दंड थोपटले - शड्डू ठोकला
योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड करून भाजपच्या ’हाय कमांड’ ने सर्वांनाच जबर धक्का दिला आहे. सर्वांना म्हणजे पक्षसदस्यांना - विरोधकांना आणि जनतेला सुद्धा. त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशच्या जनतेसाठी हा सुखद धक्का आहे कारण भाजपच्या यशामागे असलेले योगींचे अथक परिश्रम सर्वांनाच दिसत होते. उत्तर प्रदेश निकालांचे सविस्तर परीक्षण मी करणार म्हटले होते पण तो विषय थोडा मागे पडला आहे - किंबहुना ते नंतरही करता येईल पण योगीजींना मुख्यमंत्री करण्यामागची कूटनीती हाच आजचा मोठा विषय आहे.
मोदी केंद्रित भाजपच्या पक्षसदस्यांमध्ये दोन तुकडे पडतात. ज्यांना क्लब १६० असे म्हणवले जाते असा गट आणि दुसरा मोदी यांचे समर्थक. क्लब १६० गटाने आपली संपूर्ण व्यूहरचना २०१४ मध्ये भाजप १६० सीटच्या पुढे जाणार नाही ह्या गृहितकावर केली होती. पण निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ह्या गटाची बोलती बंद झाली - काही काळापुरती! इतक्या सहजासहजी हार मानणारे हे असते तर त्यांनी मुळात असली गटबाजी केलीच नसती. तेव्हा आजही कार्यरत असणार्या ह्या गटाची पुढच्या दोन वर्षांमधली म्हणजे २०१९ साठी बनवलेली जी ’योजना’ होती तिचे तीन तेरा वाजवणारा हा निर्णय आहे. आता पुनश्च या गटाला सैरभैर होऊन जुळवाजुळव करण्याची धावपळ करावी लागणार आहे.
आता मोदी समर्थकांकडे वळू या. मोदी यांचे समर्थन करणार्या पक्ष सदस्यांमधल्या अनेकांना आता सेक्यूलॅरिझमचे डोहाळे लागले आहेत. ३७० कलम - अयोध्या - तीन तलाक आदि विषयांबद्दल कोणी सध्या बोलू नये फक्त विकास ह्याच विषयावर बोलावे - काम करावे असे प्रामाणिकपणे वाटणारा एक वर्ग आहे. कडव्या हिंदुत्वाकडे भाजप वळलाच तर त्याचा व्यापक जनाधार जाईल अशी भीती ह्या वर्गाच्या मनात आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यांमुळे उत्तर प्रदेश मध्ये भाजपचे नुकसान होत आहे असे ते समजून चालले होते. निवडणुकीच्या निकालांमध्ये आदित्यनाथ यांचे योगदान मानायला ते तयार नसावेत. मोदींनी उत्तर प्रदेशसाठी एक नव्या युगाचा चेहरा - सुसंस्कृत - उच्चशिक्षित - द्यावा अशी ह्यांची इच्छा होती. अशा वर्गासाठी आदित्यनाथ यांची निवड मन खट्टू करणारी असेल.
मोदी समर्थकांमध्ये पक्षसदस्यांचा आणखी एक वर्ग आहे. ह्यांना मोदींनी हिन्दुत्वाचा ’त्यांच्या’ मनामधला अजेंडा पुढे न्यावा असे वाटत असते. हा वर्ग मोदी पुरेसे हिन्दुत्ववादी नाहीत. पंतप्रधानकीची वस्त्रे स्वीकारल्यानंतर ते सेक्यूलर होऊ घातले आहेत असे विचार करत होता. आदित्यनाथ यांच्या निवडीमुळे ह्या वर्गाला ’काहीही कारण’ नसतानाही मोदी ह्यांनी आपल्याच मनामधली आपल्या पसंतीची पावले उचलली आहेत असा भास होत असेल. परंतु हा भासच आहे कारण हिंदुत्वाचा अजेंडा पुढे न्यावा याकरिता आदित्यनाथ यांची निवड झाली आहे असे दिसत नाही. मोदी पुरेसे हिंदुत्ववादी नाहीत असे वाटणार्या आणखी काही गटांनी गुजरातमध्ये कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेत मोदींना अडचणीत आणण्याचे उपद् व्याप केले होते. थोडक्या कालावधीमध्ये मोदींनी ह्याही गटाचा बंदोबस्त केला होता. भविष्यामध्येही हेच कडवे भोंदू हिंदुत्ववादी मोदी सरकारविरुद्ध तीच पोपटपंची करण्याची शक्यता असल्यामुळे त्यांची तोंडे मोदी यांनी आता योगींची निवड करून बंद केली आहेत. मोदी आणि भाजप हाय कमांडच्या समोर किती ही आव्हाने असे वाटून तुम्ही ’झाला यांचा बंदोबस्” म्हणत निःश्वास सोडाल. पण मोदी यांच्यासमोरचे सगळ्यात मोठे आव्हान अर्थातच पक्षाबाहेर आहे. आज समोर आली आहे त्यापेक्षा वस्तुस्थितीला काही मोठे पैलू आहेत. ते बघितल्याशिवाय योगींच्या निवडीमागचे इंगित पुरते कळणार नाही.
२००२ पासून देशामधल्या गैर भाजप शक्तींनी सेक्यूलॅरिझम हीच आपली राजकीय तरफ बनवली होती. २००४ आणि २००९ मधल्या यूपीएच्या विजयामुळे आपल्या हाती winning formula मिळाला आहे आता आपण पाहिजे तसे राज्य करू आणि पाहिजे तसे जनतेला वाकवू अशी घमेंड भोंदू सेक्यूलरांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. पण कोणतेही थोतांड फार काळ चालत नाही. सेक्यूलॅरिझमच्या नावाने ज्या शक्ती एकत्र आल्या होत्या त्यांचे सेक्यूलॅरिझमचे काहीही नाते नाही किंबहुना ह्या शक्तींना सेक्यूलर तत्वांवर भारताचे राज्य चालवायचेच नाही हे त्यांच्याच कृतींमधून जनतेसमोर येत गेले. भरीसभर म्हणून ह्याच लोकांनी अत्यंत भ्रष्ट प्रशासन जनतेला दिले आणि तिला गांजले. दोन रुपये किलोने तांदूळ - गहू तोंडावर फेकले की जनता आपल्याच झोळीत मते घालेल अशी त्यांना खात्री होती. अगदी २०१४ साली हरल्यानंतर सुद्धा ही घमेंड उतरली नव्हती. सहा वर्ष उत्तम चाललेल्या अटल सरकारला आपण यूं पाडले मग मोदी किस झाड की पत्ती असा त्यांचा प्रामाणिक समज होता. त्याच भ्रमामध्ये आणि नशेमध्ये २०१४ नंतरची दोन अडीच वर्षे गेली आहेत. हीच नशा डोळ्यांवर असल्यामुळे ह्या सेक्यूलरांना मोदी सरकारचे अनेक निर्णय लोकाभिमुख नसल्याचा साक्षात्कार होत होता. नोटाबंदीमुळे देशाचा कोणताही फायदा तर झाला नाहीच पण त्यात आलेल्या अडचणींमुळे जनता त्रस्त आहे आणि आपल्याला झालेल्या त्रासाचे उत्तर ती राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये देईल अशी त्यांना दिवास्वप्ने पडत होती.
त्यांची गणिते अगदीच काही चुकीची होती असे नाही. उदा. बिहारच्या निवडणुकीमध्ये लालू - नीतीश आणि कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवली तेव्हा भाजप विरोधामधल्या मतांमधली फूट टळल्यामुळे बिहारची सत्ता भाजपच्या हातामधून निसटली. उत्तर प्रदेशामध्येही हे करता आले असते. परंतु उप्र मधला एक महत्वाचा पक्ष बसपाने गेल्या काही वर्षांमध्ये निवडणूकपूर्व आघाडी टाळून निवडून आल्यानंतर सरकार बनवण्यासाठी समर्थन घेण्याचे तंत्र अवलंबले असल्यामुळे तिथे सपा बसपा आणि कॉंग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवतील अशी शक्यता मावळली होती. याचा स्पष्ट प्रभाव उप्रच्या निवडणूक निकालांवर पडलेला असून भाजपच्या जवळजवळ २३५ सीटवरचा विजय हा विरोधकांची मते विभागल्यामुळे (highly fractured mandate) झाला असल्याचे दिसते. म्हणजेच भाजपचा विजय हा स्वबळावरचाच आहे असे नसून विरोधकांची फाटाफूट हे त्यामागचे महत्वाचे कारण आहे असे दिसते. (असे असूनही भाजपने खेळलेल्या काही अप्रतीम चालींचा फायदा त्याला निवडणुकीत कसा मिळाला हे स्वतंत्र लेखामध्ये पाहू)
ही परिस्थिती बघता मोदी यांचे विरोधक हा निष्कर्ष काढत आहेत की All is not lost! आपण सगळेच काही गमावलेले नाही. विशिष्ट परिस्थिती असेल तर मोदींचाही पराभव करता येतो. पण ही परिस्थिती नेमकी काय आहे ह्याची जणू चाचपणी विरोधक गेल्या अडीच वर्षामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये करताना दिसतात. अजूनही मोदी हरू शकतात ही आशा पल्लवित करणार्या चुटपुट का होईना घटना घडत असल्यामुळेच त्यांची मगरूरी - गुर्मी कमी होताना दिसत नाही. यापूर्वी आपण असे बघत आलो आहोत की एखादा पक्ष निवडणूक हरलाच तर पक्षातर्फे याचा अभ्यास करून आत्मपरीक्षण करून त्यावरील पावले उचलली जातील असे विधान निदान जनतेसमोर येताना दिसत असे. आतापर्यंत इतक्या निवडणुकांमध्ये सपशेल आपटून सुद्धा कॉंग्रेस पक्षातर्फे वा अन्य विरोधकांतर्फे आत्मपरीक्षण करण्याची भाषा तुम्हाला ऐकायला मिळाली का? त्यांच्या गुर्मीमध्ये ते इतके मगरूर आहेत की ह्या सर्वाची त्यांना गरजही वाटेनाशी झाली आहे. पण मोदींचे हे विरोधक बुद्दू नाहीत. भले जनतेसमोर बोलताना त्यांना जे नेमके कळले आहे त्याचे आकलन ते मांडत नसतील तरीही अंतर्मनामध्ये काही गोष्टींची स्पष्ट नोंद त्यांनी घेतल्याचे जाणवते. त्यांचे आकलन काय आहे आणि ते जनतेसमोर काय बोलतात यामधली तफावत मोदी नेमकी हेरून आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुका काही फार लांब नाहीत. आता त्या निवडणुकीची तयारी करण्याचा काळ सुरु झाला आहे. म्हणूनच आपल्याला फायदेशीर असलेले घटक कोणते ह्याला प्राधान्य देण्यात येत आहे. कारण त्यामधूनच ’रणनीती’ आखली जात असते. आजपर्यंत मोदी लाटेला अडवणार्या तीन निवडणुका आपल्याला दिसतात. पहिली अर्थातच दिल्ली विधानसभेची. ह्या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने घवघवीत यश मिळवले त्यातून देशव्यापी मोदी पर्याय म्हणून केजरीवाल आणि आम आदमी पक्ष जागा घेऊ शकतो का याची चाचपणी सुरु झाली. पण केजरीवाल यांनी आपल्या वागणुकीमधून आपण ह्या जबाबदारीला नालायक आहोत हे सिद्धच केले आहे. शिवाय त्यांच्या विषयी देशभरच्या जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे केजरीवाल हा पर्याय मागे टाकावा लागला. त्यानंतर चे उदाहरण म्हणजे बिहारच्या निवडणुका. इथे मोदी विरोधकांना यशाचा एक नवा फॉर्म्युला मिळाला. त्यातून समोर आलेले नीतीश कुमार यांना देशव्यापी पर्याय म्हणून स्वीकारता ये ईल का याची चाचपणी चालू असतानाच मूळ स्वभावावर गेलेल्या लालू यांनी नीतीश यांना पुरते छळले आहे. ह्यातून खुद्द नीतीश यांचाच भ्रमनिरास झाला असल्याचे दिसत असून इथून पुढे ते मोदी विरोधकांशी हातमिळवणी करतीलच याची खात्री विरोधकांना उरलेली नाही. अशा तर्हेने दोन पर्याय असून नसल्यात जमा आहेत. पण विरोधकांकडे तिसर्या पर्यायाचा फॉर्म्युला आहे. मी ’पर्याय’ आहे असे म्हणत नाही 'पर्यायाचा फॉर्म्युला' आहे असे म्हणते हे लक्षात घ्यावे. ही बाब महाराष्ट्राशी जुळलेली असल्यामुळे कदाचित आपण त्याच्याशी अतिपरिचित आहोत. म्हणून इथे आपल्या मनामधल्या काही बाबी बाजूला ठेवून शक्यता अशक्यता यांचा विचार करावा लागतो.
लक्षात घ्या की विरोधक हे समजून चुकले आहेत की सेक्यूलॅरिझम ही तरफ आता निकामी झाली असून ही तरफ वापरून आपण सत्तेपर्यंत पोहोचू शकणार नाही याची त्यांना खात्री पटली आहे. दिवस आहेत हिंदुत्वाचे. मोदी जर गांधी ’पळवू’ शकतात तर मग हिंदुत्वाचा अजेंडा आपल्याला पळवता येईल का याची चाचपणी सुरु आहे. हे कितीही धक्कादायक असले तरी आपल्या डोळ्यासमोर दिसत असून आपण केवळ विचार न केल्यामुळे हा धक्का आहे असे लक्षात येईल. अर्थात ह्या हिंदुत्वाची मांडणी संघ करतो तशी होणार नाही. जसेजसे सत्तेमध्ये दिवस जातील तसेतसे मोदी सेक्यूलर होत जातील. मग हीच संधी साधून आपल्या मांडणीमधले प्रचारासाठी हिंदुत्व हा मुद्दा वापरायचा अशी व्यूहरचना मला दिसते.
हे प्रयोग नवीन नाहीत. १९८५ मध्ये शाहबानो खटल्यानंतरच्या निवडणुकीमध्ये तिथल्या CPI(M) कम्युनिस्ट पक्षाने राजीव गांधी यांच्या निर्णयाला विरोध केला होता. असेही - तुम्हाला कितीही अतार्किक वाटले तरीही - केरळी जनतेच्या मनामध्ये त्यावेळी म्हणजे १९८५ मध्ये कॉंग्रेस हा मुस्लिम आणि ख्रिश्चन यांचा पक्ष तर कम्युनिस्ट हा हिंदुंचा पक्ष असेच समीकरण होते. शाहबानो खटल्यानंतर झालेल्या नव्या कायद्याला विरोध करणारा कम्युनिस्ट पक्ष तेव्हा दणदणीत विजय प्राप्त करता झाला. (ही निवडणूक पार्ल्याच्या निवडणुकीनंतर झाली होती.) दुसरा प्रयोग केला तो मायावती यांनी. ’तिलक तराजू और तलवार इनको मारो जूते चार’ ही आपली परंपरागत घोषणा सोडून मायावती यांनी २००७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ’हाथी नहीं गणेश है ब्रह्मा विष्णु महेश है’ अशी घोषणा देत जेव्हा उप्र ची सत्ता काबीज केली तेव्हा NDTV वरील चर्चेमध्ये श्री प्रणोय रॉय यांनी ’मायावतींनी SOFT हिंदुत्व स्वीकारल्याची टिप्पणी केली होती. (अर्थात मायावती यांनी हा नमुना पेश केला तरी त्यातून भाजप नेतृत्व तेव्हा काहीच शिकले नाही हे २००९ च्या दारूण पराभवामधून पुढे आलेच.) तेव्हा हिंदुत्वाची ढाल करून निवडणुका अगदी स्वतःला सेक्यूलर म्हणवणार्या पक्षानीही जिंकल्या आहेत याची ही आठवण यासाठी करून द्यायची की अशा शक्यता राजकारणामध्ये आजमावल्या जात असतात हे नोंदण्यासाठी.
संघ ही हिंदुत्ववादाची आज मुख्य विचारधारा बनली असली तरीही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे अनेक गट या ना त्या कारणासाठी संघाचे विचार नाकारत असतात. त्यामधे हिंदु महासभेचा उल्लेख करता ये ईल. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये उ.प्र.मध्ये महासभेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता याच्या नोंदी सापडतात. महासभेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न आता जोमाने होताना दिसत आहेत. ह्या व्यतिरिक्त Fringe Elements म्हणून ज्यांचा उल्लेख माध्यमे करत असतात असे अनेक हिंदुत्ववादी गट - ज्यामधले काही संघावर नाराज होऊन बाहेर पडले आहेत - आपापल्या पद्धतीने काम करत असतात. हे हिंदुत्ववादी म्हणून मिरवत असले तरीही संघाशी उभा दावा असल्याप्रमाणे वागतात. हा सगळा फौजफाटा गोळा करून मोदी यांना कोंडीत पकडण्याची चाल केली जाण्याची दाट शक्यता आहे. आता यापैकी राजकीय जीवनामध्ये कोणीच दिसत नाही. मग हे आव्हान कितपत नोंद घेण्याइतके मोठे मानायचे असा प्रश्न आपल्या मनामध्ये ये ईल. Here enters Shivasena.
संघ - भाजप ह्यांच्याशी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन हात करणारा राजकीय विकल्प म्हणून सेक्यूलरांची गॅंग शिवसेनेकडे बघत आहे. श्री बाळासाहेब यांचे ऋण मानणारा मतदार मागे उभा राहिल्यामुळे शिवसेनेने महाराष्ट्राची सत्ता एकहाती भाजपच्या हातामध्ये जाण्यापासून रोखली हे सत्य आहे. हे एकदा नव्हे तर दोनदा सिद्ध झाले आहे. म्हणूनच बुडत्याला काडीचा आधार ह्या न्यायाने शिवसेना ही आता सेक्यूलर गॅंगला जवळची वाटू लागली आहे. खरे तर त्यांना शिवसेनेमध्ये ’रस’ नसून त्यानिमित्ताने मोदींना पर्याय म्हणून एक राजकीय फॉर्म्युला जनतेसमोर मांडता येईल का असा विचार ते करत आहेत. ही वस्तुस्थिती आहे म्हणूनच उद्धवजी कधी ममताजींबरोबर राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जाताना दिसतात तर कधी 'मातोश्री' वरती हार्दिक पटेल त्यांची भेट घेताना दिसतात. सेक्यूलर गॅंगला स्वीकारता येईल अशी भाषाही श्री ठाकरे यांच्या तोंडी कधीकधी दिसते. उदा. श्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते शेंडी जानव्याचे हिंदुत्व आम्हाला अभिप्रेत नाही. आताच म्हणजे अगदी एखाद आठवड्यापूर्वी 'सामना' मध्ये छापून आले होते की शिवसेना लाल किल्ल्यावरती भगवा फडकवेल. ह्याची काही भाजपेयी टिंगल करताना दिसले. पण 'सामना'ने छापलेले विधान म्हणजे बरळलेले वक्तव्य नसून त्यामगे काहीतरी निश्चित हालचाली आहेत असे लक्षात येते.
आजतरी ह्या प्रयोगाच्या रेषा धूसर आहेत - जनतेसमोर. पण केंद्र सरकारकडे याबद्दल विश्वसनीय माहिती असेलच ना? तेव्हा मोदी यांच्या विरोधकांनी अखेर सेक्यूलॅरिझमची तरफ सोडून हिंदुत्वाची तरफ स्वीकारण्याचे प्रयत्न चालवले आहेत हीच एक बातमी म्हणायची. निदान विक्री व्यवस्था म्हणून का होईना सेक्यूलॅरिझमला राजकीय मार्केटिंग मध्ये डच्चू मिळाला आहे. नवे हिंदुत्व आपल्या समोर कसे पेश होईल याची उत्कंठा अर्थातच लागणार. त्यामध्ये आजच्या सेक्यूलर फौजेला नेमके कोणाचे सहकार्य मिळेल - क्लब १६० सकट - सर्व पर्यायांचे हेही बघायचे आहे!
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर डॉ. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते की इथून पुढे भारतामध्ये भाजपला पर्याय म्हणून एक हिंदुत्ववादी पक्षच उभा राहू शकतो. स्वामी धक्कादायक विधाने करतात खरे. पण त्यांचे हे राजकीय निरीक्षण किती अचूक होते हे प्रतिष्ठा गमावलेल्या सेक्यूलर आघाडीने सिद्ध केले आहे.
पण मोदी - शहा हेही कच्चे खेळाडू नाहीत. योगी आदित्यनाथ यांची उ.प्र.चे मुख्यमंत्री म्हणून निवड करून त्यांनीही दंड थोपटले आहेत, शड्डू ठोकला आहे. पुढचा सामना कसा रंगेल ह्याकडे लक्ष ठेवू याच.
No comments:
Post a Comment