मोदी - ट्रम्प भेटीनंतर मोदी यांची अमेरिका वारी सफल झाली म्हणायची का नाही ह्या द्वंद्वामध्ये फेसबुकी प्रजा अडकली आहे. काहींना मोदी अयशस्वी झाले आहेत हे सिद्ध करण्याची घाई आहे तर काहींना ते कमालीचे यशस्वी झाले आहेत असे वाटते. ट्रम्प यांनी चार भारताच्या बाजूच्या गोष्टी केल्या याचे काही जण कौतुक करतात तर काही नाके मुरडतात. एखादी चांगली कारवाई केली तरी आपण चुकीचे ठरू नये या बेताबेतानेच कौतुक करण्याची सवय अंगवळणी पडलेली दिसते.
आमच्याकडे एक फॅशन झाली आहे. अमेरिका ना मग ती बेभरवशाचीच. अमेरिकेवर विसंबला त्याचा कार्यभाग संपला म्हणून कोल्हेकुई केली की आपण ’सेफ’ झालो! तुमचा वापर करतील आणि गरज संपली की शेंबडासारखे फेकून देतील. अमेरिका म्हणजे तेलाचे राजकारण करते. अशा ह्या अमेरिकेविषयीच्या अटकळी असतात. आमच्या फेसबुकीयांना एकवेळ पाकिस्तानचा भरवसा वाटतो पण अमेरिकेचा मात्र नाही. या एव्हढ्या बाबीचा विचार केला तर एकीकडे कट्टरपंथी / जिहादी इस्लामी शक्ती आणि दुसरीकडे डाव्या कम्युनिस्ट शक्ती ह्यांचे ह्या एका गोष्टीमध्ये अगदी १००% एकमत असल्याचे दिसते. मग फेसबुकामध्येही असलेच सूर वाचायला मिळाले तर नवल नाही. कारण १९८० नंतरच्या काळामध्ये मराठी माध्यमांमध्ये डाव्या विचारसरणीच्या छुप्या कार्यकर्त्यांनी शिरकाव करून आपले तत्वज्ञान वगळता अन्य काही विचार छापलेच जाणार नाहीत असे षड् यंत्र केल्यामुळे सामान्य जनतेच्या जाणिवा तशाच विकसित झाल्या आहेत. म्हणून सामान्य फेसबुकीय जेव्हा ह्याच पद्धतीने विचार करताना मांडताना दिसतात तेव्हा त्यांचा राग येत नाही पण त्यांच्या ’जडणघडणी’तून ज्या सापळ्यामध्ये ते अडकले आहेत त्यामुळे डोळ्यासमोर बाबी असूनही त्या मेंदूत शिरत नाहीत किंवा दिसत असूनही बुद्धी ती ’साक्ष’ स्वीकारत नाही.
तेव्हा अमेरिकेवर विश्वास ठेवावा का - ट्रम्प ह्यांच्यावर कोणी अमेरिकेतही विश्वास टाकत नाहीत - हे महाशय आज एक बोलतात आणि उद्या टोपी फिरवतात - निवडणूक प्रचारासाठी जी जाहीर भूमिका त्यांनी घेतली त्याच्या बिलकुल विरोधात त्यांचे वर्तन चालू आहे - हा कसला राष्ट्राध्यक्ष - ह्याची केव्हाही हकालपट्टी होऊ शकते - अमेरिकेने नेहमीच भारताच्या तोंडाला पाने पुसली आहेत - ह्यांच्या भरवशावर चीनला दुखावण्याची घोडचूक भारताने करू नये. मुळात मोदी यांना परराष्ट्रनीती राबवण्यामध्ये मोठे अपयश आले आहे त्यामुळे काही तरी वरवरच्या रंगसफेदीच्या गोष्टी वगळता त्यांच्याकडून काही होणार नाही - बघा मिळाला का भारताला एन एस जी प्रवेश - आणि भारतीयांच्या एच वन बी व्हिसाचे काय? आपल्या पोरांवर तिकडे बेकारीची कुर्हाड कोसळत आहे पण ट्रम्पसमोर मोदींचे काहीच चालले नाही हे आणि अशाच चालीवरचे अनंत प्रश्न वाचून कधी एकदा ह्या प्रश्नांच्या दलदलीतून बाहेर पडते असे मला होते.
तेव्हा मोदी दौर्याचे फलित काय ह्या बाबी डोळ्यासमोर अगदी स्पष्ट दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मनामधले डाव्या माध्यमांनी रुजवलेले पूर्वग्रहच आपल्याला मोठे वाटत असतात पण त्यामुळे खरे विश्लेषण करण्यात अडथळे येतात. मोदी सत्तेवर आले तेव्हा अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांचे भारत धोरण काय होते हे सर्वविदित आहे. डावे कानाला लागले म्हणून मोदींना व्हिसा नाकरण्यात आला होता. पण प्रचारमोहिमेमध्ये जसजसे हे पुढे आले की मोदीच जिंकणार अमेरिकेने घाईघाईने इथला राजदूत बदलून भारतीय वंशाच्या रिचर्ड वर्मा यांची नेमणूक करण्यात आली. पुढे मोदी अमेरिका दौर्यावर गेले असता भारतीय जनतेचा अमेरिकन भूमीवर मिळालेला प्रचंड प्रतिसादाने वॉशिंग्टन डीसीला अनेक बाबी बाजूला ठेवाव्या लागल्या. मोदी यांनीही ओबामा यांच्याशी उत्तम वैयक्तिक संबंध बांधण्यात तर यश मिळवलेच पण धोरणात्मक दृष्ट्या अमेरिका आणि भारत एक ’व्हीजन’ तयार् करण्यात यश मिळवले ही बाब यूपी एचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री शिवशंकर मेनन यांनीही बोलून दाखवली. ओबामा यांच्याच कारकीर्दीमध्ये लेमोआ सारखा महत्वाचा संरक्षण बाबींमधला सहकार्य करार - अमेरिकेने भारताला मेजर डिफेन्स अलाय म्हणून मान्यता देणे आदि महत्वाची पावले टाकली गेली.
ट्रम्प यांच्या कारकीर्दीमध्ये ही दिशा कायम राहील का - संरक्षण विषयक करारांना गती ये्ईल की ते भिजत घोंगडे पडून राहील - चंचल विचारांचे ट्रम्प भारताशी मैत्री करण्यास उत्सुक आहेत की नुसतीच ’धंदो’ बरकतीचा विचार करणारे ठरतील ही जी अनिश्चितता खास करून माध्यमांनी उपस्थित केली होती तिला मोदी ट्रम्प भेटीमध्ये पूर्णविराम मिळाला असे म्हणता येते. Pivot to Asia हे ओबामा यांचे धोरण ट्रम्प यांनी वार्यावर सोडले आहे ासे जे संकेत मिळत होते तसे वास्तव नाही असे मानायला जागा आहे. उत्तर कोरियाचा प्रश्न गंभीर आहे आणि तो लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे असे ट्रम्प म्हणाले. तर आशिया पॅसिफिक विभागामध्ये भारत हाच सिक्यूरिटी प्रोव्हायडर - प्रमुख संरक्षण प्रदाता आहे हे दुसरे निःसंदिग्ध विधान. हे दोन्ही एकत्र करा की पुढे येईल - ट्रम्प साहेब चीनला इशारा देत आहेत की भल्या बोलाने कोरियाला आवरा! कोरियाला आवरणे चीनच्या हातात आहे आणि हे करण्यास चीन अळंटळं करत आहे असा निदान आभास उभा राहिला आहे. दक्षिण चीनी समुद्रामध्ये हवाई मार्गांवर बंधने असू नयेत आणि आंतरराष्ट्रीय समुद्रमार्गाने बोटींना निर्वेधपणे ये जा करता यावी असा भारत चीन यांचा आग्रह असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. हे प्रतिपादन वाचून चीनची लाहीलाही झाली तर नवल नाही. झाल्या जखमेवर मीठ चोळावे तसे सांगण्यात आले की भारताने अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. आजपर्यंत अफगाणिस्तानमधील शांतता चर्चेमध्ये भारताला निमंत्रण देखील मिळत नव्हते. कारण चीनला भारत अफगाणिस्तानमध्ये नको आहे. आणि अमेरिका तर भारताला ड्रोन (मानवरहित यान) देण्यास राजी झाली आहे. वर गरम तेल ओतल्यासारखे सीमावाद देशांनी आपापसात वाटाघाटी करून सोडवावेत आणि ह्याबाबतीत आंतरराष्ट्रीय कोर्टाचे म्हणणे पाळले जावे हे घोषित करून तर चीनला व्यवस्थित खाईमध्ये लोटण्यात आले आहे. चीनचे आपल्या कोणत्या शेजार्याशी सीमेवरून भांडण नाही? शिवाय फिलिपाईन्स प्रकरणी त्याने आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल आपण पाळणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली होती. तिच्यावरची ही मल्लिनाथी झोंबरी आहे. आणि जपान अमेरिका भारत अशी आधी ठरवलेली संयुक्त कवायत द. चीन समुद्रात होणार असल्याचीही अंतीम घोषणा झाली.
एकंदरीत उत्तर कोरियाबद्दलचा आग्रह - द. चीनी समुद्रामधील भूमिका - सीमावाद - आंतरराष्ट्रीय कोर्ट - अफगाणिस्तान शांतता - एकही मुद्दा ट्रम्प साहेबांनी सोडला नाही की चीनला हायसे वाटावे. उगाच नाही उत्तर सीमेवरती कुरबुरी वाढत आहेत. आणि काश्मिरात चीनप्रणित हिंसक घटना घडताना दिसतात तर चुम्बा खोर्यानजिकच्या दार्जिलिंगमध्ये जी बंगाली कधी लादली गेली नाही त्या खोट्या आणि भ्रामक प्रश्नावरून जो विभाग केवळ पर्यटनावर पोट भरतो त्या प्रदेशात ऐन पर्यटन धंद्याच्या बरकतीच्या काळात फूस लावून आंदोलने होतात आणि त्यामागे चीनचा हात असल्याचे संशय गडद होतात. ट्रम्प मोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर चीनने चुंबा खोर्यामध्ये केलेल्या घुसखोरीविषयी मी सविस्तर लिहिले आहे.
असो. मेजर डिफेन्स अलाय म्हणून पर्रिकरांच्या काळामध्ये सिस्मोआ करार झाला. त्याचा पुढचा भाग लेमोआ आपण किती लवकर गुंडाळतो हे लवकरच स्पष्ट होईल. आणि ह्या करारानुसार अमेरिकन संरक्षण दलातील विमाने - जहाजे - सैन्य ह्यांना भारतीय हद्दीमधील सुखसोयी वापरता येतील का - कोणत्या काळामध्ये परिस्थितीमध्ये हे वापरण्याचे आयोजन आहे ह्या गोष्टी आज गुलदस्तात असल्या तरी त्यांचे प्रयोजन उघड आहे. मालकच चिडचिडाट करू लागला तर पाकिस्तानी गुलामाची काय कथा? त्याची अवस्था प्रवाहपतिताच्या विधीलिखितासारखी झाली आहे.
मोदी यांच्या अमेरिका - ट्रम्प भेटीचा हा झाला संरक्षण विषयक पैलू. धंदो सांभाळायचा तर मोदी म्हणतात मी पक्का अहमदाबादी आहे - एका तिकिटात दोन सवार्या मिळतील का विचार करतो! यावेळी ट्रम्प यांची कन्या एव्हंकाला आंत्रप्रिनॉयर्सच्या परिषदेनिमित्ताने भारतभेटीचे निमंत्रण देण्यात आले आणि तिने ते स्वीकारले सुद्धा! तेव्हा गोष्टी सुरळीत आहेत म्हणायच्या. त्याविषयी पुन्हा कधीतरी.
No comments:
Post a Comment