जून २०१७ मधील पंतप्रधान मोदी यांच्या इस्राएल भेटीमध्ये त्यांना इस्राएल सरकारने दिलेल्या अभूतपूर्व स्वागताने सामान्य माणसाचे डोळे दिपून गेले. वर्षानुवर्षे ज्याची वाट पाहिली त्या एका नव्या मैत्रीपूर्ण संबंधांना आता शिखर गाठण्यात कोणतीही आडकाठी राहणार नाही ह्या विचाराने सामान्य माणूस भारावून गेला. पण मोदी हा माशाचा काटा ज्यांच्या गळ्यात अडकला आहे त्यांच्या अंगाचा ह्या वातावरणाने तिळपापड झाला. ह्या प्रसंगी "अशा" फेकू आणि टाकाऊ माणसाला असे देदीप्यमान स्वागत मिळतेच कसे ही पोटदुखी लपवायचीही त्यांना गरज भासली नाही. असे काय नवे घडले आहे मोदींच्या इस्राएल दौऱ्यामध्ये हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. गेली २५ वर्षे भारत - इस्राएल यांचे राजनैतिक संबंध आहेत आणि अगदी सुरळीत चालले आहेत. दोन्ही देशांमध्ये गरज लागेल तसे करार होत असतात - ते पाळले जातात - तक्रारीला जागा नाही. ही जर वस्तुस्थिती आहे तर ह्या स्वयंकेंद्री आत्मस्तुतीप्रिय नेत्याने स्वतःचे किती म्हणून कौतुक करून घ्यावे ह्या दौऱ्याच्या निमित्ताने? जमाते पुरोगामींचा जळफळाट नुसता उतू चालला होता.
जमाते पुरोगामी कितीही बोंबलले तरी काहीतरी देदीप्यमान घडते आहे एवढे सामान्य माणसाला नक्की जाणवत होते. एक ७० वर्षांनंतर पहिल्यांदा आपला पंतप्रधान तिकडे गेला - कारगिल युद्धात इस्राएलची मदत घेऊन सुद्धा तिकडे जाण्याचे अटल बिहारी वाजपेयींनी टाळले - मग आता मतपेटीची बंधने यांचा विचार ना करता मोदी तिकडे गेले त्याचे कौतुक का होत नाही ही सामान्य मानसाची शंका. पण पुरोगाम्यांची टीका चालूच होती. ते म्हणतात - दौर्याचा एवढा डिंडिम कशाला? इतकी वर्षे इस्राएलच्या जवळ गेलो नाही कारण अरब देशांना दुखावता येत नव्हते हो - खनिज तेल ही अत्यावश्यक वस्तू केवळ अरबांकडून घेता येते मग त्यांना दुखावणे शक्य तरी होते का - आता काय तेलाच्या आयातीसाठी आपल्याला अन्य पर्याय मिळाले आहेत - म्हणून हे मोदी मोठी मर्दुमकी गाजवल्यासारखे दाखवत आहेत - प्रत्यक्षात काय तर तेलाच्या बाबतीमधले आपले अरब देशांवरचे परावलंबित्व संपले तेव्हा तुम्ही जीभ बाहेर काढताय - ह्यात कसला आला आहे पराक्रम - भक्त लोकांना काय - काही पण भरवले तरी ते आनंदाने जेवतात - आमचे तसे नाही बरे का - आम्ही विचार करणारी माणसे आहोत - उगाच थापा मारू नका अशा अर्थाच्या फेबु वरच्या पोस्टी वाचून वाचून मजा वाटत होती. म्हटले सगळा भर जरा ओसरू देत - येऊ देत सगळे मुद्दे बाहेर - मग घेऊ समाचार.
मित्रहो - ते जमाते पुरोगामी बोंबलणारच - त्यांचे ते कामच आहे - त्याने नाउमेद होण्याची गरज नाही - त्यांच्या प्रत्येक खोडसाळ आक्षेपाला उत्तर देण्याचीही गरज नाही - आपण आपल्या पद्धतीने मोदी यांच्या इस्राएल दौऱ्याचा आढावा घेतला की गोष्टी स्पष्ट होतील. तर आपल्या सर्वाना जे जाणवले पण आपल्याला शब्दात सांगता आले नाही असे काय होते ह्या दौऱ्यामध्ये ते पाहू. ७० वर्षांनंतर एक पंतप्रधान इस्राएलला जातो - हो जरूर मोठी घटना आहे. ज्या ज्यूंना संपूर्ण दुनियेत मायेचा आसरा फक्त भारतात मिळाला त्या ज्यूंच्या इस्राएलनिर्मिती पासून आतापर्यंत आपण त्यांच्या सद् भावनांची कदर केली नाही. हेही सत्य आहे. आज एक पंतप्रधान मतपेटीचे चिंता न करता इस्राएलला जातो हेही वैशिष्ट्य पूर्ण आहे. दुसऱ्या कोणी हे केले नाही पण मोदींनी हे केले हेही मान्य आहे. हे करण्यासाठी भारताला वाट पाहावी लागली ती अरब देशांवरच्या तेलसाठीच्या परावलंबित्व संपण्याची ही मात्र शुद्ध थाप नाही का वाटत तुम्हाला? आजही भारत 60% अधिक तेल आयात करतो ते इराण आणि इतर अरब देशांकडून - या स्थितीमध्ये आजच्या तारखेला काही फरक पडलेला नाही. हां, एक आहे की अमेरिका आज मध्यपूर्वेवर तिच्या तेलाच्या गरजेसाठी अवलंबून नाही - त्यामुळे अरबांकडे असलेले तेल विकत घेणारे एक मोठे गिऱ्हाईक कमी झाले आहे. येत्या काही वर्षात एकूणच जग खनिज तेलाच्या आपल्या गरजेतून बाहेर पडून अन्य इंधनाचे मार्ग चोखाळू लागेल ह्यामुळे अरब देश भानावर आले आहेत ही देखील सत्य परिस्थिती आहे. पण अरब देशांच्या ह्या मजबुरीचा फायदा घेऊन मोदी यांनी इस्राएलला जाण्याचे धाडस केले हे मात्र परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन नाही हे म्हणावेच लागते.
अशा प्रकारचे युक्तिवाद जे लोक मांडतात त्यांच्याबाबतचेच म्हणेन की हे कूपमंडूक आहेत. त्यांना आपली विहिर वगळता अन्य जग माहिती नाही. मग उर्वरित जग तर सोडाच. मित्रहो, भारत इस्राएल जेव्हा नव्याने एकत्र येऊ पाहत आहेत ह्या क्षणाचे महत्व जाणायला तसाच दूरदर्शीपणा हवा. दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये पहिल्यांदाच एक नवी व्यवस्था जन्माला येऊ पाहत आहे. १९४५ पासून ते २०१६ पर्यंत जगामधली व्यवस्था दुसऱ्या महायुद्धाने जे केले - जे न केले आणि जे अर्धे सोडले त्याच्यामागे फरफटणारे जग आपण पाहिले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्माला आलेली जगाची व्यवस्था काही समीकरणे घेऊन जन्माला आली आणि त्याच समीकरणांमध्ये बंदिस्त राहिली आहे. आज ७२ वर्षांनंतर सुद्धा त्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे जगाला मिळालेली नाहीत. जगामधल्या कोणत्याही दोन देशांमधली बोलणी गेल्या ७२ वर्षात ह्याच व्यवस्थेच्या परिघापर्यंत जातात आणि त्याच सीमारेषेमध्ये उत्तरे शोधतात. भारत इस्राएल एकत्र आले म्हणून आता ह्या बंदिस्त चौकटीला छेद देण्याची उमेद बाळगणारी संयुक्त शक्ती उदयाला आली आहे हा ऐतिहासिक क्षण आहे.
तसे पाहिले तर इस्राएल असो की भारत - हे देश म्हणजे जगामधले एक व दोन नंबर चे बलाढ्य देश नव्हेत की ज्यांनी प्रचलित जागतिक व्यवस्था बदलण्याची स्वप्ने पाहावीत आणि ती सत्यामध्ये उतरवण्याचे प्रयत्न करावेत. खरे आहे दोन्ही देश बलाढ्य नाहीत पण त्यांच्या मैत्रीमध्ये भविष्य घडवण्याची शक्ती आहे का हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर सरळ सोपे आहे. ही शक्ती ओळखून पुढची वाटचाल करता येईल का असा प्रश्न आहे. अर्थात ही वाटचाल करताना लघु पल्ल्याचे निर्णय कसे घ्यावेत आणि दीर्घ पल्ल्याचे निर्णय कसे घ्यावेत ह्यावर एकवाक्यता झाली तर काम सोपे होते. नैमित्तिक अडचणी येतच राहतील पण जे व्यापक क्षितिज नजरेसमोर ठेवायचे आहे त्याचा विसर पडता कामा नये. ही लक्ष्मणरेषा दोन्ही देशांना सांभाळायची आहे.
म्हणून ह्या पार्श्वभूमीवरती ह्या मैत्रीचे पदर केवळ राजकीय अथवा केवळ लष्करी नाहीत म्हणून त्याचे आकलन सुद्धा राजकीय अथवा लष्करी असे करणे अवास्तव ठरेल. केवळ आर्थिक तर नाहीच नाही. जो राजकीय निर्णय व्यापक क्षितिजामध्ये बसत नाही तो टाळावा लागेल. तीच बाब लषकरी निर्णयांना लागू होईल. थोड्या धाडसाने म्हणते की इथून पुढे ह्या देशांना निव्वळ आर्थिक निकषावर कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. ज्या आर्थिक निर्णयाच्या मागे धोरणात्मक राजकीय (Strategic political) किंवा धोरणात्मक लष्करी (Strategic Military) दृष्टी नसेल तो निर्णय हे देश घेत नाहीत असे दृश्य दिसणार आहे.
आज ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका - इस्राएल - भारत - जपान ही समर्थ चौकट उभी राहिली आहे. ट्रम्प यांनी जगामध्ये जे विश्वासू नेते आपल्या गटामध्ये सामावून घेतले आहेत त्यामध्ये भारत आणि इस्राएल ह्यांना मानाचे स्थान मिळाले आहे. शिवाय भारत आणि इस्राएल यांनी स्वतंत्रपणे व्हिएतनाम ह्या देशाशी सामायिक लष्करी क्षितिज असलेले सामंजस्य निर्माण केले आहे. ही जी शक्तिमान आघाडी उदयाला आली आहे तिचे पडसाद जगभरच्या प्रत्येक राजधानीवर जाऊन पोचले आहेत. ह्या आघाडीचा गुरुत्वमध्य इस्राएल - भारत मैत्री हा राहणार आहे. कारण ह्या आघाडीची कर्मभूमी भारत आणि इस्राएलच्या परिसरात आहे. स्वतंत्रपणे उभ्या राहिलेल्या ह्या जागतिक घडीमधील पाच देशांना एकमेकांशी बांधून ठेवणारे नेटो सारखे करार नाहीत की कोणते सामायिक व्यासपीठ नाही. पण म्हणून तिचे महत्व कमी होत नाही. कारण ह्या नव्या घडीचे परिणाम मध्यपूर्वेपासून आशियापर्यंत आणि अगदी आफ्रिका युरोपपर्यंत येऊन भिडणार आहेत हे जाणकार विश्लेषक समजून आहेत.
ह्या नव्या आघाडीचा फायदा हा आहे की ह्यापुढे भारताला आपण एकटे आहोत असे वाटण्याचे कारण उरले नाही. त्याच बरोबर ह्या देशांनी जो विश्वास त्याच्यावर टाकला आहे त्या विश्वासाला जागायचे काम पार पाडायचे आहे. आणि हे करत असताना इस्राएलसारखी मोलाची मदत दुसर कोणता देश आपल्याला करू शकतो? त्याच बरोबर इस्राएलची ही चिंता मिटली आहे की मध्य पूर्वेमध्ये तो आत एकटा नाही. भारतासारख्या समर्थ देशाशी त्याची असलेली मैत्री हीच एक स्थैर्यासाठी अत्यावश्यक असलेली बाब ठरणार आहे. ह्याचे कारण असे की काश्मिर सारख्या महत्वाच्या समस्येवरती मध्यपूर्वेच्या कोणत्याही देशाने आजवर भारताला तोंडदेखलाही पाठिंबा दिलेला नाही उलट पाकिस्तानची री ओढली आहे. ह्या चुकीचे परिमार्जन करण्याची वेळ आता टळली आहे. म्हणूनच भारत इस्राएल मैत्रीमुळे ज्यांच्या अस्तित्वावरती आणि भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उमटले आहे त्या देशांची त्याविरोधात बोलण्याची हिंमत झालेली नाही. आज जर भारत इस्राएलच्या मदतीला गेला तर हे देश तक्रार करू शकणार नाहीत. थोडक्यात काय - भारत इस्राएल - परस्परांच्या उत्कर्षामध्ये एकमेकांना आपले उज्ज्वल भविष्य दिसत आहे ही हर्षभरित करणारी बाब आहे. इस्राएल स्वतः एक महासत्ता कधीच बनू शकणार नाही पण भारताला एक महासत्ता बनवण्याच्या कामी तो महत्वाची कामगिरी करू शकतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठे योगदान देऊ शकतो. ह्याच निमित्ताने आजवर इस्राएलने आपले कार्यक्षेत्र पश्चिमेकडे मर्यादित ठेवले होते ते विस्तारून आता इस्राएल पूर्वेकडे लक्ष वळवू शकेल. आणि हे साध्य करण्यासाठी भारत इस्राएलला भरघोस मदत करू शकतो.
ही जी नवी जागतिक घडी बसवली जात आहे तिचे काही देश स्वागत करतील तर काही कडवा विरोध. अमेरिका आणि पाश्चिमात्य त्याकडे स्वागतपर नजरेने बघत आहेत. रशियाने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. चीनही उघड काही बोलायला धजावलेला नाही पण ठुसठुसते कोणाला हे उघड आहे. म्हणूनच केलेच तर आकाशही ठेंगणे होईल इतकी व्याप्ती ह्या मैत्रीमध्ये आहे म्हणूनच सर्व जग त्याकडे अचंबित होऊन बघत आहे. ह्या मैत्रीच्या potential चा पुरेपूर लाभ उठवणे आपल्याच हातात आहे. भविष्याचा दट्ट्या हाती आहे. नवी जागतिक घडी बसवण्याचे काम यातून आकार घेऊ शकते. त्याविषयी पुन्हा कधीतरी. तोवर ऋणानुबंधाच्या ह्या गाठी बांधणार्या मोदी - दोवल - नेतान्याहू यांचे अभिनंदन जरूर करू या.
Great analysis.
ReplyDelete