह्याच्याकडे चालून आली होती. त्याच्या वडिलांचा काळ मागे पडला होता. जुलै १९९४ मध्ये किम इल सॉन्ग ह्यांच्या मृत्यूनंतर किम जॉन्ग इलची राजवट सुरु झाली. किम इल सॉन्ग ह्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रत्यक्षात दुसरे महायुद्ध पाहिले होते - त्यात भाग घेतला होता. किम जोन्ग इलचे तसे काहीच नव्हते. कोरियन जनतेच्या मनामध्ये असलेली वडिलांची प्रतिमा आणि सॉन्गचा सुपुत्र एव्हढीच त्याची जमेची बाजू होती. कोरियन जनतेला कह्यात ठेवण्यासाठी कोरियन लष्कराच्या हिशेबी कदाचित किम जोन्ग इलचा उपयोग होता. बंडखोर्रीचे संकट संपल्यावरती उर्वरित लष्कर किम जॉन्ग इलच्या मागे उभे राहिले. एक एक करत किम जोन्ग इलकडे देशाची सर्वंकष सत्ता आली. महत्वाचे म्हणजे कालांतराने त्याने लष्करावरती सुद्धा आपला वचक निर्माण केला. बळजबरीने दक्षिण कोरिया आपल्याकडे जोडून घेण्याचे आणि उत्तर कोरियाला एक जागतिक अणुसज्ज देश बनवण्याचे वडिलांचे स्वप्न किम जॉन्ग इलनेही स्वीकारले होते. जागतिक परिस्थितीचे भान नसलेले नेतृत्व आणि लष्करी खाक्या असलेली राजवट इतकीच कोरियाची ओळख उरली होती. पण लोकांच्या आठवणीत राहिल्या आहेत त्या कोरियातर्फे दिल्या जाणार्‍या अणु हल्ल्याच्या धमक्या. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ह्या देशाकडे असे हल्ले करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आहे हे माहिती असल्यामुळेच जगाच्या चिंतेमध्ये भर पडत होती. आपल्या अणु कार्यक्रमावरती कोरियाने कधी आंतरराष्ट्रीय आय ए इए चे नियंत्रण स्वीकारले तर कधी ते धुडकावून दिले. अशा अत्यंत अस्थिर आणि धोकादायक चित्र सतत् सादर करणार्‍या कोरियाचे करायचे काय हा प्रश्न अमेरिकेच्या सर्वच अध्यक्षांना सतावणारा होता. अद्धूनमधून मॅडलिन अल्ब्राइट सारख्या सचीवांशी बोलणी आणि तत्सम संपर्क सोडले तर इत्तर कोरिया आपल्या छोट्याशा वर्तुळात राहून सगळे उपद् व्याप करत होता. 

किम जॉन्ग इल ह्यांचा कार्यकाल जसजसा संपत आला तसतसे कोरियामधील सर्वोच्च सत्तावर्तुळामध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले होते. किम घराण्यातील एक बुजगावणे पुनश्च पुढे उभे करून प्रत्यक्ष सत्ता मात्र कोरियन सैन्याकडे ठेवण्याचे त्यांचे मनसुबे होते. हे मनसुबे उधळून लावण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून होणार ह्याची सैन्याला खात्री होती. २०१०च्या सुमाराला जॉन्ग इलच्या आजारपणाच्या काळामध्ये कोरियन सैन्याने अमेरिकेला काही पेच घातले. एप्रिल २०१० मध्ये सैन्यातील एकूण १३० वरिष्ठ अधिकार्‍यांना बढती देण्याची ऑर्डर जॉन्ग इलच्या सहीने काढली गेली. जॉन्ग इलचा वारसदार कोण ह्या प्रश्नामध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करू नये म्हणून इशारेवजा "घटना" घडवून आणण्याचे कोरियन सैन्याने ठरवले. अमेरिका कोणाला चुचकारेल - कोणाला "बक्षिसे" देऊ करेल तर आणि कोणाला दटावून गप्प बसवेल - देशाला काही आर्थिक लाभ देऊ करेल हे गृहित धरून हे वरिष्ठ अधिकारी वागत होते. एखादा असा हल्ला करायचा की त्याच्या प्रत्य्त्तरामध्येच अमेरिका व युरोपाला गुंतवून ठेवायचे जेणे करून अमेरिका व युरोपाशी साटेलोटे असणार्‍यांच्या मदतीने जॉन्ग इलचा वारस नेमायच्या सैन्याच्या कारवाईमध्ये त्यांना ढवळाढवळ करता येऊ नये. ह्या निर्णयानुसार दक्षिण कोरियाचे चेनॉन जहाज १०४ प्रवाश्यांसकट बुडवण्यात आले.  अध्यक्ष ओबामा ह्यांच्या बोटचेप्या धोरणामुळे हा हल्ला हो्ऊ शकला असे त्यांचे विरोधक म्हणत होते. ओबामा सरकार कोरियाची मनधरणी करण्यात आणि लाड पुरवण्यात मग्न असताना हा फटका जबर बसला. इतका की त्याने आपला इप्सित साध्य केले. (उदा. २६/११ सारखा हल्ला झाल्यानंतर भारतामध्ये "पाक धार्जिणे" सरकार असूनही यूपीएला जनमताच्या दबावाखाली पाकिस्तानशी बोलाणी थांबवावी लागली. तसेच कोरियाने जहाज बुडवल्यावरती अमेरिका आणि युरोपाला कडक विरोधाची भूमिका घेणे भाग पडले आणि विविध प्रलोभने दाखवून चंचुप्रवेश मिळवण्याचे मनसुबे मागे ठेवावे लागले.) एकंदरीत कोरियासंबंधी माहिती मिळवण्याचा पाश्चात्यांकडे असलेली सूत्रे म्हणजे अधूनमधून फुटून येणारे अधिकारी. ह्याव्यतिरिक्त कोरिया घनदाट धुक्याच्या आवरणामध्ये गुरफटलेलाच राहिला. त्याच्याकडून येणार्‍या अणुहल्ल्याच्या - आयसी बी एम वापरून थेट अमेरिकन भूमीवर हल्ले चढवण्याच्या धमक्या तेवढ्या ऐकू येत आणि त्यांचाच आवाज घुमल्यासारखा प्रतिध्वनी काढत अमेरिकेला बुचकळ्यात टाकत राहिला.

वारसदार नेमायच्या प्रक्रियेपासून अमेरिकेला दूर ठेवायचे मनसुबे एक वेळ यशस्वी झाले खरे पण कोरिया समस्येवरती कायमचा तोडगा काढण्याचे स्पष्ट ध्येय हाती घेऊन आलेल्या एका अमेरिकन अध्यक्षाने आज बाजी पलटवून दाखवली आहे. तिची पार्श्वभूमी काय आणि हा पेच कसा सोडवला जात आहे त्याचे वर्णन आता अंतीम भागामध्ये पाहू. 






No comments:

Post a Comment