Monday 22 January 2018

सिंजोना भाग ८

१९४६ मध्ये मिलान शहरामध्ये येताना सिंजोनाने आपली पत्नी आणि मुलाला मसिना येथेच ठेवले होते. मिलानमध्ये आल्यानंतर त्याने वित्तविषयक बाबींवरती वर्तमानपत्रातून लेख लिहिण्याचे काम सुरु केले. त्यामुळे व्यावसायिकांच्या बड्या  वर्तुळातील लोक त्याला ह्या विषयातील तज्ज्ञ म्हणून ओळखू लागले. मसिना येथील टॅक्स ऑफिसमध्ये केलेल्या कामामधून आत्मसात केलेल्या टॅक्स बुडवण्याच्या विविध क्लृप्त्या, डबल बिलिंगचे तंत्र आणि सुपीक डोके ह्या भांडवलावरती काम सुरु करताना त्याने जपून पावले टाकली होती. अगदी ऑफिससाठी भाड्याने जागा घ्यायची तर नगद भाडे न देता त्याने त्याबदल्यात मालकाला आपली कन्सल्टन्सी देऊ केली होती. टॅक्स चुकवण्याच्या युक्त्यांव्यतिरिक्त त्याने पैशाच्या गुंतवणुकीचे वेगवेगळे किफायती मार्ग शोधून काढले होते. त्यातलेच एक म्हणजे मिलान शहराभोवतालची जमीन. चढत्या क्रमाने प्रगती होत असणार्‍या मिलान शहरामध्ये काही वर्षातच जमिनीला सोन्याचे भाव येतील असा त्याचा होरा होता. त्यात गुंतवणूक करताना त्याने राओल ब्यासी ह्या मित्राबरोबर भागिदारी करण्याचे ठरवले. जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी ब्यासी काही फार उत्साही नव्हता. पण नेहमीप्रमाणे सिंजोनाला आपल्या निर्णयावर विश्वास होता. आणि खरोखरच काही वर्षातच त्या जमिनीचे कित्येक पटीने भाव वाढले . मीटरमागे १०० लिरा खरेदी किंमत अधिक दोनशे लिरा वरती खर्चून त्याने जमीन ३००० लिरांना विकली. अमाप फायदा त्याने खिशात टाकला आणि तो लक्षाधीश झाला. 

हळूहळू इतका पैसा हातात खेळू लागला की त्याने पत्नीला फोन करून सांगितले की आता तुम्ही इथे येऊ शकता, आपण एकत्र राहू शकतो. मिलानमध्ये सिंजोनाने व्हिया व्हिस्कॉन्ती दि मोद्रोने ह्या प्रतिष्ठेच्या रस्त्यावरती आलिशान घर घेतले. घर आणि ऑफिस ह्या दोन्ही वास्तूंमध्ये पोललेलोची शिल्पे - प्याझेतोची चित्रे अशी गर्भश्रीमंताच्या घरात शोभेल अशी सजावट होती. 

वयाची तिशी पूर्ण व्हायच्या आत १९४९ मध्ये फार्मा युरोपा ही कंपनी त्याने विकत घेतली. तिचे काम बघण्यासाठी त्याने वडिलांना मिलान येथे बोलावून घेतले. अकाउंटनसीच्या जोडीला आज ज्याला इन्व्हेस्टमेंट बॅंकर किंवा पोर्टफोलियो मॅनेजमेंट असे झोकदार शब्द प्रचलित झाले आहेत ते काम सिंझोना १९४६ नंतर मिलानमध्ये करत होता. पैसा द्विगुणित करण्याचे त्याचे कसब बघून मोठमोठे लोक त्याच्याकडे येऊ लागले. ज्या कंपन्यांची स्थिती विशेष ठीक नाही असे वाटेल त्यांच्याकडून सल्ला देण्याच्या बदल्यामध्ये सिंजोना रोखीने पैसे न घेता कंपनीचे शेयर्स घेऊन ठेवत असे. अशा तर्‍हेने केवळ मिलानमध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्याचे नाव गाजू लागले. सिंजोनाने परकीय चलनाच्या व्यवहारांचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यामधल्या पळवाटा समजून घेतल्यावर त्याने स्वित्झरलँडच्या बँकांमध्ये अनेक गुप्त खाती उघडली होती. ही खाती वापरून तो आपल्या अशिलांना त्यांचे पैसे हवे तसे फिरवून देत असे. 

जर्मनीच्या कचाट्यामध्ये आपल्या कंपन्या येऊ नयेत म्हणून लिश्टेनस्टाईन ह्या छोट्या देशातील राजाने त्यांचे भांडवल सुरक्षित राखण्यासाठी अनेक कायदे केले होते. त्यांचा गैर(??)वापर करण्यामध्ये सिंजानाचे सुपीक डोके भन्नाट काम करत होते.  पुढच्याच वर्षी म्हणजे १९५० मध्ये लिश्टेनस्टाईन येथे फासो एजी ही वित्तव्यवहारातील कंपनी त्याने विकत घेतली. आज शेल कंपन्या ही संज्ञा डिमोनेटीझशनमुळे आपल्याला माहिती झाली आहे. पण सिंजोनाला हे छुपे काम १९५० मध्येच ज्ञात झाले होते. कारण फासो ही अशीच एक शेल कंपनी म्हणून त्याने स्थापन केली होती. फासो ही कंपनी त्याच्या आर्थिक साम्राज्याचा पाया बनून गेली. १९५२ मध्ये इटालियन एडिटोरियल इन्स्टिट्यूट नामक प्रकाशनसंस्था त्याने विकत घेतली. त्याचा भाऊ एनियो कलाक्षेत्रामध्ये नाव कमवू लागला होता. त्याच्या हाती इ लिब्रि दि आर्ट नामक प्रकाशनाची सूत्रे सिंजोनाने दिली. १९५७ मध्ये वडिल निवर्तल्यानंतर फार्म युरोपा कंपनी त्याने विकून टाकली. 

फ्रँको मरिनोती टेक्सटाईल उद्योगात स्निया व्हिस्कोसा ह्या कंपनीचे मालक होते. तर रिचार्डो जुलिनो आणि जुवानी आग्नेली (फियाट कंपनीचे उपाध्यक्ष) ह्यांनी त्यात गुंतवणूक केली होती. कृत्रिम धागे बनवण्याचे तंत्र पहिल्या महायुद्धाच्या आधीपासून माहिती झाले होते पण स्निया ह्या कंपनीने प्रथमच रेयॉनचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादन सुरु केले होते. त्यामुळे इटलीची सर्वाधिक उलाढाल करणारी कंपनी म्हणून तिची सर्वत्र ख्याती पसरली. 1929 नंतर फ्रँको तिचे सर्वेसर्वा बनले दुसऱ्या महायुद्धात बॉम्बहल्ल्यात तिचे कारखाने उद्ध्वस्त झाले. पण मरिनोती ह्यांनी कंपनी पुनश्च सावरण्याचे प्रयत्न केले. ह्या कंपनीचे अकाउंटन्सीचे काम सिंजोनाकडे होते त्यामुळे तो फ्रँको मरिनोती ह्यांच्या बरोबर काम करत होता. सिंजोनाने त्यांना कृत्रिम धागे बनवण्याचे पेटंट अमेरिकेत विकण्यासाठी मदत केली 

ब्यासीच्या ऑफिसमध्ये त्याची ओळख जॉनी त्रोता ह्याच्याशी झाली. त्रोता रियल एस्टेट धंद्यामध्ये अग्रणी होता. इटाली आणि बाहेरील देशामध्ये त्याने २०००० हून अधिक गाळे बांधण्याचा विक्रमच केला होता. त्रोताच्या आग्रहावरून त्याने आपले ऑफिस त्रोताच्या ऑफिसजवळ म्हणजे व्हिया तुराती येथे नेले. व्हिया तुराती म्हणजे मिलन शहराचा एकदम पॉश भाग मानला जात होता.  ब्यासी आणि त्रोता ह्यांच्या ओळखीमधून तो बोलचिनी आणि अॕना बोनोमि ह्यांना भेटला.  

अॕना बोनोमीचे क्षेत्र होते रियल इस्टेट. मिलानो सान फेलिसे हे मिलानचे जोड शहर बनवणारा हा बिल्डर पॅरिस - मॉन्ट कार्लो - मेक्सिको सिटी आदि ठिकाणी सुद्ध बांधकाम व्यवसायात होता. याखेरीज पर्फ्यूम कम्पनी ब्रायोशी आणि वित्तविषयक कंपनी क्रेडिटो व्हॅरेसिनो आदिमध्येही त्याने पाय पसरले होते. अनाच्या सोबतीने त्याने लक्ष मिलानच्या शेयर बाजाराकडेदेखील ठेवले होते. खास करून रियल इस्टेटमधले शेयर्सवरती लक्ष ठेवले होते.

फ्रँको मरिनोतीच्या ओळखीतून त्याचा अर्नेस्टो मोइझी ह्यांच्याशी परिचय झाला होता. मोइझी ह्यांचे जीवन म्हणजे अगदी सरदार दरकदाराप्रमाणे उच्च दर्जाचे होते. वन्जेती स्टील नामक एक फौन्ड्री त्यांच्या मालकीची होती. मोइझी ह्यांना ती कंपनी विकायची होती. पण ती विकली जात नव्हती. सिंजोनाने त्यांना आपण मदत करू सांगितले आणि एक गिर्‍हाईकही शोधून आणले. सिंजोनाने ती कंपनी युनियन तर्फे प्रथम २ लाख लिरा देऊन विकत घेतली. तिच्यामध्ये सुधारणा करून दोन वर्षात तीच कंपनी त्याने २० लाख लिराना विकली. पुढे सिंजोनने मोईझी ह्यांची क्रुसिबल स्टील ऑफ अमेरिका ह्या कंपनीचे प्रतिनिधी डॅन पोर्को ह्यांच्याशी गाठ घालून दिली. पोर्को ह्यांनी बाजारभावाच्या तिप्पट किंमत देऊन वन्जेती स्टील विकत घेण्याची तयारी दाखवली. एक मोठा प्रश्न सोडवला म्हणून मोइझी सिंजोनावरती खुश होते. अगदी त्याच्याशी भागी करायलाही तयार होते.  मोईझी ह्यांची कंपनी जिने विकत घेतली ती क्रुसिबल कंपनी म्हणजे शस्त्रास्त्रे निर्मिती करणार्‍या कोल्ट ग्रुपची एक घटक कंपनी होती. अशा तर्‍हेने ह्या कंपनीवरती नेमके कोणाचे नियंत्रण आले हे सुरुवातीला अध्याहृत राहिले. प्रत्यक्षात क्रुसिबल कंपनी पोर्को आणि सिंजोनाच्याच मालकीची होती! ही खरेदी सिंजोनाला प्रचंड नफा देऊन गेली.  

मोईझी हे बडे प्रस्थ होते. त्यांची स्वतःची बँक होती - बँका प्रायव्हेटा फिनाझियारा. १९६० नंतर मरिनोती ह्यांनी सिंजोनाला बँकेच्या डायरेक्टर पदावरती आमंत्रित केले. ह्यानंतर बँकेचे शेयर्स सिंजोनाने प्रथम IOR च्या नावे आणि नंतर फासो कंपनीच्या नावे म्हणजे थोडक्यात स्वतःच्या नावे फिरवून घेतले. मरिनोती आणि लंडन येथील बँक ऑफ हम्ब्रोस चे प्रमुख जॉन मॅक कॅफरी ह्यांचेही सूत जमलेले होते.  मॅक कॅफरी ह्यांनी अशी इचछा व्यक्त केली की आपण काही कामे एकमेकांच्या सहकार्याने करावीत. अशा तऱ्हेने शेयर्स ची अदलाबदल करून हे काम पूर्ण केले गेले. पुढे सिंजोनाने बँक ऑफ मसिना आणि कॉंटिनेंटल इलिनॉय ह्या बँकाही मिळवल्या. तर १९६८ मध्ये युनियन बँक त्याच्या ताब्यात आली

सिंजोनाने विणलेले हे अवाढव्य जाळे निव्वळ अतर्क्य आहे. शेकडो कंपन्या आणि त्यांचे व्यवहार ह्याविषयी किती लिहिणार? असे साम्राज्य उभे करणे हे कौतुकास्पद होते. पण त्यासाठी तो ज्या तडजोडी करत होता त्या चिंताजनक होत्या. कारण हे सगळे उभारताना माफियांचा पैसे हेच त्याचे भक्कम आर्थिक बळ होते आणि त्यांच्या फायद्याकरिता तो अनेक बेकायदेशीर कामे दडपून करत होता हे सत्य आहे. त्याची कहाणी पुढच्या भागामध्ये बघू. 







No comments:

Post a Comment