बेधडक बेकायदेशीर व्यवहार करायचे पण सापळ्यात मात्र पकडले न जाण्याची काळजी घ्यायची ह्याच्यात सिंजोना तरबेज होता. त्याने ज्या वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या त्या बघून आजही आपल्याला अचंबित व्हायला होते. ह्या युक्त्या करण्याची त्याच्यावरती वेळ येण्याची कारणे समजून घ्यावी लागतील. पहिली गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सिंजोनाचे कसब जसे माफियांना हवे होते तसेच इटालीमधील श्रीमंतांना हवे होते. माफियांना अशासाठी हवे होते की त्यांच्या हातामध्ये येणारा पैसा हा काळा पैसा होता - त्याची नोंद बॅंकेच्या व्यवहारामध्ये नव्हती. पण कधी ना कधी माफियांना काळा पैसा पांढरा केल्याशिवाय अनेक "सरळ" धंद्यामध्ये गुंतवता येत नसे. त्याकरिता तो कोणत्याही मार्गाने का होईना बॅंकेत जमा करून घेणे आणि मग हवा तसा फिरवण्याची मोकळीक मिळवणे हे एक दिव्यच होते. श्रीमंतांना टॅक्स बुडवण्यात स्वारस्य होते. व्हॅटिकनला सेक्यूलर इटालियन सरकारने लादलेल्या करामधून आपली सुटका करून घ्यायची होती. जे चलन व्यवहारामध्ये खेळते नसते त्याची किंमत घसरती राहते, म्हणजेच हाती पैसा नुसता ठेवून उपयोग नव्हता तर तो आकर्षक फायदा होईल अशा तर्हेने गुंतवणे गरजेचे होते. जमलेच तर स्वतःच्या नावाने असले व्यवहार न करता छुपे व्यवहार करण्यासाठी डोळे मिटून विसंबता ये ईल असा प्रामाणिक भागिदार त्यांना हवा होता. सिंजोनाने ह्या सर्वांची गरज ओळखून आपले साम्राज्य उभे केले होते.
त्या काळामध्ये नाकासमोर चालणार्या बॅंका क्रेडिट संस्था म्हणून काम करत. त्यांना कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा नव्हती. किंबहुना इटालीच्या कायद्यामध्ये असले व्यवहार बसत नसत. अशीच परिस्थिती अन्य ठिकाणच्या बहुतांश बॅंकांची होती. अगदी आताआतापर्यंत भारतामध्येही बॅंकानी ठेवीच्या रूपामध्ये जमा झालेला पैसा व्याजाने कर्जाऊ द्यावा आणि त्या पैशामधून ठेवीदारांना व्याज वाटावे अशा स्वरूपाचे काम करत. सिंजोनाने ह्यामधून मार्ग काढण्यासाठी परकीय बंकांचे नियम अभ्यासले होते. उदा. लिश्टेन्स्टाईन सारख्या छोट्या देशाने आपल्या देशामध्ये एक खास बॅंकिंग व्यवस्था उभी केली होती. जागतिक युद्धाच्या काळामध्ये जर्मनीमधील उद्योजकांनी आपल्या कंपन्या पैशाच्या जोरावरती लाटू नयेत म्हणून काही नियम लागू केले होते. तसेच त्या छोट्या देशामधील बॅंकेमध्ये पैसा ठेवणार्यांना अगदी स्वल्प प्रमाणामध्ये टॅक्स द्यावा लागे. भारतासारख्या देशामध्ये आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड - पब्लिक लिमिटेड कंपन्या - पार्टनरशिप - ट्रस्ट आदि प्रकारच्या वित्तीय संस्थांशी तोंडओळख आहे. लिश्टेनस्टाईनने आन्स्टाल्ट नामक एक वेगळी स्वरूप असलेली संस्था कायद्याने मंजूर केली होती. आन्स्टाल्ट कंपन्यांना शेयरहोल्डर नसतात. त्याचे नियंत्रण मंडळ केवळ एक व्यक्ती चालवू शकते. ह्या कंपन्यांना वार्षिक स्टेटमेंट सादर करावे लागत नाही. त्यांच्यावरती शून्य वित्तकर लागू असतो. त्यांचे आर्थिक व्यवहार गुप्त राखले जाऊ शकतात. आणि कोणत्याही व्यक्तीला त्यांची माहिती मिळू शकत नाही. आता तुमच्या लक्षात ये ईल की आपले "व्यवहार" पूर्ण करण्यासाठी सिंजोनाला फ़ासो एजी ही कंपनी लिश्टेनस्टाईनमध्ये का रजिस्टर करावी लागली. केवळ लिश्टेनस्टाईन नव्हे तर पुढच्या काळामध्ये सिंजोनाने केमान आयलंड - पनामा येथील कायदे व नियमांछा वापर अशाच उद्दिष्टांकरिता करून घेतला. (जाता जाता - परदेशामध्ये दडवलेल्या पैशाचे कूळ आणि मूळ शोढणे किती कठिण आहे हे इथे स्पष्ट होऊ शकेल. अशा प्रकारची गुप्तता आहे म्हणूनच मोठ्या मोठ्या व्यवहारांमधली "लाच" परस्पर परकीय बॅंकांमध्ये का जमा होते ते कळू शकेल. त्यांचा छडा लावणे जसे कठिण आहे तसेच तो पैसा कायदेशीर मार्गाने भारतामध्ये परत आणणेही कसे अवघड आहे ते लक्षात घ्यावे.)
इटालीमधील बॅंकींग व्यवस्था कालबाह्य झाली होती असे म्हणता येईल. त्यांना ब्रोकरेजचा अधिकार नव्हता. त्यांना मर्चंट बॅंक किंवा इन्व्हेस्टमेंट बॅंक म्हणता आले नसते. ह्यापैकी काही प्रकारचे व्यवहार करायचे तर बॅंक ऑफ इटालीची परवानगी घ्यावी लागत असे. उदा. मिडियोबॅंकला अशा पद्धतीची परवानगी काही काळापुरती मिळाली होती. तिच्या सल्लागार मंडळावरती अग्नेली, पिरेली आणि एनरिको कुच्या काम करत होते. इस्टिट्यूटो पर ला रिकन्स्ट्रिक्शन इंडस्ट्रियाले IRI ची स्थापना १९४९ मध्ये करण्यात आली होती. तिच्या माध्यमातून इटालीच्या तीन मोठ्या बॅंकांवरती नियंत्रण ठेवले जात होते. त्या बॅंकांकडे मिडियोबॅंकाचे सर्वाधिक शेयर्स होते. साहजिकच तिच्या व्यवस्थापनावर त्यांचे वर्चस्व होते. एकीकडे IRI मध्ये राजकीय ढवळाढवळ होत होती. पण मिडियोबॅंकामध्ये तसे होणार नाही ह्यावर कटाक्ष ठेवला जात होता. त्यामुळे ही बॅंक आणि सिंजोना हे एकमेकांचे जणू स्पर्धक होते असे म्हणता येईल. त्यातल्या त्यात त्याचे आणि एनरिको कुच्याचे अजिबात पटत नसे. ह्या दुफळीच सिंजोनाला पुढे त्रास झाला. त्याकाळामधल्या बॅंका फक्त आपल्या श्रीमंत ठेवीदारांचे भले कसे होईल ह्याकडे लक्ष देतात आणि सामान्य कष्टकरी ठेवीदारांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे असे सिंजोनाच्या लक्षात आले होते. बांका प्रायव्हेटा फिनान्झियारा कडे चार पाच मोठे क्लायंट होते. आणि त्यांचे व्यवहार परदेशामध्ये होते. त्यामानाने युनियन बॅंकेचे स्वरूप थोडे वेगळे होते. त्यांचे व्यवहार देशांतर्गत होते. युनियनच्या स्वरूपामध्ये बदल करण्याचे सिंजोनाने ठरवले. त्याने युनियनच्या डायरेक्टरना कारखान्याकारखान्यातून काम करणार्या सामान्य कष्टकर्यांकडे पाठवले. कामगारांना बॅंक म्हणजे काय - तिचे व्यवहार कसे चालतात - तिचा त्यांना काय फायदा आहे हेही माहिती नव्हते. युनियन बॅंकेतर्फे व्याख्याने आयोजित करून कामगारांचे लक्ष बॅंकांच्या व्यवहाराकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले गेले. अगदी चेक म्हणजे काय - तो कसा वापरावा हेही शिकवले जात होते. ह्या उपक्रमानंतर सिंजोनाने बॅंक विकत घेतली त्यापेक्षा २५०० कोटी ने अधिक रकमा बॅंकेकडे जमा झाल्या. पुढच्या काही महिन्यांमध्ये ४१०० कोटी तर वर्ष पूर्ण झाले तेव्हा ६५०० कोटी लिरा बॅंकेत जमा झाले. एप्रिल १९७१ मध्ये १२५०० कोटी अशी विक्रमी रक्कम बॅंकेच्या हाती आली. बॅंकिंग क्षेत्रामधले अलिखित नियम झुगारून लावत सिंजोनाने इतर बॅंकांपेक्षा आपल्याकडील ठेवींवरती २% अधिक व्याज देण्याचे सत्र आरंभले. आपल्या ठेवीच मिलानच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये वापरल्या जात आहेत हे ठेवीदारांना माहिती नसावे. सिंजोनाचा मित्र रॉबर्टो काल्व्हीची बांका अम्ब्रोशियानो देखील अशा प्रकारे सामान्य ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारत होती. काल्व्हीने एकप्रकारचा म्युच्युअल फंडच काड्ःअला होता म्हणता ये ईल.
असे असले तरीही नेमके काय करून हे व्यवहार होत होते हे स्पष्ट होत नाही. त्यासाठी सिंजोनाने स्विटझरलंडच्या बॅंकांमध्ये जी गुप्त खाती चालू केली होती त्यांच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. ठेवीदारांचा पैसा इटालीतील बॅंकांमधून स्विटझरलंडच्या बॅंकेत जमा केला जाई. इटालियन बॅंकेच्या खात्यामध्ये हा पैसा ठेवीच्या रूपाने असल्याची नोंद होत होती. पण स्विटझरलंडमध्ये मात्र ज्या खात्यामध्ये पैसा जमा केला जात होता त्याला फायड्युशियरी खाती असे म्हटले जात होते. म्हणजे एकदा का पैसा स्विटझरलंडच्या बॅंकेत जमा झाला की तिथून पुढच्या नोंदी बघायला मिळणे अशक्य होते. गुप्त खातेदार सिंजोना सांगेल त्या खात्यामध्ये स्विस बॅंक तो जमा करत असे. मग असे खाते दुसर्या कोणत्या देशामध्ये असो की स्विटझरलंडमधल्या अन्य बॅंकेत!! त्या खात्याचा मालक् कोण आहे हेदेखील स्विस बॅंक तपासून बघत नसे. स्विस बॅंक आणि सिंजोना ह्यांच्यामध्ये एक फायड्युशियरी करार केला जाई. अन्य खात्यामध्ये एकदा पैसा जमा केला गेला की तो परत स्विस बॅंकेत जमा होत नाही तोवरती तो पैसा मूळ इटालियन बॅंकेला द्यायला स्विस ब्ँक बाध्य नव्हती!!!! लक्षात घ्या काय प्रकारे गुप्त व्यवहार केले जातात ते. म्हणजे इटालियन बॅंकेच्या खातेवहीमध्ये आपले अमुक पैसे स्विस बॅंकेमध्ये ठेव म्हणून जमा असल्याचे नोंदले गेले तरी प्रत्यक्षात तो पैसा तिथे असेलच असे नव्हते आणि नसला तर परत मिळेल याचीही काहीही शाश्वती नव्हती. सिंजोना तो पैसा लिश्टेनस्टाईनमध्ये जमा करा म्हणून स्विस बॅंकेला सांगत असे. तसे नाही तर पनामा किंवा केमन आयलंड किंवा अशाच कोणत्या ना कोणत्या टॅक्स हेवनमध्ये!! तिथल्या गुप्त खात्यामधून तो (काळ्याचा पांढरा झालेला) पैसा फिरत फिरत भलत्याच कंपन्यांमध्ये गुंतवला जाई.
सिंजोनाचे कसब हेच होते की तो अर्थव्यवहारात खिळखिळी झालेली कंपनी हेरत असे. ती अगदी पडत्या भावाने खरेदी केली जाई. नेमके खरेदीदार कोण आहे हे विकणार्याला समजणे मुश्कील होते. मग तिला रंगरंगोटी करून भरमसाठ किंमतीला तिचे शेयर्स विकले जात. जोपर्यंत असे व्यवहार फायद्यात चालत होते तोवर सगळे ठीकच होते. रोकड पैसा कमी पडत नसे. चर्चला आपला पैसा इटालीमध्ये ठेवायचाच नव्हता. शिवाय त्यावरती चढ्या प्रमाणात उत्पन्नदेखील हवे होते. दुसरीकडे माफिया गॅंगस्टर्स सिंजोनावरती खूश होते. त्याच्यातही एक आणखी तंत्र वापरले जात होते. राजकीय दृष्ट्या इटालीमध्ये कम्युनिस्टांचे राज्य येऊ नये म्हणून व्हॅटिकन जितके संवेदनशील होते तेव्हढेच माफिया सुद्धा होते. अशा तर्हेने पूर्वाश्रमीचे फॅसिस्ट - चर्च आणि माफिया ह्यांचे समान ध्येय असल्यामुळे ते एकमेकांना मदत करत. इटालीचे किचकट कायदे व्हॅटिकनमधल्या बॅंकांना लागू नहते. माफियांचा पैसा गुपचुपरीत्या व्हॅटिकनमधल्या बॅंकेमध्ये जमा केला जाई. त्यावरती आक्षेप घ्यायचा नाही असा जणू अलिखित नियम होता. एकदा तो बॅंकेत जमा झाला की बाहेर नेण्याचे काम सोपे होते. केवळ व्हॅटिकनमधल्या बॅंका नव्हे तर काल्व्हीची बॅंकही अशाप्रकारे वापरली जात होती. हेच मार्ग वापरण्यामध्ये अमेरिकेची सीआयएदेखील पुढे होती. कितीही आश्चर्य वाटले तरी सिंजोना हा ह्या वरकरणी विरोधात सणार्या शक्तींचा एकमेव "त्राता" होता असे दिसते.
कधी ना कधी रोकड कमी पडणे स्वाभाविक होते कारण सिंजोनाचे गुंतवणुकीचे सगळेच निर्णय काही उजवे ठरतील अशी शाश्वती नव्हती. त्यामुळे इटालीतील बॅंकेमध्ये कधीतरी रोकड कमी पडत असे. कागदोपत्री एखाद्या खातेदाराच्या वहीतून रक्कम "कायमची" वजा केली जाई. बॅंकेच्या एखाद्या खातेदाराने तक्रार केली की त्याचा अमुक अमुक चेक का वटला नाही किंवा त्याच्या खात्यामध्ये कमी पैसे दिसत आहेत की त्याला आपले इथले खाते बंद करा आणि दुसर्या बॅंकेत काढा असे सांगितले जाई. त्याने कुरकुर चालूच ठेवली तर मॅनेजर येउन त्याला सांगे की हिशेबामध्ये काही छोटी मोठी चूक राहिली आहे आणि ती आम्ही दुरुस्त करु. एखाद्याने सरकारी अधिकार्यांना कळवू म्हणून धमकी दिलीच तर त्याला ’अंतीम’ संस्कारासाठी पाठवण्याचीही तयारी केली जाई. बॅंका प्रायव्हेटामधून खातेदारांचा पैसा झुरिचच्या एका बँकेमध्ये जमा केला जात असे. तेथून तो एका खाजगी पोस्ट ऑफिस बॉक्स मध्ये हलवला जाई. हा बॉक्स सिंजोनाचे एक कंपनी चालवत होती. तेथून तो माबुसी इटालियाना या सिंजोनाच्याच दुसर्या कंपनीकडे पाठवला जाई. माबुसीकडून तो व्हॅटिकनकडे जात असे.
मनीरेक्स ह्या कंपनीची सिंजोनाने मांडलेली कल्पना त्याच्या बुद्धिमत्तेची पावती होती. त्याकाळामध्ये चलनाचा बाजार ही कल्पना विकसित झालेली नव्हती. समजा एखाद्या बॅंकेकडे जास्तीचे डॉलर्स जमा झालेले आहेत. आणि दुसर्या एखाद्या बॅंकेकडे डॉलर्सचा तुटवडा आहे. तर अशा बॅंका काही फी घेउन डॉलर्सच्या अदलाबदलीचे व्यवहार करत असत. पण हे काम प्रत्येक बॅंकेला स्वतःच करावे लागे. त्याऐवजी एक खाजगी क्लियरिंग हाउस उपलब्ध करून दिले तर अशा व्यवहारांमध्ये वेळ न दवडता बॅंका पैसा कमवू शकतात अशी ही कल्पना होती. जागतिक पातळीवरील अशा व्यवहारांची व्याप्ती बघता असे क्लियरिंग हाउस यशस्वी होइल याची त्याला खात्री होती. मनीरेक्स स्थापन करण्यामागची भूमिका ही अशी होती. ती राबवण्याकरिता सिटिबॅंकेसारख्या मोठ्या बॅंकेमध्ये परकीय चलनाचे व्यवहार सांभाळत असलेला कार्लो बोर्डोनी याला सिंजोनाने सोबत घेतले. सुरुवातीच्या एक दोन वर्षांनंतर त्या व्यवस्थेमधील आपला फायदा बॅंकांनी ओळखला आणि ह्या कामाचे आउटसोर्सिंग सुरु झाले. करता करता मनीरेक्सकडे जगातील ८५० बॅंकांनी विश्वासाने आपले पैसे सुपूर्द केले. मनीरेक्स जो पैसा हाताळेल त्याच्या १%तील फक्त १/३२ हिस्सा आपली फी म्हणून मनीरेक्स ठेवून घेत असे. हा सौदा सगळ्यांच्याच फायद्याचा होता. थोड्याच काळात मनीरेक्सची उलाढाल २०००० कोटी डॉलर्स एवढी अवाढव्य झाली. पुढे पुढे परकीय चलन आपल्याच कंपन्यांकडे वळवण्यासाठी सिंजोना बोर्डोनीवर दडपण आणू लागला. पण बोर्डोनीला असे व्यवहार पसंत नव्हते. सिंजोनाच्या बॅंकेमधील अधिकारी खातेदाराला न कळवता मोठाल्या रकमा व्हॅटिकन बॅंकेच्या खात्यामध्ये जमा केले जात. व्हॅटिकन ब्ँक आपले १५% कमिशन ठेवून उर्वरित पैसा फिनान्समेंटा ह्या जिनिव्हा येथील बॅंकेमध्ये सिंजोनाच्या खात्यामध्ये जमा करत असे. ह्या खात्याचे नाव होते MANI - सिंजोनाच्या दोन मुलांच्या नावाची आद्याक्षरे जोडून (Marco & Nino) हे नाव बनवण्यात आले होते. सिंजोनाचे एकंदरीत व्यवहार बघता बोर्डोनीने सिंजोनाला धमकावून पाहिले पण ब्लॅकमेल करण्यात सिंजोना त्याच्यापेक्षा जास्त तरबेज होता.
सिंजोना - माफोया आणि सिंजोना - व्हॅटिकन ह्यामध्ये नेमके कसे संबंध होते ते स्वतंत्र भागामध्ये बघू.