Wednesday, 27 February 2019

जशास तशा प्रत्युत्तराची मोदीनीती.



(from my mahaMTB aticle)

२६ फेब्रुवारी २०१९ हा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये लिहिला जाईल. आपण सर्वजण ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट आहे. १९७१ नंतर पहिल्यांदाच म्हणजे जवळजवळ ४८ वर्षांनंतर भारताने मनामध्ये कोणताही संदेह न बाळगता पाकिस्तानच्या हद्दीमध्ये विमाने नेऊन तेथील काही ठिकाणांवरती जोरदार हल्ले चढवले आहेत. अगदी १९९९ च्या कारगिल युद्धाच्या प्रसंगी सुद्धा नियंत्रण रेषा न ओलांडता कारगिल परत ताब्यात घ्या असे बंधन लष्करावर तत्कालीन अटल सरकारने घातले होते. आजच्या हल्ल्यासाठी मात्र मोदी सरकारने सैन्याला पूर्ण सूट असल्याचे निःसंदिग्धपणे जाहीररीत्या सांगितले होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजे पाकिस्तानप्रणित शक्तींनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या काफिल्यावरती जो निर्घृण हल्ला चढवला होता त्यामध्ये देशाचे ४० जवान कामी आले. ह्यानंतर देशभरात एकच आक्रोश उठला होता. देशप्रेमी जनता पुलवामा हल्ल्याला सरकारने प्रत्युत्तर द्यावे म्हणून आग्रही होती. इतक्या व्यापक प्रमाणावरील जनमताच्या पाठिंब्यानंतर आणि स्वभावतःच मोदी ह्यांनी अगदी २०१४ च्या प्रचार मोहिमेमध्ये जाहीर केल्यानुसार पाकिस्तानला सडेतोड उत्तर मिळणार ह्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नव्हतीच. अगदी पाकिस्तानच्या मनामध्येही संदेह नव्हता. हल्ला कुठे होणार कधी होणार कशा स्वरूपाचा असेल ह्याविषयी मात्र काहीच माहिती उपलब्ध नव्हती. पण अशामुळेच गेल्या काही दिवसात पाकिस्तान रडकुंडीला आल्याप्रमाणे थेट युद्धाची तयारी करू लागला असल्याच्या बातम्या थडकत होत्या. मोदी ह्यांनी २०१४ पासून पाकिस्तानशी कडक धोरण अवलंबले होते. दहशतवादी हल्ले होत असतील तर पाकिस्तानशी चर्चा करू शकत नाही कारण स्फोटांच्या आवाजात चर्चा ऐकूच येत नाही असे ते वारंवार सांगत असूनही पाकिस्तानने आपली वाकडी पावले कधी सुधारली नाहीत. उलटपक्षी भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ ठरेल अशा पद्धतीने तो प्रतिक्रिया देत होता आणि इथल्या काही राजकारण्यांना हाताशी धरून आपली प्यादी पुढे सरकवत होता.

पठाणकोट आणि उरी हे दोन मोठे हल्ले मोदी ह्यांच्या कारकीर्दीमध्ये झाले आणि मोदी सरकारने त्याला प्रत्युत्तर दिले पण पाकिस्तानने मात्र उरीनंतर भारत सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची चेष्टा मस्करी करण्याचे - असा काही हल्ला झालाच नाही - असेल तर व्हिडियो का नाही दाखवत अशी मुक्ताफळे उधळली. मुख्य म्हणजे अशाप्रकारे सैनिकी व्हिडियो प्रसिद्ध केले तर सैन्याची अनेक गुपिते शत्रूला कळू शकतात हे माहिती असूनसुद्धा इथले मोदी विरोधक पाकिस्तान जे प्रश्न रावळपिंडीमध्ये विचारत होता ते ते प्रश्न इथे मोदी सरकारला दिल्लीमध्ये विचारत होते. ह्या मोदी विरोधकांमध्ये जसे राजकीय प्रतिस्पर्धी होते तसेच सामिल होती इथली सेक्यूलर बुद्धिवंत लेखक कलाकार पत्रकार मंडळी. ह्या सर्वांनी मिळून केलेल्या गलक्याने सामान्य जनता बिथरेल आणि मोदी सरकार आपण पाकिस्तानवर हल्ला केल्याच्या आपल्याला थापा मारत आहे - प्रत्यक्षात तर हे सरकार नेभळट आहे आणि ते असे काही करूच शकत नाही असा हा सूर  जनतेला मोदींपासून दूर नेईल ह्या भ्रमामध्ये ही मंडळी होती. प्रत्यक्षात झाले ते उलटेच. जितका सेक्यूलर मंडळींनी जोरात गलका केला तितक्याच जोमाने जनतेचा मोदी सरकारने केलेल्या हल्ल्यावरती अधिकाधिक विश्वास बसत गेला. हे वास्तव स्वीकारण्यासाठी कॉंग्रेसप्रणित विरोधकांना उरी वर काढण्यात आलेल्या चित्रपटाच्या यशाने डोळे दीपवून घ्यावे लागले. अशा प्रकारे आधीच भाजलेल्या तोंडाची हे मंडळी डोळे एकदाचे उघडल्यामुळे आजच्या हल्ल्याचे पुरावे काही मागत बसली नाहीत. त्यांनी खुल्या दिलाने मोदी सरकारचे नव्हे तर सैन्याचे कौतुक केले. सैन्याने केलेल्या कामगिरीला तोडच नाही पण त्यांच्या मागे उभे राहण्याची राजकीय इच्छा शक्ती मोदींनी दाखवली त्याबाबत कॉंग्रेस मूग गिळून गप्पगार बसली आहे हे चाणाक्ष सामान्य जनतेच्या नजरेतून सुटेल काय?

जेव्हा जेव्हा भारतावर परचक्र आले आणि कॉंग्रेस सरकार सत्तेमध्ये होते तेव्हा तेव्हा येथील विरोधी पक्षाने सराअरबरोबर सहकार्य करण्याचे धोरण वलंबले होते पण मोदी सरकारच्या भाग्यामध्ये असा देशप्रेमी विचारी विरोधी पक्ष नाही. बाहेरचे काय विरोध करतात ते सोडा इथे अंतर्गत विरोधक काय म्हणतील आणि त्यांचा मुकाबला कसा करायचा ह्याचा सरकारला आज विचार करावा लागत आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. उदा. आजच्याच हल्ल्यानंतर जेव्हा पाकिस्तान सरकारनेच आपल्या बालाकोट वरती भारतीय विमानांनी हल्ला केला असे जाहीर केले तेव्हा इथले विरोधक आणि सेक्यूलर पत्रकार मंडळी हे बालाकोट नेमके कोणते म्हणून चर्चा करत बसले होते. पूंछ् जवळचे बालाकोट असेल तर सरकारने फार काही मर्दुमकी गाजवली नाही एव्हढेच म्हणायचे त्यांनी बाकी ठेवले होते. ह्या गॅंगमध्ये अग्रेसर होते ते जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री श्री ओमर अब्दुल्ला. जसजसे हे स्पष्ट हो ऊ लागले की हे बालाकोट पूंछ जवळचे नसून पाकिस्तानच्या खैबर पख्तून्वा मधील बालाकोट आहे तेव्हा मात्र ह्यांची बोबडी वळली. मोदी सरकारच्या द्वेषाने त्यांना इतके पछाडले आहे की अशा काहीतरी शंका उपस्थित केल्याने इथल्याच जनतेसमोर आपली नाचक्की होत आहे हे देखील ते विसरून गेले आहेत.

पाकिस्तान ह्या हल्ल्याने गडबडून गेले नाही तरच आश्चर्य मानले असते. भारताची एकूण १२ मिराज २००० विमाने बिनदिक्कत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसतात आणि आपल्याला हव्या त्या लक्ष्यावरती बॉम्बफेक करून सुखरूप निघून जातात आणि "बलाढ्य" पाकिस्तानचे वायुदल त्यांना साधे हटकू शकत नाही हे विदारक चित्र आता पाकिस्तानी जनतेसमोर उघड झाले आहे. मिराज २००० ह्या विमानामधून न्युक्लियर हल्ले घडवता येतात हीच एक बाब पाकिस्तानला झोंबणारी आहे. अशी विमाने आपल्या हद्दीमध्ये येत असतील तर आपण कितपत सुरक्षित आहोत असा विचार तिथली सामान्य जनता केल्यावाचून राहणार नाही. भारताने दमदार  प्रत्युत्तर दिलेच तर पाकिस्तान तात्काळ आपली अण्वस्त्री डागेल आणि आण्विक युद्धाला प्रारंभ होईल असे एक चित्र ह्या दगाबाक सेक्यूलरांनी आपल्यासमोर रंगवले होते. आणि आण्विक युद्ध टाळायचे तर उभयतांमधील चर्चेमधूनच प्रश्न सोडवता ये ईल त्यासाठी चढाई हा पर्याय नाहीच असे कंठरवाने आपल्याला सांगितले जात होते. अगदी २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर सुद्धा आम्हाला हेच ऐकवले गेले होते. त्याप्रसंगी जनतेच्या मनामध्ये हेच होते की भारताने दमदार उत्तर द्यावे. सैन्याने तर तशी तयारी केली होती आणि सरकारकडे परवानगी मागितली होती. पण समोर पाकिस्तान आहे म्हटल्याव्र सेक्यूलरांची धोतरे सुटतात हेच खरे. मग ११ जुलैचा मुंबई ट्रेनवरील हल्ला असो की २६/११ चा - सलाम मुंबई - तुमच्या संयमाला सलाम असे एकदा ऐकवायचे आणि ठंडा कारभार डोळे मिटून करत राहायचे आणि पाकिस्तान मारेल तेव्ह्ढ्या थपडा खात राहायचे हेच ज्यांचे पाकिस्तान धोरण होते तेचा आजवर गेले पाच वर्षे मोदींची मर्दुमकी कुठे आहे हे भिंग लावून शोधत बसले होते. आज त्यांच्या भिंगाच्याच नव्हे तर डोळ्यातील भिंगाच्याही ठिकर्‍या उडाल्या आहेत. ही लाजिरवाणी परिस्थिती त्यांना धड लपवून ठेवावी एव्हढेही भान उरलेले नाही.

इतके दमदार निर्णय मोदी घेऊ शकले कारण त्यांच्या मागे लोकसभेमध्ये एकजिनसी बहुमत आहे - त्यांच्या धोरणामागे इथली जनता खंबीरपणे उभी आहे हे तर आहेच पण मोदी सरकारने ज्या खेळी खेळल्या आहेत त्यांनाही दाद द्यावी लागते. १४ फेब्रुवारीनंतर पहिला आठवडा मोदी सरकारने जगातील महत्वाच्या देशांमधून आपल्या भूमिकेसाठी पाठिंबा मिळवण्याचे अवघड काम पूर्ण केले. ह्यानंतर पाळी आली ती राजकीय खेळींची. ह्यामध्ये पाकिस्तानचे हे बिरूद काढून घेणे पाकिस्तानी मालावरती २००% ड्यूटी लावणे आणि सिंधुजलकरार तंतोतंत पाळत भारताच्या वाटेचा एकही थेंब पाकिस्तानला मिळू देणार नाही ही घोषणा करणे ह्यातून वातावरण निर्मिती करण्यात आली. आज च्या हल्ल्यानंतर जगामधल्या एकाही देशाने भारताचा निषेध केलेला नाही किंबहुना भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे हे सूत्र सर्व जगाने मान्य केल्याचे दृश्य दिसत आहे. हे यश इतके मोठे आहे की अगदी चीनने सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने एकही विधान केल्याचे दिसत नाही. ही मोदी सरकारची भरीव कामगिरी आहे.

पाकिस्तानच्य अंतर्गत राजकारणाचा विचार केला तर काय दिसते? पंतप्रधान इम्रान खान आज खूष असतील. पाकिस्तानी लष्कराची जेव्हढी बे इज्जती हो ईल तितके तिथल्या पंतप्र्धानाचे राजकीय महत्व वाढेल हे काय इम्रानला समजत नाही काय? वरकरणी काहीही बोलले गेले तरी हा संघर्ष तिथे तीव्रच राहणार. ओसामा बिन लादेन मारला गेला तेव्हा देखील अमेरिकेची विमाने ह्यांच्या हद्दीत घुसली आणि ओसामाला मारून बिनदिक्कत बाहेर पडली. तेव्हा अमेरिकेला तेथील सैन्याची छुपी संमती होती असे राजरोसपणे म्हटले जाऊ लागले. क्षणभर विचार करा की स्वतःचे स्थान वाचवण्यासाठी आजसुद्धा तेथील काही जनरल्सनी भारतीय विमानांना प्रत्युत्तर देण्याचे हटकण्याचे टाळले नसेलच असे आपण खात्रीशीररीत्या म्हणू शकतो काय? पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळातच नव्हे तर त्याच्या आयएस आय मध्ये आणि सैन्यामध्ये सुद्धा जबरदस्त फूट असल्याच्या बातम्या गेले काही वर्षे बघायला मिळत होत्या. ही फूट नेमकी कोणते स्वरूप धारण करेल ह्याविषयी आता आपण केवळ अंदाज बांधू शकतो.

सर्वथया लाज गेल्यानंतर आता पाकिस्तान नेमके काय करणार? चढाई करून युद्ध छेडेल काय ह्याविषयी कयास बांधले जात आहेत. मोदींनी बाजी पल्टवली आहे. Dialogue is the only way forward हे पालुपद आता पाकिस्तानला घोळवावे लागणार आहे. शहाणा असेल तर पाकिस्तान ह्याला उत्तर म्हणून थोडेफार दहशतवादी हल्ले करून गप्प बसेल आणि मूर्ख असेल तर युद्ध पुढे वाढवेल. उठसूट आण्विक युद्धाच्या धमक्या देणार्‍या पाकिस्तानने आतापर्यंत असे का केलेले नाही ह्याचे उत्तर त्यांना स्वतःला माहिती नाही काय? त्याचे उत्तर अटलजींनीच त्यांना ऐकवले होते. अणुबॉम्ब टाकून तुम्ही भारताचा १०% प्रदेश उद्ध्वस्त कराल पण नेमके काय झाले बघण्यासाठी पृथ्वीतळावरती पाकिस्तान शिल्लक उरणार नाही असे उत्तर वाजपेयींनी दिले होते त्याची आज आठवण येते.

हा एक आठवडा अत्यंत महत्वाचा आहे. आणि होणार्‍या घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. आजपर्यंत भारताला भवानीमातेचाच आशीर्वाद होता आणि मोदींनी जय भवानी म्हटलेच आहे कारण त्याच आध्यात्मिक बळावरती त्यांनी आपले लक्ष्य ठरवले आहे हे निश्चित.

(MahaMTB Link: http://mahamtb.com/Encyc/2019/2/27/Article-on-PM-Modi-s-strategy-to-tackle-terrorism.html)

No comments:

Post a Comment