Top Maoist leader Mupalla Lakshman Rao, popularly known as Ganapathy
"In overthrowing a political power the first and regular task is to work in on the ideological front and to create public opinion." Mao Zhe Dong
ज्या चळवळीमागे लाखो लोक उभे
राहतात तिची तात्विक बैठक काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आजची जी सर्वात प्रबळ
माओवादी संघटना आहे तिचा जन्मच मुळी झाला २००४ साली जेव्हा पीडब्ल्यूजी आणि एमसीसी
यांच्या विलिनीकरणातून ही नवी संघटना जन्माला आली. नव्या पक्षाचे नाव सीपीआयएम माओवादी
असे ठेवण्यात आले. सशस्त्र डाव्या चळवळीतही वेगवेगळे प्रवाह होते ते तात्विक मतभेदांवरूनच,
मग जेव्हा विलिनीकरण झाले तेव्हा त्या मतभेदांचे काय झाले असा प्रश्न पडतो. कारण डावी
चळवळ ही आपण अत्यंत शास्त्रीय विचार करतो (दुसरे करत नाहीत) आणि विचारांतीच दिशा ठरवतो
असे मानते. माओवाद्यांच्या बाबतीत याचे उत्तर सीपीआयएम माओवादी संघटनेचे जनरल सेक्रेटरी
गणपती यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सापडते. विलिनीकरणापूर्वी आम्ही प्रत्येक मुद्द्याचा
बारीक सारीक दृष्टीने विचार केला आणि नंतरच आमचे धोरण ठरवले असे गणपती यांनी सांगितले.
या विचारांना मूर्त स्वरूप म्हणून पक्षाने काही दस्तावेज प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये
पक्षाची घटना, पक्षाचा कार्यक्रम, अर्बन पर्स्पेक्टीव्ह, एसटीआयआर (स्ट्रॅटेजी अन्ड
टॅक्टीक्स ऑफ इंडियन रेव्होल्यूशन) ही महत्वाची कागदपत्रे
आहेत. (पहा तळटीप १) या कागदपत्रांमुळे केवळ माओवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचेच नव्हेत
तर आपलेही अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होऊ शकेल. त्यातील एसटीआयआर हे सर्वात
महत्वाचे असल्यामुळे त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. इथे
दिलेले विचार हे लेखिकेचे नसून माओवाद्यांच्या एसटीआयाआर या दस्तावेजामध्ये नमूद केल्याने
इथे दिले आहेत.
एसटीआयआरचा उद्देश काय? क्रांतीच्या
प्रत्येक टप्प्यामध्ये त्या त्या टप्प्यासाठी आखलेला कार्यक्रम राबवून विजय कसा मिळवावा
ह्याचे मार्गदर्शन एसटीआयआरमध्ये पक्षाला मिळते. एसटीआयआरमध्ये असे नमूद केले आहे की
"कॉम्रेड स्टॅलिन म्हणतात तत्वज्ञानाचे मार्गदर्शन कार्यक्रम बनवण्यासाठी आवश्यक
आहे - कार्यक्रमाच्या अनुषंगाने धोरण आणि धोरणातून डावपेच ठरतात. धोरण हे दूरगामी असते
तर डावपेच सीमित कालखंडात वापरले जातात." लढा कोणत्या स्वरूपाचा असावा आणि त्यासाठी
कोणत्या प्रकारची संघटना उठावाच्या प्रत्येक टप्प्यात असावी हे त्या त्या परिस्थितीमध्ये
डावपेचांद्वारे ठरवले जाते. प्रत्येक टप्प्यामध्ये मध्यममार्गी सामाजिक राजकीय प्रवाह
एकलकोंडे पडतील अशी व्यूहरचना असावी असे स्टॅलिन म्हणतो. आजचे माओवादी असे मानतात स्टॅलिनचे
हे समीकरण सदासर्वकाळ लागू होत नाही - ते कधी वापरावे आणि कधी वापरू नये हे ठरवावे
लागते. कामगार वर्ग आणि भूमिहीन शेतमजूर वर्ग हे दोन वर्ग क्रांतीसाठी मूलभूत आहेत.
शहरातील "पेटी बूर्ज़्वा"देखील विश्वसनीय असतात तर "राष्ट्रीय बूर्ज़्वा"
विशिष्ट काळात आणि विशिष्ट मर्यादेपर्यंत विश्वसनीय असतात. (पहा तळटीप २)
समाजामध्ये असलेल्या मूलगामी
विरोधाभासाच्या अभ्यासाला माओवादी महत्व देतात. काही समाजामध्ये साम्राज्यवाद वि. शोषित
जनता, भांडवलशाही देशात कामगार वर्ग वि. बूर्ज़्वा वर्ग आणि वेगवेगळ्या साम्राज्यवादी
शक्तींमधील विरोध असे विरोधाभास जगात पहायला मिळतात. बदललेल्या नव्या जगामध्ये जुना
वसाहतवाद आज पहायला मिळत नाही तर नववसाहतवाद जन्माला आलेला दिसतो. या प्रकारामध्ये
साम्राज्यवाद्यांची आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका येथील देशांवर थेट हुकूमत नसली
तरी वेगवेगळ्या मार्गाने या देशांच्या सरकारवर आपली हुकूमत स्थापन केलेली दिसते, हाच
नववसाहतवाद म्हणता येइल. म्हणून या देशांमधील परिस्थितीचा विचार करताना ही पार्श्वभूमी
नजरेआड करता येत नाही. पाश्चात्य देशांमध्ये सरंजामशाहीला संपुष्टात आणून भांडवलशाहीने
आपले राज्य स्थापन केले. भारतामध्ये ब्रिटीश वसाहतवाद्यांनी सरंजामशाहीचे रक्षण केले
आणि त्यांच्या मदतीने येथील समाजाचे स्थित्यंतर सरंजामशाहीकडून वसाहतीमध्ये करण्यात
आले. ब्रिटीश साम्राज्यशाहीने इथली व्यवस्था न बदलता आपल्या भांडवलशहांसाठी सोयी उपलब्ध
करून दिल्याने इथे अर्धसरंजामशाहीचा उदय झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वसाहतवाद्यांनी
भारतातील सधन वर्गाच्या मदतीने विविध उद्योगांमध्ये भांडवल गुंतवणूक करून आपले पाय
रोवले आहेत व अजूनही त्यांचेच नियंत्रण इथल्या उद्योगांवर राहिले आहे. अशा प्रकारे
वसाहतवादाचा नवा चेहरा - नववसाहतवाद - येथे पहायला मिळतो. या आर्थिक ताकतीमधून त्यांनी
येथील लश्करी धोरणावरही प्रभाव पाडला आहे. लश्करी मदत वा सहयोग आणि परकीय सल्लागारांची
नेमणूक वगैरे मार्गाने ते या गोष्टी साध्य करतात. त्यांच्या प्रभावाखाली वावरणारे लश्कर
येथील क्रांतीकारकांच्या चळवळी आणि राष्ट्रमुक्तीचे लढे दाबून टाकत असतात. अशा तर्हेने अर्धसरंजामशाही, नववसाहतवाद आणि येथील
बुद्धीजीवी व अन्य भांडवलशहा असे तीन शत्रू एकत्र येउन काम करतात आणि खेड्यामधील जनतेचे
शोषण करत असतात. येथे काम करणार्या बॅंका आणि अन्य वित्तीय संस्था देखील ग्रामीण जनतेचे
शोषण करतात.
भारतातील समाजामध्ये ठळकपणे दिसणारे
विरोधाभास कोणते?
१. साम्राज्यवाद विरुद्ध भारतीय
जनता
२. सरंजामशाही विरुद्ध येथील
जनता
३. भांडवलशहा विरुद्ध कष्टकरी
समाज
४. सत्ताधारी वर्गातील आपापसातले
आंतरविरोध
यामधले पहिले दोन विरोधाभास हे
मुख्य असून उर्वरित दोन गौण आहेत. येथील क्रांती ज्या ज्या टप्प्यामधून जाईल त्या त्या
टप्प्यामध्ये यातील एक एक विरोधाभास हा प्रमुख विरोधाभास म्हणून चळवळीच्या समोर उभा
ठाकेल.
भारतीय सरकारचे वर्ग रूप कसे
आहे? भारतीय समाजाच्या वर्गांच्या अभ्यासातून हे पुढे येते की येथे प्रजासत्ताक वा
संसदीय लोकशाही हे शब्द म्हणजे केवळ बाहेर लावलेल्या पाट्या आहेत. येथे आजही अर्धवसाहतवाद
आणि अर्धसरंजामशाही अस्तित्वात असून नववसाहतवाद तिच्यावर अप्रत्यक्ष सत्ता गाजवतो आणि
तिचे शोषण करत आहे. या सरकारचे दैनंदिन कामकाज इथली न्यायालये, तुरुंग, नोकरशाही आणि
सशस्त्र दले चालवतात आणि इथल्या शोषणव्यवस्थेचे तेच मुख्य साधन बनले आहेत. साम्राज्यवादी,
नोकरशहांची भांडवलशाही आणि सरंजामशाही या तीन डोंगरांचे ओझे भारतीय समाज वाहत असतो
म्हणून ते तीनच क्रांतीचे शत्रू आहेत. त्यांना समूळ नष्ट करणे हे क्रांतीचे उद्दिष्ट
आहे.
येथील क्रांतीच्या मार्गामध्ये
दोन महत्वाचे टप्पे आहेत. एक म्हणजे नव्या लोकशाहीचा उदय आणि त्यानंतर समाजवादाचा टप्पा.
पाश्चात्य देशांमध्ये क्रांतीच्या मार्गात तीन टप्पे होते. तेथील बूर्ज़्वा वर्गाने
प्रथम राष्ट्रीय लोकशाही स्थापन केली. त्यानंतरचा टप्पा म्हणजे नवी लोकशाही आणि समाजवाद.
जे पाश्चात्य देशात झाले ते आता येथे हो उ शकणार नाही. जगातील कोणत्याही देशातील बूर्ज़्वा
वर्ग आज कष्टकरी वर्गाला घाबरतो आणि क्रांतीच्या वाटेवर असताना कष्टकर्यांना मदत न
करता साम्राज्यवाद्यांना मदत करतो. त्यामुळे आजचा बूर्ज़्वा वर्ग राष्ट्रीय लोकशाही
प्रस्थापित करण्याचा पहिल्या टप्प्याचे नेतृत्व करू शकत नाही. म्हणून आता भारतामध्ये
पाश्चात्य देशांप्रमाणे राष्ट्रीय लोकशाहीच्या प्रस्थापनेचा टप्पा गाठला जाणार नाही.
त्याऐवजी नव लोकशाहीचा टप्पा पार करण्यासाठी
कष्टकरी वर्गाच्या नेतृत्वाला पुढाकार घ्यावा लागेल. ते करत असताना क्रांतीच्या वर
दिलेल्या तीन प्रमुख शत्रूंचा संपूर्ण पाडाव अटळ ठरेल. दुसर्या टप्प्यामध्ये समाजवादी
समाजाची रचना करता येइल.
नव्या व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये
काय बदल होतील? येथील सर्व बॅंका, उद्योगधंदे
सरकारी मालकीचे होतील. जमीनदारांची जमीन गरीब शेतमजूरांमध्ये वाटून दिली जाईल. सावकार
आणि व्यापारी वर्गाकडून होणारे शेतमजूरांचे शोषण थांबविण्यात येइल. सहकाराला प्राधान्य
देउन शेतमजूरांनी त्यात स्वेच्छेने भाग घेतील. सार्वजनिक जीवनावर भांडवलशहांच्या उत्पादनाचे
नियंत्रण राहणार नाही. राष्ट्रीय भांडवलाला परवानगी मिळेल पण त्यावर नियंत्रण राज्याचे
असेल. अशा तर्हेने खर्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होइल. माओ म्हणतात, "योग्य
प्रचाराशिवाय जनजागृती होणार नाही तसेच लोकयुद्धाची तयारीही करता येणार नाही."
राजकीय सत्ता हस्तगत करणे हीच
भारतीय क्रांतीची प्रमुख जबाबदारी आहे. त्यासाठी लोकांची सेना उभारून वर्तमान सरकारच्या
सैन्याचे लढाईमध्ये उच्चाटन करून येथे लोकशाहीची स्थापना करावी लागेल व राजकीय सत्ता
हाती घ्यावी लागेल. ज्या देशांमध्ये बूर्ज़्वा वर्गाने स्थापन केलेली लोकशाही व्यवस्था
अस्तित्वात असते तेथे कष्टकर्यांना आणि त्यांच्या मदतनीसांना जागृत करून त्यांचा लढा
कायदेशीर मार्गाने उभारता येइल.
रशियन राज्यक्रांतीचा मार्ग कोणता
होता? त्यांनी प्रथम शहरी भागामधील राजकीय सत्तेला निर्णायक धक्का देउन प्रस्थापित
सत्ता उद्ध्वस्त करून राजकीय सत्ता हाती घेतली. त्यानंतर अतिवेगाने हालचाली करत ग्रामीण
भागातील प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करत तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. पण ज्या
देशांमध्ये परकीय सत्ता आहे अथवा अर्धसरंजामशाही आहे आणि जिथल्या लोकांना स्वातंत्र्य
आणि लोकशाहीचे अधिकार नाहीत तेथे लोकयुद्धासाठी लोकांना तयार करण्यासाठी ग्रामीण भागातील
खेडूत जनतेचा सहभाग आवश्यक ठरतो. अशा परिस्थितीमध्ये प्रदीर्घ लढ्याची तयारी लोकांचे
सैन्य उभारून करावी लागते. प्रथम आपल्या प्रभावाखालील तळ निर्माण करून मग असा प्रदेश
मुक्त प्रदेश म्हणून वापरण्याच्या कारवाया करत करत शहरांना वेढावे लागेल. या व्यूहरचनेमध्ये
ग्रामीण भागातील विस्तीर्ण प्रदेशाचा कल्पक वापर करून क्रांतीकारकांना चढाईसाठी तसेच
गरज पडलीच तर माघार घेण्यासाठी मुक्त प्रदेशाचा उपयोग हो उ शकतो. शत्रूवर चढाई करण्यासाठी
ग्रामीण पट्टा उपयुक्त आहे. प्रथम गनिमी लढाईचा पाया, मग त्याभोवतीचा प्रदेश असा मोठाच्या
मोठा पट्टा क्रांतीकारकांच्या नियंत्रणाखाली येउ शकतो. असे करताना प्रथम डोंगराळ प्रदेश
आणि नंतर पठारी प्रदेश असा क्रम घेता येइल. तसे केल्यामुळे शत्रूच्या सैन्याला जाउन
भिडण्याऐवजी गनिमी काव्याने तुकड्यातुकड्याने त्यांना खतम करता येइल.
क्रांतीकारकांनी हे लक्षात ठेवावे
की शत्रूंचे सैन्य केवळ डावपेचांच्या दृष्टीने आपल्या सैन्याला वरचढ ठरते. खरे तर ते
कागदी सैन्य आहे. त्यांचे उद्दिष्ट भोवतालच्या लोकांच्या हिताविरोधात असल्यामुळे त्यांना
लोकांचा पाठिंबा मिळूच शकत नाही. त्या सैन्यातील अधिकारी आणि जवान यांच्यामध्ये एक
दरी असते. त्यांचे सैनिक स्वतः देखील शेतमजूर वर्गातून आलेले असतात. अशा वेळी लोकांच्या
सैन्याशी युद्ध लढताना त्यांचे मनोबलही खालावलेले असते. या लढ्यांमध्ये उभारलेले गनिमी
सैन्याचे मुक्ती सेनेमध्ये रूपांतर अंतीम टप्प्यामध्ये करायचे असते. तरी तसे करण्यापूर्वी
पुरेसे सैन्यबळ उभे राहणे महत्वाचे असते. गनिमी सैन्याकडे अत्याधुनिक शस्त्रे नसतात
पण त्याची भरपाई जनतेच्या सहभागातून करता येते. चेयरमन माओ म्हणतात, "लोकांच्या
सहभागाच्या पाठबळाशिवाय विजयाची अपेक्षा करणे म्हणजे रथ दक्षिणेला पिटाळून तो उत्तरेकडे
वळेल अशी अपेक्षा करण्यासारखे आहे." शत्रूची ताकत आणि लोकांची कमकुवत शक्ती या
सापेक्ष गोष्टी असून त्या केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. लोकांचे युद्ध प्रथम
संरक्षण, नंतर तुल्यबळ अवस्था आणि शेवटी चढाई अशा टप्प्याने जाते.
लेनिन - मार्क्स यांच्या म्हणण्यानुसार
निवडणूका लढणे अथवा त्यावर बहिष्कार टाकणे हा लढ्याचाच प्रकार असून तो लढाईतील डावपेचाचा
एक भाग आहे. ख्रुश्चेव्ह यांनी या कल्पनांमध्ये केलेल्या बदलानंतर (रिव्हिजनिझम) संसदीय
मार्ग आणि निवडणूकीतील सहभाग हेच आधुनिक सुधारकांसाठी एक धोरण बनले आहेत. या अनुभवानंतर
ह्या गोष्टीकडे आम्हाला एक डावपेच म्हणून बघून सोडून देता येत नाही. सशस्त्र लढ्याच्या
बाता मारता मारता निवडणूकीत भाग घेण्याच्या कृतीने क्रांतीचे केवळ नुकसान होते. भारतामध्ये
लढाईच्या तयारीसाठी शांततेच्या कालखंडाची अजिबात गरज नाही. अशा प्रकारचा कालखंड भले
पाश्चात्य देशामध्ये आवश्यक असो. काही जण असाही युक्तीवाद करतात की जोवर क्रांतीची
लाट आलेली नाही अथवा लोकांना संसदीय मार्गाविषयी खोटा विश्वास असतो अथवा लाल सैन्याचे
बळ तुलनेने कमी असते तेव्हा शांततेचा कालखंड हवा म्हणून संसदीय निवडणूकांमध्ये भाग
घ्यावा. परंतु हे युक्तीवाद निराधार आहेत आणि भारतीय पार्श्वभूमीवर ते निरर्थकही आहेत.
गेल्या ५० वर्षातील संसदीय मार्गाने जाण्याचा येथील अनुभव बोलका असून त्यातील पोकळपणा
सिद्ध करण्यास पुरेसा आहे. किंबहुना संसदीय निवडणूकांवर बहिष्कार टाकण्यासाठी थेट प्रचार
करणे जास्त श्रेयस्कर आहे.
ज्या प्रदेशामध्ये सरंजामशाहीची
पिळवणूक टोकाला पोहोचली आहे, जिथे आर्थिक सामाजिक आणि राजकीय विरोधाभास सुस्पष्ट होत
आहेत, जिथे वर्गलढा तीव्र होत आहे, जिथे शत्रू कमजोर आहे, जेथील भौगोलिक परिस्थिती
गनिमी युद्धासाठी योग्य असेल अशा ठिकाणी तळ निर्माण करणे शक्य असते. तळ निर्माण करण्यासाठी
मजबूत पक्षबांधणी आवश्यक असते. चेयरमन माओ म्हणतात, "क्रांती हवी असेल तर क्रांतीकारी
पक्ष असलाच पाहिजे. मार्क्स व लेनिनच्या तत्वांवर उभारलेला पक्ष नसेल तर साम्राज्यवादाचा
पराभव करण्यासाठी कष्टकरी समाजाला प्रवृत्त करणे अशक्य आहे".
तळाचा भूप्रदेश हळूहळू विस्तारत
त्याचेच मुक्त प्रदेशात रूपांतर करणे शक्य असते. मुक्त प्रदेशामध्ये शत्रूची हुकूमत
चालत नाही. तेथील जमीनदारांच्या जमिनी, सरकारी जमिनी आणि सरकारी आस्थापनांच्या जमिनी
ताब्यात घेउन त्यांचे पुनर्वाटप करून अशा जमिनी भूमीहीन शेतमजूरांना दिल्या जातात.
सावकारांचा आणि जमीनदारांचा कर्जाचा हप्ता बंद केला जातो. सरकारकडे कर जमा होत नाही.
तेथील जंगलांवर आदिवासींचा हक्क प्रस्थापित केला जातो. त्यातील उत्पादनांची लयलूट थांबवली
जाते. येथे सहकारी तत्वावर शेतीला प्राधान्य दिले जाते. हाच प्रदेश वापरून मोठे सैन्य
उभारणीचे कार्य हाती घेतले जाते.
यानंतर स्थान येते ते डावपेचांचे.
डावपेच हे धोरण राबवण्यासाठी वापरले जातात. एकंदर युद्धासंदर्भाने हा शब्द वापरला जात
नाही. युद्धामधील एखादी घटना - एखादी चकमक - एखादा हल्ला यांच्यासंदर्भाने हा शब्द
वापरला जातो. चपखल घोषणांचा वापर महत्वाचा असतो. प्रचारात्मक घोषणेचे रूपांतर आंदोलनाच्या
घोषणेमध्ये आणि आंदोलनाच्या घोषणेचे रूपांतर कार्यवाहीच्या घोषणेमध्ये आणि कार्यवाहीच्या घोषणेचे रूपांतर पक्षाच्या
आदेशामध्ये कसे करावे याकडे बारकाईने लक्ष दिले गेले पाहिजे कारण हा डावपेचांचा एक
भाग आहे. खेडोपाडीच्या अथवा शहरातील बेरोजगार तरुणांना पक्षाच्या कामामध्ये सामावून
घेणे, दलित समाजामध्ये पक्षाच्या कामाची उभारणी करणे, दलित कार्यकर्त्याला संघटनेच्या
नेतृत्वपदी बसवणे, आदिवासी समाजामध्ये काम उभे करणे, आदिवासी तरुणांना पक्षामध्ये सामावून
घेउन त्यांना नेतृत्वाची संधी देणे ह्या गोष्टींकडे पुरेसे लक्ष दिले गेले पाहिजे.
दलित आणि आदिवासींच्या जोडीनेच स्त्रिया आणि धार्मिक अल्पसंख्य यांनाही अशाच प्रकारे
संघटनेमध्ये सामावून घेतले पाहिजे. भारतामध्ये अनेक ठिकाणी स्वतंत्र राष्ट्रासाठी लढे
चालू आहेत. पक्षाने त्या लढ्याला समर्थन देउन त्यांच्या बरोबर आघाडी उभारली पाहिजे.
तसेच भविष्यात त्यांना नेतृत्व दिले पाहिजे. (पहा तळटीप ३) पक्षकार्यकर्त्यांना गुप्तपणे काम करण्याचे महत्व
कळले पाहिजे. पक्षाच्या कामामध्ये कायदेशीर आणि बेकायदेशीर कारवाया कराव्या लागतात
व त्या सर्व सभासदांनी आत्मसात केल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या कामांमध्ये अनेक कार्यकर्ते
गोंधळामुळे चुका करताना दिसतात. पण ते टाळले पाहिजे. पक्ष अनेकदा कायदेशीर मार्गाचा
अवलंब करून काही संस्था चालवतो. त्या संस्थांच्या आडून आपले उद्दिष्ट गाठण्याच्या अन्य
कारवाया चालू ठेवता येतात. अशा तर्हेने आपल्याला दोन्ही प्रकारची कामे सहजतेने एकत्रितरीत्या
करता आली पाहिजेत.
पक्षाने लश्करी तुकड्या उभारणे
महत्वाचे आहे. त्याखेरीज क्रांती यशस्वी हो उ शकत नाही. परंतु लश्करी कारवायांचे धोरण
हे पक्षाच्या धोरणाच्या अनुषंगाने बनवले पाहिजे. आपले लश्कर आणि शत्रूच्या लश्करामध्ये
मोठा फ़रक आहे. आपले लश्कर म्हणजे एक राजकीय शक्ती आहे. लोकयुद्धामध्ये लोकांचे धोरण
राबवण्यासाठी ते उपयुक्त असले पाहिजे. आपले युद्ध हे असे युद्ध आहे की ज्यात आपला शत्रू
आपल्यापेक्षा प्रबळ आहे् आणि आपल्यापेक्षा अवाढव्य आहे. शत्रूचा प्रत्येक कमकुवत धागा आणि आपला प्रत्येक प्रबळ गुण
यांचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. केंद्रीभूत धोरण आणि विकेंद्रित अंमलबजावणी हे कामाच्या
पद्धतीचे मूलभूत तत्व असले पाहिजे. आपले अस्तित्व, विजय आणि विस्तार यासाठी आपण जनतेच्या
आधारावर अवलंबून असतो. जनता हे आपले डोळे आणि कान आहेत, ते आपल्या सैन्याला जगवतात
आणि युद्धात अथवा दगाबाजीत मदतही करतात. गनिमी युद्ध हे लोकांच्या व्यापक पाठिंब्यावर
लढायचे असते. व्यापक समाज म्हणजे सागर असून आपले सैनिक म्हणजे त्यात बेमालूम तरणारे
मासे आहेत. दीर्घ काळपर्यंत गनिमी युद्ध केल्याने शत्रू थकतो, बेजार होतो. पण एकएक
चढाई चुटकीसरशी करावी, ती लांबवता कामा नये. शत्रू कमजोर असेल तेव्हा आक्रमण, शत्रू
प्रबळ असेल तेव्हा युद्धविराम, कधी तुकड्या पांगवणे कधी त्यांना एकत्र जमवणे, कधी माघार
कधी चढाई, कोणत्याही क्षणी कसेही शत्रूशी लढाईची तयारी ह्यात आपले लश्कर तरबेज असले
पाहिजे. १९४६ ते ५१ मधील तेलंगणाचा उठाव या
लश्करी धोरणाच्या अभावामुळे फसला हे विसरता येणार नाही.
व्यापक जनाआंदोलने उभारण्याला
अनन्यसाधारण महत्व आहे. तसे करतानाच जनतेमध्ये व्यापक प्रमाणावर राजकीय समज निर्माण
करता येते.
प्रस्थापित सरकार का उलथून टाकले
पाहिजे ते समजते आणि त्यासाठी संघटित प्रयत्नांचे महत्व समजते. असे लढे उभारताना लोकांच्या
दैनंदिन जीवनातील समस्यांना हात घातला पाहिजे तर ते त्यात सहभागी होतात. क्रांतीच्या
अंतीम उद्देशाने लढे उभारले नाहीत तर त्यांचा वापर क्रांतीच्या कामी हो उ शकत नाही.
ते लढे हे लोकयुद्धाचा भाग असले पाहिजेत. प्रथम व्यापक जनआंदोलन अथवा संघटना उभारून
हळूहळू त्यांचे रूपांतर सशस्त्र लढ्यात करण्याची कल्पना मुळातच चुकीची आहे हे समजून
घेतले पाहिजे.
माओवाद्यांनी दळणवळण, वाहतूक
संचार, रेल्वे, बंदरे, वीज, खनिज तेल, संरक्षण उत्पादन ही क्षेत्रे महत्वाची असून आपले
स्थान तेथे उभे केले पाहिजे. युद्ध जिंकायचे असेल तर ह्या क्षेत्रांमध्ये उपद्रव निर्माण
करून ती बंद पाडणे व तशी शक्ती आपल्याकडे असणे याला प्राधान्य दिले पाहिजे. हे काम
पक्षाच्या शहरातील तुकड्यांनी पार पाडायचे आहे. यातील अनेक उद्योगामध्ये सरकारी उपक्रम
असून तेथे खाजगीकरणाची मोहिम सुरु आहे. त्यामुळे अगोदरच कामगारवर्गामध्ये नाराजी असून
खाजगीकरण विरोधात आंदोलने सुरु आहेत. त्यांचा वापर आपल्या शाखा स्थापण्यासाठी करता
येइल. त्याकरिता प्रस्थापित कामगार संघटनांमध्ये गुप्तरीतीने आपले प्रतिनिधी पाठवता
येतील. अशा प्रतिनिधींनी आपली ओळख गुप्त राखणे आवश्यक आहे. देशभर दिसणार्या अन्य विरोधाभासामध्ये
धार्मिक संघर्षाचा उल्लेख करता येइल. भारतामधील धार्मिक अल्पसंख्य समाज येथील बहुसंख्य
हिंदूंच्या दडपशाहीला बळी पडत आहेत. ह्या दडपशाहीविरोधात शहरी शाखांना काम करता येइल.
भारतीय शासनाच्या पोलिसदले, लश्करी आणि निमलश्करी दले, उच्चस्तरीय प्रशासकीय सेवा येथे
पक्षाचे कार्यकर्ते घुसवता आले पाहिजेत. वेळ येताच क्रांतीच्या क्षणी या यंत्रणांचा
वापर आपल्याला हवा तसा करता यायला हवा. आपल्या शत्रूला युद्धासाठी लागणारी सामग्री
शहरी भागातूनच मिळते. आपल्या संघटनेला ही सामग्री ग्रामीण विभागातीन मिळत असली तरी
शस्त्रे, दारूगोळा, स्पेअरपार्ट, वैद्यकीय सामग्री, युद्धसामग्रीची दुरुस्ती आदि कामांसाठी
आपण सुद्धा शहरी विभागांवरच अवलंबून असतो. या गोष्टींचे संचालन शहरी शाखांनी करावयाचे
आहे. याखेरीज लढ्यासाठी आवश्यक असलेल्या तरुणांच्या भरतीचे काम शहरातून करणे हे ही
तितकेच महत्वाचे आहे.
(तळटीप १: माओवादी संघटनेची कार्यपद्धती
पहाता आज इंटरनेटवर उपलब्ध असलेले हे दस्तावेज विश्वसनीय आहेत का असा प्रश्न पडतो.
ते इंटरनेटवर कसे अवतीर्ण झाले - ते नेमके कुठे मिळाले - पोलिसांना मिळाले की पत्रकारांना
- ते विश्वसनीय मानावेत की नाही - हे दस्तावेज
पोलिसांनी कोणत्या न्यायालयामध्ये चाललेल्या खटल्यामध्ये माओवाद्यांच्या विरोधात वापरले
आहेत का - न्यायालयाने ते ग्राह्य मानले आहेत की फ़ॅब्रिकेटेड डॉक्यूमेंट म्हणून - ते
पुरावा म्हणून अमान्य झाले वगैरे माहिती उपलब्ध नाही आणि अधिकारी व्यक्तीही सांगू शकल्या
नाहीत. परंतु जे इंटरनेटवर उपलब्ध आहे त्याचे माओवाद्यांनी अथवा पोलिसांनी अथवा सरकारने
खंडनही केलेले नाही असे काही तज्ञांकडून कळले.)
,
(तळटीप २: पेटी बूर्ज़्वा
वर्गात कारागिर शिक्षक कारकून निम्नस्तरीय सरकारी अधिकारी इंजिनीयर्स डॉक्टर्स वकील
व शारिरीक अथवा बुद्धीजीवी मध्यम मिळकत असलेला समाज याचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय
बूर्ज़्वा हा वर्ग राजकीय दृष्ट्या अत्यंत अस्थिर असतो. ह्या वर्गाला सरकारमध्ये अथवा
सरकारी "तिजोरी"वर काहीच आधिपत्य मिळत नाही. हा वर्ग लाल क्रांतीला घाबरतो
- सर्व बाजूंनी दडपला गेल्यामुळे हा वर्ग आपले वेगळे राष्ट्र प्रस्थापित करू इच्छितो
- ह्याच वर्गात काही जण असेही असतात की ते स्वतःच्याच वर्गातील काहींचे शोषण करतात.
अशा दुटप्पी भूमिकेमुळे तो वर्ग कधी कधी क्रांतीमध्ये भाग घेतो तर कधी क्रांतीला विरोध
करतो. भारताच्या ईशान्येकडील राज्यामध्ये चालणार्या फुटीर चळवळींना अथवा काश्मिरातील
विघटनवादी शक्तींना माओवादी राष्ट्रीय बूर्ज़्वा म्हणून गणत असतात.)
(तळटीप
३: फुटीरतावादी अथवा विघटनवादी चळवळी अथवा लढ्याबद्दल काय भूमिका असावी याचे मार्गदर्शन
आपल्याला कॉम्रेड स्टॅलिन याने या प्रश्नाचा रशियासंदर्भात विचार करताना केलेल्या विश्लेषणामध्ये
मिळते. "अशा शक्तींचा स्वतंत्र अस्तित्वाचा हक्क मान्य करणे, लश्करी आणि आर्थिक
तत्वावर आधारित त्यांचे व केंद्रीय रशियाचे एकसंघत्व, त्यांना सांस्कृतिक आणि आर्थिक
विकासासाठी संघाकडून मदत आणि कष्टकरी जनता आणि शेतकर्यांच्या हाती एकवटलेली राजकीय
सत्ता" या सूत्रांच्या आधारे हे वेगवेगळे लढे एकत्र आणता येतील असे स्टॅलिन म्हणत
असे. माओवादी संघटनेने नेतृत्व हाती घेउन त्यांना समान राष्ट्रीयता आणि स्वयंनिर्णयाचा
हक्क बहाल करण्याने त्यांचा लढा हा राष्ट्रीय दडपशाहीच्या विरोधातील लढा न राहता तो
साम्राज्यवादी ह्या सामाईक शत्रूच्या विरोधातील लढा म्हणून काम करू लागतो. भारतामध्ये
ह्या तत्वाचा विचार करताना काश्मिरचा लढा तसेच ईशान्येकडील राज्यातील फुटीरतावादी लढ्यांचा
स्वतंत्र विचार केला पाहिजे कारण हे प्रदेश मुळात भारताचा भाग कधीच नव्हते तर साम्राज्यवादी
ब्रिटनने ते गिळंकृत करून जबरीने ते भारताला जोडले होते. ह्या लढ्यांना वारंवार देण्यात
आलेल्या आश्वसनांवर बोळा फिरवण्यात आल्यामुळे त्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहिले
पाहिजे. किंबहुना आपण त्या लढ्याचे नेतृत्व केले पाहिजे.
No comments:
Post a Comment