Sunday 1 July 2018

निकी हॅली व इराण

Can’t tolerate Pakistan becoming terror haven, have told them: Nikki Haley



अमेरिकेच्या युनोमधील राजदूत भारतीय वंशाच्या श्रीमती निकी हॅली  २८ जून पासून तीन दिवसांच्या दौऱ्यावरती भारतामध्ये येऊन गेल्या. अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये उत्तरोत्तर प्रगती होत असून अमेरिका भारताला आपला "नैसर्गिक" मित्र मानते असे श्रीमती हॅली ह्यांनी सांगितले. तसेच दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांकडे आम्ही डोळेझाक करू शकत नाही असे स्पष्टपणे सांगत त्या म्हणाल्या की पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आश्रय देण्याला आमचा जोरदार आक्षेप असून आम्ही तसे पाकिस्तानला कळवले आहे. हॅली ह्यांनी अशा तऱ्हेने पाकिस्तानला ठोकल्यामुळे प्रत्यक्षात चांगले प्रस्ताव घेऊन भारतामध्ये आल्या असाव्यात असा लोकांचा समज हो उ शकतो. परंतु वस्तुस्थिती नेमकी उलट आहे. 

हॅली ह्यांनी आणखीही काही वक्तव्ये केली. अमेरिका धार्मिक स्वातंत्र्याला सर्वोच्च मान देते म्हणून आम्ही एकत्र टिकून आहोत असे त्या म्हणाल्या. चीनशी तुलना करताना भारत आणि आमच्यामध्ये लोकशाही हा समान दुवा आहे. चीनमध्ये लोकशाहीचा मान राखला जात नाही. जिथे कायद्याचा मान राखला जात नाही त्या देशाच्या प्रगतीवरती मर्यादा पडतात असेही त्यांनी भारतामध्ये आल्यावरती म्हटले आहे. वर वर पाहता भारतीय लोकांना खुश करणारी ही वक्तव्ये जशी दिसतात तशी नाहीत. 

भारतीय उपखंडामध्ये इराणवरती कारवाई करण्यास अमेरिका आणि तिचे अन्य सहकारी उत्सुक आहेत किंबहुना अशी कारवाई अगदीच दाराशी येऊन ठेपली असता भारताने डोळे झाकून अमेरिकेला साथ द्यावी अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. पण देशहिताचा विचार करता मोदी सरकारने आपली स्वतंत्र भूमिका ह्याबाबतीत ठरवली असून ही भूमिकाच अमेरिकेच्या गळ्यामध्ये अडकलेले हाडूक बनली आहे. दहशतवाद ह्या जिव्हाळ्याच्या विषयावर भारताला खुश करणारे विधान हॅली ह्यांनी केले असले तसेच चीनच्या तुलनेत भारत आपल्याला मौलिक तत्वांच्या दृष्टीने अधिक जवळचा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले असले तरी त्यांचा मूळ उद्देश लपून राहिलेला नाही. 

प्रत्यक्षात निकी ह्यांची ही भेट मोदी सरकारवरती दडपण आणण्यासाठी होती. इराणशी भारताने संबंध तोडण्यासाठी अमेरिका दडपण आणत आहे.  मोदी सरकार त्याला सहजासहजी जुमानणार नाही हे अमेरिकेला कळून चुकल्यामुळेच धार्मिक स्वातंत्र्याचा बडगा बाईनी उगारून दाखवला आहे. 

(एके काळी जिथे श्री सुधींद्र कुलकर्णी काम करत असत) त्या ORF संस्थेने निकी ह्यांना हिंदू मुस्लिम शीख आदी धर्मांच्या पवित्र स्थळांवरती नेण्याची व्यवस्था केली होती असे समजते. अमृतसर येथील सुवर्णमंदिरामध्ये आपल्या शीख वडिलांच्या परंपरेचा आदर म्हणून निकी गेल्या असे आपण एक वेळ समजू. बाईनी तिथे बसून पोळ्याही लाटल्या. फोटो सेशन झाले. तिथे बसल्या बसल्या बाईनी "संबंधितांना" "निरोपही" पोचवले असे म्हणतात. हे पढवले गेले त्यापेक्षा त्या थोडे जास्तच बोलल्या नसल्या म्हणजे मिळवली. 

अपेक्षेप्रमाणे बाईंची डाळ शिजली नाही. आणि त्या परतल्या. आता ब्रिटनचे संरक्षण मंत्री श्री गाविन विल्यम्सन ह्यांनी भारतावर ताशेरे ओढले आहेत. गाविन ह्यांनी श्रीमती निर्मला सितारमन ह्यांना भेटण्याचा प्रस्ताव पाठवला होता परंतु त्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे नकार कळवण्यात आला. त्यावर गाविना ह्यांनी "India is sitting blood" असे उदगार काढले. त्याला जोरदार आक्षेप श्रीमती सीतारामन ह्यांनी घेतला आहे तसेच नव्या तारखा ठरवून भेट होणार असल्याचे म्हटले आहे. 

थोडक्यात काय तर इराणवरील कारवाई भारताच्या भूमिकेमुळे कुठे तरी अडलेली असावी. ह्या पार्श्वभूमीवरती असे म्हणता येईल की अमेरिकन अध्यक्ष सध्या तरी पुन्हा एकदा जुन्याच विचारांच्या तज्ज्ञांनी वेढले गेले असावेत. जे धोरण गेली दोन दशके फसलेले आहे तेच पुढे रेटण्याचे काम अमेरिकेमधली काही लॉबी करत असतात आणि त्याचेच प्रतिबिंब अमेरिकेच्या धोरणामध्ये पडलेले दिसत आहे. पुढच्या काही महिन्यात खास करून खलिस्तान विषयामध्ये भारताने सतर्क राहण्याची गरज आहे. 

ह्याच पार्श्वभूमीवरती आज अफगाणिस्तानमध्ये हिंदू जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडणुकीस उभे असलेले उमेदवार श्री अवतार सिंग खालसा ह्यांची जलालाबाद शहरानजीक आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये एका आत्मघाती हल्लेखोरांनी हत्या केली आहे. त्यांच्या सोबत १० अन्य शीख व ८ अफघाण नागरिकही मृत्यू मुखी पडले आहेत.  दहशत वादाबद्दल अमेरिका खरोखरच गंभीर असेल तर कारवाई कुठे व्हायला हवी हे स्पष्ट आहे.

मोदी ह्यांचा वुहान आणि सोची दौरा अमेरिकेला चांगलाच झोम्बला असून भारत अमेरिका संबंधांमधला लंबक आता दुसऱ्या टोकाला पोचला आहे असे म्हणता येईल. तरीसुद्धा भारत काही अवास्तव मुद्द्यांवरती हातून बसलेला नसून अमेरिकेला भारताचे यथायोग्य मुद्दे समजून घेण्याची गरज आहे. साम्राज्यवादी दृष्टिकोनामधून परराष्ट्र धोरण हाकता हाकताच अमेरिकेला काही दारुण पराभव पत्करावे लागले हे ते अधे मध्ये विसर टाटा. ह्या संदर्भात श्री किसिंजर ह्यांनी केलेले एक विधान माझ्या स्मरणात आहे ते असे - To be an enemy of America can be dangerous but to be a friend could be fatal.

असो. अजूनही LEMOA नंतर SYSMOA वगैरे कराराचे विषय निघत असल्यामुळे भारत अमेरिका संबंधाबाबत मी इतकीही निराश नाही. हात पिरगळून काम होत नाही म्हटले की अमेरिका आपला दृष्टिकोन बदलेल अशी आशा आहे.



2 comments:

  1. हात पिरगळून काम होत नाही म्हटले की अमेरिका आपला दृष्टिकोन बदलेल अशी आशा आहे.
    Agree

    ReplyDelete
  2. LEmOA and SYSMOA हे कोणते करार आहेत

    ReplyDelete