Friday, 11 August 2017

पडद्या आडचा सूत्रधार की पाठीराखा?

शी जीन पिंग यांनी स्वतःच्या पक्षातील सदस्यांविरुद्ध - सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध -  सैन्यातील अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार विरोधी मोहीम चालवली आहे. सैन्याचे मनुष्यबळ कमी करण्याची योजना राबवली जात आहे. कमी केलेले सर्वच जवानांना पुन्हा नोकरी मिळणार नाही त्यामुळे ते अस्वस्थ आहेत सैन्याची मक्तेदारी समजल्या गेलेल्या क्षेत्रातील उद्योगधंदे पिंग यांनी खाजगी उद्योगांकरिता खुले करून सैन्याची ताकद कमी करण्याचा सपाटा लावला आहे. हे सर्व दुखावलेले घटक एकत्र येऊन आपली हकालपट्टी करू शकतात याची त्यांना जाणीव आहे. ह्या सर्वासाठी जनता आपल्या बाजूने उभी राहिली नाही तर आपण सत्तेमध्ये तगणार नाही याची त्यांना खात्री आहे. चीनमध्ये जनतेचा आवाज ऐकण्याची काहीच सोय नाही. म्हणून In the Name of People ह्या नावाची प्रचंड लोकप्रिय टीव्ही सिरीयल काढून त्याद्वारे लोकांना बोलते करून त्यांचे मत विरोधकांना ऐकवण्याची सोय त्यांना करावी लागली आहे. प्रश्न असा उठतो की इतकी सगळी हिम्मत शी जिना पिंग कोणाच्या आधारावर करत आहेत?

अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पक्ष असो की डेमोक्रॅट - दोन्ही पक्ष लिबरल म्हणवून घेण्याच्या स्पर्धेत होते. त्यांच्या उदारमतवादामुळे देशाचे नुकसान होते असे जनतेचे मत होते तिला न जुमानता त्यांचे धोरण पुढे चालूच होते. ही कोंडी ट्रम्प यांनी फोडली. अमेरिकन सामाजिक जीवनामधून ह्या उदारमतवादाची सद्दी संपवण्याचे प्रयत्न ते करत आहेत. वर्षानुवर्षे एकाच साच्यामध्ये अडकून निकामी झालेली अमेरिकन परराष्ट्रनीती आमूलाग्र बदलण्याचे ते प्रयत्न करत आहेत. देशातील जनतेचे जॉब्स बाहेर देशात जाऊ नयेत - बाहेरील देशातील मालाला झुकते माप मिळू नये म्हणून धोरण बदलू पाहत आहेत. पण जुन्या व्यवस्थेमध्येच ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांना हे बदल मान्य नाहीत ती मंडळी ट्रम्प याना विरोध करत आहेत. सरकारी यंत्रणा - पत्रकार - बुद्धिवादी - थिंक टँक्स - राजकारणी - उद्योगव्यवसाय सर्वच क्षेत्रातून ट्रम्प याना टोकाचा विरोध होतो. अगदी त्यांच्यावर इम्पीचमेंट खटला होणारच म्हणून शपथ घेणारे लोक देखील आहेत. मग हे सगळे बदल करण्याचे धाडस ते कोणाच्या आधारावर करत आहेत?

दीड दशकापूर्वी सत्तेवर आरूढ झालेल्या पुतीन ह्यांची अवस्था वेगळी नव्हती. सोविएत रशियाच्या विघटनानंतर साम्राज्यामध्ये सामील असलेले देश फुटून निघाले होते. नेटोचे (NATO) सभासद झाले होते. रशियाच्या साधन संपत्तीवरती - आर्थिक  व्यवस्थेवरती काही लोकांनी कब्जा केला होता. देशाला लुटायचे उद्योग चालू होते. आपल्याला ही लूट करता यावी म्हणून कळीच्या जागी बसलेल्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात सामावून घेतले गेले होते. रशियामध्ये नव्याने माफिया उदयाला आले होते. एक एक करत धोरण बदलून पुतीन ह्यांनी ह्या सर्व शक्तींचा निर्दयपणे बंदोबस्त केला. आज जगामध्ये रशियाच्या शब्दाला वजन प्राप्त करून दिले. हे सर्व त्यांनी कोणाच्या आधाराने केले?

भारतामधली नरेंद्र मोदी ह्यांची परिस्थिती आपण चांगली जाणतो. सत्तेवरती आल्यानंतर मोदींनी परराष्ट्र धोरणामध्ये पंचशील तत्वाची मक्तेदारी हटवली. युनोमध्ये बदल हवेत म्हणून सूतोवाच केले. सार्कवरती भारत-पाक संबंधांची छाया पडली होती आणि कारभार ठप्प झाला होता. त्यात पाक वगळता अन्य देशांना एकत्र आणून संबंध प्रवाही केले. भारताच्या धोरणाची गाज जगाच्या कानाकोपऱ्यात ऐकू येऊ लागली. देशांतर्गत सुधारणांचा मनोराच रचला आहे. हे सर्व करताना त्यांना टोकाचा विरोध होत आहे. जाणत व्यवस्थेमध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत ते मोदींना खाली खेचण्याचे प्रयत्न करत आहेत. एका चांडाळ चौकडीचा सामना त्यांना करावा लागतो आहे आणि सत्तेवर येऊन तीन वर्षे झाली तरी आपल्या ह्या देशद्रोही शत्रुंना ते  पूर्णपणे नेस्तनाबूत करू शकले असे म्हणता येत नाही. मग मोदी कोणाच्या आधारावरती हे बदल घडवण्याची हिम्मत करत आहेत?

जगभरच्या देशांमध्ये बँकांमध्ये अफरातफर करणारे एकच आहेत का? जगभरच्या देशांमध्ये रियल इस्टेटचे भाव कृत्रिमरीत्या वाढवून जनतेला लुटून झाले की बाजारभाव कोसळतात का? जगभरच्या शेयर मार्केट मध्ये गुतवणूक करून फायदा ओरपणारे एकच आहेत का? जगभरामध्ये अंमली पदार्थाची तस्करी आणि त्यातून मिळणारे फायदे ओरपणारे एकच आहेत का? जगभरच्या विविध क्षेत्रामध्ये नफेबाजीचा धुमाकूळ घालणारे कोण आहेत? थिंक टँक्स - NGO - माध्यमे चालवणारे कोण आहेत? जागतिक व्यासपीठावरती दिले जाणारे पुरस्कार आणि त्यांचे गणित कोण जमवतो?

शी जीन पिंग - ट्रम्प - पुतीन - मोदी ह्या सर्वाना आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये जमलेली घाण साफ करण्यासाठी - लोकांना सोबतीला घेऊन वाटचाल करण्यासाठी देशप्रेमाला हाक द्यावी लागत आहे ना?

मग ह्या सगळ्यांचा एक सामायिक शत्रू आहे का? आणि त्याचा सामना करण्याची एक सामायिक योजना आहे का? अनेक प्रसंग असे येतील की जिथे ह्या नेत्यांना एकमेकांच्या विरोधी  भूमिका घ्यावी लागत आहे असे दिसेल. पण एका व्यापक ध्येयाच्या दिशेने तर हे सगळे वाटचाल करत नाहीत ना? असेल तर मग ते व्यापक ध्येय कोणते? 

1 comment:

  1. यांचे शत्रु एकच आहेत येस ... १३ family ..

    ReplyDelete