बेन गाझी प्रकरण हिलरी बाईसाहेबांच्या अंगाशी येणार हे २०१२ मध्येच उघड झाले होते. पण प्रकरणाने कळस गाठला होता जेव्हा कॉंग्रेसच्या कमिटीसमोर काही सदस्यांनी ह्या प्रकरणामधल्या इमेल्स हिलरींनी ऑफिसचा इमेल न वापरता स्वतःच्या आय डी वरून पाठवल्या होत्या असे आरोप केले. ह्या आरोपांची शहानिशा करत असताना लक्षात आले होते की केवळ आय डी खाजगी होता असे नाही तर त्यांनी त्या इमेल्स खाजगी सर्व्हर वापरून पाठवल्या होत्या. हे प्रकरण अधिकच गंभीर होते. "मीच नाही तर अन्य काही माजी पदाधिकार्यांनी सुद्धा खाजगी इमेल्स वापरल्या होत्या - त्यामध्ये गैर काही नाही असे बाईसाहेब बिनदिक्कत सांगत होत्या. फरक हा होता की हिलरींनी सर्व्हर देखील खाजगी वापरला होता. पुढे ह्या इमेल्स काय आहेत त्या सरकारच्या व तपास समितीच्या ताब्यात द्या म्हटल्यावरती इमेल्स आता माझ्याकडे नाहीत असे म्हणून त्यांनी हात झटकून टाकले होते. ह्या वागणुकीमुळे खरे तर नागरिकांनी सावध व्हायला हवे होते. पण कायद्याचे राज्य म्हणून मिरवणार्या अमेरिकेमध्ये हेही घडते बाबा असे म्हणून सगळे जणू गप्प बसले होते.
इमेल्स प्रकरणातला तपास एकीकडे चालू असतानाच दुसरीकडे डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवारीच्या हिलरी बाई अधिकृतपणे उमेदवार बनल्या होत्या. ५ जुलै २०१६ रोजी एफ बी आय चे डायरेक्टर जेम्स कोमी ह्यांनी एक वार्ताहर परिषद गेतली होती. एफबीआय तपासपथकाने एकूण ११० इमेल्स हिलरी ह्यांच्या खाजगी सर्व्हर वरून पाठवल्या गेल्याचे शोधले होते. ह्यापैकी ६५ इमेल्स गोपनीय आणि २२ इमेल्स अतिगोपनीय होत्या असे नोंदले गेले होते. ह्या ११० व्यतिरिक्त अशा अनेक इमेल्स होत्या की ज्यांच्यामध्ये अतिगोपनीय माहिती होती. परंतु त्यांच्यावरती तसे लिहिले गेले नव्हते. व्हाईट हाऊससाठी एकूण तीन नेटवर्क वापरली जातात आणि तिन्ही स्वतंत्र आहेत म्हणजे एका नेटवर्कमधील माहिती दुसर्यामध्ये जाऊच शकत नाही. अनेकदा लोक कॉपी पेस्ट करून अशा नोंदी इतर नेटवर्कवरती वापरत असत. हिलरींच्या बाबतीत असे घडले तर होते शिवाय असे परिच्छेद C ह्या अक्षराने सुरु झाले असल्याचे दिसत होते. त्याबद्दल विचारले असतात हा C म्हणजे गोपनीय माहिती आहे असे मला वाटले नाही तर A B C अशा क्रमाने मांडलेले हे परिच्छेद आहेत असा माझा समज होता असे त्या बिनदिकत सांगत होत्या.
५ जुलैच्या वार्ताहर परिषदेमध्ये कोमी काय जाहिर करणार ह्याकडे लोकांचे डोळे लागले होते. ह्यामध्ये हिलरी आरोपी ठरणार का हा प्रश्न होता. चौकशी
पूर्ण झाल्याचे कोमी ह्यांनी वॉशिंग्टन डी सी येथील वार्ताहर परिषदेमध्ये जाहीर केले. ह्या प्रकरणामध्ये आम्ही हिलरी ह्यांच्यावरती कोणतेही आरोप ठेवत नाही असेही त्यांनी जाहीर केले. ह्या गंभीर आरोपामधून खरे तर हिलरी सुटणार नाहीत असेच वाटत असताना एफ बी आय ने त्यांना मोकळे सोडावे हा धक्का होता. जनतेच्या लेखी हिलरी ह्यांनी खाजगी सर्व्हर वापरून इमेल्स पाठवाव्यात आणि पुढे डेमोक्रॅटिक पक्षाच्या समितीच्या इमेल्स हॅक व्हाव्यात हे एकच प्रकरण होते. हिलरी ह्यांचे डेमोक्रॅट प्रतिस्पर्धी सॅंडर्स तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प दोघेही क्लिंटनवरती टीका करताना ’क्लिंटन इन्कॉर्पोरेशन" अथवा "वॉलस्ट्रीटच्या लाडक्या हिलरी" असे वर्णन करत होते. वॉशिंग्टन डी सी मधील प्रभावशाली शक्तींनी अमेरिकन आर्थिक आणि राजकीय सत्तेवरती पूर्णपणे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि त्याचे गैरफायदे ओबामा तसेच क्लिंटन कुटुंबीय ह्यांना मिळत आहेत असा समज पसरत चालला होता. हिलरी ह्यांच्यावरती कोणतेही गुन्हेगारीचे आरोप नोंदले जाणार नाहीत असे कोमी ह्यांनी जाहिर केल्यावरती हा समज अधिकच दृढ झाल असता. सॅंडर्स आणि ट्रम्प ह्यांचे टीकास्त्र कमी की काय पण कोमी ह्यांचा हा निर्णय क्लिंटन ह्यांना भारी पडणार असे वातावरण असताना ओबामा हिलरींच्या बाजूने आपले राजकीय वजन - आपली लोकप्रियता टाकण्यासाठी मैदानात उतरले होते. शिवाय क्लिंटन ह्यांचे जे राक्षसी स्वरूप जनमनात रूढ होऊ लागले होते त्यावरती उतारा म्हणून त्यांना एक मानवी सहृदय चेहरा मिळावा असा ओबामा ह्यांचा प्रयत्न होता. "हिलरी सर्वांशीच प्रेमाने वागतात. मग असा माणूस म्हणजे महत्वाची व्यक्ती असो वा नसो". हिलरी म्हणजे कोणी उमराव सरदार अशा प्रतिष्ठित नसून माझ्यासारख्याच सामान्य घरातील आहेत असे ठसवण्याचा प्रयत्न होता. (अमेरिकन निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष आपल्या पक्षाने अंतर्गत निवडणुकीत निवडलेल्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर करतात अशी प्रथा आहे. पण ओबामा ह्यांनी हिलरींना दिलेला पाठिंबा खरोखरच एव्हढ्यापुरता मर्यादित होता का त्यामगे त्यांचा अन्य स्वार्थ होता असा प्रश्न तेव्हाही मनात होता. ही शंका पुढे खरी ठरली.)
कोमी ह्यांना त्यांचे अंतर्मन खात असावे. अमेरिकेमध्ये थोरामोठ्यांसाठी न्यायाची मापे वेगळी असतात असे दृश्य उभे राहिले होतेच. कोमी म्हणाले हिलरी ह्यांचे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे नसले तरी त्यांनी ह्यामध्ये "हलगर्जीपणा" केला आहे. हलगर्जीपणा हा शब्द म्हणजे त्याही परिस्थितीमध्ये बॉम्बशेल होता. कारण हाच शब्द वापरून भविष्यातील गुन्हेगारी खटल्याची कोमी ह्यांनी जणू तजवीज केली आहे असे वाटू लागले. आधीच हादरलेल्या हिलरी ह्यांना ताबडतोबीने गुन्हेगारी आरोप नाहीत ह्यासाठी निःश्वास टाकीतो हलगर्जीपणा शब्दाची चिंता करावी लागली. ६ जुलै रोजी अटॉर्नी जनरल लॉरेटा लिंच ह्यांनी कोणत्ताही गुन्हा दाखल केला जाणार नाही असे जाहीर केले. पण गदारोळ इतका झाला की लगेचच दुसर्या दिवशी म्हणजे ७ जुलै रोजी स्टेट डिपार्टमेंटने पुन्हा नव्या चौकशीचे आदेश दिले.
काळ बिकट होता. हिलरी जिंकणे अत्यावश्यक आहे असे वाटणारी मंडळी केवळ डेमोक्रॅट पक्षात होती असे नव्हे तर खुद्द रिपब्लिकन पक्षामध्ये सुद्धा होती. अमेरिकन लोकशाही वाचवण्यासाठी ट्रम्प ह्यांना पाडलेच पाहिजे म्हणून त्यांना पाडण्यासाठी सगळेच एकत्र येत होते. परिस्थिती असामान्य होती आणि काही तरी असामान्य पावले उचलणे ह्यांच्यामधल्या प्रत्येकाला गरजेचे वाटू लागले. ह्या मंडळींनी कशाचाच विचार केला नाही. लोकशाही वाचवण्याच्या नादामध्ये किंवा ईर्ष्येने त्यांना इतके आंधळे केले होते की मार्गात येईल तो नियम वा कायदा मोडायला ते तयार होते - मोडत होते. शक्य होते तिथे त्यांनी ट्रम्प ह्यांच्या विरोधात बेजबाबदारपणे आरोप तर केलेच पण पुरावे असल्याचे चित्र तयार केले. कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणाच्या चौकशीमध्ये आणि तदनंतरच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये अमेरिकन अध्यक्ष हस्तक्षेप करत नाहीत. पण हिलरी प्रकरण हा अपवाद असावा. एफ बी आय ने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाणार नाही असे चौकशी समाप्त झाल्यावरती जुलै मध्ये जाहीर केले पण ओबामा ह्यांनी त्यांच्या निरपराधित्वाची जाहीर ग्वाही एप्रिल २०१६ मध्येच दिली होती. आपल्या कृत्याने त्या अमेरिकेला नसत्या संकटात कधीच टाकणार नाहीत असे ओबामा ह्यांनी त्यांना सर्टिफिकेट देऊन टाकले होते. एका टीव्ही मुलाखतीमध्ये ते म्हणाले की हिलरींच्या हेतूंविषयी मला शंका नाही. त्यांच्या हातून इमेल्स हाताळताना निष्काळजीपणा झाला आहे आणि ही बाब आपण नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. म्हणजे कोमी ह्यांनी ओबामा ह्यांचीच री ओढली होती का? आणि ती त्यांना पटली होती की त्यांच्यावरील दडपणामुळे ते तसे बोलले असावे?
हिलरींच्या हेतूंविषयी शंका नसल्याचे जाहीर करून त्यांच्या हातून हलगर्जीपणा झाल्याचे सांगितले गेल्यामुळे हिलरीही सर्वसामान्य माणसाप्रमाणेच आहेत - ट्रम्प सांगतात तशा त्या "crooked" अप्रामाणिक नाहीत अशी प्रतिमा लोकांसमोर आणण्यात येत होती. झाली असेल हातून चूक - काहीतरी नुकसान करण्याचा त्याचा हेतू होता काय असा पहिला विचार सामान्य अमेरिकन माणसाच्या मनात येतो. त्या अर्थाने हिलरींच्या हातून छोटीशी चूक झाली आहे फार गंभीर प्रकरण नाही असे भासवले जात होते. पण वस्तिस्थिती मात्र तशी नव्हती. हिलरी ह्यांच्या सर्व्हरवरून एफबीआय ने मिळवलेल्या इमेल्स काही तरी वेगळे सांगत होत्या. एकूण ५२ इमेल् शृंखलांमध्ये गोपनीय माहिती वापरली गेली असे दिसल्याचे कोमीच सांगत होते.
(अपूर्ण)
No comments:
Post a Comment