Thursday 29 March 2018

हिलरी ह्यांचे षड्यंत्र भाग ६

Image result for george papadopoulos


ट्रम्प ह्यांचे रशियाशी साटेलोटे असल्याच्या बातम्या एफबीआयपर्यंत अनेक सूत्रांकडून येत होत्या. त्यामधले दुसरे सूत्र होते ते खुद्द ट्रम्प ह्यांच्या प्रचारयंत्रणेमध्ये त्यांचे परराष्ट्रविषयक बाबींमधील सल्लागार मंडळाचे एक सभासद जॉर्ज पापादूपोलोस. जॉर्ज ह्यांचे वय तिशीच्या आतले. त्यांचे परराष्ट्र संबंध आणि संरक्षण ह्या विषयातील शिक्षण नुकतेच पुरे होत होते.  तसेच प्रसिद्ध हडसन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी थोडाफार कामाचा अनुभव घेतला होता. ट्रम्प ह्यांच्या प्रचारयंत्रणेमध्ये त्यांचा समावेश मार्च २०१६ मध्ये करण्यात आला होता. यानंतर जॉर्ज लंडनला गेले होते. तिथे जोसेफ मिफसूद नामक प्राध्यापकाने त्यांच्याशी संपर्क साधला. प्रो. मिफसूदचे रशियातील बड्या अधिकार्‍यांशी उत्तम संबंध होते. प्रो. मिफसूद ह्यांच्या बरोबर झालेल्या दोन भेटींचा वृत्तांत त्याने ट्रम्पच्या प्रचारयंत्रणेतील सात आठ जणांना कळवला होता. मिफसूद ह्यांनी जॉर्जला सांगितले होते की रशियाकडे हिलरी ह्यांच्या हजारो इमेल्स आहेत. 

ही माहिती मिळाल्यावरती ट्रम्प ह्यांचे राष्ट्रीय प्रचारसमितीचे सहप्रमुख क्लोव्हिस ह्यांनी जॉर्जला रशियाला भेट देण्याचा सल्ला दिला. जॉर्जबरोबर काही रशियन अधिकारी जाणार असावेत. मे २०१६ मध्ये जॉर्जची भेट ऑस्ट्रेलियाचे ब्रितनमधील राजदूत अलेक्झांडर डाउनर ह्यांच्याशी लंडनमध्ये झाली. ह्या भेटीदरम्यान जॉर्जने ह्या राजदूताला सांगितले की रशियाजवळ हिलरींच्या हजारो इमेल्स आहेत! डाउनर ह्यांना प्रचंड आश्चर्य वाटले पण जॉर्ज सांगतो ती माहिती ताडून पाहण्याची सोय नसल्याने ते शांत राहिले. जेव्हा जून महिन्यामध्ये डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या इमेल्स चोरल्या गेल्याचे उघडकीला आले तेव्हा डाऊनर ह्यांना जॉर्जशी झालेला संवाद आठवला. डाऊनर ह्यांनी ही बातमी ऑस्ट्रेलियाचे अमेरिकेतील राजदूत ह्यांच्या कानावरती घातली. त्यांनी ती जुलै २०१६ मध्ये एफबीआयमध्ये पोचवण्याची व्यवस्था केली. 

एक ऑस्ट्रेलियन राजदूत ट्रम्प ह्यांच्या प्रचारयंत्रणेमध्ये काम करणार्‍या व्यक्तीबद्दल काही माहिती देत होता  हे एक सूत्र तर ट्रम्प ह्यांच्या प्रचारयंत्रणेतील जॉर्ज यांची दर्पोक्ती खरी झाल्याचे हे दुसरे सूत्र. ट्रम्प आणि रशिया ह्यांच्यामधल्या संबंधांची चौकशी नेमकी कधी सुरु झाली हे अजूनही ताडता येत नाही. पण जनतेला अशी चौकशी सुरु करण्यात आली आहे असे कळवण्याच्या बर्‍याच काळ आधीच तिला सुरुवात झाली असावी. डाऊनर - पापादूलोस ह्यांच्याव्यतिरिक्त इतर अनेक सूत्रांकडून एफबीआयकडे पुढे माहिती येतच राहिली. त्याचे संदर्भ पुढे कथेमध्ये येत राहतील. इमेल्स फोडण्याचे सत्र देखील इथेच थांबले नाही आणि थांबणार नव्हते सुद्धा. 

जनतेसाठी इमेल्सचा मजकूर चव्हाट्यावरती येण्याला बराच काळ लागला होता तरी डेमोक्रॅटिक पक्षामधल्या मंडळींना संकटाची पुरेशी कल्पना आधीच आली असावी. १० मार्च २०१६ रोजी रशियाप्रणित फॅन्सी बेअर आणि कोझी बेअर ह्या हॅकर्सच्या गटांनी डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या इमेल्सवरती लक्ष केंद्रित करून "फिशिंग" इमेल्सचा मारा सुरु केला. २००८ मध्ये हिलरी ह्यांच्या प्रचारासाठी काम करणार्‍या अनेक कर्मचार्‍यांच्या नावे ह्या इमेल्स आल्या पण ते कर्मचारी केव्हाच सेवा सोडून गेल्यामुळे त्या तशाच पडून राहिल्या. त्यामधला एक कर्मचारी असा होता की २००८ मध्ये प्रचारात होता आणि तदनंतर सोडून गेल्यावरती २०१६ मध्ये पुनश्च कामासाठी आला होता. ह्या आय डी वरती आलेली फिशिंग इमेल उघडली गेली आणि त्यामध्ये दिलेल्या लिंकवरती अनेकदा क्लिक केले गेल्याचे दिसून आले. 

ह्या इमेल्स अशा तर्‍हेने लिहिल्या होत्या की जणू काही त्या गूगल कडून आल्या आहेत आणि हॅकर्सकडून हल्ला होऊ नये म्हणून त्यांना पासवर्ड बदला म्हणून सांगण्यात आले होते. त्यामधली लिंक क्लिक केली की नियंत्रण हॅकर्सच्या हाती जात होते. बस एकच चूक पुरेशी असते. ह्यानंतर २०१६ च्या प्रचारात सामिल झालेल्या वरिष्ठांच्या इमेल आय डी हॅकर्सना मिळाल्या आणि फिशिंग हल्ले त्यांच्या आय डी वरती होऊ लागले. १९ मार्च रोजी जॉन पोडेस्टा ह्यांच्या आय डी वरती अशीच एक संशयास्पद इमेल आली. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे चीफ़ ऑफ स्टाफ़ आणि हिलरी ह्यांच्या प्रचार यंत्रणेचे प्रमुख पोडेस्टा ह्यांच्या आय डी वरती आलेल्या इमेल मधली लिंक क्लिक करण्यात आली. केवळ सहा मिनिटात पोडेस्टा ह्यांच्या ५०००० हून अधिक इमेल्स हॅकर्सच्या घशात पडल्या. हॅकिंगचे प्रयत्न थांबले नाहीत. पुढे २२, २३ आणि २५ मार्च रोजी कम्यूनिकेशन डायरेक्टर जेनिफर पामिरी आणि हिलरी ह्यांची स्वीय सचीव हुमा अबेदिन ह्यांच्या इमेल्स देखील हॅकर्सच्या हातात पडल्या. 

एप्रिलमध्ये हॅकर्सनी आपली व्याप्ती वाढवून संपूर्ण डेमोक्रॅटिक पक्षाच्या देशाच्या अन्य भागातील सर्वच सभासदांना लक्ष्य बनवण्याचे प्रयत्न सुरु केले. १२ एप्रिल रोजी electionleaks.com आणि DCleaks.com अशा दोन साईटस् बुक करण्यात आल्या. डेमोक्रॅटिक पक्षामध्ये अस्वस्थता होती. ह्यानंतर म्हणजे २६ एप्रिल रोजी प्रो. मिफसूद ह्यांनी पापादूलोस ह्यांना हिलरी गटाच्या इमेल्स रशियाकडे असल्याची बातमी दिली होती. अखेर १० जून रोजी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाने सर्व कर्मचार्‍यांना बोलावून परिस्थितीची कल्पना दिली. आपापले कंप्यूटर्स पक्षाच्या हाती सोपवावेत अश सूचना दिल्या गेल्या. १४ जून रोजी पक्षाने आपल्या कंप्यूटर्सवरती काही तरी हल्ला होऊ शकतो अशी तक्रारही केली होती. हे सर्व होईपर्यंत इमेल्सचा मजकूर हॅकर्सच्या हाती पडला होता. 

जूनमधल्या गौप्यस्फोटानंतर सावरू पाहत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षावरती पुन्हा एकदा कुर्‍हाड कोसळली. २५ जुलै रोजी डेमोक्रॅटिक पक्षाचे फिलाडेल्फिया येथे अधिवेशन बोलावण्यात आले होते. इथे हिलरी ह्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळायची होती. पण काळ कठिण होता. २२ जुलै रोजी पुनश्च हॅक केलेल्या इमेल्स उजेडात आणल्या गेल्या. डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी निःपक्षपाती नाही आणि तिने छुप्या मार्गाने हिलरी कशा निवडून येतील त्यासाठी कारस्थाने केली आहेत असे दिसताच हिलरी ह्यांचे पक्षातील प्रतिस्पर्धी बर्नी सॅण्डर्स ह्यांचे समर्थक प्रक्षोभाने व्यासपीठावरती गेले. क्लिंटन ह्यांनी परिस्थिती शांतपणे हाताळून प्रकरण आटोपते घेतले. ज्या संमेलनामध्ये क्लिंटन डेमोक्रॅट पक्ष एकजूटीने निवडणुकीमध्ये काम करेल असा विश्वास व्यक्त करून जनतेपुहे ऐक्याचे चित्र निर्मान करण्याचा प्रयत्न करत होत्या त्या बेताला पाने पुसली गेली. पक्षातील दुफळी प्रकर्षाने पुढे आली. पण नुकसान एव्हढ्यावरतीच थांबले नाही. ह्या घटनेमुळे ट्रम्प ह्यांच्या हाती एक शस्त्र मिळाले. 

"सुपर डेलिगेटस नसते तर डेमोक्रॅटिक पक्षामध्ये हिलरी पडल्या असत्या आणि बर्नी सॅंडर्सच जिंकले असते" असे विधान करून ट्रम्प ह्यांनी हिलरी ह्यांच्या पक्षांतर्गत विजयावरती प्रश्नचिन्ह उभे केले. हिलरी बाईसाहेब अर्थातच "जखमी" झाल्या. ह्या सर्व हल्ल्यांच्या मागे एक परकीय शक्ती आहे ही जाणीव त्यांना अधिकच अस्वस्थ करत होती. ट्रम्प ह्यांनी ही संधी सोडली नाही. २७ जून रोजी एक अत्यंत विवादास्पद विधान त्यांनी केले - हे रशिया - मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. हिलरी ह्यांच्या ३०००० इमेल्स गायब आहेत त्या शोधायला घ्या!" 

हा संदर्भ होता बेन गाझी प्रकरणामध्ये खाजगी इमेल सर्व्हर वापरून हिलरी ह्यांनी पाठवलेल्या इमेल्स - कायद्याने त्या अमेरिकस सरकारच्या हाती सुपूर्द करण्याचे बंधन असून सुद्धा आता मला त्या मिळत नाहीत असा कांगावा हिलरी ह्यांनी केला होता. आणि त्यांच्या सहायकाने म्हटले होते की आमच्या सर्व्हरवरून डिलीट केलेल्या इमेल्स ज्या यूएसबीवरती ठेवल्या होत्या तीच हरवली आहे सबब इमेल्स देऊ शकत नाही. प्रयत्न करूनही एफबीआयला ह्या इमेल्स मिळवता आल्या नाहीत. 

ट्रम्प ह्यांनी ह्या गयब इमेल्सचा उल्लेख करून हिलरी गटावरती जोरदार हल्ला चढवला होता. शिवाय आपण एका परक्या देशाला ह्या इमेल शोधा म्हणतो आहोत ह्याचा विधीनिषेधही त्यांनी पाळला नाही. ह्या ट्रम्प ह्यांच्या एकाच विधानातून एफबीआय सीआय ए आणि डेमोक्रॅटिक पक्षातील यच्चयावत सर्वांची खात्री पटली होती की ट्रम्प म्हणजे पुतिन् ह्यांनी उभे केलेले अमेरिकन निवडणुकीमधले एक बाहुले आहे जे त्यांच्या इशार्‍यावरती नाचू शकेल. आता आपला हा निष्कर्ष अमेरिकन जनतेसमोर नेण्याची पक्षाला आणि हिलरी गटाला घाई झाली होती. 

हिलरींच्या गायब इमेल्स उघडकीला आनण्याचे आवाहन ट्रम्प ह्यांनी रशियाला केले म्हणजेच राष्ट्रघात झाला - राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे असे प्रतिपादन होऊ लागले. डेमोक्रॅटस् नी आपल्या वेबसाईटवरती पाच प्रश्न प्रसिद्ध केले आणि त्यांची जाहीर उत्तरे द्या असे आव्हान ट्रम्प ह्यांना दिले. देशद्रोहाच्या ह्या मुद्द्यावरती आपण ट्रम्प ह्यांना निर्विवादपणे हरवू अशी त्यांना १००% खात्री होती. ह्याच आत्मविश्वासामधून पुढच्या चुका डेमोक्रॅटस् करत गेले. हिलरी गटाने विचारलेले प्रश्न काय होते?

१. ट्रम्प ह्यांच्या पुतिनविषयक आकर्षणाचे मूळ कारण काय?
२. क्रेमलिनच्या निकटवर्तियांनी ट्रम्प ह्यांच्या आसपास कोंडाळे का केले आहे? ट्रम्प त्यांच्या सल्ल्याने का वागत आहेत?
३. पुतिन ह्यांना अमेरिकेने जे जे करावे असे वाटते नेमक्या त्याच कल्पना ट्रम्प आपले परराष्ट्रधोरण म्हणून का मांडत आहेत?
४. ट्रम्प ह्यांनी आपले टॅक्स रिटर्न्स जाहीर करण्याला नकार दिला आहे. मग त्यामध्ये त्यांचे आणि रशियन ढुढ्ढाचार्यांचे काय संबंध आहेत हे उघड होईल काय? 
५. अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप करा म्हणून ट्रम्प पुतिन ह्यांना प्रोत्साहन का देत आहेत?


वेबसाईटवरती प्रत्यक प्रश्नाचे छोटे उत्तरही दिले गेले होते. त्यातून निष्कर्ष निघत होता तो एकच ट्रम्प आणि रशिया - पुतिन ह्यांचे साटेलोटे!! हे साटेलोटे नेमके कोणत्या मुद्द्यांवरती आहे हे वेबसाईटवरती लिहिण्यात आले नव्हते. ती जबाबदारी "विश्वासू" प्रत्रकारांनी पार पाडायची होती. फ्यूजन जीपीएसची नेमणूक डेमोक्रटिक पक्षाने ह्या कामाकरिताच केलेली होती. 

(अपूर्ण)

No comments:

Post a Comment