शी जीन पिंग हे चीन चे अध्यक्ष तेथील लष्कराला तसेच त्यांच्या राजकीय विरोधकांना नकोसे झाले आहेत. शी यांनी आपल्या राजकीय विरोधकांना लगाम घालण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी मोहीम निर्ममपणे राबवली आहे असा आरोप त्यांच्यावर केला जातो. लष्कराचे पंख छाटण्यासाठी शी यांनी लष्कराच्या संख्येमध्ये जबर कपात - लष्कराच्या संघटनात्मक स्वरूपात आमूलाग्र बदल आणि त्यामधील भ्रष्टाचाराविरोधात कारवाया तसेच लष्कराच्या ताब्यात असलेल्या उद्योगांवरील त्यांची पकड संपवण्याच्या योजना ही पावले उचलली आहेत. ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून चिनी आस्थापनांवर ज्यांचे आज वर्चस्व आहे अशा समाज घटकांना त्यांच्यावर आलेली बंधने नकोशी झाली आहेत. त्याबद्दलची नाराजी इतकी तीव्र आहे की शी जीन पिंग ह्यांना नजीकच्या भविष्यामध्ये एखाद्या बंडाला तर तोंड द्यावे लागणार नाही अशी रास्त शंका काही जण बोलून दाखवत आहेत. याउलट अशा टीकेला आणि संभाव्य परिणामांना जराही दाद ना देता शी यांनी आपल्या कारवाया चालूच ठेवल्या आहेत. एकाच वेळी अनेक शत्रुंना अंगावर घेण्याच्या त्यांच्या खेळी त्यांच्या शत्रुंना एकत्र आणतील आणि ह्या एकत्रित आव्हानाला तोंड गदेने त्यांना कठीण होईल असे म्हटले जात आहे. ह्या वर्षीच्या ऑकटोबर मधील पार्टी काँग्रेस च्या बैठकीमध्ये आपले वर्चस्व निर्विवाद प्रस्थापित करण्याकडे त्यांची वाटचाल होत आहे. अशा तऱ्हेने एक प्रकारची अस्वस्थता आणि अनिश्चितता चीनच्या सामाजिक जीवनामध्ये बघायला मिळत आहे. म्हणूनच शी यांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेची व्याप्ती नेमकी किती आहे हे बघणे महत्वाचे आहे.
सत्तेमध्ये आल्यापासून चीनचे अध्यक्ष शी जीन पिंग यांनी देशामध्ये भ्रष्टाचाराविरोधात एक प्रचंड आघाडीच उघडली आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे आठ कोटी ९० लाख सदस्य आहेत. पक्षाच्या सदस्यांची वेगवेगळ्या सरकारी पदांवर नियुक्ती होत असते. अत्यंत गलथान कारभाराला हे सदस्य बऱ्याच अंशी जबाबदार असतात. शिवाय एकमुखी सत्ता आणि अधिकार हाती असल्यामुळे तसेच त्यावरती आक्षेप घेण्याचे कोणतेही साधन लोकांच्या हातामध्ये नसल्यामुळे ह्या सरकारी अधिकाऱ्यांची आपल्या कामामध्ये मनमानी चालते. लोकांचे जीवन अनेक प्रकारे सरकारवरच अवलंबून असल्यामुळे त्यांच्याविरोधात जाण्याचे धाडस नागरिक करू शकत नाहीत. विचारणारा कोणी नाही आणि हातात अमर्याद अधिकार ह्यांचे जे स्फोटक मिश्रण बनेल तेच चीनच्या सामान्य नागरिकांच्या नशिबी येत असते. कम्युनिस्ट पार्टी आणि तिचे सदस्य ह्यांच्याबद्दल मनामध्ये घृणा निर्माण होईल अशी ही भयावह परिस्थिती आहे. नागरिकांनी बंद करायचे ठरवलेच तर ते निर्दयपणे कसे चिरडले जाते ते जगाने तियान आन मेन येथील कोवळ्या पोरांनी केलेल्या आंदोलनात बघितले आहे. असे गुलामांचे जिणे जगणाऱ्या जनतेला बरोबर न घेता उलट पक्षी तिला हवे तसे राबवून चिनी नेते जगावर राज्य करायला निघाले आहेत. आता ह्या परिस्थितीमध्ये ज्या कोणाला चीन सामर्थ्यवान वाटतो आणि अजिंक्य वाटतो त्यांना त्यांच्या कल्पना लखलाभ होवोत.
एक भ्रष्टाचाराचा लोकांना छळणारा मुद्दा घेतला तरीदेखील त्याच्या समूळ उच्चाटनासाठी शी जीन पिंग याना कसे आकाश पातळ एक करावे लागत आहे ते बघण्यासारखे आहे. गेल्या सात ते आठ दशकांमधले एकमेकांना मदत करणारे आणि एकमेकांच्या आधाराने जगणारे जे हितसंबंध तयार झाले आहेत ते एकमेकांना सावरत राहतील - सहजासहजी पडू देणार नाहीत आणि नव्या बदलाचा निकराने विरोध करतील. त्या संकटामधून समाजाला - देशाला - सरकारी यंत्रणेला बाहेर काढणे सोपे नाही. ह्याचे प्रत्यंतर आपल्याला वृत्तांत वाचले की येते.
शी यांच्या प्रयत्नांमधला पहिला पैलु आहे तो सरकारी नोकरांच्या भ्रष्टाचाराचा. एकट्या २०१६ ह्या वर्षामध्ये चार लाख सोळा हजार कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली गेली . यामध्ये जवळ जवळ ७६ लोक मंत्री दर्जाचे अथवा प्रांतीय सरकारमधले उच्चपदस्थ होते. आणि हुआंग शिन गुओ हे त्यान जिन शहराचे महापौर - शहराच्या पक्षाचे प्रमुख आणि शी जिन पिंग यांचे जवळचे सहकारी समजले जात. त्यांच्यावरही कारवाई झाली. ह्यातून शी ह्यानी एकच संदेश दिला की कोणाचाही मुलाहिजा राखला जाणार नाही. सरकारी कर्मचार्यांवरती नजर ठेवण्यासाठी एक स्वतत्र यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सध्या ही यंत्रणा बीजींग शहर तसेच झिज्यांग आणि शान शी प्रांतांना लागू करण्यात येणार आहे. २०१८ मध्ये जेव्हा शी आपल्या कारकीर्दीचे दुसरे पर्व सुरु करतील तेव्हा ती देशभर लागू केली जाईल.
पक्ष सदस्य आणि सरकारी कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराचा राक्षस खाजगी क्षेत्रापर्यंत पोचला आहे. चीनमध्ये वैद्यकीय सेवा केवळ सरकारी माध्यमामधून मिळते. चीनमधल्या काही फार्मा कंपन्यांनी बेकायदेशीर मार्गाने आपली विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांपासून सर्व प्रकारच्या पदधिकार्यांना लाच दिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये औषधांखेरीज नवजात बालकांसाठी वापरले जाणार्या (बेबी फूड) खाद्याचाही समावेश आहे. ह्याच्याशी संबंधित गैरप्रकारांमध्ये काही बहुराष्ट्रीय - अमेरिकन कंपन्यांनाही दंड भरावा लागला आहे. बाओशान आयर्न ऍंड स्टील कंपनीच्या प्रमुखाला ५८ लाख अमेरिकन डॉलर्सचा घोटाळा केला म्हणून शिक्षा झाली. ह्या प्रमुखाची सरकारी नोकरीही गेली तसेच त्याचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्याने लुटलेले पैसे वसूल करून ते कंपनीला आणि शहराच्या सरकारी यंत्रणेला देण्यात यावेत असा निर्णय कोर्टाने दिला. अशी अन्य उदाहरणेही आहेत. सेल्समनने आपले विक्रीचे लक्ष्य पूर्ण केले तर अनेक कंपन्या सेल्समनला तसेच गिर्हाईकांना विशेष मानधन बक्षिस म्हणून देतात. या मानधनाला इन्सेन्टीव्ह असे म्हटले जाते. चीनमध्ये इन्सेन्टीव्ह देण्यामध्येही मोठ्या प्रमाणावरती लाच दिली जाते हे लक्षात घेऊन सरकारने त्यावरतीही चौकशीचा बडगा उगारला आहे. इन्सेन्टीव्ह ह्या नावाने लाच वाटण्याची युक्ती शोधून काढणारे हुशार आणि त्यावर निर्बंध घालून आळा घालायचा प्रयत्न करणारेही हुशार म्हटले पाहिजेत. काही कंपन्या असे इन्सेन्टीव्ह गिफ्ट कार्डाच्या रूपात देत असत. त्यामुळे तो पैसा दिल्याचे बिल बनत नसे. बिल न बनवल्यामुळे हा पैसा ज्याला मिळे त्याला तो आपल्या खात्यामध्ये आल्याचेही दाखवण्याची गरज नव्हती. अशा प्रकारची लाच प्रामाणिक उद्योगांच्या मुळावरती येऊ शकते हे लक्षात घेऊन सरकारने कारवाई केली आहे. लाच घेऊन चीनमधून पळ काढणार्या अधिकार्यांची ह्या मोहिमेमुळे झुंबड उडाली आहे. कसेही करून लुबाडलेले पैसे परदेशात पाठवायचे आणि मग पोबारा करायचा हे तंत्र पक्ष सदस्य - सरकारी कर्मचारी - न्याय व्यवस्थेतील नोकरदार - बॅंकांमधले अधिकारी आणि वकिलातींमध्ये काम करणारे कर्मचारी ह्या वर्गाने अवलंबलेले आहे. गैरप्रकारांचे हे स्वरूप बघता चीनचे सामाजिक जीवन किती मूल्यहीन झाले आहे आणि नीतीमत्ता कशी घसरणीला लागली आहे ह्याचे द्योतक आहे. ह्या घसरणीला अर्थातच अनिर्बंध सत्ता - अधिकार हे जबाबदार आहेत. कम्युनिस्ट प्रकारची का होईना हुकूमशाही समाजाला कशी विनाशाकडे नेते ह्याचे हे जीवंत उदाहरण आहे.
सर्व समाज आणि व्यवस्था भ्रष्टाचाराच्या रोगाने पोखरून निघाला असताना शी यांनी जर निर्ममपणे ही मोहीम राबवली तर त्यावरती कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण ह्या योजनेच्या निमित्ताने शी जिन् पिंग आपल्या राजकीय आणि लश्करी स्पर्धकांचा काटा काढत आहेत असा आरोप सर्रास केला जात आहे. आणि त्याचे उदाहरण म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वी सुन झेंग कई ह्यांच्याबरील कारवाईकडे लक्ष वेधले जाते. सुन झेंग कई ही सामान्य व्यक्ती नव्हे. चोंग किंग ह्या महत्वाच्या शहराचे ते प्रमुख होते. हे शहर इतके महत्वाचे आहे की इथे जगामधले सर्वोच्च इलेक्ट्रॉनिक ब्रॅंड आपले उद्योग चालवतात. Hewlett-Packard, Asus, Acer, Foxconn सारख्या कंपन्या इथे आल्या कारण स्वस्त मजुरी - उद्योगधंद्यासाठी आवश्यक असलेल्या उत्तम पायाभूत सोयी - स्वस्त जमीन - करांमध्ये सूट! जगामधले ३३% लॅपटॉप ह्या शहरामध्ये बनवले जातात. अशा शहराच्या प्रमुखावरती कारवाईच बडगा उगारण्यात आला आहे. ध्यानीमनी नसताना झेंग कई ह्यांना पदावरून हाकलण्यात आले. त्यांच्यामागे चौकशीचा लकडा लावण्यात आला आहे. त्यांच्या जागेवरती शी जिन पिंग ह्यांच्या विश्वासामधल्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे. सुन झेंग कई हे खुद्द शी यांच्या सत्तेला आव्हान देण्याइतके मोठे होते. त्यांचा काटा काढण्यात आला आहे. ह्या कारवाईनंतर ऑक्टोबरमध्ये होणार्या पार्टीच्या कॉन्ग्रेसमध्ये शी ह्यांना आपले स्थान बळकट करणे सोपे जाईल असे म्हटले जाते. ह्या आधी चोंग किंग शराचे प्रमुख आणि सुन झेंग कई प्रमाणेच मोठ्या पदावरती काम करणार्या बो शिलाई ह्यांच्यावरती काही वर्षांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. सुन झेंग कई वरची कारवाई पक्षाला आवडलेली नाही. ह्याला वेगवेगळ्या प्रकारे विरोध होत आहे. अणि त्याचे पर्यवसान शी ह्यांना राजकीय आव्हान उभे करण्यामध्ये होईल अशीही रास्त शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे प्रमुख कारण हेच आहे की भ्रष्टाचारविरोधामध्ये उभारण्यात आलेल्या Central Commission for Discipline Inspection (CCDI) ह्या संस्थेने शी जिन पिंग ह्याच्या कारवाईवरती नाराजी व्यक्त केली आहे. ही एक दुर्मिळ घटना मानली पाहिजे.
दुखावलेले सर्व घटक जर एकत्र आले तर ते शी ह्यांना पदावरून दूर करण्यात यशस्वी होतील का हा प्रश्न आज निरीक्षकांना सतावतो आहे. भ्रष्टाचारासारख्या महाराक्षसाला गाडून टाकण्याची मनिषा बाळगणारे शी जिन पिंग हे भविष्यात साहसी नेते म्हणून कदाचित ओळखले जातील की एका जटील समस्येपुढे हार मानलेले नेते ठरतील हे येणारा काळ ठरवेल. चीनच्या समाजजीवनामधल्या ह्या घडामोडींचा संबंध थेट त्याच्या अन्य देशांशी असलेल्या संबंधांवरही पडतो. म्हणून ह्या कारवायांचा बारकाईने पाठपुरावा जगभर केला जात आहे.
अचूक, अभ्यासपूर्ण आणि व्यासंगी विश्लेषण.👌👌💐
ReplyDelete