Thursday, 23 March 2017

उत्तर प्रदेशाचा रंग सेक्युलरांचा बेरंग - भाग १





भारतामध्ये निवडणूक निकालांचे विश्लेषण करणे म्हणजे ठराविक मार्केटिंग बझ वर्डस तोंडावर मारायचे असा गेल्या तीन दशकांचा माध्यमे विचारवंत निरीक्षक राजकारणी आणि सेक्युलरांचे खाक्या झाला होता. उत्तर प्रदेश निवडणूक निकाल आल्यानंतर तेच जुने बझ्झ वर्डस वापरून आता ह्या निवडणुकीचे विश्लेषण होउ शकत नाही असे त्यांच्या लक्षात आले आहे. ज्या उत्तर प्रदेश मध्ये १२५ हुन अधिक मतदारसंघात मुस्लिम मतपेटी आपला प्रभाव टाकू शकते  तेथे भाजप जिंकूच शकत नाही अशी या पब्लिकची श्रद्धा होती. लक्षात घ्या मी श्रद्धा म्हणते आहे. डोळ्यासमोर दिसते ते नाकारून - बुद्धीला  पटते ते नाकारून - आपल्या कल्पनेमधले चित्रच वास्तव आहे असे ज्यांना भास होतात आणि जे भास ते वास्तव म्हणून आपल्या गळी मारू पाहतात किंबहुना स्वतःचीच समजूत घालतात त्या सेक्युलरांना बुद्धीप्रामाण्यवादी म्हणायचे तरी कसे? 

असो. उत्तर प्रदेश मध्ये भाजपाला जे घवघवीत यश मिळाले आहे त्यामागे विरोधक एकजूट होऊन लढले नाहीत हे सर्वात मोठे कारण आहे. निकालांवर नजर टाकली तर ३२५ पैकी किमान २३६ जागा अशा आहेत की जिथे भाजपाला मिळालेल्या मतांपेक्षा सपा बसपा आणि काँग्रेस यांच्या मतांची बेरीज मोठी आहे. बिहार मध्ये जसे काँग्रेस लालू आणि नितीश कुमार एकत्र येऊन निवडणूक लढल्यानंतर भाजपाला त्यांनी सहज हरवले तीच खरे तर अवस्था उत्तर प्रदेश मध्ये आहे. अर्थात ह्या जर तर च्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात पक्ष एकत्र येतात तेव्हा सगळ्याच मतांची बेरीज होत नाही. काही प्रमाणात वजाबाकीही होत असते.  त्यामुळे अशी तुलना करणे कठीण असले तरी उत्तर प्रदेश मध्ये भाजपाला मिळालेले यश जितके मोठे वाटते तितके ते मोठे नाही एवढी नोंद घेणे भाग आहे.

तसे पाहिले तर २०१२ च्या तुलनेमध्ये सपा बसपा काँग्रेस मिळून ६६.६% मते मिळवली होती तीच आता ५०% इतकी उरली आहेत. शिवाय नोंदणीकृत नसलेले पक्ष आदी मिळून २०% मते २०१२ मध्ये होती तीही आता १०% च्या आसपास आली आहेत. याचाच अर्थ भाजपने जी २४.७% मते वाढवून घेतली त्याचे गणित सुटू शकते. त्यातही मायावतींची ३% - काँग्रेसची ५% तर सापाची ८% मते कमी झाली आहेत असे दिसते. म्हणजेच मार कोणाला पडला ते स्पष्ट होते. तरीही तिघांना मिळून पडलेली ५०% मते भाजपच्या ३९.७% मतांपेक्षा जास्तच आहेत.

अर्थात यावरचे चर्वितचर्वण यावेळी TV वर फारसे ऐकायला मिळाले नाही. कारण मार्केटिंग बझ वर्डस वापरणारे फेक्युलर दणकले आहेत. उत्तर प्रदेशाच्या विजयाचा डंका जगाने ऐकला - २०१९ मध्ये मोदीना अडवणारे आहे का कोणी तिथे याचे उत्तर त्यांना मिळाल्यामुळे तोंडे कडू झाली आहेत. निकालांचे वार्तांकन संपल्यावर एकच धोशा चालू होता. भाजपाला मुस्लिमांनी सुद्धा मतदान केले आहे. काहींनी तर मुस्लिम महिलांनी तीन तलाकाच्या निर्णयाचे स्वागत म्हणून घराच्या पुरुषांना न जुमानता भाजपच्या पारड्यात मत टाकले अनेकांनी सांगून झाले. तेव्हा हे चर्वितचर्वण सकाळ दुपार संध्याकाळ ऐकण्याचे प्रयोजन काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. 

इतक्या दणदणीत विजयानंतर भाजप हमखास कट्टर हिंदुत्वाकडे वळेल याची फेक्युलरांना भीती होती. पण आपली भीती दाखवण्या ऐवजी ते परत परत मुस्लिमांनी मते भाजपाला दिली तसेच मुस्लिम महिलांनी तर घरच्यांना न जुमानता अशी मते दिली हे मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होते त्यामागे काही निश्चित हेतू होता. 

पहिला हेतू म्हणजे आता मुस्लिमानी पण मते दिली आहेत तेव्हा उतू नका मातु नका. नाही तर पुढच्या वेळी ही मते मिळणार नाहीत असा इशारा फेक्युलर देत होते. हे आपले बरे आहे - स्वतः निवडणूक हरले तर त्यातून धडा काहीच घ्यायचा नाही आणि उठ सूट भाजपाला इशारे द्यायचे म्हणजे अजूनही आढ्यता अहंकार संपलेला नाही. भाजपकडे तुच्छपणे बघण्याची दृष्टी अजूनही तशीच आहे हे दिसते. फेक्युलरांचे विश्लेषण सुद्धा प्रचारात्मकच असते हे आता सांगायला नको. ह्या बेगडी प्रचारामधून तुम्हाला मते देऊन देखील तुम्ही मुस्लिमांसाठी काहीच करत नाही हे बोंबलत राहिले की भविष्यात मुस्लिमाना पटवण्याची त्यांनी पूर्व तयारी करून ठेवली आहे. खरे तर त्यांना हेच हिंदूंनाही पटवायचे आहे की भाजपाला मते देऊन तुमच्या पदरात काहीच पडणार नाही. कारण तुम्हाला जसे वाटत होते की भाजपाने मुस्लिम तुष्टीकरणाचे धोरण अवलंबू नये, तसे होण्याची बिलकुल शक्यता नाही. मुस्लिमांची मते घेणारा त्यांनाच झुकते माप देईल - तुम्हाला नाही. तेव्हा भाजप केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर हिंदूंनाही बाता मारतो असे ह्या फेक्युलरांच्या मनात आहे. तेव्हा तेच वास्तव असल्यासाखे ते बोंब मारत सुटतात. 

आणि याही पेक्षा आणखी एक गंभीर इशारा ते असल्या प्रतिपादनामधून देऊ पाहत होते. मुस्लिमांच्या विरोधामध्ये हिंदू मते एकवटण्यामध्ये भाजपाला आलेले यश त्यांना बघवत नाही. मुस्लिम एकगठ्ठा मते देतात हा हिंदूचा गैरसमज आहे असे मनावर ठसवण्याचा प्रयत्न चालला होता. मुस्लिम एक गठ्ठा मते देतात म्हणून प्रतुत्तर म्हणून हिंदूही एकत्र येतात - त्यांच्या एकत्र येण्याला निमित्त मिळते - असा प्रचार करण्यास भाजपाला वाव मिळतो हे फेक्युलरांच्या लक्षात आले आहे. पण हिंदू एकत्र येऊच नयेत असा त्यांचा कटाक्ष असल्यामुळे ते जातीजातीमध्ये विभागले जावेत हीच त्यांची रणनीती राहिली आहे. तेव्हा मुस्लिम लोक मौलवी सांगेल तसे मत देतात हे कसेही करून हिंदूच्या मनातून पुसण्याचे काम ११ तारखेपासून १७ तारीख पर्यंत चालू होते. एकदा आपण पोपटपंची सुरु केली की तीच देशभर बोलली जाईल अशी त्यांना अजूनही खात्री आहे. 

याचाच अर्थ इथून पुढे हे फेक्युलर  मुस्लिम मतदारांनी काय करावे ह्यावर शेरेबाजी न करता हिंदू मतदाराने काय करावे हेच आपले टार्गेट करतील हे स्पष्ट होत आहे. आणि हे करण्यामागे पुनश्च एक सुसूत्रता आहे. ती  किती भीषण आहे ते पुढील भागामध्ये पाहू. 

No comments:

Post a Comment