Monday 26 March 2018

हिलरी ह्यांचे षड्यंत्र भाग ३

Image result for mccabe

अगदी अनवधानाने आणि निष्काळजीपणाने हिलरींनी काही गोपनीय इमेल्स आपल्या खाजगी इमेल सर्व्हरवरून पाठवल्या असे चित्र जरी उभे करण्यात आले होते तरी देखील ’निष्काळजी"पणाचे सर्टिफिकेट हिलरींना देणारे स्वतः खरोखरच आपल्या निर्णयाबाबत आश्वस्त होते का? प्रथम असा विचार करा की अशा प्रकारे खाजगी सर्व्हरवरून इमेल पाठवणे कितपत योग्य आहे? आज एखाद्या सामान्य नोकरदाराची नोकरीही अशा प्रकारासाठी जाऊ शकते मग हिलरींनी - येल सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या आणि अमेरिकन सरकार मध्ये स्टेट सेक्रेटरी सारखे महत्वाचे पद भूषवणारी व्यक्ती जर असे वागू लागली तर तिला त्याबद्दल काय दंड दिला जावा? की तसे न करता तिला सोशून देण्यात आले तर पुढच्या कर्मचारीवर्गाला आपण काय संदेश देत आहोत असा विचार कोणाला कसा करावासा वाटला नाही? 

प्रश्न अनवधानाचा आणि निष्काळजीपणाचा असेल तर आता पुढच्या तपशीलाकडे जाऊ. एखादी गोपनीय इमेल आपल्याला आली आणि अनवधानाने आपण ती दुसर्‍या कुणाला पाठवली असे होऊ शकते. पण व्हाईट हाऊसच्या इमेल्सबद्दल इतके सोपे स्पष्टीकरण देता येत नाही आणि कोणी दिले तर मानता कामा नये. कारण साध्या इमेल्स - गोपनीय इमेल्स आणि अतिगोपनीय इमेल्स ह्यांचे मूळ सर्व्हर पूर्णपणे वेगळे आहेत आणि ते एकमेकांशी जोडलेले नाहीत. अर्थात सर्व्हरवरून इमेलचा मसुदा जर दुसर्‍या कुणाला पाठवायचा असेल तर तो कॉपी पेस्ट करावा लागेल असे तुम्हाला वाटेल. पण प्रत्येक नेटवर्क साठी स्वतंत्र लॅपटॉप जोडलेला आहे. म्हणजे गोपनीय संदेश एका थम्ब ड्राईव्हवरती घेऊनच दुसर्‍या सर्व्हरवर टाकला जाऊ शकतो. ह्याला तुम्ही अनवधानाने म्हणाल काय? आणि अशी एखादी इमेल जर अटॅचमेंटसकट आली असेल आणि अटॅचमेंटमधील मजकूरही असाच दुसर्‍या कोणाला गेला असेल तर? ठीक आहे असे एखादे कागदपत्र कॉपी झाले असेल. पण अशा प्रकारे इकडचा माल तिकडे करायचे सत्र सरसकट वापरले जात होते. तपासपथकाला एक केस अशी मिळाली की जून २०११ मध्ये एका कर्मचार्‍याला गोपनीय इमेल अशा तर्‍हेने पाठवता येईना. हिलरी बाईंनी त्याला आज्ञा दिली की त्या कागदपत्रावरील गोपनीय शीर्षक उडवून टाक आणि मग साध्या इमेल्स वरून तो संदेश पाठव. हे काम इतके वेळा करावे लागे की ३-४ इमेल्समध्ये कर्मचारी शीर्षक बदलायलाही विसरले. काही कागदपत्रामध्ये मजकूराच्या समासामध्ये C हे अक्षर दिसले. मूळ Confidential शब्द बदलून फक्त आद्याक्षरच ठेवण्यात आले होते. पण त्याच्या आधी वा नंतर A B ही अक्षरे वापरलेली दिसत नसूनही पथकाने विचारणा केल्यावरती हिलरी बाई म्हणाल्या की हे तर A B C मधला एक परिच्छेद आहे असे मल वाटले. शुद्ध थापा. जर जेम्स कोमी ह्यांनी हिलरी ह्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई करायचे म्हटले असते तर प्रकरणाचे दोरे ओबामा ह्यांच्यापर्यंत पोहोचले असते. 

साहजिकच जेव्हा जेम्स कोमी ह्यांनी ५ जुलै रोजी वार्ताहर परिषद घेऊन हिलरी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार नाही असे जाहीर केले तेव्हाची परिस्थिती लक्षात घ्या. ऐन अध्यक्षीय निवडणुकीवरती लक्षणीय प्रभाव टाकणारा निर्णय कोमी ह्यांना घ्यायचा होता. हिलरींवरती दोष टाकला असता तर लोकमत ट्रम्प ह्यांच्याकडे वळले असते. दुसरी शक्यता काय होती? पुढे मतदानामध्ये दिसून आले तसे ५०% अधिक मते हिलरींना मिळाली ते हिलरींचे मतदार खवळून उठले असते. आपल्या उमेदवारावरती जाणून बुजून खोटे आरोप लावले जात आहेत जेणेकरून त्यांची उमेदवारी निष्प्रभ ठरावी. अशा लोकक्षोभामध्ये तेल घालायचे काम अर्थातच डेमोक्रॅट पक्षाने केले असते. कदाचित परिस्थितीने असे वळण घेतले असते की गुन्हा दाखल करण्याचा निर्णय योग्य असूनही अयोग्य ठरला असता. बरे गुन्हा दाखल न करावा तर आणि कल्पना करा की हिलरी निवडून आल्या असत्या तर निर्वाचित अध्यक्षावरती पुढे मागे गुन्हा दाखल करण्याचा आणखीनच अप्रिय निर्णय घेणे एफबीआयला भाग पडले असते. तेव्हा कोमी ह्यांची एकप्रकारे कुचंबणा होती हे मानले पाहिजे. 

तपासांतर्गत काही बाबी कोमी ह्यांच्या नजरेत आल्यानंतर त्यांना हे प्रकरण इथेच मिटणार नाही ह्याची कल्पना आली असावी. म्हणूनच त्यांनी निदान हलगर्जीपणाचा ठपका हिलरींवरती ठेवून घेतला. शिवाय अन्य काही व्यक्ती देखील त्यामध्ये अडकू शकल्या असत्या ह्याचाही त्यांना अंदाज आला असावा. म्हणजेच कोमी ह्यांना तपास जे दाखवत होता त्यावरती आधारित नव्हे तर "politically right" निर्णय घेणे परिस्थितीने भाग पडले होते.

७ जुलै रोजी ह्या प्रकरणाची पुनश्च चौकशी करण्याचे जाहीर झाले तेव्हा कोमी ह्यांनी त्यासाठी काही अधिकारी नियुक्त केले. तपासपथकासाठी डेमोक्रॅटिक विचाराचा माणूस असेल तर ठीक होईल अशी धारणा होती. हे काम अण्ड्र्यू मॅककेब ह्यांच्यावरती सोपवल्यावरती डेमोक्रॅटस् खूश झाले असावेत. मॅककेब एफबीआय मध्ये डेप्यूटी डायरेक्टर होते. एफबीआयमध्ये जुन्या काळी त्यांच्यासारख्या उच्च पदावरती पोचण्याआधी अन्य अधिकार्‍यांना तळापासून कष्टाचे काम करावे लागत असे. पण मॅककेब हा अपवाद होता. त्यांना कधी चोरांच्या मागे पाठलाग करावा लागला नव्हता. ही पिढी नवी होती. ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर भरती झालेले नवे अधिकारी दहशतवाद विरोधी पथकामध्ये थेट कामाला लागत. राष्ट्रीय सुरक्षा राबवताना दहशतवाद विरोधी पथकात कामे केलेल्यांना झटपट बढत्या मिळाल्या होत्या. न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन खेपा घालत ते वर चढले होते. उर्वरित देश आणि गुन्हेगारीबद्दल दांडगा अनुभव घेण्यासाठी ह्या नव्या पिढीला  संधीही मिळाली नव्हती. आपल्या कामाच्या निमित्ताने त्याने आपले असे एक वर्तुळ बनवले होते आणि अनेक व्यक्तींशी चांगले वैयक्तिक संबंध जोडले होते. मॅककेबची पत्नी डेमोक्रॅटीक पक्षातर्फे व्हर्जिनिया राज्यातील कायदेमंडळाच्या निवडणुकीला २०१५ साली उभी राहिली होती. व्हर्जिनियाचे गव्हर्नर टेरी मॅक ऑलिफ ह्यांच्या हाताखाली काम करणार्‍या डेमोक्रॅटीक पक्षाने हिलरी ह्यांना निवडणुकीसाठी पाच लाख डॉलर्स मिळवून दिले होते. टेरी ह्यांच्याबरोबर मॅककेबची पत्नीही हे काम करत होती. डेमोक्रॅटीक पक्षाशी सलगी हा एक भाग होता पण ह्या तपासामध्ये डिपार्टमेंट ऑफ जस्टीसबरोबरही - DOJ - डीओजेशी संबंध उत्तम असणे गरजेचे होते. हूवर बिल्डिंगच्या समोरच असलेल्या डीओजेच्या बिल्डिंगमध्ये हार्वर्डमधून कायदा विषयातील उच्चविद्याविभूषित "आफ्रिकन-अमेरिकन" अटॉर्नी जनरल लॉरेटा लिन्च ह्यांचे ऑफिस होते. आणि त्या ह्या प्रकरणामधील सर्व तपास बारकाईने बघणार होत्या. (अमेरिकन व्यवस्थेमध्ये पोलिसांकडे असलेले पुरावे न्यायालयामध्ये टिकतील की नाही ह्याची छाननी करून मग त्यावर आधारित कोणती कलमे लावायची ते जस्टीस डिपार्टमेंट सांगेल तसे लावून काम होत असते. तेव्हा अटॉर्नी जनरल ह्यांचे मत महत्वाचे होते. तपासाच्या कामी प्रतक्ष हिलरी ह्यांनाही पाचारण करावे लागेल तेव्हा अध्यक्षप्दाच्या उमेदवार असलेल्या हिलरी ह्यांची चौकशी योग्य मान राखून होणे महत्वाचे होते. कदाचित त्याच अध्यक्ष म्हणून जिंकूही शकल्या असत्या. तेव्हा तपासपथकासाठी योग्य अधिकारी नेमणे गरजेचे होते. मॅककेब ह्यांच्यासोबत असेच दोन अधिकारी देण्यात आलेले होते. पीटर स्ट्रेझॉक आणि लिझा पेज ह्यांची नेमणूक ऑपरेशन मिड इयर एक्झाम साठी करण्यात आली होती. पीटर देखील मॅककेबसारखाच नव्या पिढीमधला अधिकारी होता. दहशतवादविरोधी पथक आणि कायदा ह्यांच्याशी निगडित कामे त्याने केलेली होती. त्याच कल थोडासा रिपब्लिकन पक्षाकडे असला तरी तो हिलरीला भीत असे. आणि ट्रम्प ह्यांनासुद्धा. नेमस्तपणे मध्यममार्ग अनुसरणारा अधिकारी अशी त्याची ओळख होती. अशा ह्या कठिण खटल्यामध्ये त्याची कसोटी लागणार होती. सोबत असलेली लिझा मात्र स्मार्ट होती. दोघांचेही लग्न झालेले असूनही दोघे एकमेकांच्या प्रेमातच पडलेले होते. लिझा अगदी टिपिकल उच्चविद्याविभूषित उच्चभ्रू वर्गातील महिलेसारखी विचार करायची. तिला ट्रम्प आवडणे शक्यच नव्हते. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून ट्रम्प ह्यांचे नाव नक्की झाल्यानंतर ह्या समविचारी दोघांमध्ये त्याविषयावरती बरीच खुसखुस चालत असे. आपल्याकडे येणारी माहिती पत्रकारांना पुरवून आपण कसे महत्वाचे आहोत ह्याचा आनंद दोघे घेत असत. हिलरी प्रकरणात सनसनाटी बातम्या पेरण्याचे काम ते उत्साहात करत होते. मॅककेब -- लिझा पेज आणि पीटर हे त्रिकूट जमले होते. आपल्याच नादामध्ये ही मंडळी मग्न असली तरी भोवताली राजकारण वेगात पळत होते. 

(अपूर्ण)

No comments:

Post a Comment