२२ सप्टेंबर २०२० रोजी भारत आफ्रिका सहकार्य या विषयावर एक डिजिटल परिषद घेण्यात आली होती. त्या निमित्ताने भारताचे परराष्ट्रमंत्री श्री जयशंकर यांनी परिषदेतील उपस्थितांना संबोधित करताना आपल्या भाषणामधून एक महत्वाचा संदेश दिला आहे. आफ्रिका खंडातील देशांच्या प्रगतीला हातभार लावला नाही तर व्यापक जागतिक विकासाचे उद्दिष्ट अपूर्ण राहील असे प्रतिपादन जयशंकर यांनी केले आहे. याप्रसंगी त्यांनी नोंदवलेली मते ही मोदी सरकारच्या दूरगामी विचारांचे प्रतिबिंब असल्यामुळे त्याची सखोल दखल घेणे गरजेचे आहे.
२०२० वर्षातील कोरोना संकटाचा उल्लेख करत श्री. जयशंकर म्हणाले की १९५०-६० च्या दशकामध्ये जेव्हा वसाहतवाद संपुष्टात आला तेव्हा जागतिक परिस्थितीवर जसा त्या घटनांचा खोलवर ठसा उमटला होता तसाच खोलवर ठसा कोरोनाच्या साथीमुळे जगावर उमटलेला बघायला मिळणार आहे. दुसर्या महायुद्धातून डोके वर काढणारे जग आणि या साथीच्या संकटामधून डोके वर काढणारे जग याची तुलना करून जयशंकर यांनी एक वेगळीच तार छेडली आहे. दुसर्या महायुद्धाने जसे देशोदेशीच्या जनतेचे नाहक प्राण घेतले तसेच कोरोनाच्या साथीमध्ये कोणतीही चूक नसताना लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या महायुद्धाचा परिणाम म्हणून १९ व्या शतकापासून जगाच्या वेगवेगळ्य़ा भागांमध्ये वसाहती निर्माण करून त्यावर राज्य चालवणार्या शक्ती दुबळ्या झाल्या - त्यांचे आर्थिक साम्राज्य संपुष्टात आले तसेच त्यांचा राजकीय प्रभाव सुद्धा अस्ताला गेला होता. अशा वसाहती चालवणार्या ब्रिटन फ्रान्स पोर्तुगाल स्पेन आदि देशांना महायुद्धाचा असा फटका बसला की आपल्या वसाहतीवरील नियंत्रण स्वतःहून सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. आजच्या घडीला जगामध्ये १९ व्या शतकातील वसाहतवाद दिसत नसला तरी खास करून चीनने गेल्या दोन दशकामध्ये ज्या पद्धतीने आपले आर्थिक व राजकीय धोरण पुढे रेटले आहे त्यातून वसाहतवादी देशांची मानसिकता पुन्हा एकदा जगाला अनुभवायला मिळाली होती.
वसाहतवाद म्हणजे काय? आधुनिक शस्त्रास्त्रे आणि युद्धशास्त्राच्या बळावरती या देशांनी खंडोपखंडामध्ये आपले साम्राज्य प्रस्थापित केले आणि विस्तारले होते. त्यांच्याकडून कच्चा माल कमी किंमतीला आपल्या देशात नेऊन त्यावर प्रक्रिया करून भरमसाठ दराने तोच माल पुन्हा वसाहतींमध्ये विकायचा आणि त्यातून आपल्या गुलामीमध्ये राहणार्या देशामधली अमाप संपत्ती लुटून स्वदेशामध्ये न्यायची असा हा व्यवहार होता. असे म्हटले जाते की आज मूल्यमापन करायचे म्हटले तर ब्रिटनने भारतामधून लुटून नेलेल्या संपतीचा आकडा ७५ लाख कोटींच्या घरामध्ये जातो. अशाप्रकारे आपल्या वसाहतीमधून संपतीची लूटमार करून त्या देशांना नागवून पूर्णपणे निर्धन करून मग स्वातंत्र्य देण्याचे निर्णय याच महासत्तांना युद्धातील नुकसानीमुळे घेण्याची नामुश्की आली होती. मग आज जयशंकर यांना दुसर्या महायुद्धाची त्यावेळच्या वसाहतवादी देशांची आठवण का बरे यावी?
कारण ज्या मार्गाने वसाहतवादी देश गेले होते त्याच मार्गाने जाणार्या चीनने संपूर्ण जगावर हे महामारीचे संकट तर लोटलेच आहे पण त्या आधीच्या दोन दशकामध्ये जी आर्थिक पिळवणूक केली आहे त्यातून हे साम्य शोधण्याचा प्रयत्न जयशंकर यांनी केला असावा. चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षा केवळ एखाद्या खंडापुरत्या सीमित राहिल्या नव्हत्या. मागासलेल्या आफ्रिकेलाही चीनने वरकरणी आकर्षक वाटतील असे प्रस्ताव गेल्या दोन दशकांमध्ये दिले होते. विकासाचे स्वप्न दाखवत प्रत्यक्षात मात्र कर्जाच्या सापळ्यामध्ये या दुबळ्या देशांना पकडायचे आणि त्याची परतफेड म्हणून त्यांच्याकडून भूमी उकळायची असा व्यवहार चीनने सर्वत्र केलेला दिसतो आणि त्याला आफ्रिकेतील देशही अपवाद नाहीत. आफ्रिका खंडाकडे आजही खूप मोठ्या प्रमाणावर खनिज व अन्य नैसर्गिक संपत्ती उपलब्ध असून त्यावर चीनने आपले लक्ष केंद्रित केले होते. कोरोनाच्या निमित्ताने चीनच्या या मुजोर वागण्याचा पुनर्विचार सर्व जगाला करावा लागत आहे. आणि केवळ आर्थिक सुबत्तेच्या बळावर जगामध्ये आपले प्रस्थ प्रस्थापित करण्याचे त्याचे प्रयत्न आता उघडे पडले आहेत. बळी तो कान पिळी हा जगाचा न्याय असला तरीही त्यामध्ये भरडला जाणारा नवे पर्याय शोधतो आणि तीच परिस्थिती आज चीनने आपल्या सहकारी देशांवर आणली आहे.
अशा पार्श्वभूमीवर जेव्हा जयशंकर आफ्रिकन देशांना सहकार्य - व्यापार - परस्परातील सौहार्द आणि परस्परांचा विकास या मुद्द्यावर भारत आफ्रिकन देशांशी संबंध प्रस्थापित करू पाहत आहे असे म्हणतात त्याला विशेष महत्व येते. आफ्रिकेचा विकास आणि उदय ही आमच्यासाठी एक केवळ हवीशी वाटणारी बाब नसून ती आमच्या परराष्ट्रधोरणाचा कणा आहे असे निःसंदिग्धपणे त्यांनी सांगितले. त्याचा संदर्भ अर्थातच चीनच्या अन्य देशांशी वागण्याच्या पद्धतीशी होता. २०१५ पासून एकूण ३४ उच्चस्तरीय भेटी भारताने आयोजित केल्या होत्या. यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान पातळीवरील भेटी गणल्या आहेत. तसेच याला प्रतिसाद म्हणून गेल्या सहा वर्षांमध्ये सुमारे १०० आफ्रिकन नेत्यांनी भारताला भेट दिली आहे. ह्यातूनच भारताने घेतलेल्या विशेष प्रयत्नांची झलक दिसून येते. कोरोना संकटाच्या काळामध्ये भारताने आफ्रिकेतील अनेक देशांना औषधे व अन्य सामग्री पाठवली आहे. याआधी ३३ आफ्रिकन देशांकडून भारतामध्ये पाठवल्या जाणार्या मालावरती आयातशुल्क शून्य ठेवण्यात आले आहे. आफ्रिकेतील मोझांबिक आणि दक्षिण सुदान देशांमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायु उत्पादन क्षेत्रामध्ये भारताने ७०० कोटी डॉलर्स एवढी प्रचंड गुंतवणूकही केली आहे. जवळजवळ ५०००० आफ्रिकन विद्यार्थ्यांना भारतामध्ये तंत्रज्ञान व अन्य विषय शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१५ साली नवी दिल्ली येथे घेतलेल्या तिसर्या भारत आफ्रिका परिषदेमध्ये तब्बल ५४ देशांनी भाग घेतला होता. असा उत्साह हेच दाखवतो की नवी दिल्ली येथील मोदी सरकारची दखल आफ्रिकन देशांनी घेतली व आपल्याला काहीतरी चांगले हाती पडेल पिळवणूक न करता आपल्या विकासाचा विचार करणारा सहकारी देश मिळेल या विचाराने हे देश प्रेरित झाले होते. आज भारताच्या ३९ आफ्रिकन देशांमध्ये वकिलाती आहेत यामधल्या ९ वकिलाती तर गेल्या दोन वर्षात आम्ही सुरू केल्या आहेत असे जयशंकर म्हणाले.
"India offers Africa an honest partnership, and room to maximize its space under the sun and multiply its options. Africa is of course not without options, and by no stretch does India claim to be the only one. However, what we can promise is to be Africa’s most steadfast partner." आम्ही एक प्रामाणिक भागीदार म्हणून आफ्रिकेला आमची मैत्रीचा प्रस्ताव देत आहोत. यातून आफ्रिकन देशांना आपापल्या विकासाच्या नव्या वाटा चोखाळता याव्यात हा हेतू आहे. आम्हाला कल्पना आहे की आफिकन देशांना मदत देऊ पाहणारे आम्ही एकटेच नाही आहोत पण आम्ही जे काही देऊ करतो त्यामध्ये आफ्रिकन देशांना एक प्रामाणिक आणि दीर्घकाळचा भरवशाचा दृढ सहकारी देश मिळावा अशी आमची धारणा आहे असे जे जयशंकर यांनी सूचित केले त्याची तुलना चीनच्या विपरित व्यवहाराशी झाली नाही तरच नवल.
बदलत्या परिस्थितीचे भान राखणारा आणि चीनच्या तुलनेमध्ये एक अत्यंत मृदू चेहरा आणि वर्तणूक दाखवणारा आणि तितक्याच तंत्रज्ञानात्मक क्षमतेचा देश म्हणून आज भारत आफ्रिकेमध्ये आपले स्थान प्रस्थापित करू पाहत आहे. या सर्व विचारधारेचे एक छोटे प्रतिबिंब तर जयशंकर यांच्या भाषणामध्ये दिसतेच शिवाय भारताची विश्वासार्हता जगाच्या प्रत्येक कानाकोपर्यामध्ये कशी वृद्धिंगत झाली आहे याची पावतीही मिळते. हाती उपलब्ध असलेली संधी मोदी सहसा गमावत नाहीत हेच या उदाहरणामधून दिसून येते. मोदी सरकारने जी पावले उचलली ती उचलण्यावर आधीच्या यूपीए सरकारवर कोणती बंधने होती? त्यांना कोणी अटकाव केला होता? कोणीच नाही पण भारताचे स्थान जगामध्ये उंचावण्याचा मानस ठेवून आखलेले जागतिक धोरण हा चमत्कार घडवून आणत आहे हे विशेष.
No comments:
Post a Comment