Wednesday 21 March 2018

हिलरी ह्यांचे षड यंत्र भाग १

Image result for hillary charlotte


१९९३ ते २००० पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष असलेले श्री बिल क्लिंटन आणि त्यांची पत्नी हिलरी रॉडहॅम क्लिंटन ह्यांच्या राजकीय आणि खाजगी आयुष्याबद्दलच्या विवादांना कधी पूर्ण विराम मिळेल असे वाटत नाही. इंटरनेट वरती शोधले तर त्यांच्याबद्दलचे समज गैरसमज अपसमज ह्यांनी खचाखच भरलेले साहित्य पोत्याने हाताशी लागेल. इतके की त्यामधले कोणते स्वीकारायचे आणि कोणते फेकून द्यायचे ह्याविषयी आपल्या मनात किंतु निर्माण व्हावा. खरे तर त्यांच्याविषयीच्या बाबींमुळे असे किंतु जनतेच्या मनात निर्माण होत नाहीत तर त्यांच्या कृती आणि हेतूंविषयी मात्र अनेक जण साशंक आहेत हे नक्की. असे असले तरीदेखील २०१६ च्या अमेरिकन अध्यक्ष पदाच्या नवडणुकीमध्ये श्रीमती हिलरी ह्यांना ट्रम्प ह्यांच्या पेक्षा गोळा बेरीज अधिक मते मिळाली होती तसेच अमेरिकेच्या ज्या प्रांतांमधून राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा येतो त्या प्रातांमध्ये आपल्याला ट्रम्प ह्यांच्यापेक्षा निर्विवाद आघाडी मिळाली होती असे हिलरी ह्यांनी इंडिया काँक्लेव्ह  २०१८ मध्ये उपस्थित राहून आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. त्यातून त्या असे सूचित करू पाहतात की विचारी आणि अर्थार्जन करू शकणाऱ्या अमेरिकन जनतेने आपल्याला स्वीकारले तर कोणत्या ना कोणत्या कारणाने अर्थार्जनाचे साधन नसलेल्या नागरिकांनी मात्र सामाजिक अन्यायाच्या अन्य विषयासंदर्भातील सरकारवरील रोषाला वाट करून देण्यासाठी ट्रम्प ह्यांना मतदान केले. 

थापेबाज क्लिंटन दाम्पत्य आणि तेवढेच थापेबाज बाराक ओबामा ह्यांच्याविषयी लिहायचे म्हटले तर एखादे पुस्तक कमी पडावे. २०१२ च्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी ला दोन महिने उरले असता  ११ सप्टेंबरच्या  स्मृतीदिनी लिबियामधील अमेरिकन वकिलातीवरती इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करून अमेरिकेचे राजदूत जे. क्रिस्तोफर स्तीफॅन्स  - अधिकारी शॉन स्मिथ, टायरॉन वूड्स आणि ग्लेन दोहरती ह्यांना ठार मारले. क्रिस्तोफर ह्यांनी वारंवार विनंती करूनही त्यांना संरक्षण देण्यात आले नव्हते. ह्या प्रकारामध्ये अधिकाऱ्यांचे बळी गेल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने त्यावरती पांघरूण घालण्याचे प्रयत्न केले. निवडणूक पार पडेपर्यंत ओबामा ह्यांच्या विरोधामध्ये काही लिहिले जाऊ नये म्हणून निर्वाणीचे प्रयत्न केले गेले. 

बेन गाझी प्रकरण दडपण्यात डेमोक्रॅट्सना यश आले त्यात नवल नाही कारण सत्तेवरती पुन्हा ओबामाच आरूढ झाले. पण वर्तमानपत्रातून मात्र सरकारवरती टीका होत राहिली. ह्याला कारण होते ओबामा ह्यांचे इस्लामी दहशतवाद्यांशी सोयीचे असेल तेव्हा लगट करण्याचे आणि मुख्य म्हणजे त्यांना असेही करून न दुखावण्याचे धोरण. अमेरिका - मध्य पूर्व - युरोपमध्ये लिबरल्सनी जो  धुमाकूळ घालून ठेवला आहे त्याने अनेक प्रश्न चिघळत आहेत. त्यांच्या पूर्वग्रहदूषित धोरणांमुळे दुखावला गेलेला रशिया आणि त्याचे सत्ताधीश व्लादिमिर पुतीन ह्यांच्याशी अमेरिका योग्य संबंध राखू शकली नाही हे सत्य आहे. जिथे रशियाचे म्हणणे खरे होते तिथेसुद्धा रेटून खोटे बोलण्याचा धडाका कधी ना कधी अंगाशी येणार होताच. पण पुतीन ह्यांना आपण दुखावले ह्याचा इतका धसका डेमोक्रॅट्सनी घेतला आहे की आपल्या सर्व समस्यांचे मूळ त्यांना पुतीनप्रणित रशियामध्ये असल्यासारखे वाटते. एक काळ होता की भारतामध्ये इंदिराजी आपल्या सर्व समस्यांचे खापर अमेरिकन सीआयएवरती फोडत असता. "रॉ" चे माजी ऍडिशनल सेक्रेटरी श्री बी रमण ह्यांनी लिहिले होते की जिथे सीआयएचा काही संबंध नाही तिथेदेखील इंदिराजींना त्यांचा हात असल्याचा भास होत असे. आज डेमोक्रॅट्सची अवस्था तशी झाल्यासारखी दिसते.

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन अथवा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची प्रथा आहे. ह्यासाठी पक्षाच्या प्रतिनिधींनी आपला उमेदवार अंतर्गत निवडणुकीमधून निवडण्याचे बंधन आहे. जेव्हा हिलरी क्लिंटन ह्यांनी २०१६ च्या निवडणुकीला उभे राहण्याचा मानस व्यक्त केला तेव्हा त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून बर्नी सँडर्स पक्षांतर्गत लढा देत होते. सुरुवातीच्या काळामध्ये हिलरी ह्यांना ही निवडणूक कठीण जात होती. अडचणींवरती मात करत २०१६ च्या जूनमध्ये हिलरी आपले प्रतिस्पर्धी सँडर्स ह्यांच्या पुढे पोहोचल्या आणि अंतीमतः त्याच पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडल्या जातील अशी चिन्हे दिसत असूनही सँडर्स ह्यांनी माघार घेतल्याचे जाहीर केले नव्हते. राष्ट्रीय पातळीवरील लढतीमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प असतील तर आपण अध्यक्षीय लढाई अगदी आरामात जिंकू शकतो असा हिलरी गटाचा कयास असल्यामुळे रिपब्लिकन उमेदवार म्हणून ट्रम्प ह्यांची निवड कशी होईल ह्यास त्यांनी हात भार लावला होता. त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत होत्या. कारण ट्रम्प ह्यांनी खरोखरीच रिपब्लिकन पक्षामध्ये बाजी मारत उमेदवारी पटकावली. 

ट्रम्प ह्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली म्हणून काही रिपब्लिकन सुद्धा नाके मुरडत होते. पण मला प्रथितयश रिपब्लिकनांचा पाठिंबा नसला तरी चालेल - मी जे मुद्दे मांडतो त्यावर अमेरिकेतील सामान्य जनता माझ्या मागे येईल असा विश्वास ट्रम्प दाखवत होते. तर दुसरीकडे अत्यंत एकांगी टोकाची मते मांडणारे ट्रम्प - राजकारणाचा काही अनुभव नसलेले ट्रम्प - महिलांविषयीची त्यांची यापूर्वी जाहीर झालेली मते - अमेरिकेच्या व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट (WASP) समाज गटाविषयीची त्यांची आस्था आणि पर्यायाने अन्य गटांवरती असलेले आक्षेप हे बघता ट्रम्प कधी व्यापक जनमत स्वतःकडे खेचून घेऊ शकतील अशी कल्पनाच हिलरी ह्यांनी केली नव्हती. 

रिपब्लिकन पक्षाने जेव्हा ट्रम्प ह्यांना आपले उमेदवार म्हणून निवडले तेव्हा हिलरी ह्यांनी जित मया म्हणून आनंद साजरा केला असेल. पण प्रत्यक्षात जेव्हा फासे उलटे पडायला सुरुवात झाली आणि ते अशा वेगाने पडू लागले की त्या धक्क्यांमधून त्या पुरेशा सावरल्याच नाहीत. यापूर्वी २००८ मध्ये जेव्हा त्यांनी डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार म्हणून येण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ओबामा ह्यांनी हरवले होते. ह्या निवडणुकीमध्ये हिलरी ह्यांचा इतका अमाप पैसा गेला की सरते शेवटी त्यांना स्वतः च्या खात्यातून शेवटचा खर्च करावा लागला. ह्या उलट ओबामा ह्यांनी इंटरनेटचा सुयोग्य वापर करत सर्व सामान्य अमेरिकनांकडून पैसे उभारत हिलरी ह्यांना हरवले. ह्या अनुभवातून जागे झालेल्या हिलरी ह्यांनी २०१६ च्या निवडणुकीसाठी इंटरनेटचा वापर चतुराईने करण्याचा प्रयत्न केला होता. (२०१६ मध्ये त्यांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प ह्यांनी पुन्हा एकदा इंटरनेटच्या साहाय्यानेच हरवले.)

हिलरी ह्यांच्या गावीही नसलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर निवडणुकीत होणार ह्याची अस्पष्ट कल्पना देखील त्यांना नव्हती. किंबहुना ट्रम्प ह्यांनाही ती नसावी असे दिसते. आठ वर्षांच्या ओबामा ह्यांच्या कारकीर्दीच्या झळा सोसलेल्या रशियाला हिलरी बाईसाहेब नको होत्या. वेगळ्या कारणांसाठी इस्राएललासुद्धा त्या नकोच होत्या. त्याला अर्थात कारणीभूत होते ते त्यांचे थापेबाजीचे राजकारण. ह्या थापेबाजीमध्ये त्यांनी अनेकांना लालूच दाखवून आणि मिळणाऱ्या फायद्यांमध्ये लुटीचा हिस्सा देऊन सामील करून घेतले होते. आठ वर्षांच्या ओबामा कारकीर्दीमध्ये उदयाला आलेल्या अनेक व्यक्ती हिलरी ह्यांना निवडून आणण्यामध्ये प्रयत्न करत होत्या. वरकरणी अमेरिकन समाजजीवनाची मूल्ये आपण जपतो म्हणून आढ्यताखोरी करणाऱ्या ह्या व्यक्ती अत्यंत घृणास्पद राजकारण करत होत्या आणि ते जनतेसमोर आणणे गरजेचे होते. हिलरी रॉडहॅम क्लिंटन हा अमेरिकन जीवनामधला एक सर्वात मोठा फ्रॉड आहे. आणि त्याला उघडे पाडण्यातच अमेरिकेचे हित आहे असे मानणारेही खूप लोक होते. ह्या सर्व व्यक्ती समानशीलेशु व्यसनेषु सख्यम न्यायाने हिलरी ह्यांना हरवण्यासाठी  एकत्र आल्या होत्या. 

त्या प्रयत्नांमधून हिलरी ह्यांचे मायावी रूप आणि जग जनतेसमोर आणण्यात आले. लोकांसमोर पहिला बुरखा फाडला गेला तो डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीचा. पक्षीय उमेदवारीच्या निवडणुकीमध्ये ह्या कमिटीने तटस्थ राहून आपले काम बजावले पाहिजे असा संकेत आहे. पण प्रत्यक्षात हिलरी ह्यांचे पक्षातील प्रतिस्पर्धी सँडर्स ह्यांना कमिटीने तोंडघशी पाडण्याचे उद्योग चालवले होते. १५ जून रोजी गुसिफर नामक व्यक्तीने कमिटीच्या सदस्यांच्या हजारो इमेल्स हॅक केल्या व प्रसिद्ध केल्या. ह्याने कमिटीच्या सदस्यांचे बिंग फुटले आणि हिलरी बाईसाहेब अडचणीत आल्या. हिलरी ह्यांच्या प्रचारमोहीमेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारी कमिटी उघडी पडली. कमिटी तटस्थपणे आपले काम करत नसल्याची तक्रार सँडर्स ह्यांचे समर्थक करत होते पण त्यांच्या हाती पुरावा नव्हता. गुसिफर ह्यांच्या गौप्यस्फोटामुळे हे पुरावे केवळ सँडर्स समर्थकांच्या नव्हे तर सामान्य अमेरिकन जनतेच्या हाती लागले. ह्या घटकेपर्यंत स्पर्धेमध्ये हिलरीच जिंकणार हे स्पष्ट होऊन सुद्धा सँडर्स ह्यांनी माघार जाहीर केली नव्हती. कमिटीच्या पक्षपाती वागणुकीचे पुरावे हाती आल्यानंतर नैतिक जबाबदारी घेत एक तर कमिटीने प्रक्रियेमधून दर व्हायला हवे होते तसेच हिलरी ह्यांनी सुद्धा ह्या मुद्द्यावरती माघार घ्यायला हवी होती. पण नैतिकतेचा मुखवटा चढवलेल्या ह्या लबाडांना असे काही करण्याची बुद्धी होणे अशक्यच होते. इमेल्सच्या प्रकटीकरणाने अमेरिकन जनता धास्तावली. पण आपल्या एकतर्फी वागणुकीबद्दल क्षमा याचना करण्याचे सोडून हिलरी समर्थक आपल्या गोपनीय इमेल्स हॅक केल्या गेल्यामुळे आपलाच हक्कभंग झाल्यासारखे बोंब मारू लागले. त्यामुळे ही बाजू अमेरिकन जनतेसमोर अधिकच लंगडी झाली. इमेल्स प्रकाशात आल्यामुळे आपली राजकीय बाजू लंगडी झाली आहे आणि विश्वसनीयता धोक्यात अली आहे असे त्यांच्या गावीही नव्हते कारण ट्रम्प जिंकूच शकत नाही ह्यावर त्यांची जणू श्रद्धाच बसली होती. 

गुसिफरने माध्यमांकडे प्रसिद्धीस दिलेले काही दस्तावेज बोगस होते असे पुढे दिसून आले. पण प्रत्यक्षात त्या क्षणी मात्र अशी शहानिशा करण्यासाठी कोणालाच वेळ नव्हता. गौप्यस्फोटानंतर काही अमेरिकन माध्यमांनी गुसिफर कोण आहे शोधून काढत त्याच्याशी संपर्क साधला. त्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने आपण रोमेनियन नागरिक असल्याचे सांगितले परंतु रोमेनियन भाषेमध्ये उत्तरे लिही असे सांगताच त्याची उत्तरे गूगल मधून भाषांतर केल्यासारखी दिसू लागली. आणि त्याच्या सत्यकथनावरती प्रश्नचिन्ह उभे राहिले. इतकेच नव्हे तर रोमेनियन अशी आपली ओळख सांगणारी ही व्यक्ती प्रत्यक्षात रशियन नागरिक असावी असे तर्क लढवले जाऊ लागले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमिटीच्या इमेल्स हॅक कशा झाल्या ह्याचीच चर्चा माध्यमांमध्ये होत राहिली पण त्या इमेल्स मधला आक्षेपार्ह मजकूर काय होता ह्यावरती कोणीच चर्चा करे ना. राईट टू प्रायव्हसी त्यांच्यासाठी मोठा होता. त्याच्या पडद्या आड भले आम्ही खूनही करू पण आमच्या इमेल्स वाचण्याचा हक्क अबाधित का राहिला नाही ह्याचे दुःख मोठे होते. 

संकटाच्या समयी अवघा डेमोक्रॅट पक्ष आपल्यामागे एकवटेल ही हिलरी ह्यांची अशा धुळीस मिळणार असे दिसू लागताच ओबामा ह्यांना आपले वजन खर्ची घालत सूर मारावा लागला. नार्थ कॅरोलिनाच्या शार्लट शहरातील पक्षाच्या सभेमध्ये ५ जुलै रोजी ओबामा ह्यांनी "हिलरी ह्यांच्या मागे सभासदांनी एकत्र यावे आणि आपला मुख्य सामना ट्रम्प ह्यांच्याशी आहे" अशी आठवण करून दिली. ओबामा ह्यांनी सभेमध्ये उपस्थित राहण्यामागे केवळ इमेल्स हॅक झाल्या हे कारण नव्हते. मामला थोडा पुढे सरकला होत.

(अपूर्ण) 






2 comments:

  1. pudhacha bhag lavkar taka, utkantha vadhali ahe

    ReplyDelete
  2. एखादी रहस्यमय कादंबरी वाचल्या सारखे वाटते आहे खूप छान लिहिले आहे तूम्ही

    ReplyDelete