इसवी सनापूर्वी २०० वर्षे आधी चीनमध्ये 'चीन' (QIN)नावाचे एक राजघराणे होते. हे चीनचे पहिले राजघराणे. त्याच्या नावावरून चीनचे नाव 'चीन' (QIN)असे पडले आहे. पहिले राजघराणे म्हणून जसे त्याचे अप्रूप आहे तसेच त्याच्या कारकीर्दीमुळे सुद्धा. त्याच्या साम्राज्याच्या प्रदेशाला आज शान्शी वा गान्सू म्हटले जाते. समकालीन सहा अन्य राज्यांच्या पराभव करून हे घराणे सत्तेवर आले होते. 'चीन शी हुआंग' असे त्याच्या सम्राटाचे नाव आहे. हे घराणे सत्तेवर येण्यापूर्वी चीनमध्ये एक कालखंड येऊन गेला त्याला Warring States period असे म्हटले जाते. एकमेकांशी भांडणाऱ्या सात सत्तांमधील संघर्ष असे त्याचे स्वरूप होते. ह्याच काळामध्ये सून त्सु यांचे सुप्रसिद्ध पुस्तक Art of War लिहिले गेले. युद्धनीतीवरचे हे पुस्तक इतके प्रभावी ठरले की चिनी मनावरती आजही त्याचा प्रचंड पगडा आहे.
भारतीय लोक जसे राज्यकारभाराच्या सुव्यवस्थेसाठी आर्य चाणक्यांकडे एक आदर्श म्हणून बघतात तसेच युद्ध कसे खेळले जावे ह्याचा आदर्श म्हणून चिनी माणूस ह्या पुस्तकाकडे आदराने बघतो. जसे आर्य चाणक्य यांनी कोणत्याही आदर्शवादाच्या वा इझमच्या पाठी न जाता अत्यंत व्यवहारी दृष्टिकोनामधून राज्य कसे चालवले जावे ह्याचा वस्तुपाठ आपल्या पुस्तकामध्ये दिला आहे तसेच सून त्सु यांच्या पुस्तकामध्ये युद्धाच्या तंत्राबद्दल आणि व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन मिळते. साहजिकच पाय जमिनीवर ठेवून युद्धाची आखणी कशी करावी ह्याच्या नोंदी त्यात मिळतात. एकप्रकारे सून त्सु यांचे युद्धतंत्र निर्दयपणे शत्रुंवरती विजय कसा मिळवावा ह्याचा विचार करताना दिसतो. सून त्सुच्या आधीची युद्धनीती लशी होती? एकदा शत्रूचे सैन्य नदी पार करत होते. त्याक्षणी त्यांचा पराभव करणे सोपे होते पण राजा झू ने तसे करण्याचे टाळले. शत्रूचे सैन्य नदीपार आल्यावर - स्थिरावल्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये त्याचा दारुण पराभव झाला. पण आपण दाखवलेल्या औदार्याबद्दल त्याला खंत नव्हती. शहाण्यांनी असेच वागावे असे त्याचे मत होते. सून त्सु अशा प्रकारचे औदार्य शत्रूला कधीच दाखवू नये असे मानणारा होता.
ह्याच काळामध्ये उदयाला आला तो 'Legalism' - एक मतप्रवाह - विचारसरणी. नीतीमत्ता किंवा आदर्शवादाच्या मागे न धावता वस्तुस्थिती काय आहे ते पाहून निर्णय घेण्याच्या - अगदी पद्धतशीर मांडणी करून त्याप्रमाणे आपले कार्य करण्याच्या विचारसरणीला चीनमध्ये Legalism असे म्हटले जाऊ लागले. Warring States Period मधल्या ह्या विचारसरणीचा पाठपुरावा 'चीन Qin' राजघराण्याने केला असे आता दिसते.
Warring States Period मध्ये Legalism ही विचारसरणी प्रचलित झाली होती. अशाच प्रकारे आणखी जवळपास शंभर मतप्रवाह होते. पण चीन राजघराण्याने Legalism चा स्वीकार करण्याचे ठरवले 'चीन QIN'राजघराण्याचे काम ह्या परंपरेमुळे सोपे झाले असे म्हणता येईल. ह्याच विचारसरणीने रचलेल्या पायामध्ये सुयोग्य बदल करत अत्यंत वस्तुनिष्ठ आणि व्यवहार्य तत्वावरती राज्यव्यवस्था निर्माण करण्याचे अवघड काम 'चीन शी हुआंग' ह्या सम्राटाने पार पडले. सुरुवातीच्या काळात अधिकाधिक अमानुष शिक्षा ठोठावण्याचा सपाटा न लावता पूर्वीच्या राज्यकारभारापेक्षा अधिक मानवी चेहरा असलेले राज्य चालवले गेले. मी म्हणेन तेच खरे अशी भूमिका इथे घेतली गेली नव्हती. त्यामुळेच Legalistic दृष्टीकोनाबरोबरच प्राचीन काळापासून चीनमध्ये चालत आलेल्या कन्फ्यूशियसच्या विचारसरणीलाही त्याने सामावून घेतले होते. खरे तर कनफ्यूशियसची विचारसरणी आणि Legalism विचारसरणी यामध्ये चांगलाच आंतरविरोध आहे पण त्याही विचारसरणीचे समाजमधले स्थान पुसून टाकण्याचे प्रयत्न केले गेले नाहीत.
"चीन" राजघराण्याच्या सर्वसमावेशकतेचे उदाहरण म्हणजे त्या काळामध्ये लिहिले गेलेले काही कागदपत्रे अगदी स्पष्टपणे नमूद करतात की "विचारप्रणाली कोणतीही असो त्या सर्वांचा उद्देश लोकांना योग्य मार्गदर्शन करणे - सुखलोलुपतेपासून त्यांना दूर ठेवणे आणि शुभ विचार रुजवणे हाच असतो". ज्या काळामध्ये मानवी राजसत्ता एकमेकांचे अस्तित्व कायमचे पुसून टाकण्यासाठी नवनवे मार्ग शोधत होत्या त्या समकालीनांमध्ये ह्या राजघराण्याने आपल्या तत्वांच्या विरोधातील विचारसरणीबद्दल देखील इतका विशाल दृष्टिकोन बाळगावा हे खरोखरच कौतुकास्पद आहे. अर्थात हे लक्षात घेतले पाहिजे की हा "चीन" राजा म्हणजे काही राजा रामचंद्र नव्हे आणि त्याचे राज्य म्हणजे रामराज्य नव्हे. तत्कालीन रूढ राज्यपद्धतीच्या तुलनेमध्ये त्याने एक सुसह्य असे राज्य केले असे म्हणता येईल.
काटेकोर राज्यव्यवस्था - आर्थिक सुबत्ता ह्याकडे सम्राट लक्ष देत होता. ह्या पायावरती आपल्याला मोठे सैन्य पोसता येईल आणि राज्याचे संरक्षण करणे सोपे जाईल असे त्याला वाटत होते. राजाने तत्कालीन सरदार उमराव आणि जमीनदार यांची सद्दी मोडून काढली. राज्यामध्ये बहुसंख्य असलेल्या शेतमजुरांवरती राज्य करण्यासाठी राजा आणि शेतमजूर यांच्या मधल्या सरदार उमराव आणि जमीनदारांच्या फळ्या मोडीत काढण्यात आल्या. राजाचा शेतमजुरांशी थेट संपर्क प्रस्थापित झाला. जमीनदारी व्यवस्था मोडीत काढण्याचे अवघड काम चीन राजाने केले. पण त्याच बरोबर राज्यामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य नाकारण्यात आले. ज्या व्यक्तीचे राजाशी पटत नव्हते तिचे अधिकार तर हिरावून घेतले गेले.. व्यापारी वर्ग आणि विद्वान मंडळी अत्यंत निरुपयोगी आहेत असे राजाने ठरवले होते. म्हणून ह्या मंडळींचा काटा काढणेच योग्य असे त्याला वाटत होते.
शेतमजुरांशी थेट संपर्क स्थापित झाल्यामुळे राजाच्या पदरी अधिक मजूर उपलब्ध झाले. चीनमध्ये फार जुन्या काळापासून गावाच्या रक्षणासाठी भिंती बांधायची पद्धत होती पण "चीन" ने जवळ जवळ तीन लाख मजूर आणि कैदी कामाला लावून उत्तरेकडील गावागावांमधल्या भिंती जोडण्याचे काम केले. त्यातून सध्या जगप्रसिद्ध असलेली १४०० मैलांची चीनची भिंत अस्तित्वात आली. आज जगप्रसिद्ध असलेले चीनमधले दुसरे महत्वाचे स्मारक म्हणजे चीनची टेराकोटा आर्मी. वेगवेगळ्या चेहऱ्याचे मातीमध्ये घडवलेले सैनिकांचे हजारो पुतळे बघण्यासाठी आज पर्यटकांची रांग लागते. ही कलाकृती देखील चीन राजघराण्याच्या काळामधली आहे. २०१५ साली चीनच्या दौऱ्यावर गेलेल्या मोदींचे टेराकोटा सैनिकांबरोबरचे छायाचित्र प्रसिद्ध आहे. सून त्सु च्या सूत्रांचा प्रभाव असणाऱ्या राजाने आपल्या सैन्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे असावीत असा आग्रह धरला होता. सैन्याला हालचाली करणे सोपे जावे म्हणून वाहतुकीची साधने रस्ते तयार करण्यात आले. ही पावले उचलल्यामुळे राजाच्या पदरी एक बलाढ्य - तत्पर आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले सैन्य तयार झाले. त्याचा दबदबा सर्वत्र पसरला. एकमेकांशी लढणाऱ्या सात सत्ताना हरवण्याची काम ह्या व्यवहारी दृष्टीमुळे शक्य झाले होते.
"चीन" राजाने चलन आणि वजन मापाच्या साधनांमध्ये एक उत्तम व्यवस्था निर्माण केली. त्यामध्ये एकसूत्रता आणली. राज्य चालवण्याच्या आधुनिक दृष्टिकोनाबद्दल राजाचे कौतुक केले पाहिजे. शिवाय चिनी लिपीमध्येही एकसूत्रता आणली गेली. जगामध्ये चिनी लिपी अत्यंत क्लिष्ट समजली जाते. शिवाय वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी अक्षरे वापरली जात. चीन राजाने लिपी सोपी करायचे प्रयत्न केले. अशा प्रकारची दृष्टी २२०० वर्षांपूर्वी बाळगणे हे आधुनिकतेचे लक्षण होते. पुढील काळामध्ये राजाच्या अंमलामध्ये काही विकृती दिसू लागल्या. टीकाकारांचे तोंड बंद करण्याच्या नादामध्ये काही जुनी पुस्तके साहित्य नष्ट करण्याच्या घटनाही घडल्या. सम्राटाच्या मृत्यूनंतर योग्य व्यक्ती राजसत्तेमध्ये आली नाही त्यातून जनतेने उठाव करून घराण्याची सत्ता संपुष्टात आणली. ह्या उठावामधूनच पुढे हानांचे राज्य उदयाला आले.
तुम्हाला जरूर असा प्रश्न पडेल की चीन राजघराण्याची ही गोष्ट आज उगाळायची काय गरज आहे? मित्रहो एक योगायोग मानावा लागेल. आजचे चीनचे अध्यक्ष शी जिन पिंग ज्या "शी आन" प्रांतामधले आहेत त्याच प्रांतामध्ये "चीन" राजघराण्याचे मूळ आहे. शी जीन पिंग आणि सम्राट "चीन" यांच्या कार्यपद्धतीमध्ये लक्षात येण्याजोगे साम्य आहे. आज शी जीन पिंग यांचा सामना हानांशी आहे ज्या हानांनी सम्राट "चीन"ला हरवून आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते. परराष्ट्र नीतीमध्ये यजमान देशाची संस्कृती आणि इतिहासाचे भान राखणे गरजेचे असते. आपल्या चीन भेटीमध्ये मोदी यांनी टेराकोटा स्मारकाला भेट देऊन शी यांच्या ह्या वारशाचे आपल्याला जणू स्मरण असल्याचे दाखवून दिले नाही ना? जिथे हजारो वर्षांच्या परंपरा जनमानसावर प्रभाव टाकत असतात तिथे समाजातील संघर्षाची मुळे देखील अशीच खोलवर रुजलेली असतात. त्यांच्या कडे कानाडोळा करून नव्हे तर त्यांचे भान राखण्यामधला आब काही वेगळाच असतो. तो मोदींनी राखला आहे.
Nice info about Pre Communist era of China....
ReplyDelete