भारतीयांना आपल्या देशामधील नेत्यांच्या गूढ मृत्यूंबद्दल बरीच माहिती असली तरी अशाच प्रकारची शृंखला पाकिस्तानातही अस्तित्वात असल्याची फारशी कल्पना नसते. त्याची सुरूवात तर बॅ. महमद अली जिना यांच्या संशयास्पद मृत्यूपासूनच होते ही आज आपल्याला धक्कादायक बाब वाटते. पण या विषयावर आजही पाकिस्तानमध्ये उलट सुलट चर्चा होताना दिसतात. उपखंडामध्ये परकीय शक्तींचा किती सुळसुळाट असेल ही आज शंका राहिलेली नाही तर तो एक केवळ कधीही विचारला न गेलेला प्रश्न बनून गेला आहे. सामर्थ्यवान नेतृत्व घातपाताने संपवण्याचे सत्र जसे इथे दिसते तसेच तिथेही दिसते. मग ह्या देशांमध्ये कधी शांतता सुबत्ता नांदूच नये म्हणून तर काही शक्ती जाणून बुजून अशा कारवाया करत नव्हत्या ना? घडवून आणत नव्हत्या ना? हे प्रश्न गैरलागू ठरत नाहीत.
आपल्याला टीबीसारख्या त्याकाळी असाध्य मानल्या जाणार्या रोगाचे निदान झालेले असूनही जिनांनी ही बाब जगापासून लपवून ठेवली होती आणि त्याकामी त्यांचा प्रतिपाळ करणारी त्यांची बहिण फातिमा जिना यांचा मोठा सहभाग होता असे आज म्हटले जाते. किंबहुना जिनांची तब्येत इतकी ढासळली आहे असे कळले जरी असते तरी बोलणी लांबवून फाळणीही टाळता आली असती का असेही एक वास्तव चर्चेत आलेले दिसते. असो. पाकिस्तानच्या जन्मानंतरही आपली ढासळती तब्येत जिनांनी सर्वांपासून लपवून ठेवली होती हे एक आश्चर्य मानले पाहिजे.
असे सांगितले जाते की आजारी जिनांना आराम पडावा म्हणून २६ जुलै १९४८ रोजी त्यांना क्वेट्टा शहराजवळच्या झियारात या गावात आणण्यात आले. विमानामध्ये कोण प्रवासी आहेत याची वाच्यता तेथील कर्मचार्यांकडेही केली गेली नव्हती. विमानतळावर त्यांना निरोप देण्यासाठी केवळ ख्वाजा नझीम उद्दीन - मुस्लिम लीगचे अध्यक्ष आले होते. केवळ वैमानिकाला आपल्या प्रवाशाबद्दल कल्पना देण्यात आली होती. क्वेट्टा येथे पोचल्यावर त्यांची बहिण फातिमा जिनाने कर्नल इलाही बक्ष यांना बोलावून घेतले. त्यांनी सर्जन डॉ. सिद्दिकी आणि महमूद यांना बोलावून घेतले. दोघांनीही जिनांना तपासले. त्यांच्या थुंकीच्या निदानामधून टीबीच असल्याचे निश्चित झाल्यावर लाहोरमधून रियाझ अली शाह, एस एस आलम आणि गुलाम मोहमद या डॉक्टरांना बोलावून घेण्यात आले. त्यांनी आपल्या सोबत एक एक्स रे मशिन आणले होते. एक्सरे रिपोर्टमध्ये टीबीचे निदान बरोबर असल्याचे समजले. तसेच फुफुसांना बरीच इजा झाल्याचेही दिसून आले होते. यानंतर इलाजांना सुरूवात झाली. फिलिस डनहॅम म्हणून युरोपियन नर्सलाही बोलावून घेण्यात आले. आजारपणाच्या काळामध्ये टीबी बळावल्यामुळे बाहेरून ऑक्सीजन दिल्याशिवाय जगणे अशक्य होऊ लागले होते. जितका काळ ऑक्सिजन दिला जाई तेवढाच वेळ त्यांना झोप लागत होती. अखेर १३ ऑगस्ट रोजी त्यांना झियारातमधून क्वेट्टा येथे हलवण्यात आले. इतके होऊनही त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांचे पंतप्रधान श्री लियाकत अली खान यांनाही पुरेशी कल्पना देण्यात आली नव्हती हे विशेष. इलाही बक्ष यांनी अखेरच्या दिवसात तुम्हाला गंभीर रोग जडल्याचे जिनांना सांगितले होते. कसे कोणास ठाऊक पण इलाहींनी जिनांना ते सांगितले आणि तीनच दिबसात पंतप्रधान लियाकत अली खान स्वतःच जिनांच्या भेटीला आले(??) त्यांच्या पाठोपाठ अर्थमंत्री चौधरी महमद अलीही क्वेट्टामध्ये पोचले. लियाकत अली खान यांनी इलाहींना विचारले की जिनांची तब्येत कशी आहे. इलाहींनी त्यांना उत्तर देण्याचे टाळले. इलाहींच्या मते जिनांच्या तब्येतीसाठी त्यांची नियुक्ती सरकारने केली नव्हती. फातिमा जिनांनी वैयक्तिकरीत्या त्यांना बोलावून घेतले होते. म्हणून आपले निदान काय आहे हे सरकारला सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती असे इलाहींचे मत होते. लियाकतनी त्यांना तुमचे काय निदान आहे असे विचारले पण मी अजून काही निश्चित केलेले नाही असे इलाहींनी त्यांना सांगितले. पण तुमच्या मते त्यांना कोणता रोग जडला आहे असे लियाकतने विचारताच इलाही म्हणाले माझ्या डोक्यात वेगवेगळे दहा आजार आहेत त्यापैकी मी तुम्हाला काय सांगू शकतो. इलाही लियाकतना दाद देत नाहीत दिसल्यावर चौधरी महमद अली मध्ये पडले आणि जो काही प्रसंग उभा ठाकेल त्यासाठी सरकारला तयारी करावी लागेल सबब जिनांच्या आजाराविषयी मौन धारण करणे बरोबर नाही असे इलाहींनाच ऐकवले गेले. परंतु रुग्णाच्या परवानगीशिवाय आपण काहीही माहिती देऊ शकणार नाही असे इलाहींनी ठामपणे सांगितले. इतके झाल्यावर ते दोघे निघून गेले.
जिनांनी इलाहीला जवळ बोलावून हे दोघे तुमच्याकडे माझ्याबद्दल काही सांगत होते का असे विचारले. त्यावर इलाहीने जे घडले ते जिनांच्या कानी घातले. जिनांना आनंद झाला. माझ्या प्रकृतीविषयी मी स्वतःच लोकांना कळवेन असे आश्वासन जिनांनी इलाहीला दिले होते. जिनांनी आपल्या बहिणीला विचारले - फातिमा हे दोघे इथपर्यंत का आले तुला ठाऊक आहे? फातिमा म्हणाली - मला महिती नाही आणि मी अंदाजही बांधू शकत नाही. जिना उत्तरले - माझा आजार किती बळावला आहे आणि माझे किती आयुष्य उरले आहे याची चाचपणी करण्यासाठी लियाकत इथे आले होते. पहिल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाला जिना उपस्थित राहू शकले नव्हते पण त्यांनी आपले भाषण पाठवले होते. भेटीला आलेल्या महमद यांनी फातिमांना सांगितले की - जिनांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाला पुरेशी प्रसिद्धी दिली गेली नाही हे तुम्हाला माहिती आहे काय? त्याऐवजी पंतप्रधान लियाकत यांच्या भाषणाची सर्वत्र चर्चा होती. माध्यमांमधून त्यालाच प्रसिद्धी मिळाली इतकेच नव्हे तर शहरामधल्या अनेक महत्वाच्या इमारतींवर लियाकतच्या भाषणाची पोस्टर्स लावली गेली होती. अनेक ठिकाणी विमानामधून त्यांचे छापील भाषणही गावागावात टाकण्यात आले आहे.
गुलाम महमद यांचे म्हणणे पाहता जिनांचा पाकिस्तानातील स्वतःच्याच पंतप्रधानावरही (आणि पंतप्रधानांचा जिनांवर) त्यांचा विश्वास उरला नव्हता असेच नाही काय? जिनांची तब्येत ढासळू लागली तसे डॉक्टरांनी त्यांना कराचीच्या जवळ नेण्याचे ठरवले. त्यासाठी बहावलपूरच्या नवाबाचा मलिर गावातील बंगला वास्तव्यासाठी योग्य असल्याचे ठरवून लगेच त्यांना तिथे नेण्याचा प्रस्ताव आला. पण फातिमा म्हणाल्या की यासाठी नवाबाची परवानगी घेणे योग्य ठरेल. नवाब त्यावेळी लंडनमध्ये असल्यामुळे पाकिस्तानच्या राजदूताने त्यांच्याशी बोलून परवानगी मिळवावी असे ठरले. पण राजदूताला नवाबांशी संपर्क साधता आला नाही. सरते शेवटी त्यांना मलिर ऐवजी कराचीला नेण्याचे ठरले. जिनांच्या नाजूक प्रकृतीचा गवगवा होऊ नये म्हणून विमानतळावर राजशिष्टाचारानुसार सोपस्कार होऊ नयेत असे ठरले होते. तसे लियाकत अली खानना कळवण्यात आले होते असे म्हणतात. रिवाजानुसार त्यांनी याची अधिकृत नोंद ठेवायला हवी होती. पण तशी नोंद पुढे मिळाली नाही.
क्वेट्टाहून निघताना स्ट्रेचरवरून जिनांना विमानात चढवले तेव्हा मार्गाची पूर्ण झाकपाक करण्यात आली होती. विमानामध्ये त्यांच्या सोबत फातिमा होत्याच शिवाय कर्नल इलाही बक्षही होते. हे दोघे जिनांना आलटून पालटून प्रवासात ऑक्सीजन देत होते. सोबत त्यांची नेहमीची नर्स डनहॅमही होती. विमान कराचीजवळच्या मौरीपूर येथील लष्करी विमानतळावर उतरवण्याचे ठरले होते. हा विमानतळ कराची पासून १७ किमी अंतरावर होता. हा प्रवास इतक्या नाजूक अवस्थेत जिनांना कसा झेपला असता हा प्रश्नच होता. पण फातिमांनी आपल्या अमेरिकेतील दोस्त मंडळींशी बोलून त्यांना तपासण्यासाठी अमेरिकेतून तज्ञ डॉक्टर बोलावून घेतले होते. ते १५ सप्टेंबर रोजी कराचीत पोचणार होते. जिनांचे विमान दुपारी ४-१० च्या सुमारास मौरीपूरला पोचले. त्यांच्या स्वागतासाठी सरकारतर्फे कोणीच आलेले नव्हते. केवळ त्यांचा मिलिटरी अटॅची कर्नल जॉफ्री नोलेस हजर होता. जिना हे नोलेसचे अधिकृत वरिष्ठ नव्हते. त्याचे वरिष्ठ होते लॉर्ड माऊंटबॅटन! विमानतळावर उतरल्यावर जिनांना नेण्यासाठी एक जुनीपानी अम्ब्युलन्स आणि सोबत एक सेडन कॅडिलॅक कार पाठवण्यात आली होती. अखेर अम्ब्युलन्समध्ये जिनांच्यासोबत फातिमा बसल्या तसेच नर्स डनहॅम. सोबतचे डॉक्टर्स व अन्य मंडळी कॅडिलॅकमध्ये बसली आणि प्रवास चालू झाला. विमानतळावर कोणीही भेटीस आले नाही हे समजू शकते पण कराचीपर्यंतचा मार्गही मोकळा व सुरक्षित करण्यात आलेला नव्हता. एकंदरितच एखाद्या गव्हर्नर जनरलला शोभेल असे काही त्यांचे आगमन कराची येथे होऊ शकले नाही.
��
ReplyDeleteजिना मृत्यूचा जीना उतरत होते
लियाकत हुकुमशाही आणण्याचा चढत होते
जिना ना टीबी झाला आहे ते फार तर सहा महिने जगतील आणि त्यांना पंतप्रधान करून फाळणी टाळावी असा निरोप जिना वर उपचार करणाऱ्या डॉ ने गांधी ना सांगितले होते पण नेहरू प्रेम नडले
ReplyDelete