Saturday, 25 April 2020

किम जॉन्ग उनच्या मृत्यूचे गूढ


Donald Trump says he and North Korea's Kim Jong-un 'fell in love ...

(पौर्वात्य प्रथेनुसार घरच्या ज्येष्ठाचा हात संकटसमयी धरावा तसे किम ट्रम्प यांच्यासोबत चालताना)


किम जॉन्ग उनच्या मृत्यूचे गूढ

उत्तर कोरियाचे नेते किम जॉन्ग उन ११ एप्रिल २०२० रोजी लेबर पार्टीच्या पॉलिटब्यूरो बैठकीमध्ये हजर होते. त्यानंतर मात्र ते कोणत्याही समारंभात दिसलेले नाहीत. त्यांच्या वडिलांच्या वा आजोबांच्या जन्मदिवस सोहळ्यामध्ये देखील ते १५ एप्रिलला हजर राहिले नाहीत. गेल्या आठवड्यामध्ये उत्तर कोरियाने किम राहतात त्याच वोनसान शहरानजिक काही प्रक्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या. साधारणपणे अशा चाचण्यांच्या बातमीमध्ये किमचा उल्लेख हमखास असतोच. पण यावेळी तसे घडले नाही. त्यामुळे अफवांना पीक येत आहे. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यामध्ये ते दगावले असल्याच्या बातम्या वेगाने पसरत आहेत. अशा बातम्या देणार्‍यात अमेरिकेचे सी एन एन ही वृत्तवाहिनी होती तसेच अन्यही माध्यमे अशीच बातमी देत आहेत. समाजमाध्यमांमध्ये तर किम यांच्या शवाचा खोटा फोटोदेखील कोणीतरी टाकून खळबळ उडवून दिली होती पण त्यातील बिंग लगेचच फुटले आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्याची (ली झाओशिन्ग यांची) भाची हॉन्गकॉन्ग सॅटेलाईट टीव्हीच्या उप डायरेक्टरपदावर काम करतात. त्यांनीदेखील ट्वीटरसारख्याच चिनी व्यासपीठ वाईबोमधील पोस्टमधून "अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून कळलेल्या माहितीनुसार" किमच्या मृत्यूची बातमी दिली होती. तिचे जवळजवळ १५ लाख वाचक आहेत. साहजिकच ही बातमी वार्‍यासारखी पसरली. तर दक्षिण कोरियाचे वृत्तपत्र जून्ग आन्ग इल्बोने अधिकृत बातमी यायच्या आतच मृत्यूलेखही छापला. आधीच कोरोनामुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे त्यातच किमच्या मृत्यूने भर पडली आहे असे लेखात छापले होते. नंतर ही अनवधानाने झालेली चूक आहे असे म्हणत लेख काढून टाकण्यात आला. तरीदेखील अशा प्रकारचा लेख लिहून तयार ठेवला गेला ही देखील एक मोठीच बातमी ठरते. शनिवार दिनांक २५ एप्रिलच्या रोदोन्ग सिनमुन या दैनिकाच्या अंकातही किमचा उल्लेख नाही. सर्वसाधारणपणे रोजच्या रोज त्यांचे कथन पहिल्या पानावर बघायला मिळते. आजच्या अंकामध्ये दोन नंबरच्या पानावर कॅबिनेटचे प्रमुख किम जे रिओन्ग यांचा फोटो मात्र छापलेला आहे. द वर्ल्ड एन्ड नॉर्थ इस्ट एशिया पीस फोरम WNPF या संस्थेचे चेयरमन आणि कोरिया उपखंडाचे तज्ञ मानले जाणारे जान्ग सुन्ग मिन यांनीही एका लेखामध्ये आपला अंदाज व्यक्त करत असताना किमच्या मृत्यूविषयी आपली शंका व्यक्त केली आहे. "किम जॉन्ग उन यांची प्रकृती गंभीर असून तेथील प्रशासनाचे असे मत झाले आहे की त्यांची प्रकृती आता सुधारण्याच्या स्थितीमध्ये नाही." 

याखेरीज चीनने आपले वैद्यकीय पथक उत्तर कोरियामध्ये रवाना केल्याची बातमी रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर किमची प्रकृती खालावल्याच्या बातम्यांमध्येच चिनी डॉक्टर्सचे पथक तिथे कोरियन डॉक्टर्सच्या मदतीसाठी पोचले आहे. पथकामध्ये वैद्यकीय कर्मचार्‍यांव्यतिरिक्त काही अधिकारी वर्गही गेला असल्याचा अंदाज आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या इन्टरनॅशनल लायझोन खात्यातील वरिष्ठ सदस्याच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरूवारी चीनमधून तिथे प्रयाण केले आहे. याच खात्याकडे उत्तर कोरिया संबंधांचे काम पक्षाने सोपवलेले आहे. या भेटीमुळे ली झाओशिन्ग यांच्या भाचीने दिलेल्या वृत्त विश्वसनीय वाटू लागते. 

असे असले तरी उत्तर कोरियाचा सर्वात जवळचा शेजारी देश दक्षिण कोरियाच्या सूत्रांनी म्हटले आहे की किमच्या मृत्यूची बातमी खोटी ठरू शकते. गेल्याच आठवड्यामध्ये किम वोनसान शहरामध्येच असल्याचे तसेच कोणाचीही मदत न घेता फेर्‍या मारत असल्याचे दृश्य टिपल्याचे ही सूत्रे सांगतात.  त्यांच्या सोबत कोणीही मदतनीसही नव्हता वा ते व्हीलचेयरमधून फिरत नव्हते असे ही सूत्रे सांगतात. शिवाय त्यांच्या गाड्यांच्या फेर्‍या वा त्यांच्यासोबत काम करणार्‍या सहकार्‍यांची वर्दळ तिथे बघायला मिळाली आहे. ही सर्व दृश्ये उपग्रहाने तसेच टेहळणी विमानांनी टिपली असून कोरियाची सूत्रे त्यावर अधिक भर देत आहेत. कोरियाची राजधानी प्योनग्यान्ग हे दाटीवाटीचे शहर असून किमच्या काही सहकार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यामुळे किम प्योनग्यान्ग सोडून वोनसानमध्ये रहायला आले असावेत असा अंदाज केला जात आहे. वोनसान शहरामध्येच वैद्यकीय सोयी उपलब्ध असून किमवरील शस्त्रक्रिया तिथेच करण्यात आली असण्याची शक्यताही ती सूत्रे कळवतात. ट्रम्प यांना याविषयी विचारले असता - सी एन एन ने फेक न्यूज दिली असल्याचे ट्रम्प म्हणाले. किम यांची प्रकृती ठीक असल्याचे मला कळते. माझे आणि त्यांचे चांगले संबंध जुळले होते आणि मी आशा करतो की त्यांची प्रकृती ठीकच असेल असे ट्रम्प म्हणाले.

जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर कोरोना साथीमुळे गंभीर संकट कोसळले असून उत्तर कोरिया त्याला अपवाद नाही. पण किमच्या मृत्यूसोबतच उत्तर कोरियामध्ये लष्करी हालचाली सुरू असल्याचे संकेत काही सूत्रे देत आहेत. तसेच दक्षिण कोरियाने आपल्या सीमेवरती अधिक लक्ष केंद्रित केले असून परिस्थिती काय वळण घे ईल याची अनिश्चितता आहे. जर काही विपरित बातमी खरी ठरलीच तर अनेक निर्वासितांचे लोंढे दक्षिण कोरियाच्या दिशेने चालू होण्याची शक्यता लक्षात घेऊन दक्षिण कोरियाने त्याही घटनेची तयारी सुरू केली आहे. 

एकीकडे चीनविरोधात जगभरात एक लाट येत असून अमेरिका जर्मनी ब्रिटन ऑस्ट्रेलिया आदि देशांमधून काही सूत्रांनी तर चीनकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कोर्टाचे दारही ठोठावले आहे. चीनची अवाजवी बाजू घेतली म्हणून डब्ल्यूएचओ संघटनेलाही टीकेचा भडिमार सहन करावा लागत आहे. आर्थिक दृष्ट्या समर्थ चीनविरोधात सगळे देश एकत्र आले तर त्याची कोंडी करणे शक्य होईल. याच वातावरणामध्ये अमेरिकेने वन चायना तत्व गुंडाळून टाकत चीनच्या विरोधाला न जुमानता ताइवानला जागतिक संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व मिळवून देण्याचा राजमार्ग खुला करणारा कायदा मंजूर केला आहे. या जागतिक संबंधांच्या पार्श्वभूमीवरती किम यांच्या मृत्यूच्या खबरा लिब्बू सी एन एन ने द्याव्यात - चीनच्या मंत्र्याच्या भाचीनेही त्यावर शिक्कामोर्तब करावे - आणि किमच्या प्रकृतीच्या चिंतेने (?) चीनने तिथे आपले पथक पाठवावे या घटना नेमके काय दर्शवतात बरे?

कोरियावर लिहिलेल्या दीर्घ मालिकेमध्ये मी ट्रम्प यांनी किम यांच्याशी कसे विशेष संबंध जोडले - चीनच्या अखंड पहार्‍यामधूनही किम आणि ट्रम्प जवळ आले येऊ शकले ही मोठी घटना होती. आज  लिब्बूंनी किमच्या मृत्यूची बातमी उठवावी आणि अमेरिकेने ती नाकारावी ह्याचे विशेष महत्व तुमच्या नजरेतून सुटणार नाही. भारताच्या मदतीने अमेरिकेने उत्तर कोरियाचे चक्रव्यूह भेदले असल्याची दाट शक्यता आहे. चीन सर्व बाजूंनी संकटात घेरला गेला असताना त्याचे दोन साथीदार त्याच्यापासून दूर गेले तर चीन एकाकी पडू शकतो. म्हणून ट्रम्प यांचा दोस्त बनलेल्या किमला हटवून तिथे चीनची लष्करी सूत्रे सत्ता हाती घेण्याचा डाव खेळू शकतात. तीच परिस्थिती पाकिस्तानमध्ये आहे. तिथेही वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली सुरू असून काही बैठकींमध्ये जनरल बाजवा नसल्याच्या बातम्या याच काळामध्ये बघायला मिळाल्या होत्या. उत्तर कोरिया पाकिस्तान याखेरीज चीनचा सहकारी देश म्हणजे इराण. हे त्रिकूट हाणून पाडले की चीनचा बुद्धिबळपट कुठच्या कुठे फेकला जाऊ शकतो. या देशांमध्ये अमेरिकेशी जवळीक करणारे नव्हे तर आपल्याशी इमान राखणारे सत्ताधारी आज चीनला हवे आहेत. या वातावरणामध्ये किम जॉन्ग उन यांच्या मृत्यूच्या बातम्या दुर्दैवाने खर्‍या ठरल्याच तर भारतीय डावपेचांना धक्का बसेल. अशा तर्‍हेने भारताच्या परसदारामध्ये परिस्थिती गढूळ व गूढ बनली असून कोरोनापेक्षाही मोठे संकट आपल्या डोक्यावर घोंगावत आहे हे निश्चित. 

एकीकडे कोरोनाचा सामना - दुसरीकडे अर्थव्यवस्थेचे आव्हान - तिसरीकडे चीनमधून स्थालंतरित होऊ इच्छिणार्‍या कंपन्यांच्या गरजांची पूर्तता करून त्यांचे भारतात स्वागत करण्याच्या हालचाली यासोबत पाकव्याप्त काश्मिर आणि अरुणाचल व सिक्किमला जोडलेली चीन सीमा येथील हालचाली अशा चौफेर बाबींना मोदी तोंड देत आहेत. अशा दुर्घर परिस्थितीमध्येच मोदींच्या नेतृत्व गुणांना आजवर उजाळा मिळालेला आहे आणि आताही तसेच होईल. या सत्वपरिक्षेस ते उतरले तर जागतिक नेतृत्वाची झूल आपणहूनच त्यांच्याकडे चालून येईल. 

दोन वर्षे जुन्या लेखमालेची ब्लॉगवरील लिन्क.




9 comments:

  1. 🙏🏻🙏🏻🙏🏻 फारच गूढ आहे आणि चीन ही खेळी खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही . कोरोना हे फक्त एक प्यादे आहे मागून फार भीषण खेळी असू शकते भारताने फार सावध पावले उचलावी लागतील कारण अंतर्गत शत्रू पण आहेतच चीन ला सपोर्ट करायला

    ReplyDelete
  2. या बद्दल कृपया विस्ताराने सांगावे --तर्‍हेने भारताच्या परसदारामध्ये परिस्थिती गढूळ व गूढ बनली असून कोरोनापेक्षाही मोठे संकट आपल्या डोक्यावर घोंगावत आहे हे निश्चित---पंकज

    ReplyDelete
  3. पुढील बाबतीत काही विशेष लक्ष नाहीये भारताचे , --चीनमधून स्थालंतरित होऊ इच्छिणार्‍या कंपन्यांच्या गरजांची पूर्तता करून त्यांचे भारतात स्वागत करण्याच्या ₹₹पंकज

    ReplyDelete
  4. कोरोना हा एक गूढ विषाणू आहे, ज्या चीन मधून निघाला तिथे काहीएक झाले नाही आणि बाकी युरोपियन देशांमध्ये भयंकर पसरला आहे... कदाचित चीन ची हि एक घातकी खेळी असू शकते ...खेड वाटतो कि भारतात अजूनही त्याबद्दल कलगी नाही...

    ReplyDelete
  5. बरेच दिवस झालेत ताई, आपला अजून लेख प्रसिद्ध झाला नाही. आपले जवळ-जवळ सर्व लेख मी वाचत आणलेले आहेत. खूपच सुंदर आणि तर्कसुसंगत लेख/विचार आहेत. आणि मनाला पटणारे आणि सत्य परिस्थिती विशद करणारे आहेत. ताई, तुमच्या लेखांची खूप आतुरतेने वाट पाहत आहे कारण जागतीक किंवा देशातील घटना अशाप्रकारे समजुन सांगणारे आम्हाला आजपर्यंत मिळालेच नाही.तरी कृपा करून तुम्ही तुमच्या लेखात खंड पडू देऊ नका ही विनंती!

    ReplyDelete
  6. बरेच दिवस झालेत ताई, आपला अजून लेख प्रसिद्ध झाला नाही. आपले जवळ-जवळ सर्व लेख मी वाचत आणलेले आहेत. खूपच सुंदर आणि तर्कसुसंगत लेख/विचार आहेत. आणि मनाला पटणारे आणि सत्य परिस्थिती विशद करणारे आहेत. ताई, तुमच्या लेखांची खूप आतुरतेने वाट पाहत आहे कारण जागतीक किंवा देशातील घटना अशाप्रकारे समजुन सांगणारे आम्हाला आजपर्यंत मिळालेच नाही.तरी कृपा करून तुम्ही तुमच्या लेखात खंड पडू देऊ नका ही विनंती!

    ReplyDelete
  7. Waiting for your next article, SwatiTai!

    ReplyDelete
  8. Waiting for next article.

    ReplyDelete
  9. Waiting for your new article...

    ReplyDelete