Tuesday, 20 March 2018

What Happened? - श्रीमती हिलरी क्लिंटन

Image result for clinton india conclave 2018


इंडिया कॉन्क्लेव्ह २०१८ मध्ये या वर्षी श्रीमती हिलरी क्लिंटन ह्यांना निमंत्रण देण्यात आले होते. "What happened" शीर्षक असलेले त्यांचे पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झाले आहे. २०१६ मधील अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक अत्यंत वादग्रस्त ठरली होती. विजयी उमेदवार डॉनल्ड ट्रम्प ह्यांनी रशियाच्या आधाराने दिशाभूल करणारी माहिती नेमक्या क्षणी प्रसिद्ध करून आणि त्यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर करून लाखो अमेरिकन नागरिकांचे मत आपल्या विरोधामध्ये कसे फिरवण्यात आले ह्याची कहाणी हिलरी बाईसाहेबांनी पुस्तकामध्ये मांडली आहे. ह्यासंदर्भाने त्यांना कॉन्क्लेव्ह मध्ये निमंत्रण देण्यात आले होते. हिलरी ह्यांनी तेथे केलेले भाषण आणि श्री अरुण पुरी ह्यांनी  तदनंतर त्यांची घेतलेली मुलाखत ही ’लेकी बोले सुने लागे’ न्यायामध्ये अगदी चपखल बसते. ह्या समारंभाची लिंक मी इथे दिलेली आहे. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीवरती सगळ्या जगाचेच लक्ष लागलेले असते. प्रचारादरम्यान कोणता उमेदवार काय भूमिका मांडतो - अंतर्गत बाबी असोत की परराष्ट्र धोरणाशी निगडित असोत सर्वच मुद्द्यांमध्ये बाहेरील निरीक्षकांना रस घ्यावाच लागतो कारण अमेरिकन अंतर्गत असोत की आंतरराष्ट्रीय धोरणाचे कोणते परिणाम आपल्या देशावरती होऊ शकतात ह्याचे मूल्यमापन सतत चालू असते. तेव्हा इंडिया कॉन्क्लेव्हने हिलरी ह्यांची कथा ऐकण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले असते तर ते स्वाभाविक ठरले असते. परंतु त्यांच्या भाषणाच्या आणि मुलाखतीच्या निमित्ताने २०१९ च्या भारतीय लोकसभा निवडणुकांना लागू होतील असे संदर्भ त्यामध्ये आल्यामुळे भारतीयांच्या स्वाभाविक ’रसा’पलिकडे जाऊन काही तरी संदेश पोचवण्यासाठी हिलरी बाईसाहेब येथे आल्या तर नव्हत्या ना अशी शंका साहजिकच मनात येते. आणि मुख्य म्हणजे त्याला दुसरे सबळ कारण हे आहे की त्यांची यूपीए च्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी ह्यांच्याशी असलेली घनिष्ठ मैत्री! ही मैत्री काही केवळ दोन व्यक्तींमधली जुळलेली नाती अशा स्वरूपापुरती मर्यादित नसून दोन समविचारी मैत्रिणींचे हितगुज आहे. यूपीएच्या काळामध्ये २००८ नंतर अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार होते. ह्या पक्षाचे विचार आज जगामध्ये सर्वच लिबरल्स लिबरली आत्मसात करताना दिसतात. १९९० पर्यंत जसे जगातील सर्व कम्युनिस्टाचे विचार एकाच धर्तीवरती मांडले जाताना आपण बघत होतो तसे आता लिबरल्सचे झाले आहे. किंबहुना पूर्वाश्रमीच्या काही युरोपीय कम्युनिस्टांनी कायापालट करून स्वतःला लिबरल्स म्हणून घोषित करून जागतिक राजकारणामध्ये धुमाकूळ घातला आहे. एकमेकांची री ओढणारी ही जमात - तिची पिल्ले भारतामध्येही दिसली नाही तर नवल. ह्या घनिष्ठ वैचारिक मैत्रीसंबंधांमुळे काश्मिर पासून चीनपर्यंत सोनियाजी आणि ओबामा-हिलरी ह्यांचे मेतकूट चांगलेच जमले होते असे दिसते. लिबरॅलिझमच्या कल्पनांचा उद्घोष करत प्रत्यक्षात एकीकडे सोयीचे असेल तेव्हा व्हॅटिकन अन्यथा अगदी रॅडिकल इस्लामिस्ट किंवा कम्युनिस्ट शक्तींच्या हातात हात मिळवत भारतामध्ये ज्या गटांनी एनजीओच्या मदतीने कसा धुमाकूळ घातला ते आपण सर्वांनी अनुभवले आहे. म्हणूनच २०१४ मध्ये हाती सत्ता येताच गृहमंत्री श्री राजनाथ सिंग ह्यांनी परदेशी मदत घेणार्‍या सर्व संस्थांचे लायसन्स रद्द करून पुनर्तपासणी नंतरच त्यांना परदेशामधून पैसा मिळावा अशी कारवाई केली होती. ह्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षसदस्यप्रणित संस्थाही होत्या, इथे श्रीमती सोनियाजी निवडणूक हरल्या तर तिथे श्रीमती हिलरी क्लिंटन.

रशियन नेते व्लादिमिर पुतिन ह्यांनी आपण निवडणूक जिंकूच नये ह्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि प्रतिस्पर्धी उमेदवार श्री ट्रम्प ह्यांचे साथीदार त्यासाठी रशियाची मदत घेत होते असे हिलरी बाईसाहेबांचे म्हणणे आहे. नव्हे तशी त्यांची खात्री पटली आहे व ह्या निष्कर्षावरती त्यांची श्रद्धा आहे. जगामधला क्वचितच असा एखादा देश असेल जिथे अमेरिकन हस्तक्षेपाशिवाय निवडणुका पार पडत असतील. अशा अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मात्र रशियाने हस्तक्षेप करावा ह्याचा गाजावाजा करून त्याच मुद्द्यावरून श्री ट्रम्प ह्यांच्यावरती महाभियोगाचा खटला चालवून त्यांना खाली खेचण्याचे मनसुबे डेमोक्रॅटस तेव्हाही करत होते आणि आजही करत आहेत.

मुलाखतीमध्ये हिलरी बाईसाहेबांनी रशियाप्रणित शक्तींनी आपले सेक्रेटरी पॉडेस्टा ह्यांचे ईमेल हॅक केले गेले अशी तक्रार केली.  इंटरनेटवरून आपल्या संदर्भाने धादांत खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या. अमेरिकन जनमतावरती ह्या बातम्यांमुळे प्रभाव पडल्यामुळे आपण निवडणूक हरलो आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा आपला मान हुकला अशी खंत हिलरी ह्यांनी व्यक्त केली. एव्हढ्यापुरते ठीक आहे. त्यांची वेदना त्यांनी बोलून दाखवावी ह्यामध्ये गैर नाही.

परंतु मुलाखतीचा संपूर्ण रोख भारतीय पार्श्वभूमीकडे होता आणि तसे अस्पष्ट उल्लेख त्यात ऐकायला मिळतील. ट्रम्प ह्यांनी अमेरिकन जनतेमध्ये धर्माधारित फूट पाडली आणि एका गटाला दुसर्‍याच्या विरोधात उभे करून त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेतली असे त्यांनी म्हटले. मध्यपूर्वेमधून आलेले निर्वासित - भारत वा अन्य ठिकाणाहून स्थलांतरित झालेले भारतीय ह्यांच्यावरती कसे आक्षेप घेतले गेले हे सांगून अशीच परिस्थिती भारतामध्ये मोदी ह्यांच्या भाजपने निर्माण करून २०१४ साली सत्ता मिळवली आणि २०१९ मध्येही असेच होऊ शकते असे त्या सूचित करत होत्या. देशद्रोह करून पुतिन यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप जसा यांच्या वर त्या करत आहेत तसेच भारतात मोदी देशाबाहेरील शक्तींशी हातमिळवणी करून अश्लाघ्य मार्गाने निवडणूक लढवतील असे सूचित केले जात आहे. ट्रंप ह्यांनी  जे डिबेट टीव्ही च्या माध्यमातून  जनमोर केले जाते त्यातच  ट्रोलींग करत आपल्याला घाबरवण्याचा  प्रयत्न केल्याचा हिलरी यांचा  हास्यास्पद आरोप पाहता महिलांसंदर्भातील ट्रम्प यांजवरील अन्य आरोप लक्शात घेता भारतात मोदींवरती असेच आरोप तर केले जाणार नाहीत अशा शंकेला जागा उरते.

किंबहुना हिलरी ह्यांच्या पाठीशी जो जागतिक गट काम करत होता त्याचा भक्कम पाठिंबा हिलरी ह्यांनी सोनियाजींच्या मागे उभा केला होता आणि २०१९ च्या निवडणुकीतही त्या तसे करतील अशी जणू ग्वाही देण्यासाठीच त्या इथे आल्या होत्या की काय अशी शंका येते. आणि त्यांच्या भक्कम पाठिंब्यावरती आश्वस्त होऊन सोनियाजी ह्यांनी २०१९ मध्ये मोदींना निवडणूक जिंकूच देणार नाही असे ठामपणे ह्याच कॉन्क्लेव्हच्या आपल्या मुलाखतीमध्ये म्हटल्याचे आपल्याला आठवत असेल.

अमेरिकन सरकारने श्री मोदी ह्यांना अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा देखील नाकारला होता. त्यामागे प्रयत्नशील असणार्‍या शक्ती ह्या हिलरी ह्यांच्या समर्थक आहेत. ट्रम्प ह्यांच्या ऐवजी हिलरी जिंकल्या असत्या तर त्यांनी मोदी सरकारला उभ्या धारेवर धरून भाजून काढले असते हे निर्विवाद आहे. मोदी ह्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या यशाला कात्री लावण्याचे काम वॉशिंग्टन मध्ये बसून बाईसाहेबांनी केले असते. असो. ते टळले संकट भले असे आता म्हणायचे. स्वतःच्या निवडणुकीमध्ये रशियाने हस्तक्षेप केला आणि त्यासाठी जे मार्ग वापरण्यात आले त्यावरती आक्षेप घेणार्‍या हिलरी बाईसाहेब स्वतः मात्र प्रच्छन्नपणे भारतीय निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करू पाहत आहेत आणि विद्यमान सरकार काय कारस्थाने करू शकेल ह्याच्या टिप्स देत आहेत हे एक नवलच म्हणायचे. आणि आमचे लिब्बू सेक्यू फेकू पत्रकार त्यांची वाहवा करत आहेत. असो. ही लिंक चेक करा.  खुद्द बाईसाहेबांच्या निवडणुकीची सत्यकथा आता समजून घेणे गरजेचे झाले आहे. कारण इतिहास पुन्हा पुन्हा घडतो पण सगळेच तपशील तसे राहत नाहीत. तेव्हा २०१९ मध्ये मोदी विरोधक काय करतील ह्याचा रोडमॅप समजयचा तर बाईसाहेबांच्या निवडणुकीची कथा - त्यांच्या चष्म्यातून नव्हे तर - वास्तव कथा आता लिहिणार आहे. प्रतीक्षेत रहावे. धन्यवाद.

https://www.youtube.com/watch?v=t_XNsvjjISA

4 comments:

  1. खुप छान ब्लॉग।

    आपले ब्लॉग कसे subscribe करायचे।
    ई-मेल वर पाहिजे आहेत।

    ReplyDelete
  2. NGOs च्या माध्यमातून दुसऱ्या देशांमध्ये लुडबूड करण्यात बाई निष्णात आहेत.

    ReplyDelete
  3. तुमची हिलरी सिरीज वाचायला आरंभ केला आहे. हा पहिलाच लेख अगदी उत्तम. जस मी याआधीही म्हटलं होतं एक कमेंट मध्ये ...हिलरी जेव्हा येते तेव्हा ती भारतात नकली रोगराई घेऊन येत असते ....

    ReplyDelete