Saturday 4 May 2019

जाॕर्डनमधील असंतोष - भाग १

३ मे रोजी जाॕर्डनचे राजे अब्दुल्ला २ यांनी आपल्या गुप्तचर खात्याचे प्रमुख मेजर जनरल अदनान अल झुंडी यांना डच्चू देत त्या जागेवर मेजर जनरल अहमद हुस्नी यांना लेफ्टनंट जनरल पदाची बढती देऊन नेमणूक केली असल्याचे जाहीर केले.

याच जोडीला शाही दरबारचे प्रमुख सल्लागार अन्वर अली फलेह अल अयस्रा यांनाही डच्चू दिला गेला असल्याची बातमी आली. त्यांच्या कार्यालयातील अनेक वरिष्ठ सल्लागार व अधिकाऱ्यांनी या अगोदर राजीनामे टाकले होते.

परंतु सरकारी वृत्तसंस्था पेट्राने २४ एप्रिल रोजी अशी बातमी दिली होती की दरबारातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यात फैसल जिब्रिल अल शोबाकी यांचाही समावेश होता.  त्यांच्या जागेवर बिशर अल खासोने यांची राजाचे सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. याबरोबर कमाल अल नासेर यांची धोरण व माहिती सल्लागार तर मनार अल दबास आणि मोहमद अल असास यांची राजाचे खास सल्लागार म्हणून नेमणूक झाली.

इतकेच नव्हे तर पोलिस यंत्रणेत तसेच लष्करी आस्थापनातही मोठे बदल करण्यात आले असून ते अजून प्रकाशात आलेले नाहीत. तसेच बदलांची ही लाट इथेच थांबणार नसून आणखीही काही बदल लष्करी नेमणुकात तसेच राजवाड्याशी संबंधित अधिकारी पदात केले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

इतके व्यापक बदल करण्याची पाळी राजावर का आली असा सहज प्रश्न मनात उद् भवतो. जाॕर्डनची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. गेल्या वर्षी प्रचंड आर्थिक तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला.  तूट कमी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान हानी अल मुलकी यांनी अनेक उपाययोजना करण्याचे ठरवले. त्यामध्ये पेट्रोलची किंमत वाढवण्याचा आणि अधिक आयकर लादण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाने बिथरलेली जनता थेट रस्त्यावर आली. हानी यांच्या विरोधातील निदर्शनांची तीव्रता बघता त्यांना जून २०१८ मध्ये राजीनामा सादर करावा लागला होता.

याच पार्श्वभूमीवर आतादेखील निदर्शनांची लाट येईल या भीतीने राजाने ही पावले उचलली असावीत. पंतप्रधान ओमर रझाझ यांच्या विरोधात आंदोलन उभे करण्याचे कारस्थानात ही वरिष्ठ अधिकारी मंडळी गुंतली होती असा संशय आहे. यावेळी आंदोलने राजवाड्याबाहेर घडवून आणण्याचे घाटत होते.

कल्पना करा की ज्या कटामध्ये पोलिस यंत्रणा गुप्तचर यंत्रणा लष्करी आस्थापन यांच्या जोडीला राजवाड्याची प्रमुख सल्लागार मंडळी सामील असतील त्याची व्याप्ती किती मोठी असेल - किती काळ ही तयारी करण्यात येत होती - त्याचा सूत्रधार कोण आणि बाहेरील मदतीशिवाय हे शक्य आहे काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आसले तरी त्याची उत्तरे मात्र लगेचच उपलब्ध नाहीत.

हे कारस्थान दुर्लक्ष करण्याजोगे अजिबात नव्हते तसे नसते तर राजाने आपल्या नव्या गुप्तचर प्रमुखाला एक पत्र लिहून चिंता व्यक्त केली नसते आणि असे पत्र प्रसिद्धीस तर बिलकुल दिले नसते.

२ मे रोजी राजाने अहमद हुस्नी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले की खात्याच्या कारभारात त्रुटी आहेत. अशा प्रकारे आपल्याच गुप्तचर खात्याच्या कारभारावर टीका करणारे जाहीर पत्र राजाने जाॕर्डनच्या इतिहासात पहिल्यांदाच लिहिल्याचे दिसते. राजाने पुढे म्हटले होते की इथे काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नियमांची पायमल्ली केली आहे. खरे तर या खात्याच्या इतिहासात अनेक गौरवशाली कामगिरीची नोंद आहे. पण काही मूठभर व्यक्तींनी देशहिताला मूठमाती देऊन आपल्या स्वार्थासाठी अधिकाराचा दुरूपयोग केला आहे. या मूठभर व्यक्तींना पद आणि अधिकारासोबत जबाबदारी आणि जबाबदेही देखील येत असते याचा विसर पडला आहे. ह्या परिस्थितीत तात्काळ सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे. अशा मूठभरांच्या वागण्यातून एक वैभवशाली परंपरा असलेल्या संस्थेच्या कामाला गालबोट लागता कामा नये तसेच त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागू नये म्हणून व कामाचे मूल्यमापन मूठभरांच्या वागण्यावरून केले जाता कामा नये म्हणून खबरदारी घेतली गेली पाहिजे.

जाॕर्डनच्या परिसरात एक विलक्षण नाजूक परिस्थिती असून यातून अनेक अनपेक्षित बदल आणि आव्हाने उभी राहतील अशी लक्षणे आहेत. जगामध्ये तणावपूर्वक वातावरण आहे. देशातील सत्ता कमकुवत करण्याचे आणि राजसत्ता खिळखिळी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी हुस्नी यांनी कणखरपणे आपले खाते चालवावे असे प्रतिपादन राजाने केले आहे.

या पत्रामध्ये व्यक्त झालेल्या चिंता बघता राजाने देशातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे ठरवले आहे हे उघड झाले आहे. देशांतर्गत तसेच जवळच्या प्रदेशातील स्थैर्याबाबत ते अत्यंत संवेदनशील असल्याचे दिसत आहे.

संपूर्ण राज्य यंत्रणा अशा प्रकारे जेव्हा बंड करून उठते तेव्हा त्यामागे केवळ आर्थिक दुरवस्था हे कारण असू शकत नाही. (काही महिन्यांपूर्वी भारतातही आयबी सीबीआय राॕ तसेच काही लष्करी अधिकाऱ्यांनी कशी उचल खाल्ली होती हे आपल्या स्मरणात असेल). चार अधिकाऱ्यांनी काही केले म्हणून देश कोसळला नाही तरी खिळखिळा होऊ शकतो.

म्हणजेच जसे इंग्रजी मध्ये Shoe is pinching elsewhere म्हणतात तसे या असंतोषाच्या मागे भलतीच कारणे आहेत ज्यांचा स्पष्ट उल्लेख झालेला दिसत नाही.

जाॕर्डनचे राजे अब्दुल्ला २ यांच्या मनाविरोधात अमेरिका पॕलेस्टाईन शांतता आराखडा पुढे ढकलत आहे पण जाॕर्डनचे राजे मात्र त्याला विरोध करत असल्यामुळे त्यांच्या विरोधात हा असंतोष असल्याचे वातावराण निर्माण केले जात आहे काय? या प्रश्नाचे उत्तर पुढील भागात बघू.




1 comment:

  1. खूप दिवसांनी लेख लिहिला ताई आम्ही अक्षरशः दररोज नवीन काही लिखाण आले आहे का ते येऊन पहायचो

    ReplyDelete